वासूदेव

महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. पहाटे येणारा वासुदेव रामनामाचा महिमा गातो आणि दान मागतो.त्याची वेशभूषा त्याच्या प्रबोधनाला साजेशी असते. अविद्येला घालवणारा श्रीविद्येचा मोरपिसांचा मुकुट डोईवर तो चढवतो. विश्वाला व्यापणार्‍या पूर्ण ज्ञानाचा पायघोळ अंगरखा वासूदेव घालतो. ब्रह्ममाया प्रकृति पुरूष या देवोदेवीची चिपळी त्याच्या हातात असतात. नादब्रह्माचा पावा वाजवत भोग सोडून तो त्यागाचे दान मागतो.

रंगभूषा : साधी, कपाळाला गंध, डोक्यावर मोरपिसांची शंखाच्या आकाराची टोपी, पायात घुंगराचे चाळ.

वेशभूषा : धोतर, घोळदार अंगरखा, उपरणं, काखेत झोळी, कमरेला शेला.

साहित्य : बासरी – कमरेला खोचलेली.

वाद्य : टाळ, चिपळ्या.

जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला,

जनामातेला काम भारी,

घालिते दळण जात्यांवरी,

विट्ठला या हो लौकरी ॥

यावे यावे जगजेठी,

तुमच्या नावाची आवड मोठी,

खुटीला घालून मिठी,

दोन बोलू सुखाच्या गोष्टी ॥

अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला,

कर जोडोनी विनवितो तुम्हा,

तुम्ही वासुदेव म्हणा,

नको गुंतु विषय कामा,

तुम्ही आठवा मधुसुदना ॥

मराठी संतांनी वासुदेव, पांगुळ, पिंगळा, सरवदा, बाळसंतोष, जोशी या सतविचारांचे, विवेकाचे दान मागितले आहे. वासुदेव ही मराठी लोक संस्कृतितील सात्विक लोकभूमिका.

वासुदेवाला लोक संस्कृतितील भागवत संप्रदाय म्हणतात.वासुदेवाच्या रुपाने संतांनी भक्‍तिचे दान मागितले. जीवन-मुक्‍तीचा आनंद सांगितला.परमेश्वराच्या व्यापक स्वरुपाची ओळख करुन दिली. विकार मुक्‍त होऊन सत प्रवृत्तीवर वाटचाल करण्याचा मार्ग सांगितला.अंगणात येणार्‍या वासुदेवाला दान दिले की तो सर्व देवदेवतांची नावे घेत ’दान पावलं’ असं म्हणत गिरकी मारतो आणि म्हणतो………

दान पावलं दान पावलं ॥

भीमशंकरी महादेवाला ।

कोल्हापुरी महालक्ष्मीला ॥

पंढरपुरी विठुरायाला ।

जेजुरीमंदी खंडेरायाला ॥

देहुगावी तुकयाला ।

आळंदीमंदी द्न्यानोबाला ॥

पैठणमंदी एकनाथाला ।

सज्जनगडी रामदासाला ॥

सदगुरुरायाला दान पावलं ।

जनता जनार्दनाला दान पावलं ॥


  दान पावलं बाबा दान पावलं
वासुदेव आला हो वासुदेव आला
सकाळच्या पारी हरीनाम बोला || धृ ||

नाही कुणी जागं झोपलं पहारा
दु:खी जीव तुला देवाचा सहारा
तुझ्यासाठी देव वासुदेव झाला || १ ||

जागा हो माणसा संधी ही अमोल
तुझ्या रे जीवाला लाखाचं रे मोलं
घालतील वैरी अचानक घाला || २ ||

इच्चेच्या झाडाला बांधलाय घोडा
घालूनिया घावं सारे बंध तोडा
नको रे उशीर,वेळ फार झाला || ३||