- तिथी :
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी
- पार्श्वभूमी :
दसर्याविषयी पुराणात कथा प्रचलित आहेत, देवांविरूध्द राक्षसांचे घनघोर युध्द आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले होते. दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला. तो दिवस होता आश्विन शुध्द दशमीचा. विजयारूपी पार्वतीने विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात.
प्रभु श्रीराम याने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला ‘विजयादशमी’ असे नाव मिळाले आहे.
पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी.
- साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :
शमी वृक्षाची पूजा केली जाते. रामाने रावणाशी युध्द करून त्याचा वध केला व वनवासात जाताना शमीच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रास्त्रे परत ताब्यात घेतली म्हणून शमीच्या वृक्षाला या दिवशी महत्त्व आहे. वनवासाला जाताना सीतेचे सुवर्ण अलंकार आपटयाच्या झाडामधे ठेवले होते असे मानतात. म्हणून आपटयाची पाने सोने म्हणून सर्वांना वाटतात. या दिवशी वाहनांचीही पूजा करतात.
या दिवशी घरातील कर्त्या पुरूषांनी सीमोल्लंघन करावयाचे असते. सोने घेऊन देवीचे दर्शन घ्यावयाचे. घरी आल्यावर बहिणीने अथवा घरांतील मुख्य जी सवाष्ण स्त्री असेल तिच्याकडून ओवाळून घ्यायचे असा प्रघात आहे. पूर्वी साम्राज्य वर्धनाच्या दृष्टीने ज्या मोहिमा आखल्या जात त्यांची सुरुवात या दिवशीच्या सीमोल्लंघनाने होत असे.
शेतकर्यामध्ये देखील या सणाचे महत्त्व आहे. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात.
- वैशिष्ट्य :
साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा हा एक शुभ मुहूर्त होय . या दिवशी पूर्वी शिक्षणाची सुरुवात होत असल्याने या दिवशी सरस्वती पूजन करतात आणि हत्यारांचीही पूजा करतात.
दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ , घर, गाडी, बंगला, सोन्या चांदीचे दागिने यांची खरेदी या गोष्टी केल्या जातात. नवे व्यवसाय सुरु केले जातात.
उत्तर प्रदेशात या दिवशी रामलीला खेळली जाते व रावणाच्या प्रतिमेचा जाहीरपणे वध केला जातो . मुंबईतही असे जाहीर कार्यक्रम आयोजित केले जातात.
- खाद्यपदार्थ :
पुरणपोळी, तळण, खीर