आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते आणि छोट्या – मोठ्या मुलींच्या आनंदाला उधाण येते. कारण माहीत आहे ? त्या दिवसापासून त्यांच्या आवडत्या ह्दग्याची किंवा भोंडल्याची सुरुवात होते. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात झाली, कि त्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत मुली ‘हदगा’ खेळतात. याला ‘भोंडला’ असेही म्हणतात. हा सण मुलींचा विशेष आवडता आहे. या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून तिला निरनिराळ्या फळांच्या व फुलांच्या माळा घालतात. शिवाय धान्याने हत्ती काढतात. रांगोळीच्या टीपक्यांनी त्यावर झूल काढतात. रंगबेरंगी फुलांच्या माळाघालून त्याला सजवतात. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरुन छोट्या मुली, व शाळेतल्या मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.जिच्या घरी भोंडला असतो, तिची आई खिरापत करते. रोज बहुधा वेगळे घर आणि त्यामुळे वेगळी खिरापत असते. म्हणजे पहिल्या दिवशी १, दुसऱ्या दिवशी २ अशा करत करत ९ व्या दिवशी ९ + १ खिरापत असते. फेर धरताना एक छोट्या मुलींचा व १ मोठ्या मुलींचा. असे २ फेरे होतात.सर्वच मुली गाणी म्हणतात.[१] नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्व विशेष आहे. बहु उंडल असा याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते.* हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळ तांदूळाचा हत्ती मांडून त्याभोवती फेर धरून गाणे म्हणून पूजा करतात.याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार बदलते.
जुन्या काळात स्त्रिया आपल्या भावना गीतांच्या माध्यमातून व्यक्त करायच्या. सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेमाची कामे करतांना पारंपारिक गाणी गायच्या त्यांची गोडी अवीट होती म्हणूनच बहिणाबाईंची ‘आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर’ आजच्या काळातही गुणगुणावेसे वाटते. सणवार, मंगळागौर, डोहाळेजेवण, बारसे, भोंडला इत्यादी प्रसंगांना सुध्दा पारंपारिक गाणी आहेत. ह्या गाण्यांचा शोध हा विभागाचा उद्देश. आपणही आपल्यालाला अशी गाणी माहिती असल्यास marathoglobalvillage@gmail.com वर जरूर पाठवा.