ओवी (जात्यावरची गाणी) हा मराठी काव्यामधील एक छंद आहे. ओवीचे साधारणपणे दोन प्रकार आहेत. ग्रंथांमधील ओवी व लोकगीतातील ओवी. ओवीचा उगम वैदिक छंदात आणि अनुष्टुभ छंदात आढळतो असे मानले जाते.
मराठी ओवीचा उगम इसवी सन ११२९ पर्यंत मागे नेता येतो. त्या काळातल्या सोमेश्वरकृत अभिलषितार्थचिंतामणी नामक ग्रंथात ओवीचा पुढीलप्रमाणे उल्लेख आला आहे – महाराष्ट्रेषु योविद्भिरोवी गेया तु कण्डने।

महाराष्ट्रातल्या स्त्रिया कांडण व दळण करताना ओवी गातात, असा त्याचा अर्थ आहे. वरील अवतरणात ओवी ही संज्ञा छंद या अर्थी योजिली आहे. महानुभाव पंथात इसवी सनच्या १६व्या शतकाच्या अखेरीस भीष्माचार्य नामक एक ग्रंथकार झाला. त्याने मार्गप्रभाकर या आपल्या ग्रंथात दिलेले ओवीचे लक्षण असे – गायत्रीछंदापासौनी धृतिपर्यंत। ग्रंथ वोवीयांचे तीन चरण जाणावे मिश्रित। प्रतिष्ठे पासौनि जगतीपर्यंत। चौथा चरण॥

जुन्या काळात स्त्रिया आपल्या भावना गीतांच्या माध्यमातून व्यक्त करायच्या. सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेमाची कामे करतांना पारंपारिक गाणी गायच्या त्यांची गोडी अवीट होती म्हणूनच बहिणाबाईंची ‘आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर’ आजच्या काळातही गुणगुणावेसे वाटते. सणवार, मंगळागौर, डोहाळेजेवण, बारसे, भोंडला इत्यादी प्रसंगांना सुध्दा पारंपारिक गाणी आहेत. ह्या गाण्यांचा शोध हा विभागाचा उद्देश. आपणही आपल्यालाला अशी गाणी माहिती असल्यास marathoglobalvillage@gmail.com वर जरूर पाठवा.