दादासाहेब फाळके यांनी मराठी चित्रपटसृष्टीची व पर्यायाने भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. मराठी चित्रपटसृष्टी ही फाळके, व्ही. शांताराम, सचिन, लता मंगेशकर, आशा भोसले, सुलोचना, सूर्यकांत, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ इत्यादी कलाकारांची कर्मभूमी आहे.

मराठी सिनेमा म्हणजे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषेतून निर्माण केलेली एक चित्रकृती. हा भारतातील सर्वात जुना आणि अग्रेसर/पहिला चित्रपट उद्योग आहे. १८ मे १९१२ रोजी दादासाहेब तोरणे यांनी मुंबईतील कोरोनेशन सिनेमातोग्राफ येथे श्री पुंडलिक हा भारतातील पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित केला. पहिला मराठी बोलपट ‘अयोध्येचा राजा’ १९३२ मध्ये प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ‘आलम आरा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ एक वर्षात हा चित्रपट प्रदर्शित झाला.

मराठी चित्रपटसृष्टी अलीकडच्या काळात पुन्हा भरभराटीला आली आहे. चित्रपट उद्योगाचे मुंबई हे आरंभ स्थान आहे. १९१३ मध्ये प्रदर्शित झालेला दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारतातील पहिला फुल लेंग्थ फिचर असलेला मराठी चित्रपट. दरवर्षी भारत सरकारकडून चित्रपट सृष्टीतील व्यक्तींना दादासाहेब फाळके यांच्या आजीवन योगदानाबद्दल त्यांच्या स्मरणार्थ ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ दिला जातो. श्वास हा मराठी चित्रपट ऑस्करकरिता पाठवला गेला होता तसेच त्याला राष्ट्रपती पुरस्कारदेखील मिळाला होता.