वासोटो वनदुर्ग
जावळीच्या, कोयनेच्या खोऱ्यात अन् घनदाट निबीड अरण्यात सह्याद्रीच्या माथ्यावर विराट विराजमान झालेला वासोटा हा वनदुर्ग दुर्गप्रेमींसाठी नेहमीच साद घालतोय. सातारा हा जिल्हा पर्यटकांसाठी त्यातही दुर्गप्रेमींसाठी खास ठरणारा जिल्हा आहे. साताऱ्यापासून 40 कि.मी. अंतरावर बामणोली हे गाव आहे.
या ठिकाणाहून जवळच काेयनेचा शिवसागर जलाशय आहे. याच जलाशयातून नौकाविहार करत तासाभराच्या अंतरानंतर आपण पोहोचतो ते या साद घालणाऱ्या वासोट्याच्या पायथ्याच्या ठिकाणी… आणि खऱ्या धाडसी ट्रेकींगला सुरुवात होते ती इथूनच…
उंचच उंच वाढलेल्या विविध लता-वृक्षांच्या घनदाट छायेतून खाच-खळग्यातून अन् धापा टाकायला लावणारी चढणीची पायवाट आंतरिक ओढीने आपणाला घेऊन जाते ते या वासोट्याकडे. विविध पक्षांचा किलबिलाट, किटकांचा गुंजारव, मोठमोठे दगडगोटे, ओढ्या-वघळी त्यावरील प्राणीमात्रांच्या विष्ठा अन् अस्वलांच्या झाडांवरील नख्यांच्या खुणा या संपूर्ण वाटचालीत आपल्या सोबतीला असतात. बामणोलीजवळ असणाऱ्या शिवसागर जलाशयाचे पाणी आणि सह्याद्रीचा कडा यामधील भागात घनदाट अरण्य आहे.
वासोट्याच्या पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात उतरणाऱ्या खोलवर दऱ्या यामुळे वासोट्याची दुर्गमता अधिक जाणवते. हा चढाईचा मार्ग दुतर्फा पसरलेल्या घनदाट जंगलामधून जातो. या जंगलामध्ये प्रामुख्याने अस्वले, गवे आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने वाटचाल करणे आवश्यक आहे.
थोड्या अंतरावर थंडगार पाण्याचा एक ओहोळ लागतो. या शीतल पाण्याजवळ विसावा घेतल्यानंतर समोरची चढाई करायला पुन्हा अंगामध्ये उत्साह संचारतो. अर्धे अधिक मार्गक्रमण केल्यानंतर उजवीकडे नागेश्वर गुहेकडे जाणारी वाट लागते. सरळ वाटेने वर चढल्यानंतर कारवीचे जंगल लागते.
याच कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या दिसू लागतात. तासाभराच्या चढणीनंतर आपण प्रत्यक्ष किल्ल्याच्या दरवाज्याजवळ पोहोचतो आणि तेथून पाहिलेल्या निसर्गाच्या रमणीय दृश्याने आपला तासाभराच्या पायपिटीचा शिणवटा पार गायब होऊन जातो.
या किल्ल्याविषयी सातारा गॅझेटमध्ये पुढील प्रमाणे उल्लेख आढळतो, तांबी गावाच्या पश्चिमेस 8 किलोमीटरवर कोयना खोऱ्याच्या मुखाजवळ सह्याद्रीच्या एका शाखेवर वासोटा किल्ला आहे. या किल्ल्याचा उल्लेख राष्ट्रकुट नृपती अविधेय याच्या पांडरंगपल्ली ताम्रपटात वासाटा असा आलेला आहे.
किल्ल्याजवळ वासोटा नावाचे खेडे असले तरी किल्ला मेट इंदवली गावाच्या हद्दीत आहे. कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील पन्हाळ्याचा राजा भोज दुसरा (1178-1193) यांनी हा किल्ला बांधला असावा. सन 1655 मध्ये शिवरायांनी घेण्याआधी तो जावळीचे मोरे व त्याआधी शिर्केंच्या ताब्यात होता. यास शिवरायांनी दिलेले वज्रगड नाव रुढ झाले नाही. याचा उपयोग तुरुंग म्हणून केला जात होता. 1806 मध्ये दुसऱ्या बाजीरावाच्या हुकमावरुन बापू गोखल्याने पंत प्रतिनिधीस पकडून मसूरच्या गढीत ठेवले. ताई तेलिणीने फौज जमवून वासोटा किल्ला काबीज केल्यावर मसूरवर हल्ला करुन प्रतिनिधीस सोडविले; परंतु वसंतगडाच्या खाली प्रतिनिधी व गोखल्यामध्ये झालेल्या लढाईत प्रतिनिधी पुन्हा कैद झाला. तेलिण निसटून वासोट्यावर गेली.
तिच्यावर बापू गोखल्याने चाल केली. तेलिणीने 8 महिने किल्ला शिताफीने लढविला; परंतु धान्याचे कोठार जळाल्यामुळे तिचा नाईलाज होऊन ती गोखल्याच्या स्वाधीन झाली. खडकीच्या लढाईच्या दरम्यान दोन इंग्रज अमलदार मॉरिसन व हंटर निजामाचे हद्दीतून पुण्याजवळ आले असता त्यांना बापू गोखल्याने पकडून वासोटा किल्ल्यावर नेऊन कैदेत टाकले. दि. 6 मार्च 1818 रोजी हा किल्ला एल्फिन्स्टनने घेतला.
किल्ल्याच्या दरवाजामधून आत गेल्यानंतर डाव्या बाजूलाच बिन छपराचे मारुतीचे मंदिर आहे. त्यासमोरील जाणारी वाट किल्ल्यावरील भग्न अवस्थेत असणाऱ्या वाड्याजवळ घेऊन जाते. या वाड्याचा चौथरा आजही मजबूत असून कलाकुसर पहावयास मिळते. या चौथऱ्यातून आत उतरल्यावर वाड्याच्या मुख्य चौकात आपण पोहोचतो. या ठिकाणी पाण्याचे नाले पहावयास मिळतात. या वाड्यापासून काही अंतरावर म्हातारीचा अंगठा नावाने दिसणारा समोरील डोंगर आणि त्याचबाजूला नागेश्वरची गुहा पहावयास मिळते. मारुतीच्या मंदिरापासून डाव्याबाजूने जाणाऱ्या रस्त्यावरुन जाताना चुन्याच्या घाणीचे अवशेष पहायला मिळतात. या ठिकाणी काळ्या दगडापासून बनविलेले चुना तयार करणारे भलेमोठे चाक आहे.
तसेच या चाकाची मार्गिकाही या ठिकाणी आपणाला पहायला मिळते. तेथून पुढे गेल्यानंतर काळ्या कातीव दगडांपासून बांधलेले दोन जोड तलाव पहायला मिळतात. यामध्ये सध्या पाणीही आहे. या तलावापासून पुढे गेल्यानंतर गुन्हेगारांच्या कडेलोटाच्या शिक्षेसाठी प्रसिद्ध असणारा बाबू कडा पहायला मिळतो. या कड्याच्या दक्षिणेला पलिकडील डोंगरावर आदळून परत येणारे प्रतिध्वनी हे या बाबू कड्याचे आणखी एक वैशिष्ट्य होय. बाबू कड्यावरुन पाहताना जबरदस्त धडकी भरवणारी खोलवर जाणारी दरी दिसते. त्याचबरोबर निसर्गाचे विविध अविष्कारही पहायला मिळतात. या दरीजवळच्या खिंडीपलीकडे लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजे जुना वासोटा होय.
डोंगरावरील घनदाट अरण्यात उभा असलेल्या या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. या दोन्ही किल्ल्यांमध्ये बरेच अंतर आहे. या किल्ल्यामध्ये तटबंदी किवा कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. घनदाट अरण्य, वन्य श्वापदे या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे बोलले जाते.
मारुती मंदिरापासून सरळ गेल्यानंतर डाव्या बाजूला छोटे तळे लागते. येथे प्राण्यांना पाणी पिण्यासाठी केलेली सोय तेथे असणाऱ्या दगडी कुंडावरुन दिसून येते. तेथून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला दारु कोठार असून त्याची पडझड झालेली दिसते. बाजूलाच महादेवाचे मंदिर आहे. त्यास गाभारा व लहान मंडप आहे. गाभाऱ्यावर लहान शिखर देखील आहे. या परिसरात फक्त सदरेच्या इमारतींचे अवशेष आहेत आणि येथे असणाऱ्या तटभिंतीची पडझड झालेली दिसते. येथून असणाऱ्या छोट्या दरवाजातून उतरुन समोर असणाऱ्या पठारावर जाता येते.
हे पठार विस्तीर्ण असून येथे पडझड झालेली तटबंदी आहे. या ठिकाणावरुन सह्याद्रीच्या रांगा, उंचच-उंच कडे, खोलवर गेलेल्या दऱ्या आणि कारवी, अंजन, कांचन, जंगली वृक्षांची राई दिसते.
या ठिकाणावरुनही समोर असणाऱ्या डोंगरावरील म्हातारीचा अंगठा आणि नागेश्वरची गुहा पहायला मिळते. वेळ आणि शारीरिक क्षमतेच्या जोरावर वासोटा आणि नागेश्वर या दोन्ही ठिकाणांची पाहणी करता येणे शक्य आहे. या ठिकाणी राहण्याची कोणतीही सोय नाही. मात्र बामणोली येथे राहण्याची सोय आहे.
सातारा-कास-बामणोली अशा मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत. येथून वन विभागाची परवानगी घेऊन किल्ल्याकडे नौकेतून शिवसागर जलाशय ओलांडून जाता येते.
महाराष्ट्रातील दुर्गप्रेमींसाठी वासोटा हा दुर्गरत्नच आहे. वासोट्याची एकदा भ्रमंती केल्यानंतर एक वर्षानी आयुष्य वाढते, असे परिसरातील ग्रामस्थ सांगतात. यातून त्याची दुर्गमता आणि शारीरिक क्षमता वाढविणारा ट्रेक हेच बहुदा सूचित करावयाचे असेल.