बहुरूपी
लोकनाट्याचा महाराष्ट्र,गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमधे प्रचलित असणारा दुसरा प्रकार म्हणजे बहुरुपी खेळ होय. महाराष्ट्रातील लोककलांकारांपैकी एक.पूर्वीच्या काळी जेव्हा गांव वस्त्यांवर करमणुकीचे पर्याय मर्यादित होते, तेव्हा हे कलाकार कुणाची तरी हुबेहूब नक्कल करून लोकांना रिझवत असत.लोकसंस्कृतीचे उपासक या नात्याने लोक त्यांना भिक्षा घालत असत.
बहू रुपे धारणम् ! करून समाजाचे मनोरंजन करणारा तो बहुरुपी. श्रीकृष्णाच्या ज्योतिष्यरत्नमाला या ग्रंथापर्यंत बहुरुपी असल्याचे आढळून योतात.
संत तुकाराम,
“ बहुरुपे नटला नारायण
सोंग संपादुन,जैसा तैसा !”
अशा प्रकारे बहुरुपी या नावाची परंपरा सांगतात. त्याचप्रमाणे संत जनार्दन यांचे अभंग आणि समर्थ रामदासांच्या भारुडामध्येही बहुरुप्याचे वर्णन केले आहे. संगीत नृत्य आणि संवाद ही बहुरुपी खेळाची वैशिष्ठ्ये आहेत. संवादात अतिशयोक्ती,ग्राम्यता,प्रासंगिक हास्य घटना प्रसंगाचे वर्णन येते. सोंगाला भारदस्तपणा यावा म्हणून बहुरुपी टाळ,खंजीर,पेटी व तुंबडी इ. वाद्य वाजवतात.हे बहुरूपी प्रामुख्याने फौजदार, हनुमान, शंकर,बाळंतीण,राक्षस,नंदी,मोर,हाल्या,घोडा,भिल्ल,शंकर,पार्वती यांचे सोंग धारण करून गावभर फिरत.ती रूपे पाहून गावातील लोक त्यांना धान्य, पैसे वगैरे देत.लशंखासुर,भस्मासुर,विश्वमित्रसत्वहरण,इ. पौराणिक कथावरील प्रसंगाचे सादरीकरण तसच राम कृष्ण,रावण,हनुमान यांच्या पात्राच्या भूमिकाही बहुरुपी हुबेहूब सादर करत.
बहुरुप्याचे लग्नाचे गीत अतिशय प्रसिध्द आहे.
“ चला तुम्ही चला, लग्नाला चला
लग्नाची घाई,वांगी आली लई,
फोंडणाला तेल नाही,कशी करूबाई
कुत्रे घ्या काकाला,लेकरा बांधा चाकाला
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला”
अशा प्रकारे बहुरुपी आपल्या अभिनय आणि वाक्चातुर्याच्या सामर्थ्यावर आपली उपजीविका भागवत.परंतू आता आधुनिक मनोरंजनाच्या साघनांमुळे तो इतर व्यवसायांकडे वळताना आढळतो.