महाराष्ट्रातील वसाहतीचा इतिहास

महाराष्ट्राच्या वसाहतीसंबंधी एक पौराणिक आणि दुसरं ऐतिहासिक, असे दोन भिन्न मतप्रवाह आहेत. या दोन्ही मतांत काळाच्या दृष्टीने फार अंतर आहे.

पौराणिक मत :

पौराणिक दृष्टीने महाराष्ट्रातील वसाहत ऋग्वेदसूक्तांच्या संहितीकरणापूर्वी, किंबहुना ऋग्वेदात उल्लेखलेल्या दाशराज्ञ युद्धापूर्वी झाली, असं म्हणता येतं. पौराणिक मत डॉ. केतकर यांनी आपल्या प्राचीन महाराष्ट्र या ग्रंथात मांडलं आहे. महाराष्ट्राचे स्थूलमानाने अपरान्त, विदर्भ आणि दंडकारण्य असे तीन भाग पडतात. त्यांपैकी पश्चिमेकडील अपरान्त (कोकणपट्टी) भृगु आणि त्याच्या वंशजांनी फार प्राचीन काळी, म्हणजे भार्गवरामाच्या – परशुरामाच्या- अवताराच्याही पूर्वी वसवल्याचं पुराणांवरून ठरतं. कोकण म्हणजे परशुरामाची कर्मभूमी आणि परशुरामाच्या कथेशी कोकणातील कोकणस्थ, देवरुखे, हैंग, नंबुद्री इत्यादी अनेक जातींचा संबंध येतो. भडोचचे जुने नाव भृगुकच्छ असं आहे. परशुरामाचं पूजन कोकणात अनेक ठिकाणी होतं. सोपार्यात आजही परशुरामाच्या अनेक मूर्ती आहेत. पश्चिम भाग जसा भृगुंनी तसा पूर्व भाग अगस्त्यांनी वसवला. या दोन पट्ट्यांच्या मधला भाग मात्र शापदग्ध असल्याने तितकासा वसाहतयोग्य नव्हता. इक्ष्वाकुवंशातील दण्डक नावाच्या राजाने भृगुवंशातील च्यवन नावाच्या ऋषीचा अपमान केल्यामुळे ऋषीने दण्डक राजाला शाप दिला. त्या शापाच्या प्रभावाने विंध्यापासून सेतुबंधापर्यंतचा प्रांत अरण्यमय झाला. दण्डकारण्य या नावाची ही उत्पत्ती.

कोकणासंबंधी निरनिराळ्या कथा पुराणांत आहेत. सह्याद्रीच्या उपप्रांतांत आपल्या पर्वतप्राय लाटा आदळून त्याच्या उच्चत्वाच्या स्पर्धेनं सूड घेणार्या समुद्रास परशुरामाने मागे हटवून आपल्यासाठी व आपल्या यज्ञकर्मासाठी भूमी तयार केली आणि चैत्यपुलिन (चिपळूण) इथे स्थंडिल तयार करून त्यासाठी कोळ्यांच्या जाळ्यांची जानवी करून त्यांना ब्राह्मणांची दीक्षा देऊन किंवा चितेवरील प्रेतांत प्राणज्योती पेटवून त्यांना ब्राह्मण्य दिले वगैरे कथा प्रसिद्ध आहेत. या प्रांतास पूर्वी अपरान्त म्हणत असत व त्याची मर्यादाही मोठी, म्हणजे उत्तरेला आनर्तापासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत, अशी होती. या प्रांतास कोकण कधी म्हणू लागले, यासंबंधी ठाम प्रमाण मिळत नाही. नागांची जी कुळं महाभारतात सांगितली आहेत, त्यांत कुकुण असं एक कूळ आहे, आणि ते या प्रांतात खाली गोकर्णापर्यंत राहत होते, असा एक दाखला आहे. तेव्हा या कुकुण नागकुलाचा आणि कोकण या नावाचा काही संबंध असू शकतो.

कोकण या नावाची उपपत्ती आजपर्यंत पुष्कळांनी निरनिराळ्या प्रकारांनी दिली आहे. जुन्या संस्कृत आणि फारसी ग्रंथांत कोकण हा शब्द निरनिराळ्या प्रकाराने लिहिलेला आढळतो. संस्कृतात कुकुण, कुङ्कुण, कोङ्कण, कोंकण ही रूपं दिसतात, तर फारसीमध्ये केङ्केम, कंकण, कोंकम् ही रूपं दिसतात. या कोकण शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक मतप्रवाह दिसतात.

१. कोकण हा शब्द द्राविडी भाषेतून घेतला असावा.

२. कानडीत कोङ्कु असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ उंचसखल जमीन असा आहे. कोङ्कु + वन = कोङ्कुवन = कोकण अशा मार्गाने हा शब्द आला असावा.

३. फारसीमध्ये कोह (=पर्वत), कुण्ड (=खाच, खड्डा) असे दोन शब्द अहेत. कोहकुण्ड = कोकुण्ड = कोकण अशा मार्गाने हा शब्द येतो. त्याचाही अर्थ पर्वतांच्या खाचांचा प्रदेश असा होतो.

४. किम् + किण्वम् (कसली ही वनस्पती?) अशा तर्हेचा प्रश्न पहिल्या वसाहतकारांनी उन्मादक ताडीसंबंधी विचारला असावा व त्यावरून कोकण हा शब्द आला असावा.

५. कोंग नावाचे रानटी लोक प्रथम या प्रांतात वसले असावेत आणि त्यावरून या देशास कोंगवन (=कोकण) हे नाव मिळालं असावं.
कोकणाचा व इतर बाह्य प्रांतांचा व्यापाराच्या दृष्टीनं संबंध फार पुरातन काळचा आहे. इतर देशाचे व्यापारी हिंदुस्थानाशी जो व्यापार करत तो कोकणातूनच होत असे. पुष्कळ अरबी शब्द जे दक्षिणेकडील भाषांत सापडतात, ते याच काळात आले असावेत. इसवी सनापूर्वी चार शतकांपूर्वीपासून हा व्यापार चालत असावा. सह्याद्रीच्या पलीकडे असलेलं दंडकारण्य मात्र या देवघेवीपासून अलिप्त होतं. कोकणातील पुष्कळ बंदरांचा उल्लेख जुन्या लेखांमध्ये सापडतो. टोलेमी (इ. स. १५०) याच्या Geographia या भूगोलविषयक ग्रंथात सिमुल्ल (Simulla) किंवा तिमुल्ल (Timula) असा जो उल्लेख येतो, किंवा त्याही पूर्वी प्लिनीने (इ.स. २००) पेरिमल (Perimula) असा जो उल्लेख केला आहे, किंवा कान्हेरीच्या शिलालेखांत (इ. स. २००) चेमुल्ल म्हणून जे बंदर उल्लेखलेलं आहे, ते कोकणातलं चेऊल किंवा चोल होय. याशिवाय पाल, कोल, कुड, राजपुरी, घोडेगाव या गावांचाही उल्लेख आहे. उत्तरेकडचं शूर्पारक (सोपारा) हे तर मौर्यांच्या राजवटीत एक स्तूप तिथे उभारण्याइतकं महत्त्वाचं होतं. या बंदरांतून माल आत थेट नाशिक – पैठणपर्यंत पोहोचवला जात असे. काही यवन लोक बौद्धधर्म स्वीकारून कोंकणात वस्ती करून होते, असं दिसतं. कारण कान्हेरी, नाशिक, कार्ले, जुन्नर इथल्या विहारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या होत्या.

टोलेमीने कोकणाचे सौराष्ट्र – उत्तर गुजरात; लारीके – लाट, दक्षिण गुजरात; आरिआके – मराठा देश; दामरिके – दामिल, म्हणजे तामिळ लोकांचा प्रदेश असे चार विभाग केले आहेत. यांपैकी तिसरा जो आरिआके, किंवा आर्यक म्हणजे आर्यांचा प्रदेश, त्याचे टोलेमीने तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात मुंबई व दक्षिणेचा काही भाग, दुसर्या भागात उत्तर कोकण, दमणपासून खाली राजापूरपर्यंत, आणि तिसरा भागात दक्षिण कोकण नमुद केलेले होते. टोलेमी सदर भागांना अनुक्रमे Arisake Proper; Sadan’s Ariake; Pirate Ariake असे संबोधतो.

विदर्भ :

अगस्त्य ऋषींचा प्रवास, त्यांचं विदर्भ राजाच्या मुलीशी, लोपामुद्रेशी झालेले लग्न, कौंडिण्य नावाचा ऋषी, भीष्मकाची राजधानी, नलदमयंतीचा विवाह वगैरे सर्व गोष्टी पौराणिक माहितीत मोडतात. दक्षिणेकडील प्रदेशांचं आर्यीकरण सुरू झालं ते प्रथम विदर्भातच, म्हणून विदर्भाचा संबंध आर्यांच्या ग्रंथांत यावा हे साहजिकच आहे. विदर्भ हे जे नाव या प्रांताला मिळालं ते एका राजाच्या नावावरून मिळालं आहे. यदुवंशापैकीच भोज या नावाची जी एक शाखा होती, त्या शाखेचं राज्य या प्रांतावर होतं. त्या शाखेत विदर्भ भोज नावाचा एक राजा होऊन गेला व त्याच्यावरूनच या प्रदेशाला विदर्भ हे नाव मिळालं. ऋषभदेव नावाचा जो राजा होता त्याला नऊ मुलगे होते व त्यानं आपल्या नऊ पुत्रांना स्वत:चं भरतखंडाचं राज्य वाटून दिलं. जो देश ज्या पुत्रास मिळाला त्या देशास त्या मुलाच्या नावावरून नाव मिळालं. कुशावर्त, इलावर्त इत्यादी मुलांमध्ये विदर्भ नावाचाही एक मुलगा होता व त्याच्या वाट्यास हा देश आला, म्हणून त्याला त्याचं नाव मिळालं, अशीही एक कथा प्रचलित आहे. त्याच विदर्भानंतर काही पिढ्यांनी भीम आला. अजपत्नी इंदुमतीचा भाऊ भोज याच विदर्भ राजाच्या वंशातला. त्याच वंशात क्रथकैशिक, भीष्मक, रुक्मी व चंपू रामायणाचा कर्ता भोज हे सर्व होऊन गेले. या प्रांतातील स्त्रिया त्यांच्या सौंदर्याबद्दल वगैरे प्रसिद्ध असत. म्हणून इथल्या राजकुलातील कन्येशी विवाह करायला अनेक राजे उत्सुक असत. या सर्व पौराणिक संदर्भावरून इतकं स्पष्ट होतं की, विंध्यदक्षिण प्रांतात आर्यसंस्कृती सर्वप्रथम विदर्भातच रुजली. प्रथम या प्रांताचं आर्यीकरण पूर्ण झालं आणि सरस्वतीदृषद्वतीच्या काठावर जे ब्रह्मकर्म चाले, तेच ब्रह्मकर्म वर्धानदीच्या काठी सुरू झालं.

विदर्भास वर्हाड असंही म्हणतात. वर्हाड हा शब्द विदर्भावरून आला असावा, असं वाटणं साहजिक आहे, परंतु वर्हाड आणि विदर्भ हे दोन्ही शब्द वर्णपरिणतीच्या दृष्टीनं एकच समजणं अवघड आहे. अबूल फजल हा आपल्या ऐनेअकबरी या ग्रंथात वर्धातट हे या प्रांताचं नाव देतो. वाचस्पत या ग्रंथात विगता: दर्भा: – कुशा: यत: असा विदर्भ या शब्दाचा विग्रह केला आहे. राजवाडे हे त्या शब्दाचे वर्धा + आहार असे दोन भाग पाडून वर्हाड या शब्दाची व्युत्पत्ती सांगतात.

या प्रांतांचे उल्लेख फार प्राचीन काळापासून आढळून येतात. छान्दोग्योपनिषदात कौण्डिण्य नावाच्या ऋषीचा उल्लेख आहे. त्याच्या नावावरून कौण्डिण्यपूर हे गाव वसलं. हेच पुढे नलदमयंतीच्या वेळी भीष्मकाची राजधानी म्हणून प्रसिद्धीस आलं. कलिंग (पूर्वेकडील कोकणपट्टी) व अपरान्त यांचेही असेच उल्लेख सापडतात. महाराष्ट्रे तीन होती व ती अश्मक, कलिंग व अपरान्त असा उल्लेख महाभारतात आहे.

विदर्भाची विदर्भ, कैशिक, भोज, भोजकट, वर्धातट व महाराष्ट्र अशी सहा नावं आहेत व विदर्भ आणि महाराष्ट्र ही नावं समान अर्थानं वापरली आहेत. त्याला आधारही जुन्या ग्रंथांत मिळतो. राजशेखर कवीच्या बालरामायण नावाच्या नाटकात एक प्रसंग आहे. पुष्पक विमानात बसून श्रीराम, सीता व सुग्रीव हे तिघं लंकेहून परत जात असता सुग्रीव प्रत्येक देशाचं वर्णन करतो –

सुग्रीव – भरताग्रजायमग्रे महाराष्ट्रविषय: ।

राम – सोऽयम् सुभ्रु परो विदर्भविषय: सरस्वतीजन्मभू: ।

सीता – यत्रोत्पना मे पितामहश्वशुरस्य गृहिणीन्दुमती ।

त्याचप्रमाणे मुरारी हा कवीही आपल्या अनर्घ्यराघव या नाटकात इदमग्रे महाराष्ट्रमण्डलैकमण्डनं कुण्डिननाम नगरम् । असा, कुंडिननगर ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून उल्लेख करतो.

विदर्भ म्हणजे महाराष्ट्र असे जसे उल्लेख सापडतात तसेच अपरान्त म्हणजे महाराष्ट्र असे उल्लेखही सापडतात. यावरून महाराष्ट्र या देशाची व्याप्ती नीट ठरली नव्हती, असं दिसतं. महाभारतात गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उपभागांचा उल्लेख आहे. गोपराष्ट्र म्हणजे गोपांचा देश. मथुरेजवळच्या गोपांचे हे भाऊबंद असावेत. नाशिकजवळचा हा प्रदेश होता. दुसरं मल्लराष्ट्र. हे मल्ल रानटी लोक होते. त्यांचं निर्दालन खंडोबानं केलं म्हणून त्याला मल्लारी हे नाव मिळालं. मल्ल हा शब्द अनेक नावांच्या शेवटीही येतो. मल्ल याचा अर्थ पर्वत असाही होतो, तेव्हा मल्लराष्ट्र म्हणजे डोंगराळ प्रदेश, असा अर्थही संभव आहे. गोपराष्ट्राच्या खाली हे मल्लराष्ट्र होतं. पांडुराष्ट्र म्हणून जो उल्लेख येतो, तो पाण्ड्यांच्या प्रदेशाबद्दल आहे. सध्याच्या तामिळनाडूतील हा भाग. याचाही अंतर्भाव तेव्हा महाराष्ट्रात होत असावा. याशिवाय, समुद्रगुप्ताच्या एका शिलालेखात देवराष्ट्राचा उल्लेख आहे. हे देवराष्ट्र सातारा जिल्ह्यात दक्षिणेला आहे. ही सर्व राष्ट्रं व अस्मक, अपरान्त, विदर्भ मिळून महाराष्ट्र बनला होता.

आर्यांची जी वस्ती दक्षिणेस झाली ती काही एकदम व सर्व ठिकाणी सारखी अशी झाली नाही. क्रमाक्रमानं सावकाश व दीर्घ कालावधीनं जसजसं तिथलं जंगल कमी होऊन भूभाग वसाहतयोग्य होऊ लागला तसतसे आर्य आपला शिरकाव दक्षिणेत पुढे पुढे करू लागले. स्थूलमानानं व निसर्गाचे निर्बंध लक्षात घेता महाराष्ट्राचे भाग उत्तरेकडून दक्षिणेकडे नागपूर-विदर्भ, गोदाकाठ, भीमाकाठ, कृष्णाकाठ, उत्तर कोकण, दक्षिण कोकण इतके पडतात, व याच क्रमाने आर्यांनी तिथे वसाहती केल्या. याला अपवाद फक्त कोकण. देशापेक्षा फार अगोदर कोकणपट्टीवरील प्रांत वसवला गेला होता. एवढंच नव्हे तर व्यापारउदीम वगैरे व्यवहाराच्या दृष्टीनं इतर तत्कालीन देशांतील लोकांनाही तो परिचित झाला होता. शिवाय, उत्तरेचं दळणवळण कोकणाशी होण्यास तिथला मार्गही विशेष बिकट नव्हता. उत्तरेकडील आर्य किंवा पुढे जे जे लोक वसाहतीसाठी दक्षिणेत येऊ शकले ते या कोकणपट्टीच्या मार्गानेच येत. तेव्हा हा प्रांत फार अगोदर वसवला गेला, यात शंका नाही.

आर्यांच्या पूर्वी विंध्याच्या दक्षिणेस कोण लोक राहात होते व ते तेथे कुठून आले यासंबंधी संशोधकांमध्ये एकवाक्यता नाही. युरोपीय संशोधकांचा असा समज आहे की, आर्य ज्या वेळी आपल्या मूळ वसतिस्थानाहून निघाले व इतर वसाहतयोग्य प्रांतांत ठिकठिकाणी राहू लागले, त्या वेळी जशी एक लोकक्रांती झाली, तशीच जबरी लोकक्रांती मध्य आशियातून द्राविडी किंवा सुमेरी अथवा तुराणी संस्कृतीचे लोक आर्यांच्या पुष्कळ पूर्वी इतस्तत: फ़िरू लागले त्या वेळी झाली. तेच लोक आर्यांप्रमाणे हिंदुस्थानाकडे वळले आणि उत्तरेकडील पर्वतांच्या दर्याखोर्यांमधून आत शिरून राहिले. मागाहून जसजसा आर्यांचा रेटा येऊ लागला तसतसे ते उत्तरेकडील डोंगरांच्या खबदाडीत व दक्षिणेकडे विंध्यपार होऊ लागले. अशा रीतीनं दक्षिणेकडे दोन लोकांच्या निरनिराळ्या भिन्न काळी वसाहती झाल्या. एक आर्येतर द्राविडी वगैरे लोकांची आणि दुसरी आर्यांची. या दोन्ही वसाहतींचे नक्की काळ सांगणं कठीण आहे.

दक्षिणेकडील वसाहतींमध्ये काळाच्या दृष्टीनं दोन स्थूल भाग पडतात. पहिला पाणिनिपूर्व वसाहती व दुसरा पाणिन्युत्तर वसाहती. पहिल्या अनार्यांच्या व दुसर्या आर्यांच्या. सर्व अनार्य लोकांत नाग लोकांची संस्कृती उच्च समजली जात असे, व म्हणून त्यांना अनार्य म्हणणं काही संशोधकांना मान्य नाही. उत्तरेकडेसुद्धा त्यांचा आणि आर्यांचा संबंध फार आला. कुश, अर्जुन, भीम या आर्यांचे आणि नागांचे शरीरसंबंध झाले. नागांचा एक कर्कोटक नावाचा वंशज काश्मीरात राज्य करत होता. काश्मीरचा पहिला राजा असलेला नील जातीनं नाग होता असा राजतरंगिणीत उल्लेख आहे. महाभारत व इतर काही पुराणांत नागांचा उल्लेख अनेकवेळा आला आहे. बुद्धाच्या काळात नाग लोक बरेच पुढारलेले होते, कारण गौतमबुद्धानं आपल्या मताचा प्रसार या नाग लोकांमध्येच केला असल्याचं काही भित्तिचित्रांवरून स्पष्ट होतं. गौतमबुद्ध मध्ये बसलेला आणि त्याच्या भोवती कमरेवर नागाचं वेटोळं आणि डोक्यावर नागाची फणी घेतलेले असे नाग लोक बसलेले, असा देखावा या चित्रांमध्ये आहे. हे नाग लोक फार पूर्वी उत्तरेतून दक्षिणेत स्थायिक झाले होते. पाताळ हे त्यांचं वसतिस्थान असा उल्लेख म्हणूनच अनेक ग्रंथांत सापडतो. पाणिनीपूर्व काळात आर्यांच्या आधी नाग लोकांचा प्रवेश दक्षिणेत झाला. नागांचा आणि दक्षिणेकडील प्रांतांचा व विशेषत: पश्चिमेकडील कोकणाचा जास्त संबंध आला. याशिवाय गोंड, भिल्ल, वारली, कोळी, वध्र, मल्ल, काथोडी, कातकरी या एतद्देशीय लोकांच्या वसाहतीही महाराष्ट्रात होत्या.

पाणिनीपूर्व काळात आर्यांची वसाहत विंध्याच्या खाली नव्हती. कारण पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये दक्षिणेकडील कोणत्याही देशाचा उल्लेख नाही. मात्र कात्यायनाच्या वार्तिकांमध्ये व पातंजलीच्या महाभाष्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांचे स्पष्ट उल्लेख आहेत. कात्यायन व पाणिनी या दोघांमध्ये तीनशे वर्षांचा काळ होता. पाणिमीचा काळ ख्रिस्तपूर्व ७०० आहे. म्हणजे आर्यांचा दक्षिणेशी संबंध त्यानंतरचा आहे.
पाणिनीनंतरच्या काळात आर्य व त्यांच्यावर उपजीविका करणारे काही अनार्य महाराष्ट्रात आले. उत्तर भारतातील राजांच्या जुलमांना कंटाळून, धार्मिक कर्मकांडांवर आलेल्या बंधनांमुळे आणि जैन व बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक ब्राह्मणांनी देशांतर केलं. सारस्वत ब्राह्मण पश्चिमेकडील अपरान्ताच्या मार्गानं खाली उतरले तर नंबुद्री ब्राह्मण पूर्वेकडील कलिंगाच्या मार्गानं खाली उतरले. त्याच वेळी काही ब्राह्मण विदर्भात स्थायिक ज़ाले. त्यांच्यापैकी काही खाली खानदेश, नगर व नाशिक प्रांतात उतरले. खानदेश, विदर्भ या प्रांतातेल यजुर्वेदीयांची वसती जुनी असावी. नाशिक, जुन्नर, कान्हेरी येथील शिलालेखांत हे उल्लेख सापडतात.

ब्राह्मणांप्रमाणेच आर्यांपैकी क्षत्रिय, वैश्य, शूद्र व इतर घटकही दक्षिणेकडे महाराष्ट्रात आले असावे. उत्तरेकडील महापद्मादि दुष्ट शूद्र राजांच्या, जैन-बौद्धादि पाखंडांच्या व व्रात्यशूद्रादि उत्पथांच्या जुलुमाला कंटाळून स्वधर्म, स्वराज्य व स्वातंत्र्य यांचा अनुभव घेण्यास दक्षिणारण्यात बौद्धकालाच्या प्रथम ज्वानीत म्हणजे शकपूर्व सहाशेच्या सुमारास वसाहती करण्यास आर्य शिरले, असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहून ठेवलं आहे. मगधातून जे लोक आले ते महाराष्ट्रीय होत. या महाराष्ट्रीय शब्दाचाच अपभ्रंश महरट्ट असा होतो. महाराष्ट्रिक आणि महाराजिक हे एकच. यांचा उल्लेख महाराजाष्टन् या पाणिनीच्या सूत्रांत आला आहे. हे क्षत्रिय होते. यांची व पुढे उल्लेखलेल्या राष्ट्रिक व वैराष्ट्रिकांची गणराज्ये होती. त्यांत गणनायक असत. अशा तर्हेचा एक गणनायक नाणेघाटातल्या कोरीव लेण्यांत खोदला असून त्याखाली महारठीगनकयिरो (महाराष्ट्रीगणकवीर:) असा निर्देश आहे. यांची भाषा मागधी व महाराष्ट्री होती.

क्षत्रियांपैकी दक्षिणेत राष्ट्रिकही आले. अशोकाच्या शिलालेखात (इ. पू. ३२७) जे रास्टिक म्हणून उल्लेखलेले आहेत ते हे राष्ट्रिक. यांचा मूळ देश कुरुपांचल. राष्ट्रिकांनाच राजा म्हणून अभिषेक करून घेण्याची पात्रता असे आणि त्यांनाच अभिषिक्त राजे असे संबोधीत. शौरसेनी ही या राष्ट्रिकांची बोली होती. या लोकांनी आपली वसाहत दक्षिणेत बेळगावाकडे, सोलापुराकडे, स्थूलमानाने बीडपासून सौंदत्तीपर्यंतच्या टापूत केली.

वैराष्ट्रिकांचा मूळ प्रदेश उत्तर कुरू आणि उत्तर मद्र यांच्यामध्ये असणारा विराट् या नावाचा देश. पुण्याच्या दक्षिणेकडे हे वैराष्ट्रिक स्थायिक झाले. वैराष्ट्रिकांची मूळ भाषा अपभ्रंश व या भाषेसह ते खाली उतरले.

महाभारतात देशांच्या नावांची जी एक यादी दिली आहे, त्या यादीत विदर्भानंतर रूपजीविक व अश्मक ही दोन राष्ट्रं दिली आहेत. महाराष्ट्राच्या आसपासचे रूपजीविक हे लोक कोण असावेत, याबाबत नक्की सांगता येत नाही. अश्मक हे आधुनिक मराठ्यांचे पूर्वसंबंधी आहेत. त्यासंबंधीचा पुरावा आपल्याला बौद्धग्रंथांत मिळतो. बुद्धाच्या वेळी प्रसिद्ध असलेल्या ज्या सोळा जमातींची यादी बौद्धग्रंथांत दिली आहे, त्यात अश्मक हे नावही आहे. त्या वेळी अश्मक गोदावरीच्या वरच्या भागाच्या काठी राहत असत, असा उल्लेख आहे. अश्मकांची राजधानी पैठण होती.

याशिवाय भोज, महाभोज, सत्तीयपुत्त, पेत्तोनिक, केरळपुत्त, पाण्डय, चोल इत्यादी दक्षिणेकडील लोकांचा उल्लेख अशोकाच्या शिलालेखात आला आहे. भोज हे मुळचे मथुरेचे. भोसले हे आडनाव भोज या शब्दावरूनच आलं आहे. मथुरेजवळच सात्वत नावाचे लोक राहत. सत्तीयपुत्त म्हणजे सात्वतपुत्र. सात्यकी हा सात्वत कुळातच जन्मला. यादवांचा आणि सात्वतांचा संबंध होता. पेत्तेनिक म्हणजे प्रतिष्ठानचे, अर्थात पैठणकडील लोक. पाण्ड्य हे दक्षिणेकडील. त्यांचा उल्लेख कात्यायन आपल्या वार्तिकांत करतो.

वैश्यांपैकी दक्षिणेत वसाहत करण्यास जे आले त्यांच्यामध्ये मुख्य आभीर होते. आभीर मूळचे उत्तरेकडचे. ते सिंधुनदीच्या काठी राहत असत, असा महाभारतात उल्लेख आहे. त्यांचा आणि तत्कालीन आर्यांचा फारसा सलोखा नसावा. त्यांच्याकडे ते शत्रुत्वाचा नजरेनं पाहत असत. सरस्वती नदी जी एकदम अदृश्य झाली ती या आभीर लोकांच्या दुष्टपणामुळेच, परंतु त्यांचा मूळचा युद्धप्रिय असा स्वभाव असल्यानं त्यांची गणना चांगल्या योद्ध्यांमध्ये होत असे, व ते दस्यू जातीतले असूनसुद्धा त्यांचा उपयोग व्हावा म्हणून आर्य त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेण्यास उत्सुक असत, असं महाभारतात सांगितलं आहे. द्रोणाचार्यांनी जो सुवर्णव्यूह रचला त्यात या आभीर जातीच्या दस्यूंना त्यांनी प्रमुख स्थान दिलं होतं. दुसर्या एका आभीरांच्या टोळीनं अर्जुन द्वारकेहून श्रीकृष्णाच्या विधवापत्नींबरोबर परत येत असताना त्यांच्यावर हल्ला केल्याचं महाभारतात लिहिलं आहे. अभीरांना लुटारू, गवळी, गुराखी, म्लेंच्छ इत्यादी नावांनी महाभारतात संबोधलं आहे. बाप ब्राह्मण आणि आई अम्बष्ठ यांपासून झालेल्या संततीस मनुस्मृतीत आभीर असं संबोधलं आहे.

यावरून असं लक्षात येतं की, आभीर कोणीतरी कडवे, लढवय्ये, सतत फिरणारे असे लोक असावेत. आणि इतर शक, ग्रीक, यूएची, कांबोज इत्यादी जातींचे लोक जसे हिंदुस्थानात उतरले, तसे त्यांच्याबरोबर हेही उतरले असावेत, व त्यानंतर पंजाबात त्यांनी सिंधू नदीच्या काठी वस्ती केली असावी. हे साधारण इसवी सनाच्या सुरुवातीला घडलं असावं. दुसर्या व तिसर्या शतकांतील शिलालेखांत आभीरांसंबंधी उल्लेख सापडतात. इ. स. १८१मधील क्षत्रप राजा रुद्रसिंह याच्या लेखात रुद्रभूति नावाच्या त्याच्या आभीर सेनापतीचा उल्लेख आहे. शिवदत्ताचा मुलगा ईश्वरसेन हा आभीर होता अशी माहिती इ. स. ३००च्या नाशिकच्या लेण्यांतल्या शिलालेखात मिळते. इ. स. ३६०मध्ये समुद्रगुप्ताने अलाहाबाद इथे एका स्तंभावर एक लेख कोरवला होता. गुप्त साम्राज्याच्या मर्यादेपलीकडे दक्षिणेस आणि नैऋर्त्येस राजस्थान आणि माळवा प्रांतांत मालव आणि आभीर या दोन जाती नांदतात असं या लेखात म्हटलं होतं. पंजाबात सिंधू नदीच्या काठी इसवी सनाच्या सुरुवातीला आभीर लोक राहत होते, असं मानलं तर त्यांना माळव्यात पोहोचायला तीनशे वर्षं लागली. यांपैकी काही लोकांनी तिथेच स्थायिक होण्याचं ठरवलं असावं, हे नाशिकच्या शिलालेखावरून स्पष्ट होतं. झांशीच्या दक्षिणेस अहिरवाड आणि अहारवाड अशी जी दोन गावं आहेत, ती संस्कृतातील आभीरवाटिका या शब्दावरून आली आहेत. काही टोळ्यांनी इथे राज्यं स्थापन केली असावीत, आणि काही टोळ्या पुन्हा दक्षिणेस आणि पश्चिमेस गेल्या असाव्यात. कारण आठव्या शतकात ज्या वेळेस सौराष्ट्रावर हल्ला झाला त्या वेळी तो प्रांत आभीरांच्या ताब्यात होता, असं एन्थोव्हेन आपल्या Castes and Tribes in Bombay Presidency या पुस्तकात म्हणतो. हेच आभीर लोक दक्षिणेकडे आल्याचा पुरावाही तो देतो. खानदेशातील असीरगड हा अस-अहीर या आभीर जातीतल्या पुरुषानं बांधल्याचं फेरिस्ता आपल्या इतिहासात लिहितो. दक्षिणेत सहाव्या सातव्या शतकापर्यंत आंध्रभृत्य राजे राज्य करत होते. त्यांच्या राजवटीनंतर आभीरांची राजवट महाराष्ट्रात सुरू झाली, असा उल्लेख काही पुराणांत सापडतो.

पुराणांमध्ये आभीर राजे म्हणून ज्यांचा उल्लेख येतो, त्यांच्यापैकीच एक शाखा त्रैकुटकांची असावी. इ. स २५०च्या सुमारास क्षत्रप कुलानंतर त्यांचा उदय झाला. अणि हैहय या नामाभिधानानं त्यांनी आपलं राज्य स्थापन करून त्रिकुट या शहरास आपली राजधानी केली. हे घडलं इ. स. ४५५-४५६मध्ये. उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातेत त्यांनी आपला अंमल पुढे सुमारे शंभर वर्षं, चालुक्यांकडून त्यांना बाधा येईपर्यंत निर्वेध चालवला. त्रिकुट म्हणजे पुण्याजवळचं जुन्नर. अशा प्रकारे महाराष्ट्रातलं वसाहतकर्म इ. स. ६००मध्ये पूर्ण झालं.