महाराष्ट्रातील गड-किल्ले

महाराष्ट्र हा डोंगरांचा देश, दुर्गांचा देश. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे वर्णन कसे केले आहे?

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा’

अशा या राकट देशाचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर तटबुरुजांचं शेला-पागोटे चढवून उभं राहिलेलं आढळतं. यातील बहुतेक दुर्गांनी श्रीशिवछत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. त्या शिवस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. या गड-कोट-किल्ले अन् दुर्गांमधून इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. या बळीवंत दुर्गांच्या आधारावरच शिवरायांनी परकीय, आक्रमक, धर्मांध सत्ताधीशांना नामोहरम केलं आणि

या भूमंडळाचे ठायी , धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

हे समर्थ वचन सार्थ केले. दुर्ग म्हणजे काय? त्याचे प्रकार किती? महाराष्ट्रात असे किती दुर्ग आहेत? ते कुठे आहेत? तिथे पोचायचे कसे? गड किल्ले कसे पहायचे?त्यांचे महत्त्व काय? आजची त्यांची स्थिती कशी आहे? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येतात. त्यांची अभ्यासपूर्ण परंतु थोडक्यात माहिती प्रा. प्र.के. घाणेकर यांच्या सौजन्याने या विभागात दिलेली आहे. चला तर पाठीवर एक पिशवी, भक्कम बूट,बरोबर खाण्याचे काही पदार्थ आणि पाणी घेऊन गड-किल्ले सर करूयात!

किल्ला म्हणजे काय?

जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते, वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करता येतो आणि नैसर्गिक किंवा मुद्दाम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते त्याला किल्ला असे म्हणतात. किल्ले ही लढायांची ठिकाणं. रणक्षेत्रांचे हे मानकरी म्हणजे स्वातंत्र्यात्मा सह्याद्रीची आभूषणेच आहेत. या किल्ल्यांचा परिचय महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्यकाने करून घ्यायला हवा. सुट्टीच्या वेळी या किल्ल्यांना भेट द्यायलाच हवी.

किल्ल्यांचे प्रकार

रामायण, महाभारत, अग्नीपुराण, कौटिल्याचे अर्थशास्त्र, ऋग्वेद, अग्नीपुराण,अथर्ववेद,वराहमिहिराची बृहत्संहिता , मनुस्मृती अशा जुन्या ग्रंथात किल्ल्यांचे महत्व दिलेले आढळते. म्हणजे त्याही काळात आपल्या देशात किल्ले होतेच.

प्रथमं गिरीदुर्गंच , वनदुर्गं द्वितीयकम्
तृतीयं गव्हरं दुर्गं, जलदुर्गं चतुर्थकम्
पंचमं कर्दमं दुर्गं, षष्ठं स्थान्मिश्रकं
सप्तमं ग्रामदुर्गं स्यात कोष्टदुर्गं तथाष्टकम्

– देवज्ञविलास, लाला लक्ष्मीधर

लाला लक्ष्मीधराने देवज्ञविलास या ग्रंथात किल्ल्यांचे आठ प्रकार सांगितले आहेत. त्यातील सर्वात उत्कृष्ट गिरिदुर्ग – म्हणजे डोंगरी किल्ला, त्यानंतर वनदुर्ग म्हणजे अरण्यात असलेला किल्ला. गव्हरं म्हणजे एखाद्या गुहेचा उपयोग किल्ल्यासारखा करता आला तर तो तिस-या श्रेणीचा किल्ला मानला जातो. चौथ्या दर्जाचा किल्ला म्हणजे जलदुर्ग – पाण्यातला किल्ला. कर्दमं म्हणजे चिखलात किंवा दलदलीच्या प्रदेशातील किल्ला हा पाचव्या प्रतीचा तर मिश्रपध्दतीचा किल्ला म्हणजे सहाव्या प्रतीच किल्ला. संपूर्ण गावकुस किंवा गावाभोवती कोट असेल तर तो सातव्या प्रकारचा किल्ला व एखादा नुसता कोट किंवा गढी हा आठव्या प्रकारचा किल्ला.

सर्वसाधारणपणे डोंगरावर असणारा गिरिदुर्ग, समुद्रात बेटावर असणारा जंजीरा किंवा जलदुर्ग, जमिनीवर असणारा भुईकोट किंवा स्थळदुर्ग असे किल्ले आपल्याला माहीत असतात.

किल्ल्यांचे महत्व

गडकोट, किल्ले आणि दुर्ग ही संघर्षाची प्रतिके. शत्रूशी लढण्यासाठी या किल्ल्यांचा आधार घेतला जाई. ज्याच्या हाती अधिक किल्ले तो राजा आपल्या प्रजेचे जास्त चांगले संरक्षण करू शकत असे अशी शिवाजी महाराजांच्या काळी परिस्थिती होती. आपल्या पूर्वजांनी प्राणांची बाजी लावून हे गड जिंकले व शत्रूंशी ते झुंजले. महाराष्ट्राची स्वतंत्र भूमी तयार होण्याआधी शौर्याचा एक मोठा इतिहास या किल्ल्यांनी पाहिलेला आहे. त्याकाळी स्वसंरक्षणासाठी महत्व असलेले किल्ले आज आपल्या इतिहासाची, आपल्या पूर्वजांच्या शौर्याची सोनेरी पाने म्हणून आपल्याला तितकेच महत्वाचे आहेत.

आज महाराष्ट्रातील किल्ले पहायला गेले तर सगळी अवकळाच दिसते. चांगल्या परिस्थितीत असलेले तट, बुरूज आढळत नाहीत. याउलट उत्तरभारतातील किल्ले मात्र सुंदर बांधकामे, देखणी तटबंदी यांनी नटलेले दिसतात. जुलमी-परकीय आक्रमकांशी या किल्ल्यांच्या मूळ मालकांनी स्वाभिमानशून्य तडजोडी केल्यामुळे हे किल्ले शाबूत राहिले. याउलट स्वातंत्र्याच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले किल्ले कोणतीही तडजोड न करता झगडत राहिले. त्यामुळेच आजला ते किल्ले म्हणजे पडक्या वास्तू आहेत. असे असले तरी ते आपली स्फूर्तिस्थाने आहेत.

महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश…
महाराष्ट्रात आहेत तसे आणि तितके किल्ले जगात अन्यत्र नाहीतच. दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहन राजवंशापासून ते राष्ट्रकूट, चालुक्य शिलाहार, यादव, कदंब, बहमनी, मोगल, दक्षिणी पातशाह्या, मराठे, पेशवे, हबशी, पोर्तुगीज, डच,इंग्रज अशा वेगवेगळया काळातल्या वंश – धर्माच्या सत्ताधीशांनी या देशात किल्ले बांधले.

महाराष्ट्रातील गड-किल्ले

 • शिवनेरी
 • तोरणा
 • पुरंदर
 • सिंहगड
 • राजगड
 • लोहगड
 • प्रतापगड
 • पन्हाळागड
 • सज्जनगड
 • विशाळगड
 • रायगड
 • साल्हेर
 • कर्नाळा
 • वाईचा पांडवगड
 • देवगिरी
 • हरिश्चंद्रगड
 • नळदुर्ग
 • वसईकिल्ला
 • पाणकोट
 • खांदेरी
 • जंजिरा
 • विजयदुर्ग
 • सिंधुदुर्ग
 • अंजदीव
 • भुईकोट किल्ला
 • हरिहर किल्ला
 • रामसेज किल्ला
 • बोरगड