वैभवशाली महाराष्ट्र \ ऐतिहासिक महाराष्ट्र

संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार असलेल्या आचार्य अत्र्यांनी ‘माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्या राज्यांना फक्त भूगोल आहे!’, असे उद्गार काढले होते. आ ज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरं वेगाने घडत असताना महाराष्ट्र व मराठी या दोहोंच्या भविष्याची आखणी करणं गरजेचं झालं आहे. मात्र भविष्याचा वेध घेताना भूतकाळ तपासून बघणं आवश्यक ठरतं. आचार्य अत्र्यांनी उल्लेखलेल्या इतिहासाचा वेध हा महाराष्ट्राच्या व मराठीच्या भूतकाळाचा प्रवासच आहे.

महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती

‘महाराष्ट्र’ शब्दाच्या आरंभकाला डोकावल्यास आढळते की इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञांनी अनेकानेक मते मांडली आहेत.

लेखक कृ. पां. कुलकर्णी यांच्या ‘मराठी भाषा उद्गम आणि विकास’ या पुस्तकातईल लिखाअणाच्या सारंशानुसार महाराष्ट्र हे नाव तसं फार जुनं नाही. वराहमिहिराच्या ग्रंथात (इ.स. ५०५) आणि सत्याश्रय पुलकेशी याच्या इ.स. ६११ सालातील बदामीच्या शिलालेखात महाराष्ट्राचा प्रथम उल्लेख सापडतो. आपण हल्ली ज्या प्रदेशाला महाराष्ट्र म्हणतो, तो पूर्वी दक्षिणापथ या नावानं ओळखला जात असे. दक्षिणापथ म्हणजे दक्षिणेकडील मार्ग व दक्षिणेच्या मार्गावरील प्रदेश. दक्षिणेकडील प्रदेशाची नीटशी कल्पना उत्तरेकडील आर्यावर्तांत राहणार्‍या आर्यांना नसल्यामुळे त्यांनी या अज्ञात प्रदेशाला दिशादर्शक असं मोघम नाव दिलं.

दक्षिणापथ हे नाव तसं पुरातन आहे आणि ते विंध्यपर्वताच्या दक्षिण परिसराच्या खालच्या प्रदेशास लावण्याचा प्रघात होता. ख्रिस्तपूर्व काळातील पेरिप्लुस (सागरी मार्गाचे नकाशे) या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. त्यांत दक्षिणापथ या देशास Dakhinabhades असं नाव देऊन त्यांत भडोचपासून (Bargaza) द्रविड देशातील (Damiriea) व्यापारी पेठेच्या शहरांपर्यंतचा अंतर्भाव केलेला आहे. हे जे दामिरिच म्हणून शहर पेरिप्लुसांत लिहिले आहे, ते मार्कंडेय पुराणात सांगितलेलं दामरह नावाचं शहर असावं. इ. स. ३३०च्या सुमारास राज्य करणारा समुद्रगुप्त राजा आपल्या शिलालेखांत दक्षिणापथ म्हणजे नर्मदा नदीपासून थेट कन्याकुमारीचा प्रदेश असं म्हणतो. याच्या पुढचा ६०० वर्षांनंतरचा राजशेखर (इ.स. ९००-९४०) नावाचा ग्रंथकार हा आर्यावर्त आणि दक्षिणापथ या दोन प्रदेशांच्यामधील मर्यादा रेवा नदी असल्याचं सांगतो. याच काळातला चालुक्य कुळातील पहिला राजरज (इ. स. ९८५) हा दक्षिणापथाची मर्यादा नर्मदेपासून रामाच्या सेतूपर्यंत नेऊन या दोन्हींमधील प्रदेश पहिल्या विष्णुवर्धनाने (इ.स.६००) जिंकल्याचं सांगतो.

ह. श्री. शेणोलीकर यांनी अनेक मतमतांतरे लक्षात घेऊन जी माहिती दिली आहे त्यानुसार ‘महावंश’ नावाच्या बौद्ध ग्रंथात ‘थेरो महाधम्मरखिता’ यास मोगलिपुत्त तिष्याने ‘महारट्टा’स पाठविल्याचा उल्लेख आहे. सदर ग्रंथ इ. स. 500 च्या सुमाराचा आहे. हाच महाराष्ट्राचा देशवाचक असा प्राचीनतम उल्लेख आहे. महार आणि रठ्ठ (राष्ट्रिक) या दोन जातिनामांचा संयोग होऊन बनलेल्या लोकवाचक नामावरून ‘महारट्ट’ हे देशवाचक नाम तयार झाले, असा एक मतप्रवाह आहे. ‘महारांचे राष्ट्र’ ते ‘महाराष्ट्र’ अशी मोल्सवर्थ व डॉ. विल्सन यांनी सुचवलेली उपपत्ती आहे. डॉ. केतकरांनी याच उपपत्तीचा पुरस्कार केला आहे; कारण म्हार-माग; गोंड, भिल्ल, कातोडी, वारली हेच या भूभागाचे आद्य वसाहतकार होते, असे प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास सांगतो.

दक्षिणेत घुसलेल्या आर्यांनी या भागात गोप, मल्ल, पांडु, अपरान्त, विदर्भ, अश्मक अशी सहा राष्ट्रे वसवली, या सर्वांचे मिळून एकत्रित पुढे महाराष्ट्र बनले,  असाही एक मतप्रवाह आहे. ‘महंत राष्त्ड़ म्हणौनी महाराष्ट्र’ ही गुर्जर शिवबासांची व्युत्पत्ती सदर घटनेस अनुलक्षून असावी असा सदर मतप्रवाह मानतो.

नाणेघाट, भाजे, कार्ले, कान्हेरी येथील शिलालेखांत ‘महारठि’ (महारथी), ‘महारठिनी’ अशी विशेषणे आढळतात. त्यावरून या भूमीतील लोक शूर व महारथी असल्याने ‘महारटि’ या गुणवाचक शब्दावरून ‘महाराष्ट्र’ हे नाव सिद्ध झाले, अशी देखील कल्पना मांडली जाते.

महाराष्ट्रातील वसाहतीचा इतिहास

महाराष्ट्राच्या वसाहतीसंबंधी एक पौराणिक आणि दुसरं ऐतिहासिक, असे दोन भिन्न मतप्रवाह आहेत. या दोन्ही मतांत काळाच्या दृष्टीने फार अंतर आहे.

पौराणिक मत : पौराणिक दृष्टीने महाराष्ट्रातील वसाहत ऋग्वेदसूक्तांच्या संहितीकरणापूर्वी, किंबहुना ऋग्वेदात उल्लेखलेल्या दाशराज्ञ युद्धापूर्वी झाली, असं म्हणता येतं. पौराणिक मत डॉ. केतकर यांनी आपल्या प्राचीन महाराष्ट्र या ग्रंथात मांडलं आहे. महाराष्ट्राचे स्थूलमानाने अपरान्त, विदर्भ आणि दंडकारण्य असे तीन भाग पडतात. त्यांपैकी पश्चिमेकडील अपरान्त (कोकणपट्टी) भृगु आणि त्याच्या वंशजांनी फार प्राचीन काळी, म्हणजे भार्गवरामाच्या – परशुरामाच्या- अवताराच्याही पूर्वी वसवल्याचं पुराणांवरून ठरतं. कोकण म्हणजे परशुरामाची कर्मभूमी आणि परशुरामाच्या कथेशी कोकणातील कोकणस्थ, देवरुखे, हैंग, नंबुद्री इत्यादी अनेक जातींचा संबंध येतो. भडोचचे जुने नाव भृगुकच्छ असं आहे. परशुरामाचं पूजन कोकणात अनेक ठिकाणी होतं. सोपार्‍यात आजही परशुरामाच्या अनेक मूर्ती आहेत. पश्चिम भाग जसा भृगुंनी तसा पूर्व भाग अगस्त्यांनी वसवला. या दोन पट्ट्यांच्या मधला भाग मात्र शापदग्ध असल्याने तितकासा वसाहतयोग्य नव्हता. इक्ष्वाकुवंशातील दण्डक नावाच्या राजाने भृगुवंशातील च्यवन नावाच्या ऋषीचा अपमान केल्यामुळे ऋषीने दण्डक राजाला शाप दिला. त्या शापाच्या प्रभावाने विंध्यापासून सेतुबंधापर्यंतचा प्रांत अरण्यमय झाला. दण्डकारण्य या नावाची ही उत्पत्ती.

कोकणासंबंधी निरनिराळ्या कथा पुराणांत आहेत. सह्याद्रीच्या उपप्रांतांत आपल्या पर्वतप्राय लाटा आदळून त्याच्या उच्चत्वाच्या स्पर्धेनं सूड घेणार्‍या समुद्रास परशुरामाने मागे हटवून आपल्यासाठी व आपल्या यज्ञकर्मासाठी भूमी तयार केली आणि चैत्यपुलिन (चिपळूण) इथे स्थंडिल तयार करून त्यासाठी कोळ्यांच्या जाळ्यांची जानवी करून त्यांना ब्राह्मणांची दीक्षा देऊन किंवा चितेवरील प्रेतांत प्राणज्योती पेटवून त्यांना ब्राह्मण्य दिले वगैरे कथा प्रसिद्ध आहेत. या प्रांतास पूर्वी अपरान्त म्हणत असत व त्याची मर्यादाही मोठी, म्हणजे उत्तरेला आनर्तापासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत, अशी होती. या प्रांतास कोकण कधी म्हणू लागले, यासंबंधी ठाम प्रमाण मिळत नाही. नागांची जी कुळं महाभारतात सांगितली आहेत, त्यांत कुकुण असं एक कूळ आहे, आणि ते या प्रांतात खाली गोकर्णापर्यंत राहत होते, असा एक दाखला आहे. तेव्हा या कुकुण नागकुलाचा आणि कोकण या नावाचा काही संबंध असू शकतो.

कोकण या नावाची उपपत्ती आजपर्यंत पुष्कळांनी निरनिराळ्या प्रकारांनी दिली आहे. जुन्या संस्कृत आणि फारसी ग्रंथांत कोकण हा शब्द निरनिराळ्या प्रकाराने लिहिलेला आढळतो. संस्कृतात कुकुण, कुङ्कुण, कोङ्कण, कोंकण ही रूपं दिसतात, तर फारसीमध्ये केङ्केम, कंकण, कोंकम् ही रूपं दिसतात. या कोकण शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक मतप्रवाह दिसतात.

१. कोकण हा शब्द द्राविडी भाषेतून घेतला असावा.

२. कानडीत कोङ्कु असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ उंचसखल जमीन असा आहे. कोङ्कु + वन = कोङ्कुवन = कोकण अशा मार्गाने हा शब्द आला असावा.

३. फारसीमध्ये कोह (=पर्वत), कुण्ड (=खाच, खड्डा) असे दोन शब्द अहेत. कोहकुण्ड = कोकुण्ड = कोकण अशा मार्गाने हा शब्द येतो. त्याचाही अर्थ पर्वतांच्या खाचांचा प्रदेश असा होतो.

४. किम् + किण्वम् (कसली ही वनस्पती?) अशा तर्‍हेचा प्रश्न पहिल्या वसाहतकारांनी उन्मादक ताडीसंबंधी विचारला असावा व त्यावरून कोकण हा शब्द आला असावा.

५. कोंग नावाचे रानटी लोक प्रथम या प्रांतात वसले असावेत आणि त्यावरून या देशास कोंगवन (=कोकण) हे नाव मिळालं असावं.

कोकणाचा व इतर बाह्य प्रांतांचा व्यापाराच्या दृष्टीनं संबंध फार पुरातन काळचा आहे. इतर देशाचे व्यापारी हिंदुस्थानाशी जो व्यापार करत तो कोकणातूनच होत असे. पुष्कळ अरबी शब्द जे दक्षिणेकडील भाषांत सापडतात, ते याच काळात आले असावेत. इसवी सनापूर्वी चार शतकांपूर्वीपासून हा व्यापार चालत असावा. सह्याद्रीच्या पलीकडे असलेलं दंडकारण्य मात्र या देवघेवीपासून अलिप्त होतं. कोकणातील पुष्कळ बंदरांचा उल्लेख जुन्या लेखांमध्ये सापडतो. टोलेमी (इ. स. १५०) याच्या Geographia या भूगोलविषयक ग्रंथात सिमुल्ल (Simulla) किंवा तिमुल्ल (Timula) असा जो उल्लेख येतो, किंवा त्याही पूर्वी प्लिनीने (इ.स. २००) पेरिमल (Perimula) असा जो उल्लेख केला आहे, किंवा कान्हेरीच्या शिलालेखांत (इ. स. २००) चेमुल्ल म्हणून जे बंदर उल्लेखलेलं आहे, ते कोकणातलं चेऊल किंवा चोल होय. याशिवाय पाल, कोल, कुड, राजपुरी, घोडेगाव या गावांचाही उल्लेख आहे. उत्तरेकडचं शूर्पारक (सोपारा) हे तर मौर्यांच्या राजवटीत एक स्तूप तिथे उभारण्याइतकं महत्त्वाचं होतं. या बंदरांतून माल आत थेट नाशिक – पैठणपर्यंत पोहोचवला जात असे. काही यवन लोक बौद्धधर्म स्वीकारून कोंकणात वस्ती करून होते, असं दिसतं. कारण कान्हेरी, नाशिक, कार्ले, जुन्नर इथल्या विहारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या होत्या.

टोलेमीने कोकणाचे सौराष्ट्र – उत्तर गुजरात; लारीके – लाट, दक्षिण गुजरात; आरिआके – मराठा देश; दामरिके – दामिल, म्हणजे तामिळ लोकांचा प्रदेश असे चार विभाग केले आहेत. यांपैकी तिसरा जो आरिआके, किंवा आर्यक म्हणजे आर्यांचा प्रदेश, त्याचे टोलेमीने तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात मुंबई व दक्षिणेचा काही भाग, दुसर्‍या भागात उत्तर कोकण, दमणपासून खाली राजापूरपर्यंत, आणि तिसरा भागात दक्षिण कोकण नमुद केलेले होते. टोलेमी सदर भागांना अनुक्रमे Arisake Proper; Sadan’s Ariake; Pirate Ariake असे संबोधतो.

विदर्भ – अगस्त्य ऋषींचा प्रवास, त्यांचं विदर्भ राजाच्या मुलीशी, लोपामुद्रेशी झालेले लग्न, कौंडिण्य नावाचा ऋषी, भीष्मकाची राजधानी, नलदमयंतीचा विवाह वगैरे सर्व गोष्टी पौराणिक माहितीत मोडतात. दक्षिणेकडील प्रदेशांचं आर्यीकरण सुरू झालं ते प्रथम विदर्भातच, म्हणून विदर्भाचा संबंध आर्यांच्या ग्रंथांत यावा हे साहजिकच आहे. विदर्भ हे जे नाव या प्रांताला मिळालं ते एका राजाच्या नावावरून मिळालं आहे. यदुवंशापैकीच भोज या नावाची जी एक शाखा होती, त्या शाखेचं राज्य या प्रांतावर होतं. त्या शाखेत विदर्भ भोज नावाचा एक राजा होऊन गेला व त्याच्यावरूनच या प्रदेशाला विदर्भ हे नाव मिळालं. ऋषभदेव नावाचा जो राजा होता त्याला नऊ मुलगे होते व त्यानं आपल्या नऊ पुत्रांना स्वत:चं भरतखंडाचं राज्य वाटून दिलं. जो देश ज्या पुत्रास मिळाला त्या देशास त्या मुलाच्या नावावरून नाव मिळालं. कुशावर्त, इलावर्त इत्यादी मुलांमध्ये विदर्भ नावाचाही एक मुलगा होता व त्याच्या वाट्यास हा देश आला, म्हणून त्याला त्याचं नाव मिळालं, अशीही एक कथा प्रचलित आहे. त्याच विदर्भानंतर काही पिढ्यांनी भीम आला. अजपत्नी इंदुमतीचा भाऊ भोज याच विदर्भ राजाच्या वंशातला. त्याच वंशात क्रथकैशिक, भीष्मक, रुक्मी व चंपू रामायणाचा कर्ता भोज हे सर्व होऊन गेले. या प्रांतातील स्त्रिया त्यांच्या सौंदर्याबद्दल वगैरे प्रसिद्ध असत. म्हणून इथल्या राजकुलातील कन्येशी विवाह करायला अनेक राजे उत्सुक असत. या सर्व पौराणिक संदर्भावरून इतकं स्पष्ट होतं की, विंध्यदक्षिण प्रांतात आर्यसंस्कृती सर्वप्रथम विदर्भातच रुजली. प्रथम या प्रांताचं आर्यीकरण पूर्ण झालं आणि सरस्वतीदृषद्वतीच्या काठावर जे ब्रह्मकर्म चाले, तेच ब्रह्मकर्म वर्धानदीच्या काठी सुरू झालं.

विदर्भास वर्‍हाड असंही म्हणतात. वर्‍हाड हा शब्द विदर्भावरून आला असावा, असं वाटणं साहजिक आहे, परंतु वर्‍हाड आणि विदर्भ हे दोन्ही शब्द वर्णपरिणतीच्या दृष्टीनं एकच समजणं अवघड आहे. अबूल फजल हा आपल्या ऐनेअकबरी या ग्रंथात वर्धातट हे या प्रांताचं नाव देतो. वाचस्पत या ग्रंथात विगता: दर्भा: – कुशा: यत: असा विदर्भ या शब्दाचा विग्रह केला आहे. राजवाडे हे त्या शब्दाचे वर्धा + आहार असे दोन भाग पाडून वर्‍हाड या शब्दाची व्युत्पत्ती सांगतात.

या प्रांतांचे उल्लेख फार प्राचीन काळापासून आढळून येतात. छान्दोग्योपनिषदात कौण्डिण्य नावाच्या ऋषीचा उल्लेख आहे. त्याच्या नावावरून कौण्डिण्यपूर हे गाव वसलं. हेच पुढे नलदमयंतीच्या वेळी भीष्मकाची राजधानी म्हणून प्रसिद्धीस आलं. कलिंग (पूर्वेकडील कोकणपट्टी) व अपरान्त यांचेही असेच उल्लेख सापडतात. महाराष्ट्रे तीन होती व ती अश्मक, कलिंग व अपरान्त असा उल्लेख महाभारतात आहे.

विदर्भाची विदर्भ, कैशिक, भोज, भोजकट, वर्धातट व महाराष्ट्र अशी सहा नावं आहेत व विदर्भ आणि महाराष्ट्र ही नावं समान अर्थानं वापरली आहेत. त्याला आधारही जुन्या ग्रंथांत मिळतो. राजशेखर कवीच्या बालरामायण नावाच्या नाटकात एक प्रसंग आहे. पुष्पक विमानात बसून श्रीराम, सीता व सुग्रीव हे तिघं लंकेहून परत जात असता सुग्रीव प्रत्येक देशाचं वर्णन करतो –

सुग्रीव – भरताग्रजायमग्रे महाराष्ट्रविषय: ।

राम – सोऽयम् सुभ्रु परो विदर्भविषय: सरस्वतीजन्मभू: ।

सीता – यत्रोत्पना मे पितामहश्वशुरस्य गृहिणीन्दुमती ।

त्याचप्रमाणे मुरारी हा कवीही आपल्या अनर्घ्यराघव या नाटकात इदमग्रे महाराष्ट्रमण्डलैकमण्डनं कुण्डिननाम नगरम् । असा, कुंडिननगर ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून उल्लेख करतो.

विदर्भ म्हणजे महाराष्ट्र असे जसे उल्लेख सापडतात तसेच अपरान्त म्हणजे महाराष्ट्र असे उल्लेखही सापडतात. यावरून महाराष्ट्र या देशाची व्याप्ती नीट ठरली नव्हती, असं दिसतं. महाभारतात गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उपभागांचा उल्लेख आहे. गोपराष्ट्र म्हणजे गोपांचा देश. मथुरेजवळच्या गोपांचे हे भाऊबंद असावेत. नाशिकजवळचा हा प्रदेश होता. दुसरं मल्लराष्ट्र. हे मल्ल रानटी लोक होते. त्यांचं निर्दालन खंडोबानं केलं म्हणून त्याला मल्लारी हे नाव मिळालं. मल्ल हा शब्द अनेक नावांच्या शेवटीही येतो. मल्ल याचा अर्थ पर्वत असाही होतो, तेव्हा मल्लराष्ट्र म्हणजे डोंगराळ प्रदेश, असा अर्थही संभव आहे. गोपराष्ट्राच्या खाली हे मल्लराष्ट्र होतं. पांडुराष्ट्र म्हणून जो उल्लेख येतो, तो पाण्ड्यांच्या प्रदेशाबद्दल आहे. सध्याच्या तामिळनाडूतील हा भाग. याचाही अंतर्भाव तेव्हा महाराष्ट्रात होत असावा. याशिवाय, समुद्रगुप्ताच्या एका शिलालेखात देवराष्ट्राचा उल्लेख आहे. हे देवराष्ट्र सातारा जिल्ह्यात दक्षिणेला आहे. ही सर्व राष्ट्रं व अस्मक, अपरान्त, विदर्भ मिळून महाराष्ट्र बनला होता.

आर्यांची जी वस्ती दक्षिणेस झाली ती काही एकदम व सर्व ठिकाणी सारखी अशी झाली नाही. क्रमाक्रमानं सावकाश व दीर्घ कालावधीनं जसजसं तिथलं जंगल कमी होऊन भूभाग वसाहतयोग्य होऊ लागला तसतसे आर्य आपला शिरकाव दक्षिणेत पुढे पुढे करू लागले. स्थूलमानानं व निसर्गाचे निर्बंध लक्षात घेता महाराष्ट्राचे भाग उत्तरेकडून दक्षिणेकडे नागपूर-विदर्भ, गोदाकाठ, भीमाकाठ, कृष्णाकाठ, उत्तर कोकण, दक्षिण कोकण इतके पडतात, व याच क्रमाने आर्यांनी तिथे वसाहती केल्या. याला अपवाद फक्त कोकण. देशापेक्षा फार अगोदर कोकणपट्टीवरील प्रांत वसवला गेला होता. एवढंच नव्हे तर व्यापारउदीम वगैरे व्यवहाराच्या दृष्टीनं इतर तत्कालीन देशांतील लोकांनाही तो परिचित झाला होता. शिवाय, उत्तरेचं दळणवळण कोकणाशी होण्यास तिथला मार्गही विशेष बिकट नव्हता. उत्तरेकडील आर्य किंवा पुढे जे जे लोक वसाहतीसाठी दक्षिणेत येऊ शकले ते या कोकणपट्टीच्या मार्गानेच येत. तेव्हा हा प्रांत फार अगोदर वसवला गेला, यात शंका नाही.

आर्यांच्या पूर्वी विंध्याच्या दक्षिणेस कोण लोक राहात होते व ते तेथे कुठून आले यासंबंधी संशोधकांमध्ये एकवाक्यता नाही. युरोपीय संशोधकांचा असा समज आहे की, आर्य ज्या वेळी आपल्या मूळ वसतिस्थानाहून निघाले व इतर वसाहतयोग्य प्रांतांत ठिकठिकाणी राहू लागले, त्या वेळी जशी एक लोकक्रांती झाली, तशीच जबरी लोकक्रांती मध्य आशियातून द्राविडी किंवा सुमेरी अथवा तुराणी संस्कृतीचे लोक आर्यांच्या पुष्कळ पूर्वी इतस्तत: फ़िरू लागले त्या वेळी झाली. तेच लोक आर्यांप्रमाणे हिंदुस्थानाकडे वळले आणि उत्तरेकडील पर्वतांच्या दर्‍याखोर्‍यांमधून आत शिरून राहिले. मागाहून जसजसा आर्यांचा रेटा येऊ लागला तसतसे ते उत्तरेकडील डोंगरांच्या खबदाडीत व दक्षिणेकडे विंध्यपार होऊ लागले. अशा रीतीनं दक्षिणेकडे दोन लोकांच्या निरनिराळ्या भिन्न काळी वसाहती झाल्या. एक आर्येतर द्राविडी वगैरे लोकांची आणि दुसरी आर्यांची. या दोन्ही वसाहतींचे नक्की काळ सांगणं कठीण आहे.

दक्षिणेकडील वसाहतींमध्ये काळाच्या दृष्टीनं दोन स्थूल भाग पडतात. पहिला पाणिनिपूर्व वसाहती व दुसरा पाणिन्युत्तर वसाहती. पहिल्या अनार्यांच्या व दुसर्‍या आर्यांच्या. सर्व अनार्य लोकांत नाग लोकांची संस्कृती उच्च समजली जात असे, व म्हणून त्यांना अनार्य म्हणणं काही संशोधकांना मान्य नाही. उत्तरेकडेसुद्धा त्यांचा आणि आर्यांचा संबंध फार आला. कुश, अर्जुन, भीम या आर्यांचे आणि नागांचे शरीरसंबंध झाले. नागांचा एक कर्कोटक नावाचा वंशज काश्मीरात राज्य करत होता. काश्मीरचा पहिला राजा असलेला नील जातीनं नाग होता असा राजतरंगिणीत उल्लेख आहे. महाभारत व इतर काही पुराणांत नागांचा उल्लेख अनेकवेळा आला आहे. बुद्धाच्या काळात नाग लोक बरेच पुढारलेले होते, कारण गौतमबुद्धानं आपल्या मताचा प्रसार या नाग लोकांमध्येच केला असल्याचं काही भित्तिचित्रांवरून स्पष्ट होतं. गौतमबुद्ध मध्ये बसलेला आणि त्याच्या भोवती कमरेवर नागाचं वेटोळं आणि डोक्यावर नागाची फणी घेतलेले असे नाग लोक बसलेले, असा देखावा या चित्रांमध्ये आहे. हे नाग लोक फार पूर्वी उत्तरेतून दक्षिणेत स्थायिक झाले होते. पाताळ हे त्यांचं वसतिस्थान असा उल्लेख म्हणूनच अनेक ग्रंथांत सापडतो. पाणिनीपूर्व काळात आर्यांच्या आधी नाग लोकांचा प्रवेश दक्षिणेत झाला. नागांचा आणि दक्षिणेकडील प्रांतांचा व विशेषत: पश्चिमेकडील कोकणाचा जास्त संबंध आला. याशिवाय गोंड, भिल्ल, वारली, कोळी, वध्र, मल्ल, काथोडी, कातकरी या एतद्देशीय लोकांच्या वसाहतीही महाराष्ट्रात होत्या.

पाणिनीपूर्व काळात आर्यांची वसाहत विंध्याच्या खाली नव्हती. कारण पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये दक्षिणेकडील कोणत्याही देशाचा उल्लेख नाही. मात्र कात्यायनाच्या वार्तिकांमध्ये व पातंजलीच्या महाभाष्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांचे स्पष्ट उल्लेख आहेत. कात्यायन व पाणिनी या दोघांमध्ये तीनशे वर्षांचा काळ होता. पाणिमीचा काळ ख्रिस्तपूर्व ७०० आहे. म्हणजे आर्यांचा दक्षिणेशी संबंध त्यानंतरचा आहे.

पाणिनीनंतरच्या काळात आर्य व त्यांच्यावर उपजीविका करणारे काही अनार्य महाराष्ट्रात आले. उत्तर भारतातील राजांच्या जुलमांना कंटाळून, धार्मिक कर्मकांडांवर आलेल्या बंधनांमुळे आणि जैन व बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक ब्राह्मणांनी देशांतर केलं. सारस्वत ब्राह्मण पश्चिमेकडील अपरान्ताच्या मार्गानं खाली उतरले तर नंबुद्री ब्राह्मण पूर्वेकडील कलिंगाच्या मार्गानं खाली उतरले. त्याच वेळी काही ब्राह्मण विदर्भात स्थायिक ज़ाले. त्यांच्यापैकी काही खाली खानदेश, नगर व नाशिक प्रांतात उतरले. खानदेश, विदर्भ या प्रांतातेल यजुर्वेदीयांची वसती जुनी असावी. नाशिक, जुन्नर, कान्हेरी येथील शिलालेखांत हे उल्लेख सापडतात.

ब्राह्मणांप्रमाणेच आर्यांपैकी क्षत्रिय, वैश्य, शूद्र व इतर घटकही दक्षिणेकडे महाराष्ट्रात आले असावे. उत्तरेकडील महापद्मादि दुष्ट शूद्र राजांच्या, जैन-बौद्धादि पाखंडांच्या व व्रात्यशूद्रादि उत्पथांच्या जुलुमाला कंटाळून स्वधर्म, स्वराज्य व स्वातंत्र्य यांचा अनुभव घेण्यास दक्षिणारण्यात बौद्धकालाच्या प्रथम ज्वानीत म्हणजे शकपूर्व सहाशेच्या सुमारास वसाहती करण्यास आर्य शिरले, असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहून ठेवलं आहे. मगधातून जे लोक आले ते महाराष्ट्रीय होत. या महाराष्ट्रीय शब्दाचाच अपभ्रंश महरट्ट असा होतो. महाराष्ट्रिक आणि महाराजिक हे एकच. यांचा उल्लेख महाराजाष्टन् या पाणिनीच्या सूत्रांत आला आहे. हे क्षत्रिय होते. यांची व पुढे उल्लेखलेल्या राष्ट्रिक व वैराष्ट्रिकांची गणराज्ये होती. त्यांत गणनायक असत. अशा तर्‍हेचा एक गणनायक नाणेघाटातल्या कोरीव लेण्यांत खोदला असून त्याखाली महारठीगनकयिरो (महाराष्ट्रीगणकवीर:) असा निर्देश आहे. यांची भाषा मागधी व महाराष्ट्री होती.

क्षत्रियांपैकी दक्षिणेत राष्ट्रिकही आले. अशोकाच्या शिलालेखात (इ. पू. ३२७) जे रास्टिक म्हणून उल्लेखलेले आहेत ते हे राष्ट्रिक. यांचा मूळ देश कुरुपांचल. राष्ट्रिकांनाच राजा म्हणून अभिषेक करून घेण्याची पात्रता असे आणि त्यांनाच अभिषिक्त राजे असे संबोधीत. शौरसेनी ही या राष्ट्रिकांची बोली होती. या लोकांनी आपली वसाहत दक्षिणेत बेळगावाकडे, सोलापुराकडे, स्थूलमानाने बीडपासून सौंदत्तीपर्यंतच्या टापूत केली.

वैराष्ट्रिकांचा मूळ प्रदेश उत्तर कुरू आणि उत्तर मद्र यांच्यामध्ये असणारा विराट् या नावाचा देश. पुण्याच्या दक्षिणेकडे हे वैराष्ट्रिक स्थायिक झाले. वैराष्ट्रिकांची मूळ भाषा अपभ्रंश व या भाषेसह ते खाली उतरले.

महाभारतात देशांच्या नावांची जी एक यादी दिली आहे, त्या यादीत विदर्भानंतर रूपजीविक व अश्मक ही दोन राष्ट्रं दिली आहेत. महाराष्ट्राच्या आसपासचे रूपजीविक हे लोक कोण असावेत, याबाबत नक्की सांगता येत नाही. अश्मक हे आधुनिक मराठ्यांचे पूर्वसंबंधी आहेत. त्यासंबंधीचा पुरावा आपल्याला बौद्धग्रंथांत मिळतो. बुद्धाच्या वेळी प्रसिद्ध असलेल्या ज्या सोळा जमातींची यादी बौद्धग्रंथांत दिली आहे, त्यात अश्मक हे नावही आहे. त्या वेळी अश्मक गोदावरीच्या वरच्या भागाच्या काठी राहत असत, असा उल्लेख आहे. अश्मकांची राजधानी पैठण होती.

याशिवाय भोज, महाभोज, सत्तीयपुत्त, पेत्तोनिक, केरळपुत्त, पाण्डय, चोल इत्यादी दक्षिणेकडील लोकांचा उल्लेख अशोकाच्या शिलालेखात आला आहे. भोज हे मुळचे मथुरेचे. भोसले हे आडनाव भोज या शब्दावरूनच आलं आहे. मथुरेजवळच सात्वत नावाचे लोक राहत. सत्तीयपुत्त म्हणजे सात्वतपुत्र. सात्यकी हा सात्वत कुळातच जन्मला. यादवांचा आणि सात्वतांचा संबंध होता. पेत्तेनिक म्हणजे प्रतिष्ठानचे, अर्थात पैठणकडील लोक. पाण्ड्य हे दक्षिणेकडील. त्यांचा उल्लेख कात्यायन आपल्या वार्तिकांत करतो.

वैश्यांपैकी दक्षिणेत वसाहत करण्यास जे आले त्यांच्यामध्ये मुख्य आभीर होते. आभीर मूळचे उत्तरेकडचे. ते सिंधुनदीच्या काठी राहत असत, असा महाभारतात उल्लेख आहे. त्यांचा आणि तत्कालीन आर्यांचा फारसा सलोखा नसावा. त्यांच्याकडे ते शत्रुत्वाचा नजरेनं पाहत असत. सरस्वती नदी जी एकदम अदृश्य झाली ती या आभीर लोकांच्या दुष्टपणामुळेच, परंतु त्यांचा मूळचा युद्धप्रिय असा स्वभाव असल्यानं त्यांची गणना चांगल्या योद्ध्यांमध्ये होत असे, व ते दस्यू जातीतले असूनसुद्धा त्यांचा उपयोग व्हावा म्हणून आर्य त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेण्यास उत्सुक असत, असं महाभारतात सांगितलं आहे. द्रोणाचार्यांनी जो सुवर्णव्यूह रचला त्यात या आभीर जातीच्या दस्यूंना त्यांनी प्रमुख स्थान दिलं होतं. दुसर्‍या एका आभीरांच्या टोळीनं अर्जुन द्वारकेहून श्रीकृष्णाच्या विधवापत्नींबरोबर परत येत असताना त्यांच्यावर हल्ला केल्याचं महाभारतात लिहिलं आहे. अभीरांना लुटारू, गवळी, गुराखी, म्लेंच्छ इत्यादी नावांनी महाभारतात संबोधलं आहे. बाप ब्राह्मण आणि आई अम्बष्ठ यांपासून झालेल्या संततीस मनुस्मृतीत आभीर असं संबोधलं आहे.

यावरून असं लक्षात येतं की, आभीर कोणीतरी कडवे, लढवय्ये, सतत फिरणारे असे लोक असावेत. आणि इतर शक, ग्रीक, यूएची, कांबोज इत्यादी जातींचे लोक जसे हिंदुस्थानात उतरले, तसे त्यांच्याबरोबर हेही उतरले असावेत, व त्यानंतर पंजाबात त्यांनी सिंधू नदीच्या काठी वस्ती केली असावी. हे साधारण इसवी सनाच्या सुरुवातीला घडलं असावं. दुसर्‍या व तिसर्‍या शतकांतील शिलालेखांत आभीरांसंबंधी उल्लेख सापडतात. इ. स. १८१मधील क्षत्रप राजा रुद्रसिंह याच्या लेखात रुद्रभूति नावाच्या त्याच्या आभीर सेनापतीचा उल्लेख आहे. शिवदत्ताचा मुलगा ईश्वरसेन हा आभीर होता अशी माहिती इ. स. ३००च्या नाशिकच्या लेण्यांतल्या शिलालेखात मिळते. इ. स. ३६०मध्ये समुद्रगुप्ताने अलाहाबाद इथे एका स्तंभावर एक लेख कोरवला होता. गुप्त साम्राज्याच्या मर्यादेपलीकडे दक्षिणेस आणि नैऋर्त्येस राजस्थान आणि माळवा प्रांतांत मालव आणि आभीर या दोन जाती नांदतात असं या लेखात म्हटलं होतं. पंजाबात सिंधू नदीच्या काठी इसवी सनाच्या सुरुवातीला आभीर लोक राहत होते, असं मानलं तर त्यांना माळव्यात पोहोचायला तीनशे वर्षं लागली. यांपैकी काही लोकांनी तिथेच स्थायिक होण्याचं ठरवलं असावं, हे नाशिकच्या शिलालेखावरून स्पष्ट होतं. झांशीच्या दक्षिणेस अहिरवाड आणि अहारवाड अशी जी दोन गावं आहेत, ती संस्कृतातील आभीरवाटिका या शब्दावरून आली आहेत. काही टोळ्यांनी इथे राज्यं स्थापन केली असावीत, आणि काही टोळ्या पुन्हा दक्षिणेस आणि पश्चिमेस गेल्या असाव्यात. कारण आठव्या शतकात ज्या वेळेस सौराष्ट्रावर हल्ला झाला त्या वेळी तो प्रांत आभीरांच्या ताब्यात होता, असं एन्थोव्हेन आपल्या Castes and Tribes in Bombay Presidency या पुस्तकात म्हणतो. हेच आभीर लोक दक्षिणेकडे आल्याचा पुरावाही तो देतो. खानदेशातील असीरगड हा अस-अहीर या आभीर जातीतल्या पुरुषानं बांधल्याचं फेरिस्ता आपल्या इतिहासात लिहितो. दक्षिणेत सहाव्या सातव्या शतकापर्यंत आंध्रभृत्य राजे राज्य करत होते. त्यांच्या राजवटीनंतर आभीरांची राजवट महाराष्ट्रात सुरू झाली, असा उल्लेख काही पुराणांत सापडतो.

पुराणांमध्ये आभीर राजे म्हणून ज्यांचा उल्लेख येतो, त्यांच्यापैकीच एक शाखा त्रैकुटकांची असावी. इ. स २५०च्या सुमारास क्षत्रप कुलानंतर त्यांचा उदय झाला. अणि हैहय या नामाभिधानानं त्यांनी आपलं राज्य स्थापन करून त्रिकुट या शहरास आपली राजधानी केली. हे घडलं इ. स. ४५५-४५६मध्ये. उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातेत त्यांनी आपला अंमल पुढे सुमारे शंभर वर्षं, चालुक्यांकडून त्यांना बाधा येईपर्यंत निर्वेध चालवला. त्रिकुट म्हणजे पुण्याजवळचं जुन्नर. अशा प्रकारे महाराष्ट्रातलं वसाहतकर्म इ. स. ६००मध्ये पूर्ण झालं.

महाराष्ट्रातील राजसत्तेचा इतिहास

महाराष्ट्रावर पहिली सत्ता मौर्यांची होती. याबद्दल ठोस असा पुरावा शिलालेखांतून मिळतो. सम्राट अशोकाने आपल्या स्वभावात नैतिक परिवर्तन झाल्याचे लेख आपल्या साम्राज्याच्या चारही टोकांवर प्रजेचे मन हिंसेपासून वळवण्यासाठी त्या त्या प्रांताच्या बोलींत खोदवले होते. या लेखांपैकी एक ठाणे जिल्ह्यात सोपारा इथे, दुसरा महाराष्ट्राच्या पूर्व सरहद्दीवर जबलपुराकडे रुपनाथ इथे, तिसरा आग्नेयीच्या कोपर्‍यात मस्की इथे आणि चौथा महाराष्ट्राच्या दक्षिण टोकास सिद्धापूर इथे, असे महाराष्ट्राच्या चार सीमांतांवर खोदवले आहेत. यावरून हा प्रांत अशोकाच्या साम्राज्यात येत असावा. अशोकानंतरच्या बिंदुसार राजाने जरी आक्रमण केलं नाही तरी पुढच्या चंद्रगुप्त मौर्याची सत्ता महाराष्ट्रावर होती. मौर्यसत्तेचा व मौर्य घराण्याचा स्मृत्यवशेष मोरे या आडनावात राहिला आहे. मौर्यांची सत्ता ख्रिस्तपूर्व ३२१पासून १८४पर्यंत होती.

मौर्यांच्यानंतर ख्रिस्तपूर्व एक दोन शतकांपासून ख्रिस्तोत्तर दोन शतकांपर्यंत सातवाहन अथवा आंध्रभृत्य या राजांचा अंमल महाराष्ट्रावर होता. हे घराणे सनातनी होते की अन्यधर्मीय परके होते यासंबंधी मतभेद आहेत. इतिहासाचार्य राजवाडे त्यांना हिंदुधर्माचे कट्टर पुरस्कर्ते मानतात. ते अळूची भाजी व भात खाणारे, त्यांच्या रथाच्या बैलांचे कान फाडलेले आणि आंध्र राजांचे सेवक म्हणवणारे असे होते, अशा अर्थाची काही अनुमाने राजवाडे यांनी सातवाहनांसंबंधी राधामाधवविलासचंपूच्या प्रस्तावनेत काढली आहेत. महाराष्ट्रावर राज्य करणारे महाराष्ट्रीय घराणे हे पहिलेच, हे नक्की. राजसत्तेसाठी या घराण्यात व खड्गाराट घराण्यात बर्‍याच चकमकी झाल्या. नहपाण खड्गाराटाने सातवाहनांचा पराभव केल्याचा उल्लेख नाशिक व कार्ले इथल्या शिलालेखांत आहे. परंतु पुढे लगेच सातवाहन गौतमीपुत्र आणि पुलयामी या दोघांनी खड्गाराटाचा पराभव करून आपला प्रदेश पुन्हा काबीज केला. काही काळाने गौतमीपुत्राचा पराभव माळव्याच्या रुद्रदामन् या क्षत्रप राजाने केला व अशा रीतीने सातवाहनांची राजवट संपली.

सातवाहनांनंतर महाराष्ट्राच्या पश्चिम भागावर त्रैकूटक नावाचे राजे ख्रिस्तोत्तर तिसर्‍या शतकाच्या मध्यापासूनच राज्य करत असल्याचा दाखला कान्हेरी येथील शिलालेखांवरून मिळतो. या राजांची सत्ता आपल्या नावाचा राजशक सुरू करण्याइतकी मजबूत झाली होती. त्रैकुटकांचा शक इ. स. २४९पासून सुरू होतो.

त्रैकुटकांनंतर महाराष्ट्रावर सार्वभौमत्व वाकाटक राजांनी गाजवले. यांच्या साम्राज्यात सर्व महाराष्ट्र व शिवाय उत्तरेकडील काही प्रांत येत असे. यांच्याच राजवटीत उत्तरेकडील सम्राट समुद्रगुप्ताने दक्षिणेत स्वारी केली. कालिदासाने आपल्या रघुवंशात रघूने केलेल्या स्वारीचे वर्णन या समुद्रगुप्ताच्या स्वारीचेच आहे की काय, अशी विद्वानांना शंका आहे. समुद्रगुप्ताच्या या स्वारीचं वर्णन एका शिलालेखात आहे. त्यात एरंडपल्लीचा दमन आणि देवराष्ट्राचा कुबेर या दोन राजांचा त्याने पराभव केल्याचा उल्लेख आहे. एरंडपल्ली म्हणजे खानदेशातील एरंडोल व देवराष्ट्र म्हणजे सातारा जिल्ह्यातील (तासगाव तालुका) देवराष्ट्र ही गावे होत. देवराष्ट्राजवळच जे शंकराचं स्थान आहे, त्याला सागरेश्वर अथवा समुद्रेश्वर असं म्हणतात. यावरून समुद्रगुप्ताच्या नावाचा याच्याशी संबंध असावा. काही विद्वानांच्या मते एरंडपल्ली व देवराष्ट्र ही दोन्ही स्थळं महाराष्ट्रात नसून तामिळनाडूत आहेत.

वाकाटकांनंतर कलचूरी घराण्याचा महाराष्ट्राशी संबंध आला. या घराण्याने त्रैकूटकांचा राजशक सुरू केला होता. त्यावरून कदाचित हे घराणे त्यांच्यापैकीच असावं, असं वाटतं. कलचूरींचा पराभव मंगलीश नावाच्या चालुक्याने करून चालुक्यांची सत्ता जी महाराष्ट्रात स्थापन केली ती निर्वेधपणे इ. स. ७५३पर्यंत मोठ्या भरभराटीने चालली. चालुक्यांचा अंमल ९९,००० गावांवर व महाराष्ट्राच्या तीन विभागांवर होता, अशा मजकुराचा एक शिलालेख आहे.

मध्ये काही काळ चालुक्यांवर गंडांतर येऊन त्यांना राष्ट्रकूटांकडून पराजय पत्करावा लागला होता. राष्ट्रकूट घराण्यांपैकी एकोणीस राजांनी इ. स. ७५३पासून ९७४पर्यंत मराठवाड्यात असलेल्या मान्यखेट (मालखेड) इथे अविच्छिन्न सत्ता गाजवली. या वंशातील दुसरा कर्क या राजाचा चालुक्यवंशीय तैलप नावाच्या राजानं पराभव करून आपली गमावलेली सत्ता पुन्हा दीडशे – सव्वादोनशे वर्षांनंतर मिळवली. चालुक्यांच्या मोठ्या साम्राज्यात काही मांडलिक राजे होते. या मांडलिकांपैकी सेउणदेशीय मांडलिक आणि माळव्याचा भोज यांच्यात चकमकी झाल्या. शेवटी सेउणचंद्राने चालुक्यसत्ता कायम केली. चालुक्यांचा अंमल इ. स. ११८९पर्यंत निर्वेध चालला. पुढे शेवटचा सोमेश्वर मरण पावल्यावर त्याचे मांडलिक आपआपसांत भांडून आपल्या जागीच प्रबळ झाले व मध्यवर्ती चालुक्यसत्तेचा नाश झाला.

चालुक्यांनंतर यादवांची राजवट सुरू झाली. यांचा मुख्य प्रस्थापक भिल्लम नावाचा राजा होता. यादव घराण्याच्या शाखा दोन. एक दक्षिणेकडील द्वारसमुद्राची शाखा आणि दुसरी उत्तरेकडील देवगड-देवगिरीची शाखा. या दोन्ही शाखा आपआपसांत भांडत असत. शेवटी भांडणात देवगिरीचा सिंधण राजा विजयी झाला व त्याच्याच वंशाने पुढे चौदाव्या शतकाच्या आरंभापर्यंत राज्य केलं. इ. स. ११८९पासून ते १३१२पर्यंतच्या काळात यादवांच्या कुळात एकंदर सात राजे झाले. मराठा धर्म, मराठी भाषा, मराठी वाङ्मय यांच्या दृष्टीनं यादवांची राजवट ही उल्लेखनीय आहे. यादवांच्या राजवटीत मराठी भाषा व वाङ्मय यांचा आरंभ व परिपोष झपाट्याने झाला. यादवांचं राज्य सुरळीत चालयामुळे संत, संन्यासी, कवी अव्वल दर्जाचं काव्य निर्माण करू शकले. कृष्ण, महादेव व रामदेव या राजांच्या काळात प्रजेला भरपूर संपन्नता लाभली. पण दुर्दैवानं महमदीयांची नजर दक्षिणेकडे वळली व अल्लाउद्दिनाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या झुंडी येऊन यादवांची राजवट लयाला गेली. शेवटी मलीक काफ़ूराने शंकरदेव यादव याला ठार मारून यादव सत्तेचा अंत केला.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक महापुरुष

छत्रपती शिवाजीराजे –

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीमहाराजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.

शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

शिवाजीमहाराजांचा जन्म जिजाबाईंच्या पोटी इ.स. १९ फेब्रुवारी १६२७ (फाल्गुन कृष्ण तृतीया) रोजी पुण्यापासून ४० मैलांवर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.

शहाजीराजे:-शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तामिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.

जिजाबाई:-जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी दादोजी कोंडदेव ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली.

युद्धाभ्यास आणि रणनीती ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन शिवाजी महाराजांना शहाजीराजांकडून, राजकारभाराचे दादोजी कोंडदेवांकडून तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले. समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे आध्यात्मिक मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.

मावळ प्रांत:-

सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला “मावळ” म्हणतात. पुण्याखाली १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.

शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी म्हणजे बाजी पासलकर, कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते; शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते अशा शौर्यवान लोकांची साथ शिवाजी महाराजांना लाभली.

पहिली स्वारी – तोरणगडावर विजय

इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.

शहाजीराजांना अटक

शिवाजीराजांच्या यशस्वी स्वार्‍यांनी बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.

शिवाजीराजांनी मुघल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.

जावळी प्रकरण

आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.

पश्चिम घाटावर नियंत्रण

इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ल्यांवर विजय मिळविला होता.

आदिलशाहीशी संघर्ष

अफझलखान प्रकरण

आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या [ [महाबळेश्वर]] जवळ असलेल्याप्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.

शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्‍या, बलदंड अफझलाखानने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली.

आधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.

शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करुन त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.

अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.

प्रतापगडची लढाई – सिद्दी जौहरचे आक्रमण

अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.

घोडखिंडीतली लढाई – पावनखिंडीतील लढाई

पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वत: लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभू देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील. शिवाजीराजांना ते पटेना पण ‘बाजी’च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले. शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.

मुघल साम्राज्याशी संघर्ष

मुघल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग… तत्कालीन मुघल साम्राज्य हे भारतातील सर्वात बलाढ्य होते आणि औरंगझेब हा अतिशय कठोर आणि कडवा मुघल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.

शाहिस्तेखान प्रकरण

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.

सुरतेची पहिली लूट

इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.

मिर्झाराजे जयसिंह प्रकरण

इ.स. १६६५. औरंगझेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वत: आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगझेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.

आग्र्याहून सुटका

इ.स. १६६६ साली औरंगझेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत सहा वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्‍यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्‍यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.

आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदार्‍या घ्याव्या लागल्या. संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसर्‍या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगझेबाच्या हातात पडायचे नाही.

यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.

सर्वत्र विजयी घोडदौड

शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले.

कोंढाण्याची लढाई

सिंहगडाची लढाई ही शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतील महत्वाच्या घटनांपैकी एक आहे. मुघलांशी तहात गमावलेले किल्ले परत घेण्यात शिवाजींनी मोहिमा आखल्या होत्या. त्या योजनेतच सिंहगड परत मिळवणे अतिशय महत्त्वाचे होते.सिंहगडावर झालेली ही लढाई तानाजी मालुसरेच्या बलिदानासाठी ओळखली जाते.

पुरंदराच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्यात कोंडाणा हा किल्ला प्रमुख होता. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला. सिंहगड हा मुघलांना लष्करी दृष्टीने महत्वाचे ठिकाण होते. शिवाजींच्या राज्याची राजधानी राजगड केवळ काही मैलांवर होती. तसेच या ठिकाणावरून पुणे परिसरावर चांगलेच नियंत्रण मिळवता होते. म्हणून मुघलांनी या किल्यावर जास्त शिबंदी व सैन्य तैनात केले होते. या किल्याचे नेतृत्व राजपुतांकडे देण्यात आले होते.उदयभान राठोड हा मोघल सरदार किल्लेदार होता. शिवाजींना देखील राजगडाच्या इतक्या जवळ मुघल अस्तित्व नको होते. म्हणून हा किल्ला परत घेणे अत्यंत गरजेचे होते.

लढाई

सिंहगड हा किल्ला पुण्याच्या पश्चिमेला २५ किमी अंतरावर १,४०० मी उंचीवर स्थित आहे. किल्याला चहुबाजूने खड्या उताराची नैसर्गिक तटबंदी आहे. सरळसरळ युद्ध करून हा किल्ला घ्यायचे असते तर मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले असते. म्हणून तानाजीने किल्या चढायची सर्वात कठीण बाजू निवडली. ही कड्याची बाजू असल्याने ह्या जागेवर फारसे सैनिक तैनात केले नव्हते. आज ही जागा तानाजी कडा म्हणून ओळखली जाते. तानाजी व काही मावळे हा ९० अंशाचा कडा चढून गेले. वर पोहोचल्यावर तानाजीचे मावळे व मुघल सेनेत जोरदार लढाई चालू झाली. तानाजी व उदयभानमध्ये द्वंद्व झाले. लढता लढता तानाजीची ढाल तुटली. तरीही डोक्यावरील शेला हाताला गुंडाळून तानाजी लढत होता. काही वेळानंतर मराठ्यांची सरशी होत होती तेवढ्यात जखमी तानाजी उदयभान कडून ठार झाला. परंतु जखमी उदयभानही फार काळ वाचू शकला नाही. तानाजी पडलेला पाहून लढाईचे उपसेनानी सूर्याजींनी सुत्रे ताब्यात घेतली. तानाजी पडल्याने मावळ्यांचा धीर सुटला व पळू काढू लागले. परंतु सुर्याजीने परतीचे मार्ग बंद केले व कड्याचे दोर कापून टाकले व मावळ्यांना जिंका किवा मरा असा आदेश दिला. प्रेरित झालेल्या मावळ्यांनी किल्ला सर केला.

अख्यायिका

सिंहगडाची लढाई ही मराठी इतिहासात एक अतिशय रोमांचक क्षण आहे. शिवाजी महाराजांच्या महत्वाच्या घडामोडीत सिंहगडाची लढाई महत्त्वाची मानली जाते. या लढाईवरती अनेक लेख, अनेक गोष्टी, अनेक नाटकांमध्ये अनेक जणांनी आपपल्या परिने खुलवून सांगितल्या लिहिल्या इतक्या की कालांतराने त्या गोष्टी समाजमान्य झाल्या व त्या आख्यायिका बनल्या. त्यातील काही अख्यायिका खालील प्रमाणे.

तानाजी आपल्या मुलाचे लग्नाचे आमंत्रण शिवाजी महाराजांना देण्यास गेले असताना. शिवाजी महाराजांनी सिंहगडा ताब्यात घेण्याचा विचार सांगितला. परंतु तानाजीच्या घरी लग्न असल्याने शिवाजी महाराज बेत बदलणार होते. तानाजीने स्वतःहून प्रेरित होऊन शिवाजींना या लढाईचे नेतृत्व त्याला देण्यास सांगितले. तानाजी जिवंत असेपर्यंत शिवाजींना या मोहिमेवर जाण्याची गरज नाही. तानाजीने पहिले कोंढाण्याची मोहिम फत्ते करायची मगच मुलाचे लग्न करायचे. आधी लगीन कोंढाण्याचे, मगच रायबाचे असे तानाजीचे उद्गगार प्रसिद्ध आहे.

तानाजीने कडा चढण्यासाठी एका यशवंती नावाच्या घोरपडीला दोर लावला व तिला कडा वर चढून जाण्यास सांगितले व या दोराचा वापर करून मावळे कडा चढून गेले.

गड मराठ्यांच्या हातात पडल्यानंतर मावळ्यांनी किल्यावर मोठा जाळ करून राजगडावर शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याचा संकेत पाठवला. शिवाजी महाराजांना जेव्हा कळले की तानाजी मालुसरे या युद्धात कामी आला तेव्हा महाराजांना याचे अतिव दु:ख झाले. व त्याच्या तोंडातून वाक्य बाहेर पडले गड आला पण सिंह गेला. व त्यानंतर या गडाचे नाव कोंढाणावरून सिंहगड असे बदलले.

लढाईचे महत्त्व

या लढाईनंतर शिवाजी महाराजांचे मावळ प्रांतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले.

राज्याभिषेक:-

६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.

‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असे म्हणतात. शिवाजी महाराजांनी या उक्तीला आपल्या जीवनात नेहमीच पाळले.

महाराज हे प्रशासनाचे प्रमुख होते. राजकीय प्रशासन व्यवस्थेबरोबरच स्थानिक, लोकारूढ शासनसंस्था आणि वर्णाधिष्ठित जातीव्यवस्थादेखील कार्यरत होत्या.

राजशासनाची प्रमुख सात अंगे: राजा, मंत्री, मित्र, कोष, राष्ट्र, दुर्ग आणि सैन्य. यांपैकी एकही अंग कमी पडल्यास राज्य नाश पावे. ‘राजा कालस्य कारणम्’ अशी या प्रशासनाची व्यवस्था होती. स्मृत्यादी ग्रंथांनी धर्माची मर्यादा श्रेष्ठ मानून राज्य व समाजाची सर्व व्यवस्था त्यांच्या कक्षानुरुप मर्यादित केली आहे. राज्यधर्मामध्येच राष्ट्रपालन, प्रजार्तिनिवारण, धर्मपालन ह्यांचा समावेश होता. ही सर्व कार्ये पार पाडण्यासाठी राजास प्रधानमंडळ निर्माण करावे लागे व त्यांच्याद्वारा कार्याची वाटणी करुन प्रशासन करावे लागे. मुसलमान पध्दतीमध्ये ‘रख्तखाना’ ही संस्था असे, पण तिचे स्वरूप थोडे वेगळे होते. ‘सप्तांगम राज्यम’ची अमंलबजावणी करण्याकरता महाराजांनी प्रधानमंडळ स्थापन केले.

अष्टप्रधान मंडळाची निर्मिती व वाढ राज्याच्या विस्ताराबरोबरच होत गेली. महाराज बंगळुराहून परतताना शहाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर नीळकंठ पेशवे, बाळकृष्णपंत दीक्षित, हणुमंते, मुजुमदार (राज्याचे अमात्य), सोनोपंत डबीर (सुमंत), रघुनाथ बल्लाळ सबनीस (सेनालेखक) असे अधिकारी दिले होते. १६४९ मध्येच महाराजांनी तुकोजी चोर यांना तेव्हा असलेल्या लष्कराचा सरनौबत नेमले होते. (म्हणजे प्रधानमंडळाची कल्पना ही स्वराज्य बाल्यावस्थेत असतानाच निर्माण झाली व अवलंबली गेली). पुढे सरनौबती ही माणकोजी दहातोड्यांकडे व नंतर नेताजी पालकरांकडे आली. तेव्हा फौज सात हजार व पागा (घोडेस्वार) ३००० होती. अण्णाजी दत्तो, मोरोपंत पेशवे, सोनोपंत डबीर, निराजीपंत, शामराव नीळकंठ ही मंडळी राज्याभिषेकाच्या आधीपासूनच स्वतंत्रपणे आपापली कार्यक्षेत्रे सांभाळत होती. राजे या सर्व लोकांची मसलत घेऊनच पुढील कार्य आखत. पुढे जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा महाराजांनी खालील पदे निर्माण केली. ही पदे निर्माण करताना त्यांनी फार्सी शब्द टाळून मराठी प्रतिशब्द आणण्यावर भर दिला. त्यासाठी रघुनाथराव हणुमंतेंना नवीन मराठी कोष करावयास सांगितले.

अष्टप्रधान व त्यांच्या जबाबदार्‍या:

१. मुख्य प्रधान (पेशवा) : सर्व राज्यकार्य करावे. राजपत्रांवर शिक्का करावा, सेना घेऊन युध्दप्रसंग करावा. प्रदेश स्वाधीन होईल त्याचा रक्षून बंदोबस्त करुन महाराजांच्या आज्ञेत वर्तावे. सर्व सरदार व सेना यांनी त्यांजबरोबर चालावे. मोरो त्रिंबक पिंगळे हे पेशवे झाले व त्यांचा वार्षिक पगार १५००० होन ठरला. ( एक होन म्हणजे साधारण तीन ते चार रुपये).

२. अमात्य (मुजुमदार): -राज्यातील जमाखर्च ठेवावा. दफ्तदरदार व फडणीस यांच्याकडुन त्यांची कामे करून घ्यावी. फडणिशी व चिटणिशी पत्रांवर निशाण करावे. नारो व रामचंद्र नीळकंठ ह्या बंधुद्वयांकडे हे पद आले.

३. सचिव (सुरनीस) : राजपत्रे वाचून त्यातील मजकूर शुध्द करावा. राजपत्रांवर ‘संमत’ अशा शिक्का करावा. अण्णाजी दत्तो हे सचिव झाले.

४. मंत्री (वाकनीस) : यांनी सर्व राजकारण सावधानतेने करावे. राजाची दिनचर्या लिहून ठेवावी. युध्दादि प्रसंग करावा. दत्ताजी त्रिंबक हे मंत्री झाले.

हे चार प्रधान महाराजांच्या उजवीकडे बसत.

५. सेनापती (सरनौबत): सर्व सैन्याचा मुख्य अधिपती, युध्दप्रसंग करावा. हंबीरराव मोहिते हे सेनापती झाले.

६. सुमंत (डबीर) : परराज्यांच्या विचार करावा. त्यांचे वकील आले तर सत्कार करावा, आपले वकील धाडावेत. रामचंद्र त्रिंबक हे सुमंत झाले.

७. न्यायाधीश: यांनी सर्व राज्यांतील न्याय-अन्याय धर्मतः करुन राजास निवेदन करावे. निराजी राऊजी हे न्यायाधीश झाले.

८.पंडितराव (दानाध्यक्ष): यांजकडे सर्व धर्माधिकार होता. दान धर्म करणे, अनुष्ठान करणे हे सर्व यांच्या अखत्यारीत.

राज्याचे प्रांत आखून ते अष्टप्रधानांच्या हवाली करण्यात येत. जेव्हा अष्टप्रधान स्वारीवर जात तेव्हा त्यांचे मुतालिक त्यांचा कारभार पाहात. अष्टप्रधांनाच्या कचेरीस प्रत्येक काम पाहायला दरकदार नेमले जात. त्यात मुख्यत: १. दिवाण, २. मुजुमदार, ३. फडणीस, ४. सबनीस, ५. कारखानीस, ६. चिटणीस, ७. जामदार (खजिनदार) व ८. पोतनीस (नाणेतज्ञ) असत.

चिटणिसाचा हुद्दा अष्टप्रधान मंडळात समाविष्ट नाही. चिटणीस हा महाराजांचा मुख्य लेखक. राजमंडळात त्याचा समावेश होता. राज्यातील सर्व राजपत्रे लिहिण्याचे काम त्याच्याकडे होते. उत्तरेही तोच लिही. इनामासंबधी कागदपत्रांची व्यवस्थाही फडणीसच करी.

अष्टप्रधानांकडे पुढील कारखाने व महाल यांची व्यवस्था लावण्याचे काम होते. राज्याची घडी या कारखान्यांवर व महालांवर अवलंबून होती.

कारखाने:

१. खजिना २. जवाहिरखाना ३. अंबारखाना (हत्ती) ४. शरबतखाना (औषधे) ५. तोफखाना ६. दफ्तरखाना ७. जामदारखाना (नाणी) ८. जिरातखाना (शेती). ९. मुतबकखाना १०. उष्ट्रखाना ११. नगारखाना १२. तालीमखाना १३. पीलखाना १४. फरासखाना १५. अबदरखाना (पेये) १६. शिकारखाना १७. दारूखाना व १८. शरतखाना.

महाल:

१. पोते (खजिना) २. सौदागर (माल) ३. पालखी ४. कोठी ५. इमारत ६. बहिर्ला (रथ) ७. पागा ८. शेरी ९. दरुणी १०. थट्टी (खिल्लार) ११. टांकसाळ व १२. छबिना.

राज्यकारभार:

प्रांताच्या बंदोबस्तासाठी राज्याचे दोन विभाग केले गेले. एक सलग असणार्‍या प्रदेशाचा व दुसर्‍या विखुरलेल्या दक्षिणेकडील प्रदेशाचा. पहिल्या मुलखाचे तीन भाग केले. पेशव्यांकडे उत्तरेकडील प्रदेश दिला त्यात कोळवनातील सालेरपासून पुण्यापर्यंतचा वरघाट व उत्तर कोकणाचा समावेश होता. मध्यविभागात दक्षिण कोकण, सावंतवाडी व कारवार हा भाग होता – हा सचिवाकडे सोपविण्यात आला. तिसर्‍या भागात पूर्वेकडील वरघाटाचा प्रदेश म्हणजे सातारा-वाई ते बेळगाव कोप्पळपर्यंतचा प्रदेश – हा भाग मंत्र्यांकडे सोपवण्यात आला. कर्नाटकाचा स्वतंत्र सुभा करुन त्यावर हंबीरराव मोहिते व रघुनाथ नारायण अमात्य यांची नेमणूक केली गेली. या सर्व विभागांवर सरसुभेदारांची नेमणूक होई व ते प्रधानांबरोबर काम करीत. यास राजमंडळ म्हणत. किल्लेदार व कारकुन वर्गाची नेमणूक स्वत: महाराज करीत. या प्रदेशातील सैन्य प्रधानमंडळ हवे तसे कमी जास्त करू शकत असे. दरवर्षी प्रधानांनी हिशोब महाराजांना सादर करायचा अशी व्यवस्था असे.

विभागीय कारभारात सरसुभेदार मदत करीत, त्यांना देशाधिकारी म्हणत. पुढील सरसुभ्यांचे उल्लेख पत्रात मिळतात:

१. कल्याण-भिवंडी २. तळकोकण ३. कुडाळ ४. पुणे ५. सातारा-वाई ६. पन्हाळा ७. बंकापुर ८. कोप्पल.

दोन-तीन सुभ्यांची व्यवस्था पाहायला एका सरसुभेदाराला ठेवण्यात आले.

मुसलमानी राजवट व शिवाजी महाराजांची राज्यववस्था ह्यातील मुख्य फरक म्हणजे हे सरसुभे महसुली विभाग नसून विशेषतः कारभार व्यवस्थेसाठीच केले गेले. त्यामुळे सुभेदार मनमानी करु शकत नसत. (पुढे मराठा मंडळ जेव्हा स्थापन झाले तेव्हा हे सुभे महसुलीपण केले गेले त्यामुळे शिंदे, होळकर, गायकवाड सारखे सरदार नंतर स्वतंत्र राज्य करू लागले.) यावरुन शिवाजी महाराजांचे लक्ष आपल्या प्रांतीय कारभारात किती होते हेच दिसून येते.

दोन महाल मिळून लाख-सव्वालाख महसुलाचा एक सुभा होई. सुभेदाराच्या मदतीस मुजुमदार, सभासद, चिटणीस, सबनीस असे अधिकारी असत. सुभ्याच्या बंदोबस्तीकरता शिंबदी असे. सुभेदारास सालीना ४०० होनाचा तनखा व मुजुमदारास १२५ होनाचा तनखा मिळत असे. सुभेदारास सरकारी करवसुलीचे कामी प्रजेचे परंपरागत अधिकारी परगण्याचे देशमुख व देशपांडे यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते. जमिनीची लागवड व वसाहत करवून सरकारचा सारा गोळा करणे हे देशमुखाचे मुख्य काम असे. वसुली करण्याकरता देशमुखास महसुलाच्या उत्पन्नावर शेकडा ५ टक्के मोबदला मिळे. सरकारचे सर्व हुकूम जनतेपर्यंत नेणे व त्यांचे पालन करने ही देशमुखाची मुख्य जबाबदारी. देशपांडे हा देशमुखाच्या सर्व हिशोबाचे व दफ्तराचे काम पाही. त्यास देशमुखाचा निम्मा हक्क मिळे. महालावरील अधिकार्‍यास हवालदार म्हणत. सर्व सरकारी अधिकार्‍यांना वतन न मिळता वेतन मिळे. सरकार सेवेबद्दल मोकासा अथवा जमीन लावून धरण्याची पद्धत त्यांनी बंद केली त्यामुळे देशमुख, देशपांड्यास जनतेवर बळजबरी करता येत नव्हती.

गाव अथवा खेडे हे स्वराज्यातील एक महत्त्वाचा घटक होते. एखादे खेडे हे सर्व बाबतीत स्वंयपूर्ण असे. त्यामुळेच राज्य कोणाचेही असले तरी त्या भागातील अर्थव्यवस्थेवर फार परिणाम होत नसे. प्रत्येक खेड्यात बारा बलुतेदार असत, त्यांचे सर्व व्यवसाय हे जातीवर अवलंबून असत. आपल्या जातीबाहेरचे व्यवसाय कोणी करत नसल्यामुळे प्रत्येक जातीला आणि त्या व्यवसायांना समाजात निश्चित असे एक स्थान होते.

शिवशाही धारापद्धत- शिवकाठी:

जमिनीचा धारा ही सर्वात महत्त्वाची बाब होती. जमिनीवरील शेतसारा ठरविण्यासाठी पूर्वी मलिकंबरने ठरविलेली पद्धत अंमलात आणली गेली होती पण ती शिवाजी महाराजांनी बदलून वेगळी पद्धत लागू केली. त्यांनी जमिनीचे मोजमाप ठरविण्यासाठी काठीचे माप ठरविले. पाच हात व पाच मुठी मिळून एक काठी, वीस औरस-चौरसांचा एक बिघा व १२० बिघ्यांचा एक चावर असे जमिनीचे मोजमाप ठरविले. अण्णाजी दत्तो (सचिव) यांनी गावोगावी जाऊन जमिनीचा धारा, चावराणा, प्रतबंदी व लावणी वरुन ठरविला. चावराणा म्हणजे जमीन मोजून तिच्या सीमा ठरविणे. डोंगरी जमीनीच्या सार्‍याची आकारणी बिघ्यावर न करता नांगरावर होई. आकारणीत जमिनीच्या कसाबरोबर पिकाची जातही पाहण्यात येई. आकार (सारा) ठरवताना तीन वर्षाच्या उत्पन्नाची सरासरी घेऊन मगच सारा ठरविण्यात येई. वाजट जमीन, जंगल, कुरण, इत्यादी गावची जमीन सार्‍यासाठी विचारात घेतली जात नसे.

खर्‍या अर्थाने ही पध्दत लोकमान्य होती म्हणूनच शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ संबोधले जाते.

एकूण उत्पन्नाच्या ४० टक्के कर शेतकर्‍यास द्यावा लागे. पूर्वीच्या काळी २/५ कर हा लोकमान्य होता. मोगलाईमध्ये पण एवढाच कर भरला जात असे. नवीन गावे वसविली जात असत. नवीन रयतेला कसण्यास गुरेढोरे, बीजास दाणा-पैका, रोज राहण्यास दाणा-पैका देण्यात येई व तो ऐवज दोन वर्षानी जेव्हा पीक येई तेव्हा कापून घेतला जाई. शिवाजी महाराजांनी कौल देऊन अनेक गावे वसविली आहेत. या पद्धतीला ‘बटाई पद्धत’ म्हटले गेले.

राज्याचे उत्पन्न वाढविताना प्रजेचे कल्याण पाहणेही जरुरी होते अथवा मोगलाईत व शिवशाहीत काय फरक! शिवाजी महाराज याबाबत किती जागरुक होते ते खालील पत्रावरुन दिसेल:

इ.स. १६७६ सुभेदार रामाजी अनंत, मामले प्रभावळी यांस,

“साहेब मेहरबान होऊन सुभास फर्माविले आहे. ऐसीयास चोरी न करावी. ईमानेइतबारे साहेब काम करावे. येसी तू क्रिया केलीच आहेस. तेणेप्रमाने येक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास्त व दुरुस्त वर्तने. मुलूकात बटाईचा तह चालत आहे, परंतु रयेतीवर जाल रयेतीचा वाटा रयेतीस पावे आणि राजभंग राजास येई ते करणे. रयतेवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुजवर राजी नाहीत ऐसे बरे समजणे. रयेतीस तबाना करावे आणि किर्द करावी. गावचा गाव फिरावे. ज्या गावात जावे तेथील कुनबी किती आहेत ते गोळा करावे. त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणूसबळ असेली त्या माफीक त्यापासी बैलदाणे संच असेल तर बरेच झाले त्याचा तो कीर्वी करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे, माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर, पोटास दाणे नाही, तो आडोन निकामी जाला असेल, तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दो-चौ बैलांचे पैके द्यावे, बैल घेवावे व पोटास खंडी दोन खंडी दाणे द्यावे. जे सेत कर त्याचाने करवेल तितके करवावे. पेस्तर त्यापासुन बैलाचे व गायांचे पैसे वाढिदीवाढी न करता मुदलच उसनेच हळुहळु याचे तवानगी माफव घेत घेत उसूल घ्यावा. जोवरी त्याला तवानगी येई, तोवरी वागवावे. या कलमास जरी दोन लाख लारी पावेतो खर्च करिसील आणि कुणबिया, कुणबि यांची खबर घेऊन त्याल तवानगी येती करुन कीर्द करसील आणि पड जमीन लावुन दस्त ज्याजती करुन देसील, तरी साहेब कबूल असतील तैसेच कुलबी तरी आहे. पुढे कष्ट करावयास उमेद धरती. ….”

वरील पत्रावरून हे दिसून येईल की शिवाजी महाराज जनतेची किती काळजी करत. सभासदाने वर्णन केल्याप्रमाणे स्वराज्याचे उत्पन्न हे सुमारे एक कोट होन म्हणजे तीन कोटी रुपये व चौथाईचे उत्पन्न ८० लाख रुपये वेगळे होई.

सैन्यव्यवस्था:

गनिमी काव्याबद्दल मी नवीन सांगायला नकोच. शिवाजी महाराजांनी ही नीती पाठीशी सह्याद्री असल्यामुळे अंगीकारली होती. तसेही मराठ्यांचे बळ तेव्हा एवढे नव्हते की मैदानी युध्द करुन ती जिंकावीत व प्रदेश काबीज करावा. शिवाजी महाराजांनी सैन्याची तत्कालीन पद्धतच अंगीकारली होती पण त्यांची बारीक नजर सैन्यावर राही. मी पुढे काही त्यांची पत्रे देईनच पण त्या आधी आपण सैन्यरचना कशी होती ते पाहू:

सर्व सैन्यास डोईस मंदील, अंगास सकलादी, हाती सोन्याची वा रुप्याची कडी, हुद्याप्रमाणे तलवारीस सोन्या/रुप्याचे म्यान, कानास कुड्यांची एक जोड अशी हुजुरातीची (म्हणजे खासे महाराजांसोबत जी फौज चाले अशी) फौज तयार केली. त्या फौजेत शंभर लोक, साठ लोक, तीस लोक अशी पथके होती. काही जणांकडे बंदुकी, काही विटेकरी, भालकरी, धारकरी अशी विभागणी केली गेली.

पागेत शिलेदार होते, हर घोड्यास एक बारगीर, पंचवीस बारगीरांवर एक हवालदार, पाच हवालदारांवर एक जुमला. जुमलेदारास ५०० होनांचा तनखा. दहा जुमल्यास एक हजारी आणि पाच हजारास एक पंचहजारी व पाच पंचहजार्‍यांवर एक सरनौबत अशी फौजेची रचना होती. सैन्यात काही फिरंगी व मुसलमानही होते.

पायदळाची रचना- दहा हशमांचा एक गट, त्यावर एक नाईक, पाच गटांवर एक हवालदार, दोन-तीन हवालदारांवर एक जुमलेदार, दहा जुमल्यांवर एक हजारी व सात हजार्‍यांवर एक सरनौबत अशी व्यवस्था लावली.

पावसाळ्यात लष्कर छावणीस परत येई. त्यांस दाणा, रतीब, औषधे, घरे यांची उपलब्धी करुन दिली जाई. दसरा होताच लष्कर कामगिरीस निघे. आठ महिने बाहेर व चार महिने घरी अशी व्यवस्था असे. लष्करात बायका, बटीक व कलावंतीण ठेवण्यास सक्त मनाई होती. जो हे सर्व बाळगील त्याची गर्दन मारली जात असे. (मुगली सैन्य या विरुद्ध – सोबत जनानखाना, कलावंतिणी, जवाहीर असे सर्व बाळगीत. युध्द हरण्यास हे सर्व कारणीभूत होई कारण पटापट हालचाल करता येत नसे. पुढे मराठ्यांनी हे सर्व बाळगायला सुरुवात केली. पानपतावरच्या मराठ्यांच्या पराभवास हे बाजरबुणगे व जनानखानाच कारण ठरले.) तसेच परमुलुखांत पोर, बायका धरण्यास मनाई होती. मर्द लोक सापडले तर धरावे, गाय धरू नये, बैल धरावा, ब्राम्हणांस उपद्रव देऊ नये तसेच खंडणी केलेल्या जागी ओळख म्हणून ब्राम्हण घेऊ नये असे नियम होते. (सभासद बखर)

सरनौबत, मुजुमदार यांची तैनात वराता अथवा हूडीने देत. लष्करास गाव मोकासा देण्याची पध्दत बंद केली. सर्व व्यवहार रोखीने होत. मोकासे दिल्याने रयतेस त्रास होतो, धारा नीट वसूल होत नाही म्हणून ती पद्धतच बंद केली. लढाईत जखमी झालेल्यांना जखमेप्रमाणे नेमणूक मिळे, मेलेल्यांना तैनात देण्यात येई.

महाराजांचे १३ मे, १६७१ चे एक पत्र:

“चिपळूणी सैन्याचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुभ्यास पावसाळाकारणे पागेस सामा, दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होउन गेला. त्याकरिता कारकुनाकडुन व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास वातेल ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंद करुन चाराल नाहीसे झाले म्हनजे मग काही पडत्या पावसाळ्यात मिळणार नाही, उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व मुलुखास तजबीज देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोण्ही कुणव्याचे दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करु लागले म्हण्जे जे कुणबी घर धरुन जीव मात्र घेउन राहिले आहेत, तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावलोक हो, बहुत यादी धरोन वर्तणूक करणे. कोणी पागेस अगर मुलखात गावोगांव राहिले असाल त्याणी रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. साहेबी खजिन्यातुन वाटनिया पदरी घातलीया आहेती ज्याला जे पाहीजे ते विकत आणावे. कोणावरी जुलुम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे. तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजेने दाणा, रतीब कारकून देत जातील तेणेप्रमनेच घेत जावे, की उपास न पडता रोज्बरोज खायला सापडेल आणि होत होत घोडी तबाना होत ऐसे करणे. धुंदी करुन खासदार कोठीत कोठारात शिरुन लूटाया गरज नाही. खण धरुन राहिले असतील व राहतील. कोणी आगट्ये करतील, कोणी भलते जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाखुला अग्नी घेतील, गवत पडले आहे. असे मनात न आणता म्हणजे अविसाच दग होईल. ऐका खणास आगी लागली, म्हणजे सारे खण जळून जातील; हे तो अवघीयास कळते; या करणे बरी ताकीद करुन खासे असाल ते हमेसा फिरुन जावून रंधनेकरिता आगट्या जाळिता अगर रात्री दिवा घरात असेल, अविस्ताच उदिंर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वाचेल ते करणे; म्हणजे पावसाळा घोडी वाचतील. जितके खासे खासे, जुमलेदार, हवालदार, कारकून आहे, तितके हा रोखा तपशिले ऐकने आणि हुशार राहणे. येणेप्रमाने वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास मराठियांची तो इज्जत वाचवणार नाही, मग रोजगार कैसा.”

वरील पत्रावरून दिसून येईल की शिवाजी महाराजांचे किती बारीक लक्ष सैन्यावर होते. अगदी उंदीर रात्री वात पळवून नेईल इतके व्यवधान ते बाळगायला सांगत. प्रजेच्या व लष्कराच्या सांभाळाची तळमळच या पत्रातून दिसून येते.

मराठेशाहीत किल्ल्यांना फार महत्त्व होते. ‘अखिल राज्याचे सार ते दुर्ग’ अशी महाराजांची श्रध्दा असल्यामुळे त्यांनी नवीन किल्ले उभारणी, जुन्यांची डागडुजी यांवर विशेष लक्ष दिले. पण तेवढेच महत्त्व त्यांनी आरमारालाही दिले.

साधारण १६५७मध्ये कल्याण-भिवंडी घेतल्यावर स्वराज्याची सीमा समुद्राला भिडली. मिठाचा व्यवहार इंग्रज, फ्रेंच करत होते. महाराजांना समुद्रावरपण सत्ता हवी होती. पण महाराजांजवळ लढाऊ गलबते कशी बांधायची ही माहिती नव्हती. तत्काळ त्यांनी पोर्तुगीजांशी संबंध प्रस्थापित केला. पोर्तुगीजांना सिद्दीचे भय होते. महाराजांनी त्याना भासविले की ते सिद्दीविरुद्ध लढा देणार आहेत. रुय लैतांव व्हियेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हियेगस या लढाऊ जहाजे बांधणार्‍या शिल्पकारांसोबत महाराजांनी आपले निवडक कोळी धाडले व त्याकडून २० लढाऊ नौका तयार करून घेतल्या. महाराजांनी अशाच लोकांना पाठविले की ते नंतर स्वतःच अशा युध्दा नौका तयार करु शकतील. १६७५पर्यंत महाराजांकडे ४०० छोट्यामोठ्या युद्धनौका होत्या. सुरतेच्या दुसर्‍या स्वारीत महाराजांनी ही गलबते सुरत किनार्‍यावर आणली होती व लूट त्यावरून स्वराज्यात आणली.

ह्या घटनेवरून सहज लक्षात येईल की त्यांनी जमिनीबरोबरच समुद्रावर सत्ता स्थापन केली. एकदा प्रत्यक्ष मुंबईत, जिथे इंग्रजांची सत्ता होती तिथे महाराजांची मिठाची गलबते आली. इंग्रजांच्या आरमारापासून रक्षण करण्यासाठी महाराजांनी त्यांचे एक २५० टनी लढाऊ जहाज मुंबई बंदरात पाठविले, ह्या घटनेने इंग्रज हादरून गेले होते. १६५९ पूर्वी हेच इंग्रज महाराजांना ‘बंडखोर’, ‘लुटारू’ अशी विशेषणे लावीत पण १६५९ नंतर मात्र ‘आमचा मित्र’, ‘आमचा शेजारी’ ही विशेषणे त्यांच्यासाठी दिली गेली. राज्याभिषेकानंतर तर त्यांना ते पूर्वेकडील थोर मुत्सद्दी वाटू लागले!

लोकांसाठी चालविलेल्या ह्या राज्याची मुद्रा विशेष करुन अभ्यास करण्यासारखी आहे.

स्वराज्याची राजमुद्रा

प्रतिपच्चंद्रलेखेव

वर्धिष्णुर्विश्ववंदिता ||

शाहसुनो: शिवस्यैषा

मुद्रा भद्राय राजते ||

शिवाजी महाराजांचा दबदबा सर्वत्र पसरला होता. अर्धा कर्नाटक (तंजावरपासून जिंजीपर्यंत) स्वराज्यात आला होता. कुतुबशहाने तह केला, अदिलशाही नामशेष झाली, मोगलांनी भय घेतले.

कवीराज भूषणानी केलेले वर्णन येथे उधृत करावेसे वाटते :

‘सजि चतुरंग बीररंगमे तुरंग चढि,

सरजा सिवाजी जंग जीतन चलत है!

भूषण भनत नाद बिहद नगारन के

नदी नद मद गैबरनके रलत है!!’

‘भूषण भनत भाग्यो कासीपती विश्वनाथ,

और कौन गिनतीमें भूली गती भब की!

चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि,

सिवाजी न होतो तो सुनति होत सब की!!

स्वराज्याभिषेक होण्याआधी ‘सरणार कधी रण प्रभू तरी हे कुठवर साहू घाव शिरी’ लिहीणारे समर्थ ‘स्वर्गींची लोटली जेथे राम गंगा महानदी, तीर्थासी तुळणा नाही आनंदवनभुवनी’ लिहितात यातच शिवाजी महाराजांच्या राज्याचे सार आहे.

संदर्भ:

मराठ्यांचा इतिहास – खंड १ ते ५, संपादक: अ. रा कुलकर्णी, ग. ह. खरे

राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे