दागिन्यांची परंपरा आपल्याकडे पूर्वापार आहे. जितकं तुम्ही इतिहासात शिराल तितके प्रकार तुम्हाला दिसतील. अगदी गळ्याचे दागिने घेतले तरी त्यात चिंचपेटया, वजट्रिका, ठुशी, मोहनमाळ, पुतळीहार, सर, कोल्हापुरी सजा, जोंधळी हार, लफ्फा, तन्मणी, दुलेदिया, शिरोण, चंद्रहार असे बरेच प्रकार आहेत. ही यादी इथेच संपली नाही. कारण त्याची जंत्री लांबलचक आहे. या गळ्यातल्या आभूषणांच्या प्रकारांची ही ओळख.

स्त्रियांना फुलाच्या माळा, हार, गजरे यांपासून ते सोने, चांदी, रुपे, मोती, पोवळे, हिरे आणि आता प्लॅटिनम या सर्वापासून बनविलेले दागिने घालून मिरवायला मनापासून आवडते. भारतात प्रांताप्रांतातील आवडीनुसार वेगवेगळ्या जडणघडणीचे दागिने बनविले जातात.

महाराष्ट्रातील स्त्रियांची नथ व पुरुषांची भीकबाळी हे अगदी वेगळे असे दागिने आहेत. देशावरचे लोक सोन्याची एक पट्टी गळ्याभोवती घालतात, (चिंचपेटीसारखी) तिला चितक म्हणतात. आता कोल्हापुरी साज आणि पुतळी माळ महाराष्ट्रात सर्वत्र घातली जात असली तरी पूर्वी हे फक्त मराठयातच आढळत असत. ब्राह्मणांच्या बायका- विशेषत: देशावरच्या जास्तीकरून चिंचपेटयाच घालीत.

तसेच त्यांच्या हातातले दागिनेही पाठारे प्रभूंपेक्षा वेगळे असत. कोकणात दागिन्यांची विशेष परंपरा नाही, याचे कारण बहुधा तेथील गरिबी. इथे जे काही दागिने सापडतात ते देशावरल्या व इतर जमातींच्या दागिन्यांचे अनुकरण करून घडवतात. सर्व बायकांकडे हमखास असणारा कोकणी दागिना म्हणजे फक्त नथच. घाटावर बायकांचे दागिने जवळजवळ असेच असतात; पण अनेक वेळा सोन्याऐवजी घडणीत चांदी वापरलेली असते.

दागिन्यांचे काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकार :

चिंचपेटी

ही पोकळ सोन्याच्या पेटीने बनवलेली असते. मोत्याच्या नाजूक सरींना यष्टिलता किंवा यष्टिका म्हणत असत. लांबट टपो-या आकाराचे सोन्याचे मणी तारेत गुंफून जी एकसरीची माळ बनवितात त्याला एकलट किंवा एकदानी म्हणतात. तर बोरमाळेत बोराएवढे सोन्याचे मणी सोन्याच्या नाजूक तारेत गुंफलेले असतात. त्याचप्रमाणे मोहनमाळ, गुंजमाळ, जांभूळमाळ, जवमाळाही बनविल्या जातात.

ठुशी

ठुशी म्हणजे ठासून भरलेले गोल मणी. ठुशी हा प्रकार राजघराण्यात फार प्रसिद्ध होता.

लफ्फा

लफ्फा हा प्रकार म्हणजे मुसलमानी कलेचा प्रभाव असणारा प्रकार. यात हाराच्या बारीक तारा टोचू नयेत म्हणून मागच्या बाजूस रेशमी गादी लावलेली असते. हाराला पाठीमागे अडकविण्यासाठी कडया किंवा रेशमी दोरे असतात.

पुतळया

गोल चपटया नाण्यांप्रमाणे असणा-या चकत्या एकत्र गुंफून जी माळ बनविली जाते त्यास पुतळी माळ म्हणतात. पुतळया या सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत. त्यावर लक्ष्मीची चित्रंदेखील पाहायला मिळतात.

गाठला

गाठला हा देखील असाच प्रकार. गाठल्यातल्या नाण्यांवर मोहोर किंवा लिखाण असते, तर पुतळीमाळेतल्या पुतळ्या थोडया जड असून त्यांच्यावर स्त्रीची आकृती असते.

कोल्हापुरी साज

कोल्हापूरकडच्या लोकांनी हा साज मोठया प्रमाणात वापरून त्याचे नामकरण ‘कोल्हापुरी साज’ असे केले. या साजात मासा, कमळ, कारले, चंद्र, बेलपान, शंख, नाग, कासव, भुंगा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या घन पत्राचे मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक मणी ओवलेले असतात.

मध्यभागी लोलक असते त्यास पानडी असेही म्हणतात. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे त्यात काळे मणी घातले जाऊ लागले. नजर लागू नये म्हणून हे मणी वापरण्याची प्रथा आहे. हा गळ्याभोवतीच पण जरा सलसर बसतो आणि यात चंद्र, कमळ, मासा पूर्वी हा फक्त सवाष्ण बायकाच घालीत, पण आता सरसकट वापरात आढळतो.

सरी

सोनेरी वर्तुळाकृती नळी किंवा दोन तारा विणून केलेली साखळी. टोकाला मळसूत्री नागमोड व आकडा. सरी चांगली ताठ असून मळ्यालगतच घालतात.

मोहनमाळ

मुशीत घडवलेल्या मण्यांची माळ, मोहनमाळेच्या जुन्या नमुन्यात अनेक प्रकारच्या नक्षीचे मणी सापडतात.

चंद्रहार

एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ. अलीकडच्या फॅशनचा चंद्रहार अठराव्या शतकापासून चालू असलेला दिसतो आणि त्यात एकात एक अडकवलेल्या चपटया वळ्यांचे अनेक सर असतात. हे हार बेंबीपर्यंत लांब असू शकतात. जुन्या काळी अशा वळ्यांच्या एका सरालाही चंद्रहार म्हणत.

गोफ

सुरेख विणीच्या सोन्याच्या नाजूक तारांचा दोर. गोकुळाष्टमीला अथवा गौरीपूजेच्या वेळी मुले-मुली एक खेळत खेळतात त्यालाही गोफ असे नाव आहे. वरून टांगलेल्या रंगीबेरंगी रेशमी धाग्यांचे एकेक टोक पकडून सर्व जण तालात गाणे म्हणत एकमेकांभोवती अशा तऱ्हेने फिरतात की सर्व धाग्यांची वेणी अथवा गोफ पडत जातो.

मोत्याच्या माळा :

  • चिंचपेटी – मखमलीच्या पट्टयांवर शिवलेले मोती आणि खडे.
  • तन्मणी – मोत्यांच्या अनेक सरांना अडकवलेला एक मोठा खडा वा अनेक खडयांचे आणि कच्च्या (पैलू न पाडलेल्या) हि-यांचे खोड. कधी कधी हे खोड मोत्यांच्या सरांऐवजी रेशमाच्या धाग्यातही गुंफलेले असते.
  • दुलेदिया – सोन्याच्या छोटया छोटया मण्यांच्या (भिनूंच्या) सहा सरांची माळ. सोन्याची दोन डाळिंबे किंवा सोन्याचे दोन मोठे मणी सर एकत्र गोफवण्यासाठी असतात.
  • पेरोज – मोठाल्या भिनूंचे तीन सर दोन सोनेरी डाळिंब्यांनी बांधलेले.
  • शिरण – (मोठे) आठ मोठी पोवळी आणि आठ सोन्याचे मोठे मणी एक सोडून एक गुंफलेले किंवा (लहान) पाच मोठी पोवळी आणि पाच सोन्याचे मोठे मणी एकत्र गुंफलेले.
  • दोले – १४ पोवळी आणि ७ सोन्याचे मणी वरीलप्रमाणेच गुंफलेले.
  • वजट्रिक – सोन्याच्या मण्यांच्या तीन रांगा बसविलेली कापडी पट्टी.
  • पोत – लाल खडे, पोवळी आणि सोन्याचे मणी एकत्र गुंफलेले.