मराठी मंडळीनी केलेल्या औद्योगिक पराक्रमात बाबुरावांनी केलेला विक्रम अप्रतिम आहे. कागद ज्यापासून तयार होतो. तो बांबूचा लगदा तयार करण्याची त्या काळाची साडेबारा कोटी भांडवल लागणारी प्रचंड योजना त्यांनी साकार केली. महाराष्ट्रात नाही तर, भारताच्याही औद्योगिक इतिहासात खासगी क्षेत्रात एवढा मोठा उपक्रम केल्याची उदाहरणे त्या काळी तुरळकच होती. लहानपणीच वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांचे पालनपोषण त्यांच्या आई माईसाहेब यांनी केले. महात्मा गांधीच्या सत्याग्रहाच्या मोहिमेमुळे बाबुरावांचे संस्कारक्षम मन देश प्रेमाने भरले होते. कागदाची खरेदी बाबुराव शेठ फार्दुनजी यांच्याकडून करत असत. त्यातूनच स्नेहभाव निर्माण झाला. आणि ते बाबुरावांचे व्यावसायिक गुरु झाले. पुढे पदवी मिळाल्यावर ठराविक नोकरीच्या चाकोरीतून न जाता त्यांनी व्यवसाय करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला अनुभव घेण्यासाठी त्यांनी डेक्कन पेपर मिलमध्ये नोकरी केली. नंतर स्वत:च्या उद्योगावर लक्ष द्यायचे ठरवले. इचलकरंजी संस्थाकडून कर्ज शिष्यवृत्ती मिळून ते शिक्षणासाठी जपानला गेले. लहान व्यवसायातून प्रगती करून मोठे कसे होता येते. हे ते जपानला शिकले. तिथे आपल्या भावी वाढीची बोलणीही करून आले. पुढे त्यांनी खासगी व्यवसायांचे रुपांतर पेपर आणि पल्प कन्व्हर्शन लि. मध्ये केले.

पट्टा तयार करण्यासाठी लागणा-या यंत्रसामग्रीची निर्मितीही त्यांनी स्वत:च तयार केली. 16 जून 1947 पासून आपल्या दिवंगत भावाच्या स्मृतीप्रित्यर्थ गो. स. पारखे पारितोषिकाची अपूर्व योजना त्यांनी राबवली. राम-लक्षमणा सारखे प्रेम या भावांचे होते. आपला कारखाना खोपोलीला काढून तेथे त्यांनी नवीन औद्योगिक वसाहतच निर्माण केली. पुढे युरोपचा दौरा करून व्यवसायवाढीला सुरुवात केली. बाबुराव छोट्या कागद गिरणीला लागणा-या यंत्रसामग्रीची निर्मितीही करू लागले. या कारखान्यात छपाई विभागही सुरु केला. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी राजमान्यता आणि लोकमान्यताही मिळवली. व्यावसायिक बाबी बरोबरच अध्यात्मिक बाजूही कौशल्याने सांभाळली होती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे बाबुराव चालते बोलते प्रतिक होते. बाबुरावांचे जीवन हे निष्काम कर्मयोग्याचे जीवन आहे. शून्यातून सृष्टी निर्माण करणा-या तरुणांना स्फूर्तिदायक आहे.