चारोळी (चार + ओळी)  म्हणजे चार ओळीची कविता होय. आणि या चारोळीच्या संग्रहाला (कडव्यांना) चारोळ्या (चार + ओळ्या) म्हटले जाते. चारोळी हा काव्य प्रकार कवि, लेखक आणि साहित्यिक चंद्रशेखर गोखले यांनी इ. स. 1990-91 मध्ये निर्माण केला.

चंद्रशेखर गोखले यांच्या काही पूर्वप्रकाशित चारोळ्या –

एकदा मला ना

तू माझी वाट पहाताना पहायचंय

तेवढ्यासाठी आडोशाला

हळूच लपून रहायचंय

मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं

तुला शंभर वर्षे आयुष्य आहे.

मरण ही चाट पडलं म्हणालं

काय हा मनुष्य आहे ?

इथे प्रत्येकजण आपआपल्या घरात,

अन प्रत्येकाचं दार बंद आहे

तरी एकोप्यावर बोलणं हा

प्रत्येकाचा छंद आहे

घराभोवती कुंपण हवं

म्हणजे आपलं जग ठरवता येतं

बाहेर बरबटलेलं असलं तरी

आपल्यापूरतं सावरता येतं

तू बुडताना मी

तुझ्याकडे धावलो ते

मदतीला नव्हे सोबतीला,

नाहीतर… मला तरी कूठे येतय पोहायला

आठवतय तुला आपलं

एका छत्रीतून जाणं

ओंघळणारे थेंब आपण

निथळताना पहाणं

माझ्या प्रत्येक क्षणात

तुझा वाटा अर्धा आहे

भूतकाळ आठवायचा तर

तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे.

आठवणींच्या देशात

मी मनाला कधी पाठवत नाही

जाताना ते खुष असतं

पण येताना त्याला येववत नाही

कवितेच्या वहीत कविता म्हणून

मी तुझं चित्र काढायचो

आणि शब्द मात्र लिहून

तत्परतेने खोडायचो…..

माझ्या जुन्या कविता जपायला

ती कायम असते जवळ

म्हणून नवं काही ऐकवलं की

ती मुक्याने हसते केवळ…

दिवा लागतोच

काळोख पडल्यावर

पण अशावेळी काही सुचत नाही

पापणीपाशी अश्रू अडल्यावर

हल्ली मी रमतो

आपली शेवटची भेट आठवण्यात

काय आसूरी आनंद आहे कळत नाही

मधाचं पोळं उठवण्यात…

आठवणी आणि स्वप्नांचा

पाठशिवणीचा खेळ

आणि मी मनाशी म्हणतो

कळत नाही कसा जातो वेळ…

उचललं पाउल अन

थबकायला झालं

आपण बोलत नाही

हे नंतर लक्षात आलं…

आपल्याला देखील आपण लिहिलेली चारोळी मराठीग्लोबलव्हिलेज.कॉम संकेतस्थळावर आपल्या वाचकांकरिता प्रकाशित करावयाची असल्यास ती आम्हाला marathiglobalvillage@gmail.com वर पाठवु शकता किंवा येथे कमेन्ट मध्ये पोस्ट करु शकता.

नोंद : कृपया, स्वरचित चारोळीच प्रकाशित करणे अन्यथा चारोळी रचयिताचे खरे नाव नमुद करणे.