अभिजात मराठी साहित्य – कादंबरी

कादंबरी ह्या साहित्य प्रकाराला अभ्यासताना त्यासाठी असणार्‍या करार, काळ,आवाज या संकल्पनाही लक्षात घ्याव्या लागतात. डॉ. मिलिंद मालशे यांनी दिलेल्या साहित्याच्या पायाभूत करार या संकल्पनेनुसार ‘कथन करणे’ हा कादंबरीचा करार सांगितला जातो. म्हणजेच कथानात्मक या साहित्याच्या मुलभूत प्रवृत्तीत ‘कादंबरी’ हा प्रकार मोडतो. यातून कादंबरीकार त्याने अनुभवलेल्या जीवनाचे त्रयस्थपणे कथन करत असतो. म्हणून या प्रकाराला आत्मनिष्ठ म्हणता येत नाही. कादंबरीत येणाऱ्या या जीवनपट एका विशिष्ट काळाचे दर्शन घडवत असतो. कादंबरीत येणारा हा ‘काळ’ सुझन लँगरच्या ‘काळ’ यासंकल्पनेनुसार प्रतीभाषिक भूतकाळ असतो. कादंबरी ही कथनात्मक स्वरुपाची असल्याने कादंबरीकार त्यातील व्यक्तिरेखांविषयी सांगत अस्तोसतो. म्हणजे टी. रास इलियट च्या आवाजाच्या संकल्पनेनुसार कादंबरीचा ‘दुसरा आवाज’ असतो.

प्रसिद्ध मराठी कादंबरीकार

  • अरुण साधू
अरूण साधू

अरूण साधू

अरूण साधू (जन्म : १७ जून १९४१ मृत्यू : २५ सप्टेंबर २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक आहेत. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

  • प्रल्हाद केशव अत्रे
प्रल्हाद केशव अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, इ.स. १८९८ – जून १३, इ.स. १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. फार काय, आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते.

  • आनंद यादव
आनंद यादव

आनंद यादव

आनंद यादव (नोव्हेंबर ३०, १९३५ – २७ नोव्हेंबर, इ.स. २०१६) हे मराठी लेखक होते. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

  • गंगाधर गाडगीळ
गंगाधर गोपाळ गाडगीळ

गंगाधर गोपाळ गाडगीळ

गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ – सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘नवकथेचे अध्वर्यू’ असे संबोधले जाते.

  • गौरी देशपांडे
गौरी देशपांडे

गौरी देशपांडे

गौरी देशपांडे (फेब्रुवारी ११, १९४२ – मार्च १, २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत.

  • चिं. त्र्यं. खानोलकर
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (मार्च ८, इ.स. १९३०- एप्रिल २६, इ.स. १९७६) हे एक मराठी कवी व लेखक होते. कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री, खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्‍या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने ‘मौज’मधे छापण्यास पाठवून दिल्या. ‘मौज’च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली.

ये रे घना, ये रे घना

न्हाउं घाल माझ्या मना …

खानोलकरांना भीती होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसॄष्टीत तळपतच राहिला.

  • चिं. वि. जोशी
चिंतामण विनायक जोशी

चिंतामण विनायक जोशी

चिंतामण विनायक जोशी (जानेवारी १९, १८९२:पुणे, महाराष्ट्र – नोव्हेंबर २१, १९६३:पुणे) हे विनोदी साहित्याकररि प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते.

त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते तसेच आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राचे त्यांनी काही काळ संपादनही केले होते. सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी हे देखील जोश्यांच्याच घराण्यातले होते. त्यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङ्मय असले तरी ते व्यावहारिक जीवनात धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, त्यामुळे ते दु:खी असत.

दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकरांनी, गुंड्याभाऊचे बाळ कर्वे यांनी, चिमणरावांच्या पत्‍नीचे (कावेरीचे-काऊचे) स्मिता पावसकर यांनी, मैना या कन्येचे काम अरुणा पुरोहित यांनी तर मोरू व राघू या पुत्रांचे काम अनुक्रमे नीरज माईणकर व गणेश मतकरी यांनी केले होते. सुषमा तेंडुलकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुलभा कोरान्ने या व इतर बऱ्याच कलाकारांनी देखील या मालिकेत काम केले होते. या मालिकेच्या निर्मात्या विजया जोगळेकर-धुमाळे होत्या.

चिं.वि.जोशींच्या, संध्या बोडस-काणे व अलका जोशी-मांडके या नातींनी संकलित केलेले ’चि.वि. जोशी – साहित्यातले आणि आठवणीतले’ हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने छापून प्रसिद्ध केले आहे.

  • जयंत नारळीकर
डॉ. जयंत विष्णू नारळीकर

डॉ. जयंत विष्णू नारळीकर

डॉ. जयंत विष्णू नारळीकर (जुलै १९, १९३८) हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.

१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत – गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.

  • जयवंत दळवी
जयवंत द्वारकानाथ दळवी

जयवंत द्वारकानाथ दळवी

जयवंत द्वारकानाथ दळवी (१४ ऑगस्ट, इ.स. १९२५ – १६ सप्टेंबर, इ.स. १९९४) हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले. ही वर्षे ‘प्रभात’ व ‘लोकमान्य’ वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस’ (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्‍न केले.

  • द. मा. मिरासदार
दत्ताराम मारुती मिरासदार

दत्ताराम मारुती मिरासदार

दत्ताराम मारुती मिरासदार (जन्म : १४ एप्रिल, १९२७ – हयात) (रूढ नाव द.मा. मिरासदार) हे मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार आहेत. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इ,स, १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कँप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ पासून ते मराठीचे प्राध्यापक झाले.

व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. त्यातील द. मा. मिरासदार हे माईकसमोर उभे राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळे. कथाकथनाचे तीन हजारांहून अधिक कार्यक्रम झाल्याने त्यांयात कमालीची परिपक्वता आली होती..

मराठीत विनोदाची परंपरा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासली आणि मिरासदारांसारख्या लेखकांनी ती समृद्ध केली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत.

मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तथापि त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती मिस्किल कथा लिहिण्याकडेच आहे

  • दया पवार
दया पवार

दया पवार

दया पवार (इ.स. १९३५ – सप्टेंबर २०, १९९६) हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.

पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे. त्‍यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करीत होते. त्याला किंवा त्याच्या आईला न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन पवारमॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्यांच्या मामा आणि आईच्या धीराने त्यांनी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा दिली. बोर्डिंगच्या अधिकार्‍यांनी दगडूला अपवाद म्हणून बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी दिली. मुलांच्या चिडवण्याचा त्रास होई म्हणून पवार बोर्डिंगजवळच्या एका कोंबडीच्या खुराडात बसून अभ्यास करू लागलेव इंग्रजीमध्ये ६३ मार्क मिळवले.

मॅट्रिक नापास झालेल्या दया पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.

  • ना.सी. फडके
नारायण सीताराम फडके

नारायण सीताराम फडके

नारायण सीताराम फडके (ऑगस्ट ४, १८९४ – ऑक्टोबर २२, १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. इ.स. १९४९मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणार्‍या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते.

अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. लेखिका कमला फडके (माहेरच्या कमल दीक्षित) या ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्‍नी. त्यांच्या एका मुलीचे नाव अंजली. फडके यांनी अंजली प्रकाशन नावाची संस्था काढली होती. या प्रकाशन संस्थेद्वारा ते दरवर्षी ’अंजली’ नावाचा वासंतिक आणि दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असत.

फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (१९६२) ह्या नावाने संग्रहित केलेल्या आहेत.

त्यांच्या काही कादंबर्‍यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत.

  • भालचंद्र नेमाडे
भालचंद्र वनाजी नेमाडे

भालचंद्र वनाजी नेमाडे

भालचंद्र वनाजी नेमाडे (जन्म: २७ मे १९३८, सांगवी, खानदेश) हे परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्‍याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार आहेत.

भालचंद्र नेमाडे हे खानदेशातून मॅट्रिक (१९५५), पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९५९), डेक्कन कॉलेजातून भाषाशास्त्र या विषयात एम.ए.(१९६१) झाले. शिवाय त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले आहे. (१९६४) नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे.

  • पु.भा. भावे
पुरुषोत्तम भास्कर भावे

पुरुषोत्तम भास्कर भावे

पुरुषोत्तम भास्कर भावे (एप्रिल १२, १९१० – ऑगस्ट १३, १९८०) हे मराठी लेखक होते. त्यांच्या लेखनात हिंदुत्ववादी विचारसरणी होती. पु.भा. भावे यांनी १७ कादंबऱ्या, पाच नाटके, १४ लेखसंग्रह आणि दोन प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे.

  • बाबा कदम
बाबा कदम

बाबा कदम

वीरसेन आनंदराव कदम ऊर्फ बाबा कदम (मे ४, १९२९ : अक्कलकोट, महाराष्ट्र – ऑक्टोबर २०, २००९) हे मराठी लेखक होते. शिकार कथेच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ साहित्यिक बाबा कदम यांनी ८० च्या दशकात मराठी साहित्य क्षेत्रात मनोरंजनात्मक कथांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

  • रणजित देसाई
रणजित रामचंद्र देसाई

रणजित रामचंद्र देसाई

रणजित रामचंद्र देसाई (एप्रिल ८, १९२८ – मार्च ६, १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे.

  • लक्ष्मण माने
लक्ष्मण बापू माने

लक्ष्मण बापू माने

लक्ष्मण बापू माने (जन्मः १ जून, इ.स. १९४९) हे भारतातील भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्या साठी झटणारे कार्यकर्ते, तसेच मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे ‘उपराकार’ लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात. त्यांच्या ’उपरा’चे हिंदी रूपांतर ’पराया’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. ‘समाजातील उपेक्षित’ या विषयावरील परिवर्तनवादी व पुरोगामी विचार व्यक्त करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक. हे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे १९९० ते १९९६ या काळात सदस्य होते.

  • लक्ष्मण लोंढे
लक्ष्मण लोंढे

लक्ष्मण लोंढे

लक्ष्मण लोंढे (जन्म : १९४५; मृत्यू : मुंबई, ६ ऑगस्ट, २०१५) हे मराठीतले विज्ञानकथा लेखक होते. बँकेत नोकरी करणार्‍या लक्षण लोंढे यांनी वयाच्या ५०व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी त्यानंत आपला पूर्ण वेळ विज्ञान कथा लेखनात घालविला. दुसरा आइन्स्टाइन ही त्यांची कथा इंग्रजीत ‘सायन्स टुडे’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. पुढे या कथेला कन्सास विद्यापीठाचा जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच कथेची निवड जगातील विज्ञान लेखकांसाठी सर्वोच्च मानल्या जाणार्‍या जेम्स गुन यांच्या ‘द रोड टू सायन्स फिक्शन’च्या १९८९च्या आवृत्तीसाठी निवडली गेली. आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारे ते पहिले मराठी विज्ञान कथालेखक होत. ते सोबत साप्ताहिकामध्येच लक्ष्मणझुला नावाचे सदर लिहीत.

कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी विज्ञान लेखक म्हणून खूप चांगली कामगिरी केली. विज्ञान लेखक होण्यासाठी वैज्ञानिक पार्श्वभूमीपेक्षा जिज्ञासेची आवश्यकता असते हे त्यांनी दाखवून दिले. कथा लिहिण्यासाठी आवश्यक ते पुरेसे ज्ञान जवळ नसल्यामुळे कोणताही विषय त्यांनी निवडला की ते त्या विषयाचा एखाद्या वैज्ञानिकासारखाच अभ्यास करायचे. त्या विषयाशी संबधित प्रकाशित झालेले साहित्याचे वाचन करून तो विषय पक्का करून सामान्यांना समजेल अशा भाषेत त्या विषयाची मांडणी ते करायचे. मराठी विज्ञान परिषदेत नवोदित विज्ञान लेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा व्हायच्या. या कार्यशाळेत नवोदित लेखकांच्या लेखनावर ते अत्यंत मार्मिक टिप्पणी करत असत. या टिप्पणीमुळे त्या लेखकाचा उत्साह वाढे.

वैज्ञानिक कथांव्यतिरिक्त त्यांनी चरित्रे आणि ललित कथा-कादंबर्‍याही लिहिल्या.

  • व. पु. काळे
वसंत पुरुषोत्तम काळे

वसंत पुरुषोत्तम काळे

वसंत पुरुषोत्तम काळे (मार्च २५, इ.स. १९३२ – जून २६, इ.स. २००१; मुंबई, महाराष्ट्र), व.पु. काळे नावाने प्रसिद्ध, हे मराठी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. व. पु काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.

  • वि. स. खांडेकर
विष्णू सखाराम खांडेकर

विष्णू सखाराम खांडेकर

विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी ११, १८९८ – सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.

  • श्री. ना.पेंडसे
श्रीपाद नारायण पेंडसे

श्रीपाद नारायण पेंडसे

श्रीपाद नारायण पेंडसे (जन्म ५ जानेवारी इ.स. १९१९; मृत्यू २२ मार्च इ.स. २००७) हे मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार होते. पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.

  • सुहास शिरवळकर
सुहास शिरवळकर

सुहास शिरवळकर

सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. (नोव्हेंबर १५, १९४८ – जुलै ११, २००३) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक होते.

१९७४ साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते ‘सामजिक कादंबरी’ साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु ‘लोकांना आवडेल ते’ अशा मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, त्यांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी इतर कथांचेही लेखन केले. या कथा पुढे कथासंघांच्या रूपात प्रकशित करण्यात आल्या. सुहास शिरवळकरांनी काही बालकथादेखील लिहिल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहलेल्या कवितांचा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. त्यांच्या ‘देवकी’ या कथेवर आधारलेला मराठी चित्रपट बनला, तर ‘दुनियादारी’, ‘कोवळीक’ या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिकाही प्रसिद्ध झाल्या आहेत.

  • केशव मेश्राम
केशव तानाजी मेश्राम

केशव तानाजी मेश्राम

केशव तानाजी मेश्राम (इ.स. १९३७ – २००७) हे मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार व समीक्षक आहेत. धूळ वावटळ, ओलाव्यातले ठसे हे त्यांचे कथा संग्रह तर चरित, उत्खनन, जुगलबंदी कवितासंग्रह तसेच पोखरण, हकिकत, जटायू आदि कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत.

  • बाबूराव बागूल
बाबुराव बागूल

बाबुराव बागूल

बाबुराव बागूल (जुलै १७, १९३० – मार्च २६, २००८) हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवणाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोहीभाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते.

  • अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे (जन्मनाव : तुकाराम भाऊराव साठे, ऑगस्ट १, इ.स. १९२० – जुलै १८, इ.स. १९६९) हे मराठी लेखक,साहित्यिक,शाहिर व समाज सुधारक होते.

वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला ‘लोकनाट्य` हे बिरुद त्यांनी दिले. [ संदर्भ हवा ] भारताचे तथाकथित स्वातंत्र्य त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबई मध्ये वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, ” ये आझादी झूठी है,देश कि जनता भूखी है!” मार्क्सवादी चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्‍न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते तसेच जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते.

  • शंकरराव खरात
शंकरराव खरात

शंकरराव खरात

शंकरराव खरात (जुलै ११, १९२१ – एप्रिल ९, २००१) हे मराठी लेखक, कादंबरीकार होते. ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूही होते. शंकरराव खरात हे यांचा जन्म आटपाडी येथे झाला. `तराळ-अंतराळ’ हे त्यांचे आत्मचरित्र गाजले. `मी स्वत: महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे` असे ते नेहमी म्हणत. इ.स. १९५८ ते १९६१ या काळात `प्रबुद्ध भारत` या नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केले. इ.स. १९८४ साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते..

`शंकराण्णा तुम्ही असाच साहित्य लेखनात जोर केला पाहिजे. आपण पुढं एकदा माडगूळलाच साहित्य संमेलन घेऊ ` असे माडगूळकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्याप्रमाणेच प्रा. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, शंकर पाटील, प्रा. द.मा. मिरासदार यांच्यासोबत आचार्य प्र.के. अत्रे, शिरीष पै यांनी त्यांना लेखनासाठी उत्तेजन दिले. इ.स. १९५७ साली त्यांची नवयुग दिवाळी अंकात, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी `सत्तूची पडीक जमीन ` नावाची पहिली कथा प्रकाशित झाली. त्यांनतर रामा महार, बंडा मांग अशा बलुतेदारांच्या बारा कथा त्यांनी नवयुगमध्येच लिहिल्या.

इ.स. १९५७-५८ मध्ये शंकरराव खरातांची `माणुसकीची हाक’ ही महार बलुतेदारावर लिहिलेली कादंबरी गाजली. त्यामुळे ते पुढे लेखक म्हणून उदयाला आले. साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले.

  • रा.रं. बोराडे
रावसाहेब रंगराव बोराडे

रावसाहेब रंगराव बोराडे

रावसाहेब रंगराव बोराडे (जन्म : २५ डिसेंबर, इ.स. १९४०) हे मराठी भाषेतील एक लेखक आहेत. इयत्ता १०वीत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या ’पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नामाभिधान मिळाले आहे या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रगट झाले आहे.

  • व्यंकटेश माडगुळकर
व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (जुलै ६, १९२७ – ऑगस्ट २८, २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबर्‍या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद हॊता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.

व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे हे धाकटे बंधू होत.

व्यंकटेश माडगूळकर हे आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५-८५) नोकरीत होते.

आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी ‘माणदेशी माणसे’ (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी (१९५१), हस्ताचा पाऊस (१९५३), सीताराम एकनाथ (१९५१), काळी आई (१९५४), जांभळीचे दिवस (१९५७) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत.

ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळे दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२), आणि सत्तांतर (१९८२), ह्या त्यांच्या कादंबर्‍या उल्लेखनीय आहेत.

उपरोक्त सूचीमध्ये ‘मराठी ग्लोबल व्हिलेज’ टीमद्वारे अधिक माहिती उपलब्ध करून देणे सुरू असुन आपणांस नामावलीच्या संदर्भात सूचना करावयच्या असल्यास स्वागत आहे! आपण ‘संपर्क साधा’ दुव्याद्वारे माहिती देऊ शकता किंवा datateam@marathiglobalvillage.com वरती ई-मेल करू शकता.