मराठी ग्लोबल व्हिलेज

‘उद्धारीली ज्ञानदेवे जगती

मायबोली मराठी भाषा

अमृताची घेऊन ती गोडी

जगी वाढेल मराठी भाषा’

आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीने “ग्लोबल व्हिलेज “(विश्व ग्राम) ही संकल्पना मूर्तस्वरुपात उतरली आहे. जगभर पसरलेल्या मराठी कुटुंबातला संवाद आता सहज शक्य झालाय. संवाद कलेच्या जोरावर जगही जिंकता येतं आणि सृजनशीलतेला नवे पैलू पडतात मग संवाद तर व्हायलाच हवा ना ?…

विस्तारलेलं हे कुटुंब कवेत घेणं तसं महा कठीण. प्रवास सुरू झाला. जगभरातील अनेक मराठी मंडळांना भेट दिली. अर्थात ह्यात साथ होती गुगलबाबाची. विश्वातील मराठीचं हे विस्तारलेलं कुटुंब हळू हळू उलगडत गेलं. मराठी संस्कृती वाचवण्यासाठी नव्हे तर तिला वाढवण्यासाठीचा आपल्या परिवाराचा प्रयत्न केवळ कल्पने पलिकडचा. गुगलवर अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं जगभर विविध देशात ६००हून अधिक मराठी मडळं मराठी माणसाची नाळ मायभूमीशी जोडून ठेवण्याचं,मराठी नाटक, लोककला, साहित्यकृती, कलाकार यांना जागतिक दर्जाचं व्यासपीठ मिळवून देण्याचं मोलाचं काम करत आहेत. सकस साहित्य आणि दर्जेदार कलेला नेहमीच त्यांनी डोक्यावर घेतलंय. महाराष्ट्रातील कलाकारांना परदेशात बोलावून त्यांचं कौतुक,यथोचित मानपान ते करत असतात. परदेशातही मोठमोठ्या हुद्यांवर मराठी मंडळी आहेत. उत्तम दर्जाचे कलाकार ज्यांना आपण “ग्लोबल सेलिब्रिटी” म्हणू शकतो अश्या कलाकारांची खाण आहे. त्यांची मेहनत,धडपड पाहिल्यावर त्यांना सलाम ठोकावासा वाटतो.मग मराठी संस्कृतीचा झेंडा सातासमुद्रापार जपणा-या आपल्या ह्या कुटुंबाचं तर कौतुक व्हायलाच हवं. जगाला त्यांची ओळख व्हायलाच हवी. स्वस्थ बसवे ना…

त्यातूनच आकाराला आलं “मराठी ग्लोबल व्हिलेज”.

चलातर या निमित्ताने जगभर पसरलेल्या मराठी लेकरांमधला संवाद वाढवूया. भावभावनांचं आदान प्रदान करुया. माय मराठी,तिचे संस्कार आणि संस्कृती अधिक समृध्द करूया !

कविता,गाणी,कथाकथन,रंगमंच,संगीत,नृत्य,नाटकांना नवा साज चढवण्याचे कार्य,तसच आजच्या पिढीला मराठीशी जोडून ठेवण्याची जबाबदारी इथल्या मराठी बहाद्दरांनी हाती घेतली आहे. ह्या अमृततुल्य भाषेचा ओघ जगभरातील मंडळींनी वाड्मय रुपी गंगा त्यात सोडून विस्तीर्ण केलाय. अनेक दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल इथे वर्षभर असते. परदेशातही गुढय़ा उभारल्या जाताहेत,दिवे लावले जाताहेत. आपल्या मराठीपणाच्या खुणा आत्मीयतेने जपल्या जात आहेत. मराठी बाणा असलेलं ढोल ताषा पथक तर प्रत्येक देशात कार्यक्रमाची शान वाढवतं. सणवार,महिलांचे हळदीकुंकवाचे उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असतात. महाराष्ट्रातून अनेक युवक निरनिराळ्या कारणासाठी परदेशात जातात, काही तिथे स्थायिक देखील होतात परंतु मायबोलीची आठवण त्यांना सोडत नाही.यावर उपाय म्हणून अतिशय प्रयत्न करून अनेक मराठी संस्थांची सुद्धा स्थापना झालेली आहे. या संस्थांद्वारे आता मराठी शाळांची सुद्धा निर्मिती झाली आहे. मुलांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचे काम मातृभाषा करते. आजची हीच मुले उद्याच्या मराठीचं भविष्य आहेत हे ओळखून इथले पालक मुलांना मराठी शिकवायला शाळेत पाठवतात. ही “शाळा’ आठवड्याच्या शेवटी (वीक एन्डला) भरवली जाते. मुलांना मातृभाषेवर व बोलीभाषेवर प्रेम करायला शिकवा तिला पावन करा हाच तर कुसुमाग्रजांचा अट्टाहास होता नं.

‘गगनापरी जगावे

मेघापरी मरावे

तीरावरी नदीच्या

गवतातूनी उरावे ॥’

या संस्थांद्वारे परदेशात मराठी भाषिक संमेलने सुद्धा भरवण्यात येतात. रशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये मराठी रेडीओ केंद्रे आहेत. त्यावर आजही मराठीतून कार्यक्रम सादर होतात. आजही कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय ही मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात. अनेक उत्कृष्ट दर्जाची नाटकं, चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित झालेली आहेत आणि होत आहेत. या नाटक तसच चित्रपटांमुळेच मराठी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार जाउन तिचे महत्त्व दशपटीने वाढलेले आहे.

‘माझीया मराठीचिये बोलु कवतिके, अमृता तेही पैजा जिंके!”, हीच परिस्थिती.

तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या भाषांसोबत आता मराठी भाषेचा वापर ‘इंटरनेट’ चा उपयोग करणाऱ्यांकडून होतो आहे,  ही मराठी भाषक म्हणून आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब होय. कारण मराठी असे आमुची मायबोली…….

‘माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा

तिच्या संगाने जागल्या

दऱ्याखोऱ्यातील शिळा’

मराठी गेली अनेक शतकं राजभाषा,लोकभाषा म्हणून मिरवतेय मग अभिजात भाषेचा दर्जा तिला का मिळू नये ह्याही प्रश्नाने या निमित्ताने डोक वर काढलं.

मराठी भाषा ही इंडो-आर्यन कुटुंबातील मानली जाते. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत बोलीभाषेपासून झाला असल्याचं मानलं जातं. आद्यकाल,यादवकाल,बहामनी काळ,शिवाजी महाराजांचा काळ,पेशवे काळ,इंग्रजी काळ,१९५० ते १९८०  अशा विविध कालखंडात आपण मराठीचं अस्तित्व विभागू शकतो. समाजजीवनातल्या बदलानुसार भाषा बदलत राहिली असं मानायला काहीच हरकत नाही.

 साताऱ्यामध्ये सापडलेले तांब्याचे शिलालेख इ.स.७९५चे आहेत. अक्षीचा शिलालेख मराठीतील आद्य शिलालेख असून त्यावर शके ९३४ म्हणजेच इ.स. १०१२ असा स्पष्ट उल्लेख आहे. हा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीत आहे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा जैन दिगंबर पंथीय श्रवणबेळगोळ येथील बाहुबलीच्या पायथ्याशी असलेला शालिवाहन शके १०३८-३९ म्हणजेच इ.स. १११६-१७ सालातील “श्री चावुण्ड राजे करवियले श्री गंगराजे सुत्ताले करवियले     ”अशा नोंदीचा मानला जात होता, परंतु शं.गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे अक्षीचा शिलालेख हा पहिला शिलालेख ठरतो. दिवे इथे सापडलेले जमीन व्यवहाराचे तांब्याचे शिलालेख हे इ.स.१०६० किंवा इ.स.१०८६ चे आहेत. याचा अर्थ असा कि मराठी ही १२व्या शतकापर्यंत एक अधिकृत लिखित भाषा झाली होती. मराठी भाषेच्या उगम इतिहासातील सज्जड पुरावे म्हणजे कोरीव ताम्रपट आणि शिलालेख होत. त्या सर्वांवर काळाची नोंद नसली त्यांच्या अक्षरांच्या वळणावरुन त्या काळाची नोंद होऊ शकते. इ.स.११८७ नंतर यादव काळात मराठीचा वापर वाढला. यादव राजे अगोदर कन्नड आणि संस्कृत भाषा वापरत असत. हा काळ इ.स. १२५० ते इ.स. १३५० असा आहे. देवगिरी यादवांचे महाराष्ट्रावर प्रेम होते. त्यामुळे मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला होता. पुढे मराठी भाषेचा प्रसार महानुभाव आणि वारकरी पंथांमुळे झाला. यादव राजवटीतील शेवटच्या तीन राजांच्या काळात ज्योतिष, आयुर्वेद, पुराण, वेदांवर मराठी साहित्य गद्य आणि काव्य रूपात तयार करण्यात आले. मराठीतील सर्वात जुने गद्य पुस्तक हे “विवेकसिंधु” मानले जाते, पुढे १२३८ मध्ये माहीमभट्ट यांनी “लीळाचरित्र” लिहिले, जे महानुभाव पंथातील चक्रधर स्वामी यांचे आत्मवृत्त होते. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे आपल्या भाषेतील ‘ळ’ हे अक्षर जपा कारण हेच आपल्या भाषेचे वैभव आहे आणि केवळ मराठीत ‘ल’ आणि ‘ळ’ ही दोन स्वतंत्र अक्षरे आहेत. पुढे माहीमभट्ट यांनी चक्रधर स्वामी यांचे गुरु गोविंदप्रभू यांचे आत्मवृत्त “गोविंदप्रभूचरित्र” लिहिले. महानुभाव संप्रदायाने धर्म आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी मराठीला वाहन बनवले. सातवाहनांनंतर भगवद्गीतेचा अन्वयार्थ मराठीत लिहून सर्वसामान्यांना “ज्ञानेश्वरी”तून भक्तीची कवाडं खुली करून देऊन मराठी चळवळीचीच जणू स्थापना झाली.

माझा मराठीची बोलू कौतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

संत नामदेव यांनी मराठीत तसच हिंदी भाषेत श्लोक, अभंग लिहिले. संत तुकाराम यांनी सुमारे ३००० अभंग लिहिले. सल्तनत काळातही मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला.राजकीय क्षेत्रात या भाषेचा अंतर्भाव झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. महाराजांनी “राज्यव्यवहार कोश” बनवून घेतला. १७६० मध्ये मराठ्यांचे राज्य अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडोदा ते बंगाल असे ‘अटक ते कटक’ पसरले होते. आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे,त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले. १८ व्या शतकात, पेशवा काळात खूप मराठी साहित्य लिहिले गेले. अभंगगाथा, भागवत, केकावली, यांसारखी वाड्मयातील तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. “पोवाडा” आणि “लावणी” प्रकारचा उगम झाला. अनंत फंदी, राम जोशी आणि होनाजी बाळा यांनी पोवाडा आणि लावणी प्रसिद्ध केले. ब्रिटिश राज कालावधी १९व्या शतकाच्या सुरुवातीला ख्रिश्चन धर्मप्रचारक विल्यम केरी यांनी मराठी व्याकरणाचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केला. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वर्तमानपत्र “दर्पण”सुरु केले. याच काळात संगीत नाटकही विकसित झाले. मराठी नाटकाच्या प्रसिद्धीमुळे मराठीचा विस्तार झाला. आधुनिक मराठी काव्याचे पिता केशवसुत यांनी आपली पहिली कविता १८८५ मध्ये प्रकाशित केली. इंग्रजांच्या राजवटीत निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेत अप्रतिम वाड्मयनिर्मिती करून मायबोलीचे संरक्षण केले ज्योतिबा फुले आणि गोपाळ हरी देशमुख यांनी “दिनबंधू” आणि “प्रभाकर” नियतकालिकांची सुरुवात केली. इंग्लंडमध्ये अध्ययनासाठी गेलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महात्म्याने मातृभाषेविषयीचा अभिमान कधीही सोडला नाही. मराठी भाषेच्या शुद्धीकरणाची चळवळ त्यांनीच सुरु केली. इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन भाषासमृद्धीचे व्रत त्यांनी घेतले होते. मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी या आंग्ल अधिका-याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी चिन्हांची ओळख करून दिली.

२०व्या शतकात मराठी भाषेने पुढचा टप्पा गाठला. मराठी साहित्य,नाटक, चित्रपट यांनी मराठी भाषा आणखी विस्तारली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठीला घटना दुरुस्ती (आर्टिकल) ३४४(१) आणि ३५१ नुसार शासकीय राजभाषेचा दर्जा मिळाला.

मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. सांस्कृतिक संरक्षणामुळे ९० च्या दशकात मराठीभाषेची खूप प्रगती झाली. २०व्या शतकाच्या उत्तरार्धात दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी मराठीत उल्लेखनीय कार्ये झाली. साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलं होतं. छबिलदास, दलित पँथर, नवकम्युनिस्ट अशा चळवळींचं वातावरण एकीकडे फुलत होतं तर दुसरीकडे अ‍ॅकॅडेमिक साहित्याचा आणि समीक्षेचा उदय होत होता. सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा होता. मध्यमवर्गीयांना रिझवण्याची जबाबदारी पु.ल. देशपांडेंवर होती. त्यानंतर घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर, गिधाडं ही सत्तरीच्या पूर्वार्धातली तर चिं. त्र्यं खानोलकरांची मिस्टरी आणि दिलीप चित्रे, विलास सारंग, भाऊ पाध्ये हे सुद्धा साठीच्या दशकातले. ग. वा. बेहरेही याच काळात दणाणत होते. त्याच काळात स्त्री मुक्ती चळवळीचा नवीन प्रवाह उदयाला आला. त्यात छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकींनी वैचारिकतेला नवं परिमाण दिलं. यात प्रमुख वाटा होता तो म्हणजे खांडेकर, विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, विष्णू वामन शिरवाडकर, पी.के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे ,आणखी खूप साहित्यिक, कलाकारांचा.

मराठी भाषेचा इतिहास अतिशय आव्हानात्मक असा असला तरीसुद्धा काही लोकांच्या अनन्यसाधारण कार्यामुळे आज मराठी भाषेचा वर्तमान अतिशय सुंदर असल्याचेच दिसते. या भाषेचा उद्धार करण्याचे काम आपल्या सर्वांनाच एकत्र येउन करावे लागणार आहे. बदलत्या काळात इंग्रजी सुद्धा शिकली पाहिजे, वेळ प्रसंगी हिंदी सुद्धा बोलावी लागतेच पण मायभाषेचा गोडवा कशातच नाही. वास्तविक मराठी भाषेची किती विविध गोंडस रूपे आहेत. अहिराणी, वह्राडी डांगी, मराठा, झाडी, कोकणी या बोली ऐकताना एक वेगळाच आनंद मिळतो. सहा भाषांचे रस एकत्र झाल्याने तिची गोडी काही औरच आहे.

प्रत्येक भाषेची श्रीमंती ही त्या भाषेतील साहित्याच्या श्रीमंतीवरून करण्यात येते. गद्य, पद्य, नाटक अशा तिनही क्षेत्रात मराठी भाषेतील साहित्य रचना आज उत्कृष्ट दर्जाची आहेत. मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी अखिल भारतीय संमेलने होत नाही. मराठी भाषा २००० वर्षांपासून अस्तित्वात असलेली प्राचिन आणि सुंदर भाषा आहे. भाषा ही संस्काराचे, संस्कृतीचे आणि विकासाचे प्रतिक असते. मराठीत उच्चार, व्यंजन, स्वर यांत गल्लत नाही. (असलीच तर ती अत्यल्प). मराठी भाषा ही अत्यंत तरल, सुक्ष्म व संवेदनाशील आहे. अशा या संपन्न, परिपूर्ण भाषेचा जगातील ८००० (आठ हजार) भाषांमध्ये १५ वा क्रमांक लागतो.

मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर या भाषेला तमिळ भाषेप्रमाणेच ‘अभिजात भाषे’चा दर्जा देण्याच्या प्रयत्नाला हातभारच लागणार आहे.

मराठी भाषेला आज वैश्विक रुप आलय. जगभरात पलरलेलं हे बलशाली मराठी कुटुंब, महाराष्ट्रातील “जे जे उत्तम उदात्त उन्नत” आहे ते ते जगण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न करत आहेत,त्यामुळे मराठी भाषेचा स्वाभिमान उगवत्या सूर्याप्रमाणे अधिकच प्रकाशमान झाला आहे. सातासमुद्रापलीकडे जाऊन यशाच्या शिखरावर पोहचूनही, माय मराठीच्या अस्तित्व खुणा जपणारी मराठी माणसं आपला महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी, तो टिकविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

आज ख-या अर्थाने जाणवतय ‘माझ्या मऱ्हाटीचा वेलू गेला विश्वावरी..’

मराठीचं पाऊल पुढे पडतय. मराठी भाषा,संस्कृती अधिकाधिक ग्लोबल होतेय. आपल्या ह्या वैश्विक कुटुंबासाठी, हे ओंजळभर दान.

“मराठी ग्लोबल व्हिलेज”, हे विश्वची माझे घर…

मृदुला(जोशी) अतुल पुरंदरे