मराठी पाऊल हिंदीत पडतच राहू देत …..

 आजच्या पिढीतील मराठी अभिनेत्री हिंदीत जाण्या बाबत अधिक फोकस्ड आहेत

मराठी चित्रपट रसिकांच्या आनंदाच्या अनेक गोष्टींतील एक म्हणजे, मराठी चित्रपटातील कलाकार हिंदीतील मोठ्या बॅनरच्या वा निर्माता-दिग्दर्शकाच्या चित्रपटात दिसणे.

अश्विनी भावेने आर. के. फिल्मचा ‘हीना ‘ ( १९९१) साईन केला, त्या काळात खरं तर मराठी दैनिकात फक्त शुक्रवारी एकच दिवस चित्रपटाच्या बातम्या येत, पण तो नियम वा चौकट मोडून अश्विनी मराठीतून हिंदीत झेपावली ही ‘मोठी बातमी ‘ झाली आणि मराठी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले. ‘हीना ‘ रिलीज झाल्यावर त्यातील अश्विनीचा अभिनयाचं कौतुक झालंच पण तिला अतिशय किंमती फॅशनेबल कपडे परिधान करायला मिळाले आणि ‘देर न हो जाए… ‘ या गाण्यातील दमदार नृत्याचीही बरीच तारीफ झाली. यावरुन मराठी समिक्षक व प्रेक्षकांचा मराठीच्या पडद्यावरून हिंदीत झेपावत असलेल्या कलाकारांबाबत, खास करुन मराठी अभिनेत्रींबाबतचा सकारात्मक आणि कौतुकाचा कल स्पष्ट होतो. विशेष म्हणजे, ही सर्वकालीन भावना आहे. आता तर ती वाढलीय.

मराठीच्या पडद्यावरून हिंदीत गेलेले/जात असलेले/जाऊ इच्छिणारे असे नायक/नायिका/चरित्र कलाकार/विनोदवीर/ छोटीशीच भूमिका यांची सूची द्यायची म्हटली तरी बरीच होईल. कधी असेही झालयं, अरे बापरे हिंदीत जायचं तर आपले मराठी वळणाचे हिंदी तिकडे चालेल ना अशी एखाद्याला भीती, एखादीला हिंदीतले हायफाय कल्चर आपल्याला कसे बरे सूट होईल याची चिंता, एखाद्याने म्हटलं, मराठी कलाकाराने हिंदीत काय फक्त नोकराची भूमिका करायची?, एखादीला वाटले, ती अमकी हिंदीत गेली तर मलादेखील एखाद्या हिंदी चित्रपटात भूमिका मिळू देत, निदान तशी घोषणा तरी होऊ देत, न्यूजमध्ये राहता येईल. जेवढे कलाकार तेवढे भिन्न दृष्टिकोन. काही मराठी कलाकारांनी मात्र व्यावसायिक वृत्तीने सेक्रेटरी नेमला वा एखाद्या कास्टींग डायरेक्टरकडे आपला प्रोफाईल देत हिंदीत कामे मिळवलीही. तात्पर्य, मराठीतून हिंदीत जाणे हा खूपच मोठा आणि बहुरंगी/बहुढंगी विषय आहे, त्यात समज आणि गैरसमज याची अनावश्यक मिलावट आहे. अर्थात, सिनेमाचे जग म्हणजे भास आणि आभासातून वस्तुस्थितीकडे असाच अनेकदा प्रवास असतो…

आजच्या पिढीतील मराठी अभिनेत्री मात्र हिंदीत जाण्याबाबत अधिक फोकस्ड आहेत. राधिका आपटेचेच उदाहरण घ्या, ‘घो मला असला हवा ‘या मराठी चित्रपटातून ती या क्षेत्रात येताना तिला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट नवतारका हा पुरस्कार मिळाला. पण आपला आत्मविश्वास, टॅलेंट आणि सौंदर्य या गुणांवर तिने हिंदीत स्वतःचे स्थान निर्माण केले. या वाटचालीत तिने ‘लय भारी ‘ या एकमेव मराठी चित्रपटात खणखणीत भूमिका साकारली. एका हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने तिची भेट झाली असता, पुन्हा मराठीत का नाही हा प्रश्न मी केला असता ती म्हणाली, एका मराठी चित्रपटाची भूमिका आवडल्याने होकार दिला, पण काही कारणास्तव तो चित्रपट सेटवर गेलाच नाही. चांगली पटकथा असेल तर मराठीत नक्कीच काम करेन. पण आजच्या हिंदी चित्रपटातही केवढी तरी विविधता आहे, अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळतेय. कलाकार म्हणून जे सुख हवे ते त्या विविधतेत आहे, राधिका आपटेचा हा मुद्दा पटण्यासारखा आहे.

खरं तर आजच्या ग्लोबल युगात एकाच वेळेस अनेक भाषांतील चित्रपटात भूमिका साकारायची संधी आहे. म्हणूनच तर पल्लवी सुभाष एखाद्या दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटात भूमिका करते आणि तो चित्रपट ऑस्ट्रेलियातील चित्रपट महोत्सवात दाखल होतो हे विशेष कौतुकाचे आहे.

आपले मराठीनंतरचे पहिले लक्ष, बॉलीवूडकडे असते आणि आजच्या मराठी अभिनेत्रींनी अधिकाधिक प्रमाणात हिंदीत भूमिका साकाराव्यात असे वाटण्यामागचे कारण म्हणजे, हिंदीतील विविधता आणि स्टाईल यात शंभर टक्के फिट बसतील अशी गुणवत्ता, पटकथेची समज, सेक्स अपिल, नृत्य क्षमता आणि महत्वाचे म्हणजे भाषा त्यांच्याकडे आहे. सई ताह्मणकर उत्तम उदाहरण आहे. ‘लव्ह सोनिया ‘तील अतिशय अवघड व्यक्तिरेखा तिने मेहनतीने साकारली. सईतील टॅलेंटला हिंदीत भरपूर वाव आहे. तेथे आज खूप गोष्टींवर चित्रपट बनताहेत. पण तिचे दुर्दैव म्हणजे, तत्पूर्वी, ‘हंटर ‘मध्ये तिने दिलेल्या बोल्ड दृश्याच्याच भूमिका तिला हिंदीत मोठ्याच प्रमाणात ऑफर झाल्या. पहिल्या वेळेस थीमची गरज असल्याने ‘तसे ‘ दृश्य दिले होते, नंतर कदाचित तसेच दृश्य माईंडमध्ये ठेवून काही दिग्दर्शक भेटण्याची शक्यता असते. ते नकोसे वाटते. हा ‘उलटा प्रवास ‘ हिंदीत टाळावा लागतो. ते कसोटीचे/कसोशीचे/कौशल्याचे आहे. थीमची गरज म्हणून नेहा महाजनने एका मल्याळम चित्रपटात अवघ्या काही सेकंदाचे नग्नदृश्य साकारले. ते कुठेही बिभत्स वा अतिरंजित वाटत नाही. या दृश्याबाबत तिने आपल्या पालकांशी सविस्तर चर्चाही केली. हिंदीत तिने ‘गांव ‘ हा फेस्टीवल सिनेमा केला आणि ‘सिम्बा ‘ हा मसाला सिनेमाही करत समतोल ठेवलाय. आता टी सिरीजच्या हिंदी चित्रपटात भूमिका करतेय. ‘सिम्बा ‘ने वैदही परशुरामीला ओळख दिलीय. अंजली पाटील मॅच्युरिटीने हिंदीत वाटचाल करतेय. हिंदीत वावरायचे म्हणजे फिल्मच असायला हवे असे काही नाही, तुम्ही चांगले काम करा, तुम्हाला चित्रपट मिळत जातात हे अमृता सुभाष, अंजली पाटील अशा उदाहरणांवरून स्पष्ट होईल.

अमृता खानविलकरनेही हिंदी चित्रपटसृष्टी आणि इंग्लिश मिडिया यांचे लक्ष वेधून घेतलयं. एका हिंदी वेबसिरिजमध्ये बोल्ड थीमनुसार दृश्ये देतानाचा धीट अभिनय तिने तितक्याच आत्मविश्वास आणि आकर्षितपणे केला. आपण स्क्रीनवर नेमक्या कशा दिसणार आहोत याचे भान जगभरातील सगळेच कलाकार ठेवतात, पण बाथसीन/बेडसीन/किस सीन चुकीच्या पद्धतीने पडद्यावर दिसू नयेत याची खूपच खबरदारी घ्यावी लागते. अर्थात, तसेही काही एक्सवायझेड दर्जाचे चित्रपट हिंदीत बनतात, पण त्या वाटेला मराठी अभिनेत्री जात नाहीत, अजिबात जाणार नाहीत. ते शाॅर्ट कट स्वीकारण्यापेक्षा आपली गुणवत्ता, ओळख आणि ग्लॅमरवर मराठी अभिनेत्रींचा विश्वास आहे. पूजा सावंतने ‘जंगली ‘तून हिंदीत पाऊल टाकलं तेही दिग्दर्शक चक रसेल यांच्या चित्रपटातून, ही विशेष गोष्ट आहेच. आणि या पहिल्याच पावलात तिला इंग्लिश मिडियात कव्हरेज लाभल्याने ती अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचतेय. हिंदीत गेलो तरी मराठीतही चांगले चित्रपट करणार ही भावना तिने माझ्याशी बोलताना व्यक्त केलीय.

आजच्या ग्लोबल युगात बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपट असा भेदभाव न करता करियरची आखणी करणे गरजेचे आहे. अर्थात, मराठी चित्रपटांची निर्मिती अवाढव्य म्हणावी अशी वाढलीय, पण तेवढाच नवीन कलाकारांचा फ्लोही वाढलाय, ‘दुसरी बाजू ‘ म्हणजे, उठसूठ कोणत्याही मराठी चित्रपटात भूमिका का साकारावी? मग हिंदीचा उत्तम पर्याय आहे. तेथे अधिक पैसाही आहे, बदलती जीवनशैली पाहता तोही गरजेचा आहे, तेथे व्यवस्थित नियोजनबध्दपणे काम होते, पूर्वप्रसिध्दी होते, स्टार म्हणून त्याचीही गरज आणि सवय असते. मराठी संस्कृती, सभ्यता, मूल्ये यांच्याशी बांधिलकी ठेवून अवश्य हिंदीत जा, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकरने हिंदीत स्टार म्हणून घडताना मराठीपण जपलयं. सोनाली कुलकर्णी ( सिनियर) मराठी व हिंदीसह कन्नड ( चेऊली) इत्यादी भाषेतील चित्रपटातून वाटचाल करताना मराठी बाणा कायम ठेवलाय. मिथिला पालकर वेबसिरिज स्टार म्हणून ओळखली जाते, तीदेखिल ‘मुरंबा ‘सारख्या स्वच्छ मराठी चित्रपटात असते. दुसरीकडे पहावे तर मराठी अभिनेत्री बिकिनीमध्येही स्मार्ट दिसतात, हे दीप्ती सतीने ‘लकी ‘मध्ये तर आदिती पोहनकरने सोशल मिडियात तसे फोटो पोस्ट करुन सिध्द केले.

पूर्वी, असे व्हायचे की हिंदीत अशी दृश्य कशी द्यायची? त्यापेक्षा नायकाच्या बहिणीच्या भूमिकेत हिंदीत जाऊया. पण आजच्या डिजिटल पिढीच्या मराठी अभिनेत्रींत बिकिनीसाठीची मानसिक ताकद आहे. तात्पर्य, हिंदीच्या थीममधील व्हरायची आजच्या मराठी अभिनेत्रींत आहे आणि हिंदीपेक्षा आणखीन एक मोठा गुण आहे, तो म्हणजे नृत्य आणि त्यातून बेहतरीन अदाकारी. हिंदी अभिनेत्रींइतकाच ड्रेस सेन्स मराठी अभिनेत्रींतही आहे. ( सोनाली कुलकर्णी, ज्युनियर)
या विषयात अनेक वळणांवर अनेक गोष्टी आहेत, कधी प्रिया बापटची मुन्नाभाईतील प्यार की छप्पी सांगता येईल तर कधी एखाद्या सिनेपत्रकाराचा एखाद्या अभिनेत्रीला, ‘तू हिंदीत का जात नाही?’ असा खूप सरळ प्रश्नही सांगता येईल. पण त्या प्रश्नाचे उत्तर असे अनेक गुंतागुंतीने भरलयं हे वास्तव असले तरी तेच स्वीकारून मराठी अभिनेत्रींनी हिंदी इतक्यावरच थांबू नये, खूप खूप पुढे जावे हीच सदिच्छा….

दिलीप ठाकूर

चित्रपट समीक्षक,करमणूक ब्लॉग्ज लेखक