भावगीत हा मराठी संगीतातला एकेकाळचा सगळ्यात लोकप्रिय प्रकार. साधी चाल आणि भिडणारे शब्द या भांडवलावर या गाण्यांनी इतिहास घडवला.  ‘शुक्रतारा मंदवारा’, ‘फिटे अंधाराचे जाळे’ किंवा सिनेसंगीताबाबत ‘हृदयी वसंत फुलताना’, ‘चोरीचा मामला..’ अशी गाणी गुणगुणणारी एक पिढी होती… नंतर आलेल्या गुरू ठाकूरच्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ने कमाल केली. शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गाणं घराघरांत जाऊन पोहोचलं. घरातून ते सर्व वयोगटातल्या कानांत स्थिरावलं. त्यापश्चात  अजय-अतुल, अवधूत गुप्ते यांची मराठी सिनेमातली अनेक गाणी गाजली. नंतर ठेक्यांचा ट्रेंड आला. शब्दरचना कधी कधी गौण ठरेल इतके लक्ष रसिक ठेक्यांकडे देऊ लागले. अन्य भाषेच्या गाण्यांचा प्रभाव देखील मराठी गाण्यांवर जाणवण्याईतपत होता. अगदी मराठी सिनेमांमधून रॅप, हिप-हॉप ठेक्यांवर मराठी गाणीही रचली गेली. या ठेक्यांपासून या शब्दांना विलग केलं असता, तो प्रकार गद्यातच मोडत असे. तात्पर्य, या काळात मराठी गाण्यांपेक्षा ठेके महत्त्वाचे होते. चारेक वर्षं हा प्रकार चालला. त्यानंतर मात्र सिनेसंगीताच्या बदलाचं वारं वाहू लागलं. तरल, भावोत्कट, तरुणाईला आवडेल अशा विषयांचे सिनेमे आले आणि मराठी संगीताने पुन्हा मेलडीची कास धरली. ठेक्यांपेक्षा चाल आणि गीतरचनेकडे लक्ष जाऊ लागलं. ठेक्यात सतत झिंगून पडलेल्या तरुणाईला या संगीताने हात दिला. एरवी गाणी ऐकून आक्रमक होणारी तरुणाई मराठी सिनेमाची गाणी डाऊनलोड करून मोठाल्या स्पीकरवर ऐकण्यापेक्षा मोबाइलवर ऐकू लागली, कारण ही गाणी आजच्या पिढीला खूप जवळची वाटू लागली.

नंतर आलेल्या ‘नटरंग’, ‘झेंडा’, ‘बालगंधर्व’ आदी सिनेमांमुळे मराठी संगीताला ग्लॅमर मिळालं. ‘मुंबई-पुणे-मुंबई’नंतर प्रेमगीताचा ट्रेंड जास्त वेगाने फोफावला. अनेक चांगल्या सुरावटीची गाणी मराठी इंडस्ट्रीला मिळाली. यामध्ये ‘बीपी’(सुसंगती सदा घडो, हरवली पाखरे), ‘प्रेमाची गोष्ट’(ओल्या सांजवेळी), ‘दुनियादारी’(टिकटिक वाजते, देवा तुझ्या देव्हाऱ्याला, जिंदगी जिंदगी), ‘नारबाची वाडी’ (गजाल खरी काय), ‘लग्न पहावे करून’ (रेशमी बंधने, तू श्वास सारे), ‘मंगलाष्टक वन्समोअर’ (उसवले धागे, दिवस ओल्या पाकळ्यांचे) अशा अनेक सिनेमांचा समावेश होतो. यांसह ‘टाइमप्लीज’, ‘वंशवेल’ यांचीही गाणी आवर्जून ऐकली जात होती. एका बड्या मोबाइल कंपनीने मागे केलेल्या सर्वेक्षणात ‘टिक टिक वाजते’ हे गाणं डायलर टोनमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होतं. ‘सैराट’ च्या संगीताची भुरळ मराठीप्रमाणे अगदी हिंदीपासुन अन्य भाषेच्या गीतरसिकांनादेखील पडली. हे चित्र आनंददायी आहे.

मराठी गाण्यांच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण संकतस्थळे :

आठवणीतील गाणी

आपल्या माहितीतील संकेतस्थळ अथवा माहिती येथे प्रकाशित करावयाची असल्यास कृपया marathiglobalvillage@gmail.com वर संपर्क साधा.