एकदा एक पिता-पुत्र एका घोड्याला घेऊन जात होते.

मुलाने वडिलांना सांगितले, ‘‘तुम्ही घोड्यावर बसा, मी पायी चालतो. वडील घोड्यावर बसले.

रस्त्याने जात असता लोक म्हणू लागले, ‘‘बाप निर्दयी आहे. लहान मुलाला उन्हातून चालवतो आणि आपण मात्र आरामात घोड्यावर बसला आहे. हे ऐकून वडिलांनी मुलाला घोड्यावर बसवले आणि आपण पायी चालू लागले.

पुढे भेटलेल्या लोकांनी म्हटले, ‘‘मुलगा किती निर्लज्ज आहे पहा ! आपण तरुण धडधाकट असूनही घोड्यावर बसला आहे आणि बापाला पायी चालवतो आहे ! हे ऐकून दोघेही घोड्यावर बसले.

पुढे गेल्यावर लोक म्हणाले, ‘‘हे दोघेही म्हसोबासारखे आहेत आणि छोट्याशा घोड्यावर बसले आहेत. बिचारा यांच्या वजनाने दबून जाईल. हे ऐकून दोघेही पायी चालू लागले.

काही अंतरावर गेल्यानंतर लोकांचे बोलणे ऐकू आले, ‘‘किती मूर्ख आहेत हे लोक ? बरोबर घोडा आहे, तरीही आपले पायीच चालले आहेत.

तात्पर्य : काही केले, तरी लोक टीका करतात; म्हणून तिकडे लक्ष न देता आपल्याला योग्य वाटते त्यानुसार वागणे हितकर