एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.
आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, ‘अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?’
जुना मालक म्हणाला, ‘मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.’
या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, ‘तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?’
जुना मालक – होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही.
न्यायमुर्ती – तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे.
जुना मालक – (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !
न्यायमुर्ती – ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.’
न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.