पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासुर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. मोठा धूर्त आणि कावेबाज होता. दुर्गमासुर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे. देवांचे जीवन वैभवात, सुखात असे. मानव श्रद्धने जगत होते. समाधानात रहात होते. ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गमासुर सूक्ष्मरीत्या पाहात असे आणि आत्यंतिक द्वेषबुद्धीने मुठी वळून-वळून त्यांच्या नाशाचा विचार करी; पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे, हे त्याला समजत नसे.

अखेर एक दिवस उजाडला.

विनाशकारी अज्ञातशक्तीने दुर्गमासुराला प्रेरणा दिली. ‘‘शत्रूचे बळ कशात आहे, ते ओळखावे. त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे. शत्रू निर्बळ आणि हतबळ झाला की, त्याची हत्या करावी. विजय मिळवावा.’’

दुर्गमासुराने या दुष्टनीतीचा अवलंब करण्याचे ठरवले.

दुर्गमासुर हिमालयावर गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करुन लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, ‘‘असुरा, मी प्रसन्न आहे. वर माग.’’

हात जोडून असूर म्हणाला, ‘‘देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे.’’

ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, ‘‘तथास्तु.’’

ब्रह्मदेवांचा एकच शब्द ‘‘तथास्तु’’; पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली.

देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुराध्ये प्रविष्ट झाली.

सृष्टीमधील चैतन्य संपले. शक्ती संपली. सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले. प्रभाहीन झाले. शक्तीहीन झाले. हतबल झाले. वरदानामुळे शक्तिसंपन्न बनलेला दुर्गमासुर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. सर्वांना हाकून लावले. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरु झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गमासुर उन्मत्त, बेफाम बनला. मानवांच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरु झाले.

अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वत:ला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तेथे लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सामर्थ्यहीन, ज्ञानहीन, तेजोहीन झालेल्या सर्व देवमानवांनी, ऋषींनी श्रध्देची कास धरली. एकवेळ बाहूतील शक्ती नष्ट होते, एकवेळ बुध्दीचे सामर्थ्य नष्ट होते; पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रध्दा कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का ? नाही. ही निमालेली श्रध्दा या अंधारी गुहेत जागी झाली. काळ्या अंधारात प्रकाशकिरण यावा तसे झाले.

सर्व देव, मानव आणि ऋषी जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. गुहेतील भयानकता श्रध्देमुळे आणि उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता. श्रध्देमुळे मोठा आधार निर्माण झाला. एक नव्या ओजाचा, तेजाचा, सामर्थ्यांचा प्रत्यय सर्वांना आला.

उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कशी प्रकट झाली ? कसे रुप होते तिचे ? आगळे-वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच-उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडेझुडे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रुप विविधरंगी; पण तेजस्वी. जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला ‘‘शताक्षी’’ असे म्हणू लागले. देवीच्या शंभर नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवा जोम आला. नवे जीवन मिळाले.

देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण ‘‘शाकंभरी’’ देवी असे म्हणू लागले.

यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तीने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्रेअस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गमासुराला युध्दासाठी आव्हान दिले. दुर्गमासुर आपल्या सैन्यासह लढू लागला; पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले.

सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह देवांकडे, ऋषीमुनींकडे आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, ‘‘हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. हेच माझं एक स्वरुप आहे. ज्ञानाची उपासना करा. मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे तुमचे कल्याण होवो.’’ एवढे बोलून देवी अंतर्धान पावली.

शाकंभरी देवी ही खर्‍या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले. पालनपोषण केले. खर्‍या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला. म्हणूनच पौष पोर्णिमाला शाकंभरी देवीची उपासना केली जाते.

.