एका गावात एक अतिशय श्रीमंत माणूस रहात होता. तो एका मोठ्या वाड्यात रहात असे. अनेक मौल्यवान गोष्टी त्याच्याकडे होत्या. तो चांगले अन्न खात असे. त्याच्याकडे पुष्कळ नोकर-चाकर होते. मात्र कुणाला पैसे देण्याची वेळ आली की, तो अतिशय स्वार्थी आणि कंजूष बने. या श्रीमंत माणसाला आणखी एक सवय होती. तो इतरांकडून काम करून घेई; पण त्यांना पैसे देण्याची मात्र टाळाटाळ करे. त्यांना पैसे न देण्यासाठी तो काही ना काही तरी बहाणा शोधत राही.

एकदा एका रम्य सकाळी एक प्रसिद्ध गवई त्याच्या वाड्यावर आला आणि त्याने त्या श्रीमंत माणसाला आपले गाणे ऐकण्याची विनंती केली. त्याने पुष्कळ गाणी म्हटली. श्रीमंत माणूस त्यात पूर्णपणे रंगून गेला. त्या अवर्णनीय गाण्याचा मनमुराद आनंद श्रीमंत माणसाने घेतला. गाणे संपल्यानंतर त्याने आपल्या दिवाणजींना बोलावले आणि गवयाला एक लाख सुवर्णमुद्रा द्या, असा आदेश दिला.

गवयाला हे ऐकून अतिशय आनंद झाला. तो आपल्या मनाशी म्हणाला, ‘‘हा माणूस कंजूष आहे, अशी लोक याची उगीचच बदनामी करतात. वस्तुतः तो अतिशय दयाळू अंतःकरणाचा दिसतोय. त्याने मला एक लाख सुवर्णमुद्रा इनाम म्हणून द्यायला सांगितल्या.’’

त्यानंतर गवई त्या श्रीमंत माणसाच्या दिवाणजींकडे गेला आणि म्हणाला, ‘‘तुमच्या मालकांनी मला एक लाख सुवर्णमुद्रा द्यायला सांगितले आहे. तेवढ्या मला द्या.’’

त्यावर दिवाणजी म्हणाला, ‘‘तुम्हाला माझे मालक कसे आहेत ते माहीत नाही. ते अगदी नखशिखांत कंजूष आहेत. ते अशा प्रकारचे इनाम अनेकांना घोषित करतात. प्रत्यक्षात मात्र कुणालाच काही देत नाहीत.’’

दिवाणजींचे बोलणे ऐकून गवई पुन्हा त्या श्रीमंत माणसाकडे गेला आणि म्हणाला, ‘‘आपण मला एक लाख सुवर्णमुद्रा इनाम म्हणून दिले होते; पण आपले दिवाणजी ती रक्कम मला देत नाहीत.’’

त्यावर श्रीमंत माणूस हसत म्हणाला, ‘‘यात दिवाणजींची काहीच चुक नाही. तुम्ही गाणे गाऊन माझ्या कानांना सुख दिलेत. मी इनाम जाहीर करून तुमच्या कानांना सुख दिले. तुम्ही ते शब्द ऐकलेत आणि तुमच्या हृदयात आनंदाच्या लाटा उसळल्या. आपण दोघांनीही परस्परांना आनंद दिला, तेव्हा इथे आपला व्यवहार पूर्ण झाला. आता तू घरी जाऊ शकतोस.’’

गवयाला पुष्कळ वाईट वाटले; पण या पाषाणहृदयी माणसाच्या मनाला पाझर फुटणार नाही, हे त्याच्या लक्षात आले आणि तो घरी परतला.

योगायोगाने त्याच रात्री त्या कंजूष माणसाच्या वाड्याला आग लागली. आगीचे लोळ उंच उंच जाऊ लागले. सगळ्या नगरीत दिसू लागले. लोक तिथे आले; पण कुणीही आग विझवायला पुढे आला नाही; कारण अनेक लोकांचे पैसे त्याने बुडवले होते. लोक दुरून वाडा जळतांना बघत होते. बघता बघता वाड्यातील सगळ्या मौल्यवान चीजवस्तू जळून खाक झाल्या. भल्या मोठ्या राखेचा ढीग तिथे उरला. लोक बघत होते आणि म्हणत होते, ‘‘या कंजुषाला देवाने चांगली शिक्षा दिली. ज्याला दुसर्‍याला दुःख देताना आनंद होतो, त्याला कधी ना कधी असेच दुःख भोगावे लागते.’’

.