यसर आमटी (पारंपरिक)

साहित्य:-

गहू 1 पाव
हरभरा डाळ अर्धा पाव
उडीद डाळ अर्धा पाव
कलमी 10 ग्रॅम
मोठी विलायची 5 ग्रॅम
लवंग 5 ग्रॅम
काळी मिरी 5 ग्रॅम
स्टार फुल 5 ग्रॅम
जायपत्री 5 ग्रॅम
धने 10 ग्रॅम
जीरे 10 ग्रॅम
शहाजीरे 5 ग्रॅम
हळकुंड अर्धा नग
सुकं खोबरं 3 चमचे

कृती:-

गहू आणि हरभ-याची डाळ समप्रमाणात घेऊन मंद आचेवर भाजून दळून घ्या. सर्व मसाल्याचे साहित्य मंद आचेवर थोडया तेलात परतून मिक्सरमधे बारीक करुन घ्या. जेवढे पीठ तेवढा मसाला एकत्र करुन ठेवा. वेळेवर लसूणची फोडणी देऊन आमटी तयार करा.

ज्चारीच्या हुरडयाचे वडे

साहित्य –

ज्वारीचा हुरडा 1 वाटी
लसूण पाकळया 5 ते 6
आलं 1 चमचा
जीरे 1 चमचा
लिंबू 1 नग
मीठ चवीनुसार
तांदूळाचे पीठ 2 चमचे
हिरव्या मिरच्या 2 ते 3
कोथिंबीर 4 चमचे

कृती –

ज्वारी कोवळा हुरडा काढून जाडसर दळून घ्या. दळता दळता त्यात आलं-लसूण, मिरची, कोथिंबीर व जीरे घालून एकत्र करा. हे मिळून यायला दोन चमचे तांदूळाचे पीठ, थोडा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालून एकत्र करा. हलक्या हाताने गोळे तयार करुन तळून घ्या.

गव्हाची खीर

साहित्य –

गहू पाऊण वाटी
दूध 3 वाटया
पाणी 1 वाटी
साखर पाऊण वाटी
चारोळी 4 चमचे
वेलची पावडर 1 चमचा

कृती –

सर्व प्रथम गहू बारा तास पाण्यात भिजत घाला. नंतर त्याला मोड आणा. मोड आल्यानंतर 1 वाटी पाण्यात पाव चमचा मीठ घालून गहू उकळत ठेवा. थोडे शिजल्यावर त्यामध्ये दूध घालून आटवा. जेव्हा गहू पूर्णपणे शिजतील तेव्हा साखर, वेलची पूड व चारोळी घाला. साखर विरघळल्याव गरम गरम खीर खायला दया.

 खारवडया

साहित्य –

बाजरी 2 वाटया
तीळ अर्धी वाटी
जीरे 1 चमचा
लसूण 1 चमचा
हिरवी मिरची चिरलेली 1 चमचा
कोथिंबीर 1 चमचा
मीठ चवीनुसार

कृती –

बाजरीला पाणी लावून ओलवून घ्या व भरडून आणा. भरडून आणल्यावर एकदा त्याला पाखडून घ्या. त्यामुळे त्यातील छिलके बाहेर निघून जातील. नंतर याची उकड काढून घ्या. उकड काढतांनाच त्यात तीळ, जीरे, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर व मीठ घाला. शेवटी याच्या छोटया-छोटया वडया टाकून घ्या व उकड उन्हात दोन ते तीन दिवस वाळवत ठेवा. या वडयांना तसेच खाता येते किंवा जेवणाच्या वेळी तळून सुद्धा खाऊ शकतो.

दहित्री

साहित्य:-

बेसन अर्धी वाटी
मैदा 2 वाटया
दही 3 चमचे
मीठ चिमुटभर
तेल 1 चमचा

कृती:-

सर्व साहित्य एकत्र करुन कोमट पाण्यात 7-8 तास भिजवत ठेवा. नंतर 2 तारी साखरेचा पाक तयार करुन त्यामधे लिंबू पिळून ठेवा. पसरट कढईत तूप गरम करुन पळीने मैदा व बेसनाचे मिश्रण ओता. ते फसफसून वर येईल. थोडी जाळी पडल्यावर हलकेच काढून पाकात घाला.

सांडग्याची भाजी

साहित्य –

हरभरा डाळ 1 किलो
मुग डाळ अर्धा किलो
तूर डाळ पाव किलो
सोललेल्या लसणाचे वाटण 2 चमचे
चिरलेली कोथिंबीर 1 वाटी
तिखट 1 वाटी
जिरेपूड अर्धा वाटी
हिंगपूड 1 चमचा
मीठ चवीनुसार
हळद –

(सर्व डाळी रवाळ दळून घ्याव्यात.)

सांडग्याची कृती:-

डाळीचं रवाळ पाठ रात्री पाण्यात घट्ट भिजनू ठेवावं. सकाळी त्यात लसूण वाटण, कोथिंबीर, तिखट, हिंग, जिरेपूड, मीठ टाकून पीठ एकसारखं सरसरीत भिजून घ्यावं. प्लाॅस्टीक पेपरवर छोटे छोटे सांडगे घालून उन्हात वाळवावे. कडकडीत वाळलवर बरणीत भरुन ठेवावे.

रस्स्याची कृती:-

भरपूर कांदा बारीक चिरुन तेलात लालसर करुन घ्यावा. त्यात सांडगे घालून परतावे. त्यात हळद, मीठ, एक टमाटर चिरुन टाकावा. कांदा मसाला टाकून परतावा. पाण्याचा हबका देऊन झाकण ठेवावं. शिजल्यावर कोथिंबीर आकावीर. भाकरीबरोबर सांडग्याची भाजी चांगली लागते.

 पुरणाचे दिंड

साहित्य –

हरभरा डाळ 2 वाटया
मैदा अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
तेल पाव वाटी

कृती:-

नेहमीप्रमाणे 2 वाटया हरभरा डाळीचे पुरण शिजवून घ्या. मैदा, मीठ व तेल एकत्र भिजवून त्याचा गोळा करुन ठेवा. मैदयाचा एक छोटा गोळा घेऊन त्यात 2 चमचे पुरण भरुन तो बंद करावा. असे छोटे छोटे उंडे तयार करुन घ्यावे. नंतर मोदक पात्रात चाळणीवर ठेवून वाफेवर उकडावेत.

 दोडक्याचा शिरांची चटणी

साहित्य –

दोडक्याच्या शिरा पाव किलो
लसूण पाकळया 7-8
शेंगदाण्याचा कुट पाव वाटी
तेल 2 चमचे
मीठ चवीनुसार
मिरची 2-3
हिंग, जीरे फोडणीकरीता

कृती –

पाव किलो दोडक्याच्या शिरा काढून तेलावर खरपूस परतून घ्या. त्यात बाकीचे साहित्य चवीप्रमाणे घालून मिक्सरमधून वाटून घ्या .नंतर तेलावर हिंगाची फोडणी टाकून परतून घ्या. शिरा परतताना मिरची सुद्धा घाला.