विवाह संस्कार

विवाह हा संस्कार सोळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामधे दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. या सोहळ्यात धार्मिक विधीबरोबर इतर सर्व विषयांचा सुंदर मिलाप झालेला असतो. या सोहळ्यात वधूवरांची सलगी वाढण्यासाठी त्यामधे रचनाच अशी केली आहे. उष्टी हळद लावणे, सूत्रवेष्टन, सुवर्णाभिषेक असे अनेक विषय यामधे आहेत. या संस्कारामध्ये वडिलधार्‍या मंडळींचा योग्य सन्मान केला जातो. वधूपक्ष व वरपक्ष हे एकमेकांचे आदरसत्कार करतात. त्यानंतर अंतरपाट हा काहीवेळेसाठी आलेल्या विरहाचे प्रितीत रुपांतर करतो. या संस्कारामध्ये वधू व वर दोघेही देव, अग्नी पुरोहित यांच्यासमोर एकमेकांशी कायम एकनिष्ठ राहण्याचे वचन देतात. तसेच सप्तपदीच्यावेळी दोघेही एकत्र सात पाऊले चालून नाते आणखी दृढ करतात. वधूचे गोड नाव ठेवले जाते. उंबरठ्याचे माप ओलांडुन प्रवेश करणार्‍या गृहलक्ष्मीच्या आगमनाने सर्व कुटुंब आनंदी होते. या संस्कारामध्ये त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली जाते. आलेल्या गुरूजींबरोबर पाहुणे मंडळी त्या उभयतांना भरभरून आशीर्वाद देतात. अशा या सोहळ्याचे स्वरूप आहे.

आवश्यक सर्वसामान्य साहित्य

१. हळदकुंकू
२. गंध
३. अक्षता
४. फुले
५. दूर्वा
६. दर्भ
७. उदबत्त्या
८. दीप
९. साखर
१०. कापूर
११. विड्याची पाने
१२. अखंड सुपार्‍या
१३. नारळ
१४. गुलाल, रांगोळी
१५. पल्लव
१६. गहू किंवा तांदूळ
१७. पाट
१८. कलश
१९. ताम्हण
२०. पळ्या
२१. पंचपाळी
२२. मंगळसूत्र
२३. वधू व वर यांना द्यावयाचे कपडे
२४. वधूच्या भावास द्यावयाची भेटवस्तू
२५. दोन मोठे हार
२६. फुलांचे गुच्छ
२७. लाह्या
२८. तुपाची वाटी
२९. दारावर लावण्यासाठी तोरण आणि गणपतीचे चित्र.

वाङनिश्चय

१. हळकुंडे
२. कलश
३. साडीचोळी (मुलीस देण्यासाठी)
४. दागिना (सोन्याचा पदर, अथवा लॉकेट, मुलीस घालण्यासाठी)
५. पाने व सुपार्‍या
६. पूजासाहित्य
७. आप्त इष्ट
८. औक्षणाची तयारी.

वरप्रस्थान

१. नवा धोतरजोडा
२. फुलांच्या माळा
३. घोडा, पालखी किंवा गाडी
४. मुंडावळ
५. पोषाख
६. आप्तइष्ट
७. पांढरे छत्र.

मधुपर्क

१. मध (लहान वाटी)
२. दही
३. कास्यपात्र (काशाचे भांडे)
४. विष्टर (दर्भाची दोरी)
५. जानवी (२)
६. शेला
७. अंगठी
८. अक्षता (कुंकू लावून)
९. तांब्याताम्हन, पळीपंचपात्री
१०. पाय धुण्यास पाणी,
११. पाय पुसण्यास रुमाल
१२. गंध
१३. पुष्प-फुले
१४. सुपार्‍या.

गौरीहर

१. वधूवस्त्र (अष्टपुत्री)
२. पाटावरवंटा
३. कापसाचे सूत
४. तांदूळ पाव किलो
५. पंचोपचार पूजासाहित्य.

परस्परनिरीक्षण

१. दोन किलो तांदूळ किंवा गहू
२. अन्तःपट (चांगले शुभ्र वस्त्र)
३. तांदूळ, गूळ व जिरे एकत्र करून (चिमूटभर)
४. दर्भ
५. अक्षता (कुंकू लावून)
६. वधूवरांच्या मागे बहिणीने हातात घ्यावयाचा कलश (पाण्याचा तांब्या), आंब्याचे डहाळे, त्यावर नारळ, व तबकात कणकीचे दिवे.

कन्यादान

१. दागिने (कन्येबरोबर द्यावयाचे असतील ते)
२. दर्भ
३. अक्षता
४. तांब्या, पंचपात्री, पळी, ताम्हन
५. कास्यपात्र
६. वरदक्षिणा
७. अभिमंत्रित उदक
८. उंबराचे कोवळे पल्लव
९. कोरे कापसाच सूत
१०.हळकुंड
११. लोकर
१२. तांदूळ (दोन ओंजळी)
१३. दूध (लहानशी वाटी)
१४. तूप (लहानशी वाटी)
१५. सुवर्ण (गुंजभर)
१६. फुले
१७. पुष्पमाला
१८. लगीनसाडी (चांगले वस्त्र, चोळी-लुगडे)
१९. मंगलसूत्र
२०. सुपार्‍या, हळकुंडे, लाडू.

विवाहहोम

१. माती (स्थंडीलासाठी घमेलेभर)
२. सहाण
३. साळीच्या लाह्या (अच्छेर)
४. तांब्या
५. आम्रपल्लव, गंध, फुले
६. तांदूळ (एक किलो)
७. तूप (अद्पाव, होमाकरिता)
८. सूप
९. फुंकणी
१०. समिधा-लाकडे, गोवर्‍या
११. गोमय.

ऐरिणीप्रदान

१. ऐरिणी (१६ लहान सुपे व १ डाली)
२. आंब्याचे डहाळे
३. पिठाचे दिवे
४. दोन खण.

सामान्य सूचना

वर्‍हाडासाठी भोजन हे शास्त्रात नमूद केलेले नाही. परंतु दूरवरून आवर्जुन पाहुणे येत असल्याने त्यांना भोजन देणे आवश्यक ठरते. ते यजमानाने आपापसात ठरवून द्यावे.

 देवांना निमंत्रण-

पत्रिका पूजन : कन्यापक्षीय व वरपक्षीय यांनी इष्ट काळ कळावा म्हणून मुहूर्त पत्रिकेची (आमंत्रण पत्रिका ) / मुहूर्त रुपी सरस्वतीची पूजा करण्याची पद्धत आहे .

निमंत्रणाच्या पत्रिका छापून झाल्यावर वर प्रमुख तसेच वधूप्रमुख आणि घरातील इतर वडिलमंडळी हे सर्व घरातल्या देवांना तसेच गावातील ग्रामदेवता शक्य झाल्यास कुलदेवता यांच्या मंदिरात जाउन आमंत्रण करतात. मंदीरात गेल्यावर देवाला/देवीला हार, फ़ुले नारळ विडा ठेउन देवीचे मंदीर असेल तर सुवासिनी खण – नारळाने ओटी भरतात. पत्रिका ठेवतात. नमस्कार करून आपल्या घरी जातात. नंतर इतर आप्तेष्टांना आमंत्रण करतात. कार्यामध्ये कोणतेही विघ्न येउ नये म्हणून प्रथम देवांना निमंत्रण देण्याची पद्धत आहे.

  • विवाहापूर्वी मुहूर्त करणे, हळकुंड फोडणे,असे काही विधी घरातील महिला करतात.
  • लग्नाच्या आधी हळद लावणे, घाणा भरणे, ग्रहमख असे विधी करण्याची प्रथा आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी सीमांतपूजन केले जाते.
  • हिंदू विवाह कायद्याप्रमाणे हिंदूलग्नात लाजाहोम, कन्यादान आणि सप्तपदी हे तीन विधी अत्यावश्यक मानले गेले आहेत.
  • या जोडीने विवाह संस्कारात गणपती पूजन, कुलदेवता पूजन, मधुपर्क, संकल्प, कन्यादान किंवा स्वयंवर, अक्षतारोपण, मंगल सूत्र बंधन, पाणिग्रहण, होम, लाजाहोम, अश्मारोहण, सप्तपदी, अभिषेक, कर्मसमाप्ती, मंगलाष्टके असे विधी होतात. *त्याशिवाय काही ठिकाणी कंकण बंधन, कानपिळी, गाठ बांधणे, झाल, रुखवताचे भोजन, वधूने गौरीहार पूजणे असे लौकिक विधीही केले जातात.

विवाहाचे प्रकार- १)ब्राह्मविवाह, २)दैवविवाह, ३)आर्षविवाह, ४)प्राजापत्यविवाह, ५)असुरविवाह, ६)गांधर्वविवाह, ७)राक्षसविवाह, ८)पिशाचविवाह. असेविवाहाचे आठ प्रकार आहेत. त्यातला ब्राह्मविवाह हा सर्वोत्तम मानला आहे. या विवाहाच्या प्रकारामध्ये अत्ताच्या परिस्थितीत ज्या प्रकारे केला जातो वेदमंत्र पठणपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने त्याला ब्राह्म विवाह म्हणतात. बाकी सर्व प्रकार येथे सांगणे उचित वाटत नाही.

विवाह ठरल्यानंतर सर्व प्रथम वधू-वरांचे गण, गोत्र, नाडी हे सर्व जमते की नाही हे पाहिले जाते. साधारण ३६ गुणांमधील १८ गुण जमल्यास पत्रिका जमली असे मानले जाते. पण त्याबरोबर ग्रहमैत्री पाहिली जाते. ग्रहमैत्री जर उत्तम असेल तर गुण जरा कमी असतील तरी चालू शकते. एका संस्कृत श्लोकात लग्न ठरले की कोणाच्या काय अपेक्षा असतात याचे सुंदर वर्णन केले आहे.

॥ कन्या वरयते रूपम् माता वित्तं पिता श्रुतम् ।

बान्धवा: कुल मिच्छंती मिष्ठान्नं इतरे जना: ॥

म्हणजेच लग्नाच्या मुलीला सुंदर दिसणारा पती हवा असतो. सासूला जावयाच्या सापंत्तिक सुस्थितीचे महत्व वाटते. सासरा जावयाच्या शिक्षणावर लुब्ध असतो. बांधव वराचे कुल-शील चांगले असले की राजी होतात. व बाकी सर्व मंडळी आपल्याला मिष्ठान्न मिळणार म्हणून आनंदी असतात.

देवक ग्रहमख-

विवाहाच्यावेळी सर्व ग्रहांची कृपा असावी म्हणून ग्रहमख केला जातो. या मध्ये प्रथम कुलदेवतांसाठी नारळविडे ठेवण्यात येतात. नंतर संकल्प केला जातो. व गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन नांदीश्राद्ध केले जाते. याची सविस्तर माहिती अनुक्रमणिकेमध्ये गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन व नांदीश्राद्ध या विषयांमध्ये पहावी. हे सर्व झाल्यानंतर मंडपदेवतांचे पूजन होते. या देवता ज्या मंडपामध्ये विवाह सोहळा होणार आहे त्याठिकाणी काही विषेश जागी या देवतांना स्थापन केले जात असे.   पुर्वी घरी मंडपामध्ये विवाहसोहळा होत असल्याने हे शक्य होत असे. परंतु आता शहरात हे शक्य होत नसल्यामुळे घरातच देवघराजवळ या देवतांची स्थापना केली जाते. किंवा वधूपिता, वाधुमाता व वधू तसेच वरपिता, वरमाता व वर आपल्या घरी किंवा विवाहस्थळी वेगवेगळे देवक ठेवतात . पूजन-कुलस्वामी-मंडप देवता यांचे पूजन करून कार्य निर्विघ्नपणे  पार पाडण्यासाठी यांची प्रार्थना केली जाते . तसेच ब्राह्मणांचे आशीर्वाद ग्रहण केले जातात. आंब्याच्या पानांनी हळद चढविणे , यजमान – नवरा ,नवरी यांना आप्तेष्टांच्या भेटी किंवा आहेर , सुवासिनींकडून लामण दिव्यांची कुरवंडी वगैरे गोष्टींचा या संस्कारात समावेश होतो. आलेले गुरूजी यजमानांच्या गोत्राचा व नावाचा उच्चार करून संकल्प करतात गृहशुद्धीकरून अग्नीची स्थापना केली जाते व नवग्रह मंडल देवतांचे आवाहन पूजन केले जाते. व त्यांच्या प्रीत्यर्थ भात/ तांदूळ, समिधा व तूप यांचे हवन केले जाते. हवन पूर्ण झाल्यावर देवतांचे उत्तरपूजन करून कलशातील पाण्याने यजमान व घरातील मंडळींवर अभिषेक केला जातो. व यजमानांना आशीर्वाद देवून कार्यक्रमाची सांगता होते. ग्रहमख (ग्रहयज्ञ ) : ग्रहशांती निमित्त करण्यात येणारा हा यज्ञ लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा आधी आठ दिवस केला तरी चालतो . यात नवग्रहांच्या पूजेला तसेच वरुण देवाच्या पूजेला महत्व दिले जाते. ग्राहमखाच्या  दिवशी वराचे ( वधूचे ) घरचे केळवण तसेच वराच्या घरी वधूच्या आईवडिलांना पित्याच्या घरची मेजवानी – व्याही भोजन करण्याचा प्रघात आहे.

घाणा : घाणा भरणे हा एक लौकिक विधी आहे . घाणा भरताना दोन मुसळे आंब्याच्या पानांनी सुशोभित करून त्यांनी उखळात उडीद -सुपारी -तांदूळ -हळकुंड घालून ती पाच सुवासिनी लग्नाचा मुलगा ( मुलीकडे मुलगी ) व आई वडील मिळून कांडतात . मुलीकडील हळद घेऊन आलेल्या सुवासिनी आपण आणलेल्या तेलाच्या वाटीत नवरदेवाला पायाचा अंगठा बुडवायला सांगून  ती तेल हळद घेऊन मुलीकडे जातात .त्याने स्नान घालून उरलेली हळद व तेल (उष्टी हळद ) मुलाच्या अंगाला लावून त्याला मंगल स्नान घालतात .

वाग्दान,साखरपुडा-

वाग्दान म्हणजे (वाक् म्हणजे वाणी तिने जे दान देणे म्हणजे वाग्दान) या समारंभामध्ये “कन्या आणि वर यांचे पालक एकत्र येऊन विवाहा संबधी बोलणी करतात. वरमुलगा उत्तम पोषाख करून शुभदिवस पाहून वधूच्या घरी जातो. तिथे गेल्यानंतर त्यांचे स्वागत केले जाते. त्यानंतर मुख्यकार्याला सुरूवात केली जाते. अलंकाराने भूषित कन्येला पूर्वदिशेला मुख करून बसवले जाते. मुलाचेवडील मुलीच्या हातात नारळ विडा देतात. नंतर मुलगा मंत्रघोषात अमुक नावाची ही कन्या भार्या म्हणून मी स्वीकार कततो. असे तीन वेळा म्हणतो. नंतर परंपरेनुसार हळदीकुंकु, साडीचॊळी, अलंकार, यांनी मुलीची पूजा करतात. हे झाल्यानंतर मुलीच्या वडिलांकडून गणेशपूजन केले जाते. सर्वगुणसंपन्न अशा मुलाला ही मुलगी देव, ब्राह्मण, अग्नी यांच्यासमोर देईन असे संस्कृतमधून आलेले गुरूजी वदवून घेतात. याठिकाणी वाग्दान विषय पूर्ण होतो.

लग्नात रुढीप्रमाणे धार्मिक गोष्टींसहीत लौकीक गोष्टी केल्या जातात. त्यातील साखरपुडा एक. हा विधी लग्नाआधी चांगला दिवस पाहून केला जातो. यामधे गणेशपूजन, वरूणपूजन केले जाते. यावेळी वराची आई / अन्य सुवासिनी वधूला साडी देतात. काही ठिकाणी ५ फ़ळांनी ओटी भरतात. पेढे वाटून या समारंभाची सांगता केली जाते.

सीमांत पूजन-

सीमांतपूजन म्हणजे गावाच्या सीमेवर केले जात असे. आत्ताच्या परिस्थितीत शक्य होत नसल्यामुळे मुलीच्या घरी सर्वसाधारण लग्नाच्या आदल्यादिवशी हे सिमांतपूजन संपन्न होते. यामधे मुलीचेवडील मुलाचेपूजन करतो असा संकल्प करून गणेशपूजन करतात व वराचे पाय धुवून , वस्त्रेभूषणे , विडा नारळ देऊन त्याचा मान करतात .तसेच वरपक्षाकडील इतर मंडळीनाही अत्तर , गुलाब पेढा देऊन सन्मान केला जातो . ज्येष्ट जावई असल्यास ज्येष्ट जावई , मुलगी , नातवंडे यांचाही वधूपिता मान करतो . याच वेळी व्याही भेट करण्याची पद्धत आहे .

रुखवत-

रुखवत : वर ,वरपिता , वरमाता तसेच मुलाकडील मानाची जी माणसे असतात ती व लहान मुले यावेळी जेवायला बसतात . जेवायला बसल्यानंतर वधूची आई जावयाला तुपाची आपोवणी देते . तसेच जेवणानंतर पाच पानांचा विडा करून त्यामध्ये चांदीचा रुपया घालून द्यावयाचा असतो .त्याला ओले रुखवत म्हणतात . दुपारी जेवणानंतर विहिणीला व मानाच्या बायकांना सुपारी , साखर तसेच चांदीच्या लवंगा देतात

मधुपर्क-

मधुपर्क : मधुपर्क म्हणजे दही व मध यांचे मिश्रण , हा मधुपर्क नवरदेवाला प्राशन करावयास देऊन त्याचा मोठा सत्कार केला जातो . विवाहाकरता वर मंडपात आल्यानंतर त्याला ओवाळून बसण्याकरता दर्भासन प्रदान करतात .नंतर त्याचे पाय धुवून मधुपर्क प्राशनासाठी दिला जातो .गंध , अक्षता , फुले ,वस्त्र, जानवी जोड , अलंकार वगैरे शक्य असेल तेवढे देऊन वरची पूजा व सत्कार करतात . वराबरोबर आलेले ब्राम्हण व नातेवाईक यांचाही मान केला जातो.

गौरीहरपूजन-

लग्नाला बोहल्यावर उभे राहण्या पूर्वी वधूने गौरी व शंकर तसेच इंद्राणी यांची पूजा करावयाची असते . पाटा व वरवंटा यावर हळदीने गौरी व हर यांची चित्रे काढून त्या भोवती सुत गुंडाळतात किंवा एका पाटावर गौरी हाराची बोळकी ( साखरेची किंवा लाकडाची एकावर एक अशी चिकटवलेली पाच बोळकी असतात ) मांडतात . मुलीला तिचे बरोबर देण्यासाठी आणलेली अन्नपूर्णेची मूर्ती पाटावर मध्यभागी ठेवतात . तसेच तांदुळाच्या राशीवर इंद्राणी करिता सुपारी मांडतात . पाटावर बाजूला लादुगडू ठेवतात . या देवतांची ( गौरीहर पूजा ) वधूने करायची असते.म्हणजे शिव-पार्वती व इंद्राची पत्नी शची यांची पूजा करते. यामध्ये सिंहासनावर बसलेल्या, देवांवर सत्ता असणार्‍या, सर्व अलंकारानी युक्त अशादेवीला वंदन, तसेच मस्तकावर चंद्र धारणकरून रुद्राक्षांच्यामाळा धारण करून व्याघ्रचर्मावर आरूढ आहे व भक्तांवर कृपा करतो त्या शंकराचे पूजन व देवतांच्या समोर

देवेंद्राणि नमस्तुभ्यं देवेंद्र प्रिय भामिनी ।

विवाह भाग्यमारोग्यं पुत्रलाभंच देही मे॥

अशी प्रार्थना केली जाते.

घटी पूजन :- घटी म्हणजे तांब्याचे एक विशिष्ट आकाराचे भांडे , याला तळांत एक बारीक छिद्र असते . ते पाण्याच्या घंगाळात ठेऊन पूर्ण भरून बुडाले म्हणजे एक घटका झाली असे मानतात . लग्नपत्रिकेत जो घटी , पळे  यांचा मुहूर्त असतो तो मोजण्या करता यांचा उपयोग करतात .मात्र हल्ली या साधनाचा उपयोग क्वचितच केलेला आढळतो .

अंतरपाट-

अंत:पटधारण – मंगलाष्टके : मुहूर्त जवळ आल्यावर मंडपात मध्यभागी स्टेज वर पूर्व पश्चिम दोन पाट ठेऊन त्यावर तांदूळ राशी घालून बाजूला रांगोळी घालावी . अन:पटाच्या दिशा उत्तरेकडे करून तो दोन ब्राह्मणांनी असा धरावा कि मुहूर्ता आधी वधू वर एकमेकांना दिसू नयेत. पूर्वेकडे तोंड करून वधू व पश्चिमेकडे तोंड करून वराला उभे करतात . मंगलाष्टके चालू झाल्यावर वधूचा मामा वधूला बोहल्यावर आणतो .अंत:पाट धरल्यावर मुहूर्ताची मंगल वेळ येईपर्यंत मंगलाष्टके गायली जातात . आठ मंगल श्लोक म्हणजे एक अष्टक . या श्लोकात वधूवरांना उपदेश , आशीर्वाद ,शुभेच्छा दिलेल्या असतात .नवग्रह देवता यांची स्तुती असते . मुहूर्त वेळेला अंत:पट दूर केला जातो व प्रथम वधू वराला व नंतर वर वधूला हर घालतो .वधू आणि वर यांच्यामध्ये जो पडदा काहीवेळासाठी धरला जातो त्याला अंतरपाट असे म्हणतात. मंगलाष्टके म्हणून झाल्यावर तो दूर केला जातो. त्यावेळी दोन मने एक होतात. व पुढील आयुष्यात कधीही पडदा येउ नये. अशी त्यामागे भावना आहे.

मंगलाष्टक-

विशिष्ट मुहूर्तावरती गुरूजी मंगलाष्टके सुरूवात करतात. प्रथम गणेशचिंतन केले जाते. वधूवरांचे कायम मंगल असावे असा आशीर्वाद या मंगलाष्टकाद्वारे दिला जातो. व आलेली इच्छुक मंडळीसुद्धा मंगलाष्टके म्हणतात. आणि प्रत्येकजण आशीर्वादाच्या अक्षता वधूवरांवरती उधळतात. तदेव लग्नं …. श्लोकाने लग्नाचा मुख्यमुहूर्त होतो. त्यानंतर अंतरपाट बाजूला घेतला जातो. व वधूवर एकमेकांच्या गळ्यात (प्रथम वधू) हार घालतात. त्या आनंदाच्यावेळी सर्वांना पेढे वाटले जातात. *या दिवसापासून ते वधूवर आपल्या नवीन जिवनाची सुरूवात करतात.

कन्यादान-

मम समस्त पितृणां निरतिशय सानंद ब्रह्मलोक अवाप्त्यादि कन्यादान कल्पोक्त फ़ल अवाप्तये अनेन वरेण अस्यां कन्यां उत्पादयिष्यमाण संतत्यां द्वादश वरान् द्वादश परान् पुरुषांश्च पवित्रीकर्तुं आत्मनश्च श्रीलक्ष्मीनारायण प्रीतये ब्रह्मविवाह विधिना कन्यादानमहं करिष्ये.

अशा रितीने पंचवीस पिढ्यांना ब्रह्मलोकाची प्राप्ती करून देते असे या कन्यादानाचे महत्व आहे.

कन्यादान हे परंपरेने पृथ्वीदानाइतके महत्वाचे मानले आहे . समाजहिताच्या दृष्टीने कन्यादान करून कन्येला संसाराला लावणे अत्यंत आवश्यक कर्तव्य आहे . म्हणून कन्यादानाचे महत्व समाजात बिंबवणे आवश्यक आहे . योग्य स्थळी कन्यादान होऊन चांगली प्रजा निर्माण झाली  म्हणजे कन्यादानाची सांगता झाली असे मानण्यात येते .कन्यादानाच्या वेळी कन्येचा वधू म्हणून स्वीकार करताना येणारी जबाबदारी – बंधने यांची वराला जाणीव दिली जाते .
विवाह सर्व अर्थाने सुखी यशस्वी होण्याकरता धर्म, अर्थ, काम यांचा वैवाहिक जीवनात आनंद उपभोग घेताना मर्यादेचे उल्लंघन करणार नाही असा निश्चय  / वचन वराने द्यावे लागते .

सुवर्णाभिषेक-

कन्यादानानंतर पाणी मंत्रून ब्राह्मण वधू-वरांवरती अभिषेक करतात.

कंकण बंधन-

कंकण बंधन : वधूवरांच्या भोवती मंत्रघोषाने सुत्रबंधन करण्याचा विधी . वधूवरांना एकत्र बांधून टाकणारा सलोखी वाढवण्याचा संस्कार आहे .

अक्षता रोपण-

अक्षता रोपण –  मंत्राघोशामध्ये वधू वराच्या मस्तकावर व वर वधूच्या मस्तकावर अक्षता घालतात . माझी ऐश्वर्य प्राप्तीची , संपत्तीची , संततीची इच्छा पूर्ण होवो  अशी प्रार्थना वधू करते . तर माझी यशाची , त्यागाची , धर्माची , कीर्तीची इच्छा पूर्ण होवो अशी प्रार्थना वर करतो .

मंगळसूत्र बंधन : इष्टदेवतेचे स्मरण करून त्याच वेळी वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो . ते बांधताना तो अशी प्रार्थना करतो,      मांगल्यतंतुनानेन मम जिवन हेतुना ।

कंठे बध्नामि सुभगे साजीव शरद: शतम् ॥

( हे पतिव्रते माझ्या जीवनाला कारण किंवा त्याचे प्रतिक असे हे मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात बांधतो . तू माझ्यासह १०० वर्षे सुखाने रहा. याच वेळी वधूची शालू(मुख्य साडी) पाच फ़ळे यांनी ओटी भरतात. बांगड्या पाटल्या इ. नी अलंकृत केले जाते.)

विवाह होम (लाजा होम)-

वैदिक मंत्राधारित विवाह होम -लाजा होम करतात. पाणि ग्रहण : वर विधीपूर्वक वधूचा हात स्वीकारतो .
वधूचा हात वरमुलगा हातात घेतो. व उभयता अशी शपथ घेतात की, आजपासुन एकमेकांशी एकनिष्ठ तसेच इतर प्रत्येकाशी विश्वासपूर्ण अनंतकाळ वागू.

आवाहन केलेल्या अग्नीमध्ये वधू लाह्यांच्या तीन आहुती अर्पण करते. तिचा भाऊ यावेळी तिला मदत करतो. त्यावेळी अशी कल्पना केली आहे, की त्या मुलीचे हात किंचित भाजतात आणि भातापासून तयार झालेल्या या लाह्या ती अग्नीला अर्पण करते. यामधून असे सुचीत होते की त्यांचे जीवनसुद्धा भातापासुन तयार झालेल्या स्वच्छ लाह्यांसारखे समृद्ध व्हावे. याचा दुसरा अर्थ असा आहे की वधूच्या हाता मध्ये तिचा भाऊ लाह्या देतो. व लाह्यांप्रमाणे स्वच्छ असलेली माझी बहीण तिची जवाबदारी तो वरमुलगा याच्यावर सोपवतो. अग्निप्रदक्षिणा : संतती, संपत्ती आणि आरोग्य या ऐहिक सुखांच्या प्रित्यर्थ वधू वरांद्वारा हा विधी केला जातो .

अश्मा रोहण : वधूने वराच्या आयुष्यात आजन्म अचल (स्थिर ) रहावे आणि सहधर्मचारिणी बनून वराला धीर देणारी आणि त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारी मैत्रीण बनावे अशी अपेक्षा  अभिप्रेत आहे .

कानपिळी-

वधूचाभाऊ असे वचन मागुन घेतो की, तुम्ही माझ्या बहीणीची चांगल्याप्रकारे सर्वकाळ काळजी घ्याल. आणित्यानंतर वरमुलगा असे प्रतिवचन देतो की, माझ्याकडून जास्तीतजास्त काळजी घेईन व कायम सुखात ठेवीन. ( यावेळी वराचा कान पिळण्याचा लौकिक प्रकार केला जातो.)

सप्तपदी-

सप्तपदी :या विधीमध्ये वाधुसमावेत सात पावले टाकताना वराच्या वधूच्या संबंधी अपेक्षा, तसेच तिच्या विवाहोत्तर कर्तव्यांची जाणीव याचे दिग्दर्शन आहे .

या विधीतील सप्तपदी विधीचे रूपाने आपण उभयता विष्णू – लक्ष्मी स्वरूप असून त्यांच्या प्रमाणेच उदात्त व आदर्श गृहस्थाश्रमी जीवन जगायचे आहे हे वधूवरांना सुचवायचे असते. जालाभिषेकाद्वारा पत्नीची जणू गृहस्वामिनी पदावर वराने नियुक्ती केली आहे असे दिसते. याचे उलट ‘हृदयस्पर्शन’ विधीच्या द्वारा वधूवरांचे मनोमिलन सूचित केले आहे . ध्रुव : अरुंधती -सप्तर्षी यांचे दर्शन : सप्तपदी झाल्यानंतर वधू-वर ध्रुव, अरुंधती ,सप्तर्षी यांचे दर्शन घेतात .ही एक प्रकारची प्रतीकोपासना आहे. ध्रुव हे  अढळ्तेचे प्रतिक , अरुंधती ही स्त्रियांची आदर्श आणि सप्तर्षी आपले पूर्वज म्हणून त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या प्रमाणे वागण्याचा निश्चय करणे असा या विधीचा उद्देश आहे .

या विशिष्ट दृष्टीने या विधींकडे पाहिल्यास हे संस्कार प्रतीकालकता व सुचक्ते द्वारे वधू वरांना भावी आयुष्यातील कर्तव्यांबाबत जाणीव करून देतात असे ध्यानात येते .
वधू-वर एकत्र सात पाऊले चालतात त्यावेळी वधू तांदुळाच्या राशीवर चालते. त्याला सप्तपदी म्हणतात. प्रत्येकपाऊल चालताना वरमुलगा वधूला सात पाऊलांचा अर्थ सांगतो

पहिले पाऊल :- तू एक पाऊल चाललीस, तुझे माझे सख्य झाले. सुंदर अन्न तयार करणारी अन्नपूर्णा हो. माझ्याशी एकनिष्ठ वाग. आपल्या कुटुंबाचे आपण कल्याण करू.

दुसरे पाऊल :-  तू माझ्याबरोबर दोन पाऊले चाललीस, माझे बळ वाढवणारी हो. आपण धैर्य आणि सामर्थ्य ठेऊन कुटुंबातील आनंद संरक्षित ठेऊ.

तिसरे पाऊल :- तू माझ्याबरोबर तीन पाऊले चाललीस, धनप्राप्त करून देणारी हो. आपण दोघे संपत्ती व ज्ञानाची संमृद्धी करू.

चौथे पाऊल :- तू माझ्याबरोबर चार पाऊले चाललीस, तू सुख वाढवणारी हो. आपण दोघेही सुख, आनंद वाढवू.

पाचवे पाऊल :- तू माझ्याबरोबर पाच पाऊले चाललीस, तू संतती वाढवणारी हो. आपण दोघे सद्गुणी संतती निर्माण करू.

सहावे पाऊल :- तू माझ्याबरोबर सहा पाऊले चाललीस, तू सर्व ऋतुमध्ये सुख देणारी हो.

सातवे पाऊल :- तू माझ्याबरोबर सात पाऊले चाललीस तुझे माझ्याशी सख्य दृढ होवो. आपल्या कुटुंबाचे सुख-दु:ख आपण आपल्या हृदयात जतन करू.

ऐरणी दान : विवाहाचे ‘ वंशवृद्धी’ हे प्रमुख उद्दिष्ट रूपकात्मक पद्धतीने या विधीत सांगितले आहे . आप्त स्वकीयांचा सन्मान करण्याची संधी त्यायोगे मिळते . उमा महेश्वराची पूजा करून – वंश वृद्धी प्रीत्यर्थ वराच्या आईला ऐरणी दान करतात व यावेळी विहीण बाईना देण्यासाठी चौरंग, त्यावर रेशमी रुमाल, गुळाची ढेप , चांदीची वाटी व त्यामध्ये हलवा, एक जरीची हिरवी साडी – ब्लाउज पीस ,नारळ वगैरे ओटीची तयारी वस्तू देण्याचीही प्रथा आहे.

लक्ष्मीपूजन-

लक्ष्मीपूजन म्हणजे वधूचे नाव ठेवणे. वधू-वरांकडून लक्ष्मीपूजनाचा संकल्प करून प्रथम गणेशपूजन, पुण्याहवाचन करून घेतले जाते. त्यानंतर कासेधातूच्या पात्रात(शक्य झाल्यास) ताटात तांदूळ पसरून त्यावर सोन्याच्या तारेने आपल्या कुलदेवतेचे नाव व आपले आवडते असे आपल्या पत्नीचे नाव वरमुलगा लिहीतो. व महालक्ष्मीचे पूजन केले जाते.

देवकोत्स्थापन :  लग्नविधी पुरा झाल्यावर सुरुवातीला ठेवलेले ‘देवक’ ( देवप्रतिष्ठा) विधियुक्त उत्तर पूजन करून विसर्जित केले जातात. विवाह संस्कारात दोन कुले जोडली जातात , दोन मने एक होतात लग्न सोहळ्यात होणाऱ्या धार्मिक विधीत व्यवहार , शृंगार आणि नर्म विनोद  यांचा सुंदर मिलाप झालेला दिसेल. या सर्व सोहळ्याची रचनाच अशी केलेली आहे की त्यांत वधुवरांची जाहीर सलगी वाढतच जावी . विवाह संस्कार मनावर उदात्त परिणाम करतो . त्यात देवदेवतांची पूजा व प्रार्थना आहे तशीच वेदकालीन अग्निपुजेची व यज्ञसंस्थेचीआठवणआहे

आमचे विवाह मंत्र व मुख्य विधी वैदिक काळापासून आज हजारो वर्षे अव्याहत चालत आले आहेत .

रजिस्टर लग्नाची सवलत असली तरी हिंदूंचे मन सामन्यात: धार्मिक पद्धतीनेच लग्न करावे या बाजूला झुकते .

आशीर्वाद-

या सगळ्याची सांगता करताना आलेलेगुरूजी वेदमंत्रांचे पठण करून उभयतांना विशेषकरून त्यांच्या भावी जीवनामध्ये संमृद्धी, संपत्ती, वंशवृद्धी आणि वैवाहीक-जीवन सदैव सुखी/आनंदी होण्यासाठी आशीर्वाद देतात.