नागपूर जिल्हा – पर्यटन
विदर्भ भटकंती (भाग-५)
नागपुर शहरातील पर्यटन
‘लेक गार्डन’
अद्भूत निसर्गाचा आनंद लुटायची जर कुणाची इच्छा असेल, तर त्याने नागपुरच्या सक्करदरा भागातील ‘लेक गार्डन’ला अवश्य भेट द्यायला हवी. निसर्गाच्या आनंदासोबतच तुम्हाला मनासारखी विश्रांतीही येथे घेता येईल. या उद्देशासाठी सक्करदऱ्यातील ‘लेक गार्डन’सारखे अत्यंत रमणीय स्थळ आहे. रविवारची सुट्टी घालविण्यासाठी आणि मनासारखा आनंद लुटण्यासाठी हे एक उत्तम स्थळ आहे. या ‘लेक गार्डन’मध्ये खेळण्यासाठी पाच विस्तारित मैदान आहेत. या गार्डनचे सौंदर्य अप्रतिम आहे. येथील तलावातील सुर्योदय आणि सुर्यास्ताचे सौंदर्य फारच मनमोहक आहे. या गार्डनमध्येच तलाव असल्याने दिवस असो की रात्र, येथील वातावरण नेहमीच थंड असते.
गांधीसागर तलाव
नागपुरच्या महाल भागात असलेला गांधीसागर तलाव हा शुक्रवारी तलाव आणि जुम्मा तलाव या नावानेही ओळखला जातो. रमण विज्ञान केंद्राच्या अगदी समोर हा तलाव आहे. सुमारे २७५ वर्षांपूर्वी नागपूरचे तत्कालीन राज्यकर्ते चांद सुल्तान यांच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हा तलाव अस्तित्त्वात आला असल्याचे बोलले जाते. नाग नदीला सोडण्यात येणाऱ्या पाण्यातून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. जलसाठ्याशी संबंधित या तलावाचे नाव जुम्मा तलाव असेही ठेवण्यात आले आहे. १७४२ मध्ये पहिले रघुजी यांनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून नागपूरला घोषित केले आणि भोसले व ब्रिटीशांच्या राज्यकाळात या तलावाचे नाव शुक्रवारी तलाव असेही ठेवण्यात आले. या तलावाच्या मधोमध एक छोटेसे बेट आहे. याबेटावर आकर्षक शिवमंदिर आणि बगिचाही आहे. पिवळ्या रंगांच्या मर्क्युरी दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी यातलावाचे सौंदर्य अधिकच मोहक असते. येथे नौकाविहाराचीही सोय आहे.
सातपुडा बॉटनिकल गार्डन
नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन हे अतिशय अद्भुत गार्डन असून हजारो लोकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरले आहे. सिटी सेंटरच्या ईशान्येकडे असलेल्याया सातपुडा बॉटनिकल गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. कारण, येथे विविध वनस्पतींची महत्त्वूपर्ण माहिती उपलब्ध आहे. सातपुडा गार्डन आणि आसपासच्या परिसराच्या आल्हाददायक वातावरणात दुर्मिळ पक्षी देखील आढळतात.
सेमिनरी हिल
नागपुरातील सेमिनरी हिल ही लहान आकाराची टेकडी आहे. सेंट चार्ल्स यांच्या नावावर या टेकडीचे नाव ठेवण्यात आले आहे. या टेकडीवरून शहराचे विहंगम दृश्य पाहता येऊ शकते. सेमिनरी हिलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अगदी लागूनच असलेले जपानी गार्डन होय. या टेकडीवरील घनदाट झाडांना नागपूर शहराचे फुप्फुस समजले जाते.
फुटाळा तलाव
नागपुरातील अतिशय प्रसिद्ध स्थळ म्हणजे फुटाळा तलाव ! सर्वच वयोगटातील लोकांसाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. नागपूरचे पूर्वीचे राजा भोसले यांनी हा तलाव बांधला आहे. रंगीत फवारे आणि आल्हाददायक वातावरण येथील वैशिष्ट्य आहे. सायंकाळी हॅलोजन दिव्यांमुळे येथील वातावरण अधिकच आकर्षक होत असते. तीन बाजूंनी वेढलेला तलाव, हिरव्यागार जंगलाचे कवच आणि एका बाजूला अतिशय सुंदर अशी व्यापक चौपाटी हे देखील येथील मुख्य आकर्षण आहे. तलावाच्या किनाऱ्यावर आणि टेकडीवरून सुर्यास्ताचा मोहक अनुभव घेता येऊ शकतो. हा परिसर निसर्गाचा एक अद्भूत चमत्कारच आहे. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, अनेक स्थलांतरित पक्षी या तलावाकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठीही हा परिसर उपयुक्त असाच आहे. या विविध वैशिष्ट्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीयांकरिता हे अतिशय लोकप्रिय पिकनिक स्थळ ठरले आहे.
चिल्डरन्स ट्राफिक पार्क
नागपुर महानगरपालिकेअंतर्गत धरमपेठ येथील ‘चिल्डरन्स ट्राफिक पार्क’ म्हणजे लहान मुलांचा सुनियोजित ट्राफिक झोन. मुलं वाहतुकीच्या नियमांचे पालन करतं पार्कमधे मिळणारी छोटी छोटी वाहन चालविण्याचा ती शिकण्याचा मनमुराद आनंद घेतात. ईथल्या आकर्षक सायकल्स, बगीच्या आणि रस्ते बघून पुन्हा एकदा बालपण जगावेसे वाटते.
महाराज बाग
भोसल्यांच्या काळातील हा बाग विशेषत्वाने ओळखला जातो तो येथील वैविध्यपूर्ण पशु-पक्ष्यांमुळे. २० प्रजातीची जवळपास ३०० पशु-पक्षी येथे आढळून येतात ज्यात वाघ, मोर, ससे, काळविट यांचा समावेश होतो. शहराच्या मध्यवर्ती असलेला हा बाग लहान मुलांना आकर्षित करतो.
गोरेवाडा तलाव
नागपुरच्या वायव्येकडे असलेला गोरेवाडा तलाव हा २३५० फूट खोल आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होतो. राज्य सरकारच्या जल कार्य खात्याने १९११ मध्ये या तलावाची निर्मिती केली होती. या तलावाच्या चहूबाजूला घनदाट जंगल असून या जंगलात वन्यप्राणीही आहेत. येथील प्रस्तावित ‘फुलपाखरांचे राष्ट्रीय उद्यान’ पर्यटकांना नक्कीच आपलेसे करेल.
मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय
ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून जास्त वर्षांचे आहे. अनेकविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, अश्मयुगीन हत्यारे, कोरीव वस्तू यासारख्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो.हे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्यानियंत्रणाखाली आहे. विशेष म्हणजे हे संग्रहालय राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्यासंग्रहालयांमधील सर्वात मोठे व जुने असे आहे. या संग्रहालयात भूगर्भशास्त्र, सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी, पुरातत्व, शस्त्र, नाणे विषयक, नृत्त्य, चित्रकला अशी विविध प्रकारच्या पुरातन संस्कृतीची ओळख करुन देणारी दालने आहेत.
अंबाझरी तलाव
नागपूरच्या पश्चिमेकडे ६ किलोमीटर अंतरावर अंबाझरी तलाव आहे. शहरातील हा सर्वात मोठा आणि अतिशय मनमोहक तलाव आहे. या तलावाच्या देखभालीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी नागपूर महानगर पालिकेची आहे. तलावाला लागूनच अतिशय सुंदर असा अंबाझरी बगिचा आहे. १९५८ मध्ये निर्माण करण्यात आलेल्याया बगिच्याचे क्षेत्रफळ २० एकर इतके आहे. लहान मुलांसाठी येथे करमणुकीची वेगवेगळी साधने आहेत.
रमण विज्ञान केंद्र आणि रमण तारांगण
शुक्रवारी तलावाच्या अगदी समोर स्थित हे विज्ञान केंद्र म्हणजे विद्यार्थ्यांमधली विज्ञाननिष्ठा विकसीत करणारे केंद्र. मुलांच्या विज्ञानासंबंधी प्रश्नांना अगदि सोप्या आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने या केंद्रात उत्तरं मिळतात. येथील विशेष आकर्षण म्हणजे येथील कृत्रिम तारांगन जे ग्रह ताऱ्यांची माहिती देतं एका निराळ्याअनुभूतीतून. शालेय विद्यार्थ्यांनी एकदा तरी अवश्य भेट द्यावी असे हे विज्ञान केंद्र.
दीक्षाभूमी
या वास्तुचे वास्तुकार शेओ डान माल हे असून या वास्तुचे निर्माणकार्य जुलै १९७८ साली सुरु झाले होते जे १८ डिसेंबर २००१ ला पूर्ण झाले. दीक्षाभूमी हे भारतातील बौद्ध धर्माचे एक शांतिस्थल. येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ अक्टूबर १९५६ रोजी पहिले महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन ५,००,००० पेक्षा अधिक अनुयायांना बौद्ध धर्माची विधिवत दीक्षा देऊन बाबासाहेब स्वतः पुन्हा धम्माचे दिक्षीत झाले. दरवर्षी जगभरातील लाखो अनुयायी येथे येतात. ही इमारत मनःशांती देणारी आहे. जगरहाट काही काळ विसरून माणूस या स्थळी अगदि निश्चिन्त होऊन विसावतो. महाराष्ट्र शासनाने यापर्यटक स्थळास ‘अ’ दर्जा दिला आहे.
नागपुर परिसर :खेकरा नाला तलाव
नागपूरपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खाप्रा येथील खेकरा नाला हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खापाजवळील छिंदवाडा मार्गावर ते आहे. साहसी कृत्य करणाऱ्यांसाठी विशेषत: पर्वतरोहकांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, खेकरा नाला धरणाच्यासभोवताल असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, सभोवताल असलेले घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे होय. हे सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक येथे येत असतात. यामुळेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी येथे लॉजिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
खिंडसी तलाव
रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे. नागपूरपासून ५३ किलोमीटर आणि रामटेकपासून ३.५ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. वैदर्भिय जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ आकर्षक आणि आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोवींग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी पार्कही आहे. तर साहसी साहसी साहसी उपक्रम करणाऱ्या मोठ्यांसाठी जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे.
तोतलाडोह
नागपूर जिल्ह्यात नागपूरपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकजवळील पेंच नदीवर असलेले तोतलाडोह नावाचे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर हा परिसर आहे. हे धरण पेंच नदीच्याजलविद्युत प्रकल्पाचा एक भाग आहे. येथील परिसर अतिशय मनमोहक आहे.
नवेगाव बांध
नागपूरपासून ५६ किलोमीटर अंतरावर पारशिवनी तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर नवेगाव बांध आहे. पारशिवनीच्या वनक्षेत्रात हे धरण अर्थातच बांध आहे. या धरणाच्या सभोवताल अतिशय समृद्ध असे पर्वत आहेत. हिरवळीची चादर सर्वत्र ओढली गेल्यामुळे हा परिसर अतिशय शांत आहे. या क्षेत्रात असलेले विविध पक्षी पाहण्यासारखे आहेत.
पेंच राष्ट्रीय अभयारण्य
पेंच अभयारण्य हे भारतातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यांच्या सीमाभागात वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे. २७५ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या उद्यानाचा ९०% विस्तार मध्य प्रदेशात असून उर्वरित १०% विस्तार महाराष्ट्राच्या हद्दीत मोडतो. नागपूरपासून ८६ कि.मी. अंतरावरील हे अभयारण्य खूप सुंदर आहे. पेंच हे पक्षी अभयारण्य आहे. आणि हा महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. आज या उद्यानाची योग्य ती निगा राखल्यामुळे नागपूर परिसरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. महाराष्ट्र शासनाने १९७५ मध्ये या भागास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला, तसेच १९९९ मध्ये या प्रकल्पास व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. कालिदासाच्या मेघदूत आणि शाकुंतल या काव्यात या निसर्गसुंदर भागाचे वर्णन आढळते.
एवढेच नव्हे तर जंगलबुक मधल्या मोगलीचा जंगली प्राण्यांसोबतचा नटखट अधिवास येथे होऊन गेल्याचे अद्भुत येथील जंगल सांगतो ! या जंगलात ३३ सस्तन प्राणी प्रजाती, ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी, १६४ प्रजातींचे पक्षी, ५० जातींचे मासे व १० प्रकारचे उभयचर प्राणी वास्तव्यास आहेत. पेंच नावाच्या नदीमुळे याभागाला पेंच नाव पडले असावे. वाघ, बिबळ्या, अस्वल, सांबर, चितळ, चारसिंगा, निलगाय, माकड, इ. प्राणी या अभयारण्यात आढळतात. भरपूर सागाची झाडे असलेले हे जंगल असून पेंच अभयारण्य सुमारे २५० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले आहे. ऑक्टोबर ते जून या कालावधीतच अभयारण्यात खुला प्रवेश असतो. जुलै ते सप्टेंबर या अति पावसाच्या काळात येथे प्रवेश दिला जात नाही.
रामटेक
राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविकांनी हातात काहीही न बाळगणे उत्तम कारण वानरसेना खाद्यपदार्थ-प्रसादावर तुटून पडली की मग चांगलीच तारांबळ उडते. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे.या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो. रामटेक येथील जैन मंदिर आणि परिसर अत्यंत प्रसन्न आहे. भाविकांसाठी येथील धर्मशाळेत निवासाची व्यवस्था आहे.
नागपुर रेल्वे स्टेशन, जामठा क्रिकेट मैदान, मोठमोठे मॉल्स, उच्च न्यायालय, जीपीओ, रवि भवन, आमदार निवास, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र, निरी, रामगिरी, फन अँड फुड विलेज, क्रेझी केसल, आशिया खंडातील एक मोठे असे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या इमारती/स्थळे आपला इतिहास, संस्कृती, औदार्य जपून आहेत. जिल्हा न्यायलयाबाहेर मिळणारी पाटोडी उर्फ सांबारवडी, रेल्वे स्टेशन बाहेर मिळनारा तेज तरारी चना-चिवडा, बड्या मिठाईवाल्यांकडची संत्राबर्फी, नागपुर स्पेशल सोन पापडी आणि इथले सावजी जेवण ! सारे काही अनोखे ! उपराजधानी असलेल्या या मंत्र्या संत्र्यांच्या ग्रीन शहराला आता एक आगळं वेगळं रूप येतेय ते येथील सुनियोजित मेट्रो प्रकल्पामुळे ! तेव्हा एकदातरी या रम्य, सुंदर आणि ऐतिहासिक शहराला अवश्य भेट द्या !
संकलन : तृप्ती अशोक काळे