• तिथी :

श्रावण पौर्णिमा

  • पार्श्वभूमी :

देव व असुर यांच्यातील संघर्षात देवांचा जय झाल्यानंतर या सणास सुरूवात झाल्याचेही मानण्यात येते. दंतकथेनुसार देव व असुर यांच्यातील युद्धात देवांची पीछेहाट होत असलेली बघून देवराज इंद्र यांनी युद्धात भाग घेण्याचा निर्णय घेतला. इंद्राची पत्नी इंद्राणीने त्याच्या हातात रक्षाबंधन केले. यामुळे त्यांना युद्धात विजय प्राप्त झाला. अशी पौराणिक कथा आहे. तसेच महाभारतात श्री कृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडी किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी दौपदीचे रक्षण केले. अशी देखील कथा आहे.

‘रक्षा बंधन’ या सणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत, `पातळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपले भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावणपौर्णिमा होता.’ म्हणून या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते असे मानतात. मध्ययुगीन भारतात बाहेरील आक्रमकांपासून महिलांचे सरंक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत होता. तेव्हापासून भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीस सुरूवात झाली. असे ही मानले जाते.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :

नारळी पौर्णिमा प्रामुख्याने समुद्रकाठी राहणारे कोळी बांधव साजरा करतात. वर्षाऋतूत समुद्र खवळलेला असतो व सागरी प्राण्यांच्या प्रजननासाठी उत्तम कालावधी असतो. या काळात समुद्रात नद्यांद्वारे मोठी खनिजे वाहत असल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मितीसाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे कोळी बांधव मासेमारी साठी आपली बोटी समुद्रात घेऊन जात नाहीत तसेंच जहाजे सुद्धा नागरून ठेवतात. श्रावणातील पौर्णिमेनंतर पावसाचा जोर ओसरतो व खवळलेला समुद्र शांत होतो, या पौर्णिमेनंतर कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. समुद्र शांत व्हावा त्याचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, यासाठी समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. मच्छिमार बांधवांप्रमाणेच या उत्सवात सागर किना-यावर ग्रामस्थही सहभागरी होतात. यावेळी फटाके उडविणे, नौका सजिवणे, कोकणी गाणी म्हणणे, विविध खेळ खेळणे, इत्यादि कार्यकम साजरे होतात, नारळाचे गोड पदार्थ तयार केले जातात. दिवशी पर्जन्यदेवता वरूण राजाची आराधना करण्यात येते. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.

‘रक्षाबंधन’ या पवित्र दिवशी बहीण भावास अक्षता लावून ओवाळते व राखी बांधते. भाऊही आपल्या लाडक्या बहिणीस भेटवस्तू देतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मनोकामना असते.

  • खाद्यपदार्थ :

नारळाचे गोड पदार्थ – नारळीभात, नारळाच्या वड्या इ.