• तिथी :

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी

  • पार्श्वभूमी :

नवरात्रीमागील पौराणिक कथा अशी आहे, पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर राक्षस फार माजला होता. त्यानं देवदेवता, ऋषीमुनी, साधू संत सज्जन आणि भक्त भाविक ह्यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होतं. तो सर्वांनाच फार त्रास देत होता. तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली. त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासुर मर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :

प्रतिपदेस देवीचा घट बसवितात, देवघरा समोर एक पत्रावळ घेऊन त्यावर काळ्या मातीचा ढीग करतात यावर पाच प्रकारची धान्य टाकतात, यावर मातीचा घट ठेवतात. या घटास कडेने नागिणीची पाच पाने बांधतात. त्याचे तोंडाला पाच पाने कडेनी लावतात. घाटात पाणी, नाणे व हळकुंड टाकतात अश्या पद्धतीने घट स्थापना करून त्यावर फुलांची माळ सोडतात, नऊ दिवस रोज एक नवीन माळ सोडली जाते. त्यात प्रामुख्याने विडयाच्या पानाच्या तसेच तरवड या झाडाची फुले व पानांच्या माळा वहिल्या जातात. देवघरात तेलाचा दिवा लावतात तो कोजागिरी पौर्णिमे पर्यंत तेवत अखंड तेवत ठेवतात. नऊ दिवस उपवास धरतात, तर कोणी पहिल्या दिवशी व घट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात. पंचमीला ललिता पंचमी म्हणतात, पंचमीस घटावर सायंकाळी कडकनी , करंज्या, गोड वडे पिठा पासुन बनविलेले करंडा, फनी व खोबर्‍याची वाटी वगैरे टांगतात. काही ठिकाणी या वस्तू अष्टमी पर्यंत टांगतात . विविध खेळ फुगड्या, फेर रात्री खेळले जातात, या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. सर्वजण नवरात्र जागवून देवीची आराधना, प्रार्थना करतात. अष्टमीचे रात्री पूजन व होम केला जातो कोहळा दिला जातो. रात्री देवीची पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकून नाचतात. नवमीला शस्त्रपूजन होते.

दशमी दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीला पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून घाटाचे माळा उतरून घटावर उगविलेले धान देवास वाहून घटाचे उत्थापन करून उपवासाची सांगता करतात.

  • वैशिष्ट्य :

महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. या शक्तीपीठांवर नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. देवीला साडी-चोळी, पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करुन मनोभावे पूजा व प्रार्थना करतात.

  • नवरात्रीला सध्या जे सार्वजनिक स्वरुप आले आहे त्यामध्ये मुले मुली नऊ दिवस गरबा खेळतात. तसेच शेवटच्या दिवशी देवीची भव्य मिरवणूक काढली जाते.
  • खाद्यपदार्थ :

नवनव्या खिरापती केल्या जातात.