१. नवरात्रीचे व्रत आणि पूजन

नवरात्रारंभाच्या तिथीविषयी देवीपुराणात पुढील संदर्भ दिला आहे,

अमायुक्ता न कर्तव्या प्रतिपत्पूजने मम ।

मुहूर्तमात्रा कर्तव्या द्वितीयादिगुणान्विता ॥

अर्थ : नवरात्रीचे व्रत आणि पूजन अमावास्यायुक्त प्रतिपदेस करू नये. अशा वेळी प्रतिपदायुक्त द्वितीयेस व्रताचा प्रारंभ आणि पूजन करणे श्रेयस्कर असते.

२. कलश स्थापना

हस्त नक्षत्रयुक्त प्रतिपदेस कलश स्थापना करणे उत्तम असते.

३. हवन

आपल्या कुल परंपरेनुसार अष्टमी किंवा नवमी या तिथीस हवन करावे. त्यानंतर अन्न ग्रहण (भोजन) करावे.

४. विसर्जन

संपूर्ण पूजा-सामग्रीचे, तसेच देवीच्या प्रतिमेचे विसर्जन याच दिवशी करावे.

५. देवीपूजन

देवीच्या पूजेत हळद-कुंकू, बेल इत्यादी असलेले उत्तम आहे. या पूजेत तुळस आणि दुर्वा वर्ज्य आहेत.

६. देवीची उपासना

खालीलप्रमाणे कोणत्याही एका प्रकारे उपासना करता येईल.

अ. श्री दुर्गासप्तशतीचा पाठ करावा.

आ. श्रीसूक्ताचे प्रतिदिन १५ पाठ करावेत. त्या आधी सूर्यमंत्राचा जप १ माळ करावा.

७. श्रीसूक्ताची तांत्रिक उपासना

ही उपासना प्रतिदिन पहाटे २.३० वाजता चालू करावी.

अ. प्रथम विनियोग, न्यास इत्यादी करावेत. (काही विधी करण्यापूर्वी मंत्र सिद्ध होण्यासाठी दुसरा मंत्रजप किंवा अन्य काही कृती करायला सांगितल्या जातात. त्याला विनियोग म्हणतात.)

आ. त्यानंतर श्रीयंत्रावर श्रीलक्ष्मीची (कमळात बसलेली/उभी) मूर्ती ठेवून श्रीसूक्ताच्या २१ पाठांनी अभिषेक करावा.

इ. नंतर ११ पाठांनी तूप आणि गुग्गुळ यांनी हवन करावे.