मायबोली मराठी भाषा – मराठीची उत्पत्ती

महाराष्ट्रातील वसाहतीचा व राजसत्तेचा हा इतिहास. उत्तरेकडून दक्षिणेत जे लोक आले ते वेगवेगळ्या प्रांतांतून आले आणि येताना आपल्या भाषा घेऊन आले. अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, मागधी वगैरे भाषा अशा प्रकारे महाराष्ट्रात आल्या. या सर्व भाषांच्या खुणा आज मराठीत सापडतात. पण मराठीची उत्पत्ती झाली कशी?

अगदी जुन्या भाषा कशा उत्पन्न झाल्या, हा तसा वादग्रस्त व अनेक दृष्टींनी अनिश्चित असा विषय आहे. संस्कृत, फारसी, लॅटीन या भाषा कशा निर्माण झाल्या, किंवा द्राविड भाषा किंवा चिनी भाषा कशा उत्पन्न झाल्या, हा विषय आपण सोडून देऊ. पण अलीकडच्या काळात एक भाषा नष्ट होऊन नवी भाषा कशी व का उत्पन्न होते, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरीपासून आतापर्यंत मराठी भाषेच्या स्वरूपात काळानुसार थोडा फरक होत गेला आहे. परंतु भाषा एक असून तिला आपण मराठी असंच म्हणतो. ही मराठी भाषा ज्ञानेश्वरांपूर्वी उत्पन्न झाली आणि पूर्वी इथे प्रचलित असलेली महाराष्ट्री भाषा मृत झाली. मराठी भाषा कशी उत्पन्न झाली याचा विचार करत असताना ती तशी का उत्पन्न झाली, हा विचारही करावा लागतो. मूळात नवीन भाषा तयार का होतात?

कोणत्याही भाषेला तिचे बोलीचे स्वरूप जाऊन साहित्यिक स्वरूप प्राप्त झालं म्हणजे ती स्वत: नाहिशी होऊन इतर भाषांचा जन्म होतो, असा सिद्धांत काही भाषातज्ज्ञ मांडतात व त्याला आधार आर्यभाषांचा देतात. वैदिक संस्कृतापासून ज्या वेळी साहित्यिक भाषा तयार झाली त्या वेळी प्राकृत भाषा निर्माण झाल्या व बोली म्हणून त्यांनी आपलं वर्चस्व गाजवण्यास सुरूवात केली. या प्राकृत भाषा ज्या वेळी साहित्यिक भाषा म्हणून साच्यांत जाऊन बसल्या त्या वेळी बोली म्हणून त्यांनी गाजवलेले वर्चस्व अपभ्रंश भाषेने आपल्याकडे घेतलं. पुढे काळाच्या ओघात या अपभ्रंश भाषेनं साहित्यिक भा्षेचं स्थान मिळवलं आणि सिंधी, हिंदी, गुजराती, मराठी या बोली म्हणून उदयास आल्या, असा एक सिद्धांत आहे. परंतु हा सिद्धांत फारसा पटत नाही. एखाद्या भाषेच्या उद्भवास तिच्या पूर्वभाषेचं साहित्यिक स्वरूप जर कारणीभूत असेल, तर हिंदी, गुजराती, बंगाली, मराठी या आधुनिक भाषांना सध्या साहित्यिक स्वरूप प्राप्त झाल्यानं त्या मरून त्यांच्यापासून नवीन भाषांनी जन्म घ्यायला हवा होता. परंतु तसं झालेलं दिसत नाही. मराठी भाषा तर गेली अनेक शतकं साहित्यिक भाषा म्हणून टिकून आहे आणि असं असूनही तिचा विकासच होतो आहे. कोणतीही भाषा साहित्यिक होणं हे तिच्या उत्कर्षाचं गमक आहे, तिच्या अवनतीचं नव्हे आणि तिच्या नाशाच तर नव्हेच नव्हे. उलट साहित्यिक भाषेचं कायमचं न बदलणारं स्वरूपच तिच्यापासून दुसरी भाषा उत्पन्न होण्यास विरोध करतं. बोली जशी परिवर्तनशील असते तशी साहित्यिक भाषा असत नाही. परिवर्तनशील बोलीपासूनच दुसरी भाषा निर्माण होणं अधिक शक्य आहे. तेव्हा नवीन भाषा तयार होण्याचं कारण भाषेचं साहित्यिक स्वरूप नसून दुसरं काही असलं पाहिजे. समाजाला धक्का बसल्याखेरीज कोणतीही भाषा बदलत नाही. लोकक्रांती, राज्यक्रांती, धर्मक्रांती वगैरेंसारखा जबर धक्का समाजाला बसल्याखेरीज भाषा बदलत नाही. आर्यभाषेच्या स्वरूपांत निरनिराळी अवस्थांतरं ज्या ज्या काळांत झाली त्या त्या काळांत अशा तर्‍हेची क्रांती झाल्याचं इतिहासावरून दिसतं. मराठीच्या उत्पत्तीच्या बाबतीत अशा प्रकारची झालेली क्रांती सांगण्यापूर्वी तिची उत्पत्ती कशी झाली, हे बघणं आवश्यक आहे.

कोणत्याही भाषेचं स्वरूप अभ्यासताना तिच्या अंतरंगाचा विचार करावा लागतो. बाह्य स्वरूपात फक्त शब्दांचाच संबंध येत असल्यामुळे त्यांचा विचार बाजूला ठेवून वर्णप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया, प्रयोगप्रक्रिया इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक तपासाव्या लागतात. पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इत्यादी भाषांच्या स्वरूपावरून जर सहज नजर फ़िरवली तर त्या प्रत्येकीच्या स्वरूपातले काही घटक मराठीत आल्याचं कळून येतं व अशाप्रकारे पूर्वीच्या निरनिराळ्या भाषांची बरीच साम्यं मराठीत आढळून येतात, आणि म्हणूनच मराठीच्या उद्गमाविषयी विद्वानांमध्ये मतभेद झालेला दिसतो. पूर्ववैदिक, पाली, अर्धमागधी, संस्कृत, अपभ्रंश, माहाराष्ट्री या सार्‍या भाषांना मराठीचं जनकत्व बहाल केलं जातं. मराठीच्या उद्गमाविषयी अशा प्रकारचं मतवैचित्र्य आहे. या प्राचीन भाषांचे अवशेष मराठीत सापडतात, हे यामागचं कारण.

एक मत असं आहे की, वेदसमकालीन ज्या बोली होत्या त्यांपासून मराठी निर्माण झाली, व याला आधार म्हणजे वेदांमध्ये संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत व प्राकृत भाषांच्या स्वभावाशी जुळणारे जे विशेष सापडतात ते होत. वैदिक संस्कृतातले काही शब्द मराठीत, विशेषत: ग्रामीण मराठीत आजही वापरले जातात. उदाहरणार्थ, त्यो हे सर्वनाम. संस्कृतात या शब्दनामाचा छडा लागत नाही. पण मराठीत मात्र हा शब्द अजूनही ऐकू येतो. परंतु या तुटपुंज्या पुराव्यावर मराठी भाषा त्या भाषांपासून निर्माण झाली असं म्हणता येणार नाही. शिवाय भाषेला शिष्ट व अशिष्ट, किंवा नागर व ग्रामीण किंवा ग्रांथिक व बोली अशी रूपं असतात. त्यांपैकी वेदकालीन भाषेतही अशी रूपं असतीलच. त्यामुळे तत्कालीन बोलीतील काही अवशेष आज मराठीत सापडतही असतील. परंतु त्यावरून मराठीचं जनकत्व वेदकालीन बोलींना आपण बहाल करू शकत नाही.

दुसरा एक पक्ष मराठीची जननी संस्कृत भाषा ही आहे, असं मानतो. फक्त वरवर जरी पाहिलं तरी संस्कृत ही मराठीची जननी ठरत नाही. वर्णाचे बदल, प्रयोगाची भिन्नता, उच्चारांत फरक स्पष्ट आहेत. मराठी आणि संस्कृत या दोन्हींत नातं आहेच. या दोन्ही भाषांत पुष्कळ अंतर्वर्ती अशा अवस्था या प्राकृत भाषा आहेत. भाषेच्या एकंदर वाढीच्या दृष्टीनं अशा अवस्था उत्पन्न होणं अपरिहार्य आहे. तेव्हा संस्कृत भाषेला मराठीची जननी म्हणणं अशास्त्रीय ठरतं. हाच युक्तिवाद प्राकृत भाषांबद्दलही करता येईल.

पाली, मागधी, अर्धमागधी, माहाराष्ट्री, अपभ्रंश इत्यादी प्राकृत भाषांपासून मराठीचा उद्भव झाला, असं जेव्हा तज्ज्ञ म्हणतात तेव्हा पुरावे म्हणून या भाषांचे आज मराठीत अस्तित्वात असलेले अवशेष पुढे केले जातात. मात्र कोणत्याही एका प्राकृत भाषेतून मराठीचा जन्म झाला, असं ठामपणे म्हणता येणार नाही. प्राकृतोद्भव व प्राकृतिकोद्भव म्हणून ज्या काही आधुनिक, वर्तमानकालीन बोली आहेत, त्यांपैकी सिंधी, गुजराती, हिंदी किंवा बंगाली यांसारख्या बोली व मराठी यांत फरक आहे. शौरसेनीपासून हिंदी, अपभ्रंशापासून सिंधी व गुजराती, मागधीपासून बंगाली अशा या भाषांचा उद्भव मध्ययुगीन प्राकृत भाषांपासून झाला, असं म्हणता येतं. अमक्या एका भाषेपासून दुसरी भाषा तयार झाली असं म्हणताना जी भाषा उत्पन्न झाली तिने मूळ भाषेच्या व्याकरणाचा सर्वच्या सर्व सांगाडा उचलला, हे सिद्ध करावं लागतं. बंगालीने मागधीचं सर्व व्याकरणतंत्र जसंच्या तसं उचललं आहे. त्याचप्रमाणे शौरसेनीचं व्याकरणतंत्र हिंदीनं उचललं आहे. तोच प्रकार सिंधी, गुजराती आणि अपभ्रंश-आभीरांच्या भाषांचा आहे. परंतु मराठी भाषेनं संपूर्ण सांगाडा माहाराष्ट्रीपासून किंवा अपभ्रंशापासून तंतोतंत घेतला, असं दाखवता येत नाही. मराठी भाषेत बराचसा भाग हा अपभ्रंश व माहाराष्ट्रीपासून आलेला आहे. मराठीतील नामविभक्तींचा भाग हा अपभ्रंश भाषेपासून आलेला आहे, तर आख्यातविभक्तींचा भाग, म्हणजे क्रियापदांचे प्रत्यय वगैरे, माहाराष्ट्रीपासून घेतलेला दिसतो. मात्र याचबरोबर आधी म्हटल्याप्रमाणे इतर काही प्राकृत भाषांच्या लकबी मराठीत सामावलेल्या दिसून येतात.

प्राकृत भाषांपैकी आद्य असलेल्या पाली भाषेचे काही अवशेष मराठीत सापडतात. काही शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली रूपांतरं पालीमध्ये जी आढळतात, तीच मराठीत आलेली आहेत. तिण (तृण), पाऊस (प्रावृष्), पिळणे (पीडनं), छकडा (शकट), गूळ (गुड), अस्वल (ऋच्छमल्ल) इत्यादी पाली भाषेचा स्पष्ट शिक्का असलेले शब्द मराठीत रूढ आहेत. दुसरी गोष्ट पाली भातील ‘ळ’कारासंबंधी. पाली भाषेत ‘ळ’कार ही एक विशेष बाब आहे. ‘ळ’ हा वर्ण पाली-पैशाचीखेरीज इतर प्राकृत भाषांमध्ये नाही. ‘ळ’कार संस्कृत भाषेत नाही, पण वैदिक भाषेत आहे. तिथूनच तो पाली भाषेत आला असावा. ‘ळ’कार हा मूर्धन्य वर्ण असल्यानं इतर मूर्धन्य वर्ण जसे द्राविडी भाषेच्या संपर्कानं आर्यभाषेत शिरले, तसा ‘ळ’ हा वर्णही त्यांच्या बरोबर द्राविडी भाषेतून शिरला असावा. शिष्ट मराठी भाषेत या ‘ळ’काराच्या उच्चाराचं तसं बरंच स्तोम आहे. नळ, डाळिंब, ओंजळ, सावळा, सळई, आळे, फळे, काजळ, मिळणे इत्यादी अनेक संस्कृतोद्भव शब्दांत ‘ळ’चा वापर केला जातो. जळ, कमळ, सकळ इत्यादी शब्दांत तो वैकल्पिक आहे. या शब्दांत ‘ल’चा वापरही केला जातो. कित्येक शब्दांत ‘ल’काराऐवजी ‘ळ’कार घातल्यास अर्थ सर्वस्वी बदलतो. म्हणजे ते स्वतंत्र अर्थाचे निराळेच शब्द होतात. उदा. चूल, चूळ; बोल, बोळ; गाल, गाळ; नील, नीळ; वेल, वेळ इत्यादी. जुन्या पेशवाईकाळच्या मराठी लिखाणांत ‘ल’ हाच जास्त प्रचारात होता. त्या काळी ‘ळ’ दाखवण्यासाठी ‘ल’च्या मागे एक ‘त्’कार जोडत असत. ‘त्ल’ हे चिन्ह ‘ळ’बद्दल वापरत असत.

पैशाची भाषेतील जी लकब मराठी भाषेत राहिली ती ‘ण’ व ‘न’ यासंबंधी होय. पैशाचीशिवाय इतर प्राकृत भाषांत ‘ण’कार आहे, परंतु ‘न’कार नाही. उलट पैशाचीत ‘न’कार आहे, पण ‘ण’कार मुळीच नाही. पैशाची भाषेची ही लकब मराठीतही बर्‍याच वेळी दिसून येते. उदा. ऊन (उष्ण), तहान (तृष्णा), कान (कर्ण), रान (अरण्य), जानवे (यज्ञोपवीत), विनंती (विण्णतिआ), सुने (सुण्ण) इत्यादी पुष्कळ शब्दांत संस्कृतातील अथवा प्राकृतांतील ‘ण’काराऐवजी ‘न’कारच मराठीत वापरला गेला आहे.

मागधी या प्राकृत भाषेनंही मराठीत आपल्या खुणा ठेवल्या आहेत. मागधी भाषेचा एक विशेष असा की, ‘र’कार व ‘स’कार या दोहोंबद्दल ‘ल’कार व ‘श’कार हे अनुक्रमे येतात. तसंच संस्कृत ‘स्थ’ अगर ‘र्थ’ या जोडवर्णाबद्दल मागधीत ‘त्थ’ येतो. तसंच ‘ष्ट’चा ‘स्ट’ होतो. यांपैकी बरेच प्रकार ग्रामीण मराठीत रूढ आहेतच, परंतु शहरी मराठीतही हे प्रयोग आढळतात. उदा. ओशाळणे (अपसर), मिसळ (मिश्र), घोळतो (घूर्णते), जोशी (जोइसी), केशर (केसर), पेलणे (प्रेरनम्).

अर्धमागधीचे बरेच विशेष मराठीत आढळून येतात. अर्धमागधी आणि माहाराष्ट्री या दोन्ही भाषा पुष्कळ अंशी सारख्या स्वरूपाच्या असल्यानं अर्धमागधीचे जे विशेष मराठीत आढळतात ते माहाराष्ट्रीच्या विशेषांशीही जुळतात. जो प्रांत मराठीनं सध्या व्यापला आहे, त्यात जैनधर्मीयांनी आपल्या धर्माच्या प्रसारासाठी बराच प्रयत्न केला. जैनधर्मीयांची धर्मभाषा अर्धमागधी असल्यानं मराठीच्या स्वरूपावर अर्धमागधीचाही प्रभाव जाणवतो. दीर्घ स्वर र्‍हस्व करणे, मृदु व्यंजने कठोर करणे इत्यादी लकबी अर्धमागधीतून मराठीत आल्या आहेत.

माहाराष्ट्री भाषेचं बरंच ऋण मराठीनं घेतलं आहे. अनेक शतकं ही बोली ग्रांथिक भाषा म्हणून प्रचलित होती, तेव्हा अशा शिष्टसंमत भाषेचा ठसा मराठीवर उमटणं साहजिकच आहे. अकारान्त नपुंसकलिंगी नामं जशी माहाराष्ट्रीत लिंग बदलत नाहीत तशी मराठीतही बदलत नाहीत. मराठीतला द्वितीयेचा ‘स’ हा प्रत्यय माहाराष्ट्रीतल्या षष्टीचतुर्थीच्या ‘स्स’ या प्रत्ययावरून आला आहे. उदा. हत्तीस < हत्तिस्स, आगीस < अग्गिस्स. माहाराष्ट्रीतल्या आख्यातविभक्तीतले बरेच प्रकार मराठीत जसेच्या तसे उतरले आहेत. काळ व अर्थ यांचे प्रत्यय मराठीनं माहाराष्ट्रीपासून घेतले आहेत. मराठीतल्या कर् या धातूची भविष्यकाळाची रूपं माहाराष्ट्रीतल्या रूपांवरून कशी आली आहेत, हे खालील उदाहरणांवरून कळेल.

१. करिस्सामि > करिहिमी > करिइइं > करी + ल = करीन

२. करिस्सामो > करिहिमो >करिहिमु>करिइउं > करउं > करूं + ल > करून >करू

इच्छार्थक धातुही मराठीत माहाराष्ट्रीतून आले आहेत.

‘मी’ या सर्वनामाच्या बाबतीत मराठीतली सर्व रूपं माहाराष्ट्रीतल्या रूपांशी जुळतात. एकवचनाची रूपं – उदा. अहम्मि, अम्मि, म्मि > मी, महाहिंतो . मजहुनि, मज्झ>मज, मेज्च्चअ > माझं.

अनेकवचनाची रूपं – उदा. अम्हे>आम्ही, अह्मसुंतो > आह्माहुनी, अह्म > आह्मां, अम्हेसुं > आम्हांत

तारतम्याचा गुण मराठीनं माहाराष्ट्रीपासून घेतला आहे. नामे व्यंजनान्त न ठेवता स्वरान्त ठेवण्याची प्रवृत्ती माहाराष्ट्री व अपभ्रंश या दोन्हींमध्ये आहे. तीच मराठीनं उचलली. विशेष्याची जी विभक्ती तीच विशेषणाची ठेवण्याची जी प्रवृत्ती संस्कृत, माहाराष्ट्री, अपभ्रंश यांमध्ये दिसते, तीच बरेचदा मराठीतही दिसते. मराठीतल्या काही शब्दांची लिंगे माहाराष्ट्री व अपभ्रंश भाषेतील लिंगांप्रमाणे आहेत. उदा. पाऊस, जन्म, सरा, नयन हे पुल्लिंगी, आणि अंजली, गाठ हे स्त्रीलिंगी.

अपभ्रंशातूनही अनेक विशेष मराठीत आले. अपभ्रंश ही आभीरांची भाषा होती. आभीर सिंध प्रांतातून कोकणात व विदर्भात येऊन स्थायिक झाले होते, व त्यामुळे अपभ्रंशाचे बरेच अवशेष मराठीत सहज सापडतात. (डॉ. गुणे व डॉ. वि. भि. कोलते यांच्या मते तर अपभ्रंशापासूनच मराठीची उत्पत्ती झाली. ) नामाला लागणारे विभक्तींचे प्रत्यय मराठीनं अपभ्रंशापासून घेतले आहेत. सर्व विभक्तीप्रत्यय अपभ्रंशोत्पन्न आहेत. भाववाचक नामं तयार करण्यासाठी अपभ्रंश भाषेत प्पण हा प्रत्यय वापरला जातो. तोच मराठीनं उचलला आहे. अपभ्रंशाप्रमाणे मराठीतही आधी नामाचं सामान्यरूप होऊन नंतर विभक्तीचे प्रत्यय लागतात. मराठी व वर्तमानातील इतर बोलींतील काव्यात अन्त्ययमकाचं प्राबल्य दिसून येतं. हे अन्त्ययमक अपभ्रंश भाषेतून आलं आहे. अपभ्रंश भाषेतलं सर्व पद्यवाङ्मय अन्त्ययमकयुक्त आहे. संस्कृत, पाली व इतर प्राकृत भाषांत हा प्रकार नाही. त्याचप्रमाणे अपभ्रंश भाषेतील छंदांचे काही प्रकारही मराठीनं घेतले आहेत.

प्राकृत भाषांप्रमाणेच संस्कृत भाषेचाही जबरदस्त प्रभाव मराठीवर पडला आहे. ऋ, ॠ, ऐ, औ हे वर्ण संस्कृतात व मराठीत आहेत, प्राकृतात नाहीत. ङ्, ञ् ही दोन अनुनासिके संस्कृतात आहेत, प्राकृतांत नाहीत. मराठीत ती संस्कृतातूनच आली आहेत. संस्कृत शब्द तर मराठीत अमाप आहेत. तद्भव शब्दांचा भरणा आहेच. परंतु तत्सम शब्दंही कमी नाहीत. प्राकृत भाषांत तत्सम शब्द नाहीत.

पूर्ववैदिक, संस्कृत, प्राकृत आणि मराठी ही अवस्थांतरं कशी झाली, हे या उदाहरणावरून स्पष्ट व्हावं.

संस्कृत बोलणार्‍या आर्यांनी जेते म्हणून वसाहत केली, त्यावेळी इथल्या मूळ रहिवाशांनी आपली भाषा सोडून जेत्यांची संस्कृत भाषा उचलण्याचा प्रयत्न केला, आणि अशा प्रकारे चार प्राकृत भाषा तयार झाल्या. या उत्पत्तीचा काळ इ. पू. ६००-७०० असा धरता येईल. पाणिनीच्या वेळी संस्कृत भाषा बोलली जात होती. बुद्धाच्या वेळी प्राकृत भाषा निर्माण झाल्या होत्या. महाराष्ट्रात माहाराष्ट्री, पूर्वेकडे मागधी, मध्यप्रदेशात शौरसेनी आणि उत्तरेत पैशाची अशा या भाषा निर्माण झाल्या. या भाषा केवळ संस्कृतातून तयार झाल्या. त्यांचा वर्णोच्चार नरम होता आणि व्याकरणही अधिक सोपं होतं. मराठी भाषेच्या पूर्वी लोकांच्या वापरात असणार्‍या प्राकृत व अपभ्रंश या भाषांचा अस्त केव्हा झाला व मराठीचा उगम कधी झाला, हे निश्चित ठरवणं तसं कठीण आहे. नवी भाषा हळूहळू लोकमान्य होत असताना जुनी भाषा काही काळापर्यंत प्रतिष्ठित ग्रंथकार व लोक लिहीत व बोलत असतात. पाली, शौरसेनी, माहाराष्ट्री वगैरे प्राकृत भाषा लोकमान्य होत असताना पाणिनीय संस्कृत भाषा प्रतिष्टित लोकांत प्रचलित होती. अपभ्रंश भाषा प्रचलित होत असताना ग्रंथकार मात्र प्राकृत भाषेत लिहीत असत, आणि आधुनिक बोलीचा जन्म झाल्यावरदेखील पुष्कळ वर्षं अपभ्रंश व प्राकृत भाषांत ग्रंथ लिहिले जात असत. अपभ्रंश भाषेत तर इ. स. १२००पर्यंत उत्तम प्रकारची व पुढे १५०० सालापर्यंत थोडी ग्रंथरचना झाली आहे. तेव्हा पूर्वी प्रचारात असलेल्या भाषांचा अंत व नवीन भाषांचा जन्म या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होणे शक्य नाही. महाराष्ट्रात मराठी जन्मास येण्यापूर्वी अमुक एक विशिष्ट प्राकृत भाषा लोकांच्या बोलण्यात होती, असं आपल्याला सांगता येत नाही. महाराष्ट्रीय समाज कोणतीही एक विशिष्ट प्राकृत भाषा बोलत नसून निरनिराळ्या प्राकृत भाषा बोलणारे निरनिराळे समाज होते व ते एकवटून त्यांच्या मिश्रणाने महाराष्ट्रीय समाज तयार झाला, व त्यांच्या भाषांच्या मिश्रणाने बनलेल्या मिश्र प्राकृतापासून मराठी भाषा बनली. शौरसेनी बोलणारे राष्ट्रिक लोक, मागधी व माहाराष्ट्री बोलणारे महाराजिक व महाराष्ट्रिक लोक, अपभ्रंश भाषा बोलणारे वैराष्ट्रिक व आभीर लोक महाराष्ट्रात येऊन मिसळले. त्यांच्या मिश्रणापासून मराठा समाज बनला व त्यांच्या भाषांपासून मराठी भाषा तयार झाली. मराठी भाषा प्रत्यक्ष जन्मण्यापूर्वीच्या संधिकालात एक दोन शतकं एखादी मिश्र प्राकृत किंवा मिश्र अपभ्रंश प्रचारात असावी.

महाराष्ट्रात प्राकृत भाषा मृत का झाल्या आणि मराठी का उत्पन्न झाली, हा विचार त्यातून पुढे येतो. महाराष्ट्रात या काळात काही मोठी राज्यक्रांती वगैरे झाली नाही. शक लोक बाहेरून काही काळ इथे आले, परंतु ते फार काळ टिकले नाहीत, आणि त्यांच्या भाषेचाही माहाराष्ट्रीवर परिणाम झाला नाही. मराठी भाषा निर्माण होण्यास काही विलक्षण विचारक्रांती झाली असावी. ही विचारक्रांती एकट्या महाराष्ट्रातच झाली नसावी. कारण केवळ माहाराष्ट्रीच नष्ट झाली असं नाही, तर मागधीच्या जागी बंगाली, शौरसेनीच्या ऐवजी हिंदी आणि पैशाचीच्या ऐवजी लेहेडा अशा नवीन भाषा उत्पन्न झाल्या.

या काळातली मोठी क्रांती म्हणजे बौद्धधर्माचा पाडाव आणि हिंदुधर्माची पुनर्रचना. श्रीहर्ष (इ. स. ६४५) वारल्यानंतर बौद्धधर्मास उतरती कळा लागली, आणि कुमारिलभट्टाच्या लेखांनी प्राचीन वैदिक धर्म पुन्हा बहरला. याच विचारक्रांतीमुळे सबंध हिंदुस्थानात प्राचीन प्राकृत भाषांचा लोप झाला आणि नवीन भाषा उदयास आल्या. प्राचीन प्राकृत भाषा एके काळी सामान्य जनतेत रूढ होत्या. विद्वानांच्या तोंडी किंवा पद्यांत माहाराष्ट्रीचा उपयोग करावा, नोकरांच्या तोंडी मागधी घालावी, साधारण पात्र व स्त्रिया यांच्या तोंडी शौरसेनीचा उपयोग करावा, आणि चोर, शिपाई इत्यादींच्या तोंडी पैशाची ठेवावी, हा संकेत नाटककार पाळत असत. बौद्धांनी आपल्या ग्रंथांत मागधीचा वापर केला होता आणि काही जैन ग्रंथ माहाराष्ट्रीत होते. हिंदुधर्माचा परत उदय झाल्यावर संस्कृत भाषेला महत्त्व प्राप्त झालं, आणि नवीन मीमांसकांचे, विशेषत: शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचे विचार सामान्य लोकांना इतके पटले की, ते विचार लोकभाषेत सांगण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी होऊ लागला आणि संस्कृत भाषेचा पगडा लोकभाषांवर पडला. माहाराष्ट्रीय, मागधी, अर्धमागधी या बौद्ध व जैनांनी स्वीकृत केलेल्या भाषा मागे पडल्या आणि मराठीचा उदय होऊ लागला. हे सारं. इ.स. ७००-८०० या दरम्यान घडलं असावं.

मराठीच्या शब्दसमुहाकडे बघितलं तर संस्कृत भाषेच्या प्रभावातून झालेला हा उदय सहज लक्षात येतो. माहाराष्ट्रीत संस्कृत शब्द, उच्चार नरम करून मग घेतले जातात. पण जेव्हा लोकांमध्ये संस्कृताचं प्रेम वाढलं आणि निरनिराळे संस्कृत शब्द रोजच्या व्यवहारात आणणं समाजाला आवश्यक वाटलं, तेव्हा संस्कृत शब्द जसेच्या तसे मराठीत आणले गेले. त्यामुळे मजा अशी की, मराठीत एकच संस्कृत शब्द दोन प्रकारे येतो. एक माहाराष्ट्रीत या जुन्या नरम केलेल्या उच्चाराचा, तर दुसरा मूळ संस्कृतातला. उदाहरणार्थ, माणूस हा शब्द माहाराष्ट्रीतला आहे, आणि मनुष्य हा शब्द संस्कृतातून जसाच्या तसा आला आहे. कित्येक वेळी अशा दोन शब्दांचा थोडासा अर्थभेदही भाषेनं उत्पन्न केला आहे. उदाहरणार्थ, मार्ग शब्द आपण वापरतो आणि प्राकृत माग हा शब्दही आहे. पण मराठीत येताना या शब्दाचा अर्थ थोडा बदलला आहे. अशी शेकडो उदाहरणे देता येतील.

मराठी भाषेच्या उत्पत्तीचा काळ नक्की करण्यास खात्रीलायक असा आधार प्राकृत व अपभ्रंश या भाषांवरून मिळण्यासारखा नसल्याने आपल्याला मराठी भाषेतलाच आधार घ्यावा लागतो. मराठी भाषा बोली म्हणून लोकांच्या वापरात असल्याबद्दलचा सर्वांत जुना पुरावा कोणत्या काळातला आहे, हे पाहिल्यानेच मराठीचा उत्पत्तिकाळ निश्चित होऊ शकेल. मराठीत उत्कृष्ट अशी ग्रंथरचना शालिवाहन शके १२१२ (इ. स. १२९०) मध्ये झाली होती हे ज्ञानेश्वरीवरून उघड आहे. मुकुंदराजाचा विवेकसिंधु (श. १११०) व चक्रधरादिकांचे मानभावी वाङ्मय (श. ११८५) हे मराठी वाङ्मय ज्ञानेश्वरीच्या पूर्वीचं समजलं जातं. ज्ञानेश्वरी – विवेकसिंधुसारखे ग्रंथ निर्माण करण्याची शक्ती कोणत्याही भाषेत तिच्या जन्माबरोबर येणं शक्य नाही. भाषा जन्मल्याक्षणी अशी उत्तम ग्रंथनिर्मिती होत नसते. ग्रंथकर्तृत्व हे पायरीपायरीनंच वाढतं. तेव्हा हे ग्रंथ मराठीतील आद्य निश्चित नाहीत. सकस ग्रंथनिर्मितीची ताकद मराठी भाषेत त्यापूर्वीच निर्माण झाली असली पाहिजे.

ज्ञानेश्वरीत पदोपदी आढळून येणारं उपमांचं प्राचुर्य, भाषेचं सौंदर्य, कल्पनांचं प्रागल्भ्य, वाटेल तसा आकार घेण्याची भाषेची क्षमता, मनातील भावार्थ हरतर्‍हेनं विशद करण्याची हातोटी वगैरे भाषेतील वरवर दिसणारे, बुद्धीला पटणारे व मनाला भिडणारे असे दोन्ही प्रकारचे गुण भाषेत काही जन्मत:च येत नाहीत. हीच गोष्ट विवेकसिंधु व मानभावी वाङ्मयाची. मराठी भाषेच्या बालपणीची कल्पना देणारं वाङ्मय दुर्दैवानं आज उपलब्ध नाही. काही शिलालेख, ताम्रपत्रे इत्यादी तुटपुंजी साधनं आपापल्या परीनं प्रकाश पाडण्याचं काम करतात. शिलालेखांवरून तत्कालीन भाषेचं अस्तित्व तर सिद्ध होतंच, पण ते दगडावरील रेघा या प्रकारचं असल्यानं त्यांच्यांत संस्करण अथवा अर्वाचीकरण अजिबात शक्य नसतं. म्हणून तत्कालीन भाषेचं स्वरूप अभ्यासण्यास ती खात्रीलायक साधनं आहेत.

ज्ञानेश्वरीच्या एकच वर्ष पूर्वीचा म्हणजे शक १२११ (इ. स. १२८९) मधील निझामशाहीतील उनकेश्वराचा शिलालेख आहे. या लेखात रामचंद्र यादव, त्याचा एक नातलग वंकदेव, त्याचा करणाधिप हेमाडीपंडित, त्याचा साहाय्यक सोमदेवपंडित व माहूरचा रहिवासी सरणनायक, इतक्यांची नावं असून सरणनायकानं उनकेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. लेखात अठरा ओळी आहेत, त्यांपैकी पहिल्या आठ ओळी पुढे दिल्या आहेत.

आऊं नमो गणाधिपतये नम: स्वस्ती सके १२११॥ वीक्रम संवत्सरे आ. स्व.

प्रताप चक्रवर्ति: स्री रामचंद्र देव: विजयोप्रत पाद पदुमोपजिवि: हाचि साहा स्सी वकदे.

व: प्रधान हेमाडिपंडित…तं निरोपीत नाएकु टकत्तु सोमदेयो पंडित: तस्मिकाले वर्तमाने

त्रेता युगी रामु: वनवासप्रसंगी: स्रभंगाचआ आस्रम आले : स्रभंग प्रीत्यर्थ : हे उद

दक उप्ल केले : तदा काल्ये स्सि देवरचित तीर्थ हे : हरीहरा प्रसादे मातापुरनिवासी क-सी-

ष्य: कौडण्यगोत्र: सराणुना एक : रुतेमेर्वृतेवें: सकल प्रासादरतु केले तो राम प्रासादं संपुर्ण

जाला : तेयाचा नमस्कारु हरीहरा देवता सकलासि

नमस्कार त्रिकाल: वाचिता विजैया… लटिग्रामु

यापुढे देवालयाला दान दिल्याचा उल्लेख आहे. या लेखातली भाषा संस्कृतमिश्रित मराठी आहे. काही रूपं अस्सल मराठी शिक्क्याची आहेत.

याच रामदेव जाधवांच्या राजवटीतला शके १२०७ म्हणजे ज्ञानेश्वरीच्या पाच वर्षं पूर्वीचा सासवडजवळ पूर गावात एक शिलालेख आहे. यात अकरा ओळी आहेत, पण त्या पूर्णपणे वाचता येत नाहीत.

स्वस्ति स्री सक.ह १२०७

वर्षे प (पा) र्थिव सवछरे

आस्विन (ना) दौ अद्यैह स्री

म प्रौ (त्प्रौ)ढप्रताप चक्रव

तीं स्रीरामच (चं)द्रदेवविजय

राज्योदै तदपादपदुअमोपजिविस

कळकर्णा (रणा) धिप. हेमाडि पंडि

तो। त बोंइ..दंडनायक स्रीपत प (प्र) मु (भु?)

णें नायक । रामेचंद्रदेवों नाडिती जीवि..

ळक कुळ..

…सोडि

ज्ञानेश्वरीच्या पूर्वी सतरा वर्षं, म्हणजे शके ११९५मध्ये (सन १२७३) कोरलेला पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाच्या मंदिरातील शिलालेख आहे. यालाच लोक चौर्‍यांयशीची शिळा म्हणतात. या शिळेस पाठ लावली म्हणजे मनुष्य चौर्‍यांयशी योनींतून मुक्त होतो, अशी समजूत आहे. श्रीविठ्ठलाचं मंदिर बांधण्यासाठी वर्गणी गोळा करण्यात आली होती. त्या वेळेस ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची नावं या शिळेवर आठ रकाने काढून त्यांत कोरली आहेत. या यादीत त्या वेळच्या अनेक व्यक्तींची नावं व काही नाण्यांचा उल्लेख सापडतो. यांपैकी काही नावं व शब्दं मराठी व्याकरणाच्या नियमांनी जखडलेले सापडतात. चालावेया, पैकाचा, रामचंद्र देवराये, देवरायासी, करनु, सेंठी, तेयाची, विठ्ठलाची आण इत्यादी शब्दं मराठी वळणाचे आहेत.

या शिलालेखाच्या पूर्वीचा शके ११६१मधला (सन १२३९) नेवाशाचा शिलालेख होय. हा ज्ञानेश्वरीपेक्षा ५१ वर्षं जुना आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या खांबाला टेकून बसून ज्ञानेश्वरी सांगितली, त्या खांबाजवळ कणैरेश्वराचं जुनाट हेमाडपंती देऊळ होतं. त्या देवळाच्या एका दगडावरील हा लेख आहे. त्याची भाषा संस्कृत व मराठी अशी मिश्र असून त्यात सीळू पंडित वृत्तिकाराला अठरा निवर्तने जमीन दिल्याचा उल्लेख आहे. लेख पुढीलप्रमाणे आहे..

स्वस्ति श्री शकु ११६१ विकारी सं

वत्सरे ॥ श्री कणैरेस्वरदेवालये ॥ पुराण

वृत्तिकार: । शौनकगोत्रीय: । माध्यंदिन: ॥

श्री सीलूपंडित: ॥ तथा पांपूवीहरि सीमागारे ॥

पुराणवृत्ती भूमी निवर्तनें सर्वनमसे अठरा ईए भूमी

कणैरेश्वदेऔम्मूली ॥ हे भूमि देवे पुरुषेण । जीवणा दिधली ॥

या लेखाच्या पूर्वीचा उपलब्ध असलेला शिलालेख शक ११५०मधला (सन १२२८) आहे. हा लेख आंबेजोगाई येथे मिळाला असून याला खोलेश्वराचा शिलालेख असं म्हणतात. यात कोरलेल्या एकंदर ४७ ओळींपैकी पहिल्या पस्तीस ओळी आणि शेवटच्या पाच ओळी संस्कृतात आहेत. मधल्या चारपाच ओळी मराठी आहेत असं वाटतं कारण त्यातलं मराठी स्पष्ट नाही. संस्कृत मजकूर लिहून झाल्यावर तोच मजकूर मराठीत लिहिला आहे. तदेव महाराष्ट्रभाषायात्र लिख्यते, असं लेखातच म्हटलं आहे.

याच सुमारास लिहिला गेलेला एक शिलालेख खानदेशात चाळीसगावापासून दहा मैलांवर असलेल्या पाटण या गावातील श्री भवानीच्या मंदिरात आहे. हा लेख ज्ञानेश्वरीच्या पूर्वी ८४ वर्षं, म्हणजे शक ११२८मध्ये (सन १२०६) लिहिला गेला. हा लेख भाषेच्या दृष्टीनं अधिक स्पष्ट आहे. लीलावतीचे कर्ते प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांच्या चांगदेव नावाच्या नातवानं हा लेख खोदवला आहे. देवगिरीच्या सींधण यादवाचे मांडलिक म्हणून असलेल्या निकुंभ नावाच्या राजकुलाच्या आश्रयानं ज्योतिषशास्त्राचं अध्ययन, अध्यापन करण्यासाठी मठाच्या स्थापनेसंबंधी यात उल्लेख आहे. मठाच्या व्यवहारांसाठी कोणकोणत्या गोष्टी द्यायच्या, याचा त्यात उल्लेख आहे. लेखाच्या शेवटच्या चार ओळी मराठीचं पूर्वस्वरूप प्रगट करतात. या लेखात इया, पाटणी, केणें, तेहाचा, ब्रह्मणा, दिन्हला, तेलिया, मबिजे, मबावे इत्यादी मराठी व्याकरणानं मान्य केलेली रूपं आहेत.

या शिलालेखाच्या अगोदरचा परळ इथे एक सरकारी बंगला बांधत असताना सापडलेला शिलालेख आहे. हा शिलालेख शके ११०९मध्ये (सन ११८७) कोरलेला असल्यानं ज्ञानेश्वरीच्या पूर्वी १२३ वर्षांचा ठरतो. यात कोकणाच्या अपरादित्य नावाच्या राजानं श्री वैद्यनाथ देवाच्या पूजेसाठी षट्षष्टी म्हणजे साष्टी प्रांतातील माहुलीजवळ २४ द्राम उत्पन्नाच्या जमिनीची देणगी दिल्याचं नमुद केलं आहे. यातील सुरूवातीचा मजकूर संस्कृतात असून शेवटच्या दोन ओळींतील शपथ मात्र मराठीत आहे. यावरून एक गोष्ट उघड आहे की, या सुमारास शिष्टांची दरबारी भाषा जरी संस्कृत असली तरी सामान्य लोकांची भाषा मराठी होती. सर्वांना ती शपथ किंवा तो शाप समजावा म्हणून जी भाषा वापरली ती पुढीलप्रमाणे आहे –

॥अथ तु जो कोणु हुवि ए शासन लो

पी तेवा श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबीआ पडे ॥ तेहाची

माय गाढवे *विजे॥

याच्या आधीचा पुरावा एका ग्रंथातला आहे. यशश्चंद्र नावाच्या एका लेखकाच्या राजमतीप्रबोध या ग्रंथात राजसभेत बसलेला एक महाराष्ट्रिक एका स्त्रीच्या रूपसंपदेचं वर्णम करतो आहे. या ग्रंथाचा काळ गुजराती संशोधक लालचंद गांधी अकराव्या शतकाचा उत्तरार्ध मानतात. वर्णनाची भाषा पुढीलप्रमाणे –

देव चतुरांगुलाची जीहा, मी कांई सांघओ? गोमटी मुइ, फाफट निलाट चापटु, आंखड्याली ताहीची, वीणी काली, न छोटी न मोटी वानिचां पाहुली नाही । कांइ तहि तूलि। नाहि उंडी जाणु मुखकरी कुंडी, बोलती महुरवाणि चालती सुजाणि राउल खरी रूढी अमृत करी इसी कूयडी॥

मराठीच्या अस्तित्वाचा याच्या आधीचा दाखला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सांवरगाव येथील महामंडालेस्वर कडंबकुलातिलक मारडदेवाने दिलेल्या दानासंबंधी असलेल्या शिलालेखात सापडतो. याचा काळ १०८६ शके आश्चिन शु. १ गुरौ असा आहे. म्हणजे इंग्रजी तारीख १९ सप्टेंबर ११६४. ११५७ साली लिहिला गेलेला एक शिलालेखही पळसदेव इथे सापडला आहे. सरडेश्वराच्या देवळावर हा शिलालेख आहे. जाधवांच्या पूर्वी राष्ट्रकूटांच्या राजवटीत मराठी भाषा चांगली प्रचलित होती, असं यावरून लक्षात येतं.

या शिलालेखांच्या पूर्वीचा एक भरभक्कम पुरावा मानसोल्लास अथवा अभीलषितार्थचिन्तामणि या ग्रंथात सापडतो. हा ग्रंथ इ.स. ११२९मध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या १६१ वर्षांपूर्वी चालुक्य वंशातल्या सोमेश्वर या राजानं लिहिला. या ग्रंथात मराठी रूपं व मराठी शब्द कित्येक ठिकाणी आले आहेतच, पण विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथात रागतालाची माहिती देताना ग्रंथकारानं काही मराठी पदंही दिली आहेत. ही पदं किंवा ओव्या महाराष्ट्रातील स्त्रिया दळताना, कांडताना म्हणतात, असंही सोमेश्वर लिहितो. मराठीत लोकगीतांची परंपरा किती जुनी आहे, हे यावरून लक्षात येतं.

मानसोल्लासातील ही पदं पुढीलप्रमाणे –

१. जेणे रसातल उणु मत्स्यरूपे वेद आणियले मनु शिवक वाणियले तौ संसारसायरतारण मोहतो रावो नारायणु जो गीची

२. जो गीची जाणे गाइचे बहुपरिरूपे निर्होगो मय सैक: शेशनले सुलघु शशजन मान वंकसे

या लेखाच्या पूर्वीचा एक मराठी ताम्रपट आहे. तो कोकणातल्या दिवे या गावी सापडला. इ. स. १०६०मध्ये हा ताम्रपट लिहिला गेला. या ताम्रपटात वासुदेव भट्टाने त्याच्याजवळ असलेले स्थितिपुरी गावासंबंधीचे दोन ताम्रपट सभेचा समक्ष मावलभट्टाला दिल्याचा उल्लेख आहे. तसंच या गावाच्या कल्याणासाठी १२७ सोन्याची गद्याणक नाणी दिल्याचाही त्यात उल्लेख आहे. ही नाणी एका कंठ्यात ओवलेली आहेत. ऋषियप्प घैसास, सिद् पद्मदेव, तिकै, मधुवै षंगविद् जीवणै, नागरुद्रभट्ट, मधुवय, देवल वगैरे व्यक्तींची नावं त्यात आहेत. ठवियली, ठवियले, जाणति, लिहले ही क्रियापदे, स्थितिपुरीची, स्थानहचा दिवेचे ही षष्ठीची रूपे, योगक्षेमु, सासने ही प्रथमेची रूपे, पासे, पासी ही शब्दयोगी अव्यये आणि जे, ते ही सर्वनामे या ताम्रपटात सापडतात.

या उल्लेखाच्या आधीची मराठीची निशाणी म्हैसूरजवळ श्रवणबेळगोळ येथील शिलालेखात सापडते. मराठीतील शिलालेखांपैकी हा आद्य असल्यानं विशेष महत्त्वाचा आहे. हा शिलालेख इ.स. ९८३ मध्ये लिहिला गेला. गंग घराण्यातल्या राचमल्ल राजाच्या कारकीर्दीत त्याच्या चावुण्डराय नावाच्या प्रधानानं बाहुबलजी ऊर्फ गोमतेश्वराचा एक अतिशय प्रचंड असा दगडी पुतळा उभारला, आणि सर्व लोकांच्या माहितीसाठी पुतळ्याच्या खाली निरनिराळ्या देशभाषांत ती गोष्ट कोरवली. मराठीतला मजकूर पुढीलप्रमाणे –

श्री चावुण्डराजे करवियले

गंगराजे सुत्ताले करवियले

या दोन ओळी एकाच काळात खोदलेल्या नाहीत. दुसरी ओळ काही वर्षं मागाहून इ. स. १११७ मध्ये कोरली असावी. या शिलालेखातली अक्षरं मोठी आहेत. पहिल्या श्रीची उंची सुमारे दीड फ़ूट आहे. यात उल्लेखलेलं गंग घराणं दोन ठिकाणी नांदलं. एका शाखेनं कलिंगात मुखसिंग शहरी राज्य केलं. दुसरीनं म्हैसूर येथे राहून पश्चिमेकडच्या प्रदेशावर राज्य केलं. या गंग घराण्यातील मारसिंह, राचमल्ल आणि रक्कस या तिघा राजांच्या अमदानीत चावुण्डराय हा प्रख्यात जैन योद्धा, पंडित आणि भक्त त्यांचा प्रधान होता. अजितसेन हा राचमल्ल आणि चावुण्डराय या दोघांचाही गुरू होता. राचमल्लाची कारकीर्द इ. स. ९७४ – ९८४ अशी होती, व त्याच काळात चावुण्डरायानं या अजस्र स्तूपाची उभारणी केली. या त्याच्या धार्मिक आणि पुण्यशील कृत्यामुळे तो जरी प्रधान होता तरी त्याला राचमल्लानं राय ही बहुमानाची पदवी दिली. त्याने उभारलेल्या घुमटामुळे त्याला गोम्मतराय असंही म्हणत असत. त्याने लिहिलेले दोन ग्रंथ चामुण्डरायपुराण आणि चरित्रसार या नावाने प्रसिद्ध आहेत.

या शिलालेखाच्या अगोदरच्या काळातल्या काही ताम्रपटांत व शिलालेखांतही मराठी शब्द सापडतात. आपण वर जे शिलालेख बघितले, त्यांच्या पूर्वीच्या काळातील, म्हणजे इ. स. ११२७पासून ते थेट इ. स. ६८०पर्यंतच्या सोळा ताम्रपटांत व शिलालेखांत अमात्यु, देणे, प्रधानु, सांब्राज्य, वइरी, जो, इथ, खळखळ, करवून, करित, हित, पन्नास असे मराठी शब्द सापडतात. त्यावरून मराठी भाषेच्या अस्तित्वाचा दाखला इ. स. ६८०पर्यंत न्यायला हरकत नाही.

मराठीच्या अस्तित्वाबद्दलचा आणखी एक उल्लेख धर्मोपदेशमाला या ग्रंथात सापडतो. इ. स. ८५९मध्ये हा ग्रंथ लिहिला गेला. या ग्रंथात मराठी भाषेचं पुढीलप्रमाणे वर्णन केलं आहे –

सललिय-पय-संचारा पयडियमयणा सुवण्णरयणेल्ला।

मरहट्टय भासा कामिणी य अडवीय रेहंती॥

याचंच संस्कृत भाषांतरही आहे –

सललितपदसंचारा प्रकटितमदना सुवर्णरचनावती ।

मरहट्ट भाषा कामिनी य अट्वी च राजन्ते ॥

या श्लोकात मराठी भाषेस सुंदर कामिनीची उपना देऊन ती अटवीप्रमाणे सुंदर गतीची, मदनाने उद्दाम, चांगल्या वर्णाची आहे, असं वर्णन केलं आहे.

मराठीच्या अस्तित्वाचा आणखी एक फार जुना व महत्त्वाचा पुरावा कुवलयमाला नावाच्या ग्रंथात मिळतो. हा ग्रंथ उद्योतनसूरी याने इ. स. ७७८ मध्ये लिहिला. या ग्रंथात गोल्ल, मध्य, मागध, अंतर्वेध, कीर, टक्क, सैंधव, मारव, गुर्जर, लाड, कण्णाड, तायिक, कोसस, मतहट्ठ, आंध्र, खस, पारस, बर्बर इत्यादी अठरा देशी भाषांचा उल्लेख आहे. पुढे प्रत्येक देशातील मनुष्याचं वर्णन करून त्याच्या भाषेतील अतिशय ठळक अशी लकब सांगितली आहे. उदा. तेरे मेरे आउति जंपिरे मज्झदेसे म्हणजे तेरे मेरे आओ असं म्हणणार्‍या मध्यदेशीयास पाहिले. असंच पुढे गुर्जर, माळवी या लोकांचं व त्यांच्या भाषांचं वर्णन आहे. दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य । दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे ॥, म्हणजे बळकट, ठेंगण्या, सावळ्या अंगाच्या, काटक, अभिमानी, भांडखोर, दिण्णले (दिले), गहिल्ले (घेतले) असं बोलणार्‍या एका मराठ्यास पाहिले, असं एका मराठी वाण्याचं व त्याच्या भाषेचं वर्णन केलं आहे. इ. स. ७७८च्या सुमारास मराठी समाज व मराठी भाषा या दोन्हींना एक प्रकारचं विशिष्ट स्थान प्राप्त झालं होतं, हे यावरून सिद्ध होतं.

आज तसं पाहिलं तर सातपुड्याच्या खाली कावेरीपर्यंतचा पश्चिमेकडील प्रांत मराठीनं व्यापला आहे. उत्तरेस दमणपासून दक्षिणेस गोव्यापर्यंतचा अरबी समुद्राचा पश्चिम किनारा ही मराठीची पश्चिमेकडील मर्यादा आहे. उत्तरेस ती दमणपासून दमणगंगेच्या काठाकाठानं तिच्या उगमापर्यंत जाऊन नंतर घाटावर चढून घाटावरील पाणलोटाच्या अनुरोधानं नर्मदा नदीस गाठते. इथेच तिची गुजराती आणि नेमाडी या भाषांशी भेट होते. यापुढे मराठीचा प्रवास सातपुडा पर्वताच्या रांगेनं होतो. सातपुड्याच्या एका रांगेतून गाविलगडाच्या आसपासच्या प्रांतांतून तिचा रोख पूर्वेकडे वळून बैतुल आणि शिवनी वगैरे प्रदेशास अर्धवर्तुळाकार वळसा घालून नागपूर मध्यावर ठेवून थोडीशी दक्षिणेस तर थोडीशी पूर्वेस व पश्चिमेस वळून लांजी व वैरागडजवळ गोण्डी व तेलुगु या भाषांना ती भेटते. पुढे चांद्यापर्यंत जाऊन पश्चिमेकडे पैनगंगेच्या काठाकाठानं माहूरपर्यंत आल्यावर तिचा आणि तेलुगुचा संबंध तुटतो. माहूरवरून दक्षिणेकडे गोदावरीकडे जाऊन नैऋत्येकडे वळणावळणाने देगलूर, नळदुर्ग, सोलापूर, विजापूर या गावांवरून ती कृष्णानदीजवळ येते. इथे कानडीचा आणि तिचा संबंध येतो तो कोल्हापूरपर्यंत टिकतो. नंतर कोल्हापूरवरून पुन्हा नैऋत्येकडे ती जाते व संपूर्ण करवीर प्रांत व्यापून गोव्याच्या घाटालगतच्या प्रदेशावरून तेरेखोल इथे पुन्हा अरबी समुद्रास मिळते. याशिवाय निरनिराळ्या विभक्त अशा पुष्कळ लहान प्रदेशांत मराठी बोलली जाते. सतराव्या आणि अठराव्या शतकांत साम्राज्याच्या विस्तारासाठी मराठ्यांनी जी मुलुखगिरी वेगवेगळ्या प्रांतांत केली, त्या प्रांतांत त्यांचे पाय रुजल्यावर साहजिकच त्यांची मातृभाषाही तिथे रुजली. मुलूखगिरीचं पहिलं वारं ओसरल्यावर जेते जसे स्थायी झाले, तशी त्यांची भाषाही तिथे स्थायी झाली. तंजावर, बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर, काशी अशा दूरदूरच्या प्रांतांत मराठी भाषा राजदरबारी स्थानापन्न झाली.

भाषांचा हा इतिहास बघितला तर या सार्‍या भाषा एखाद्या विशाल वटवृक्षाच्या अगणित खोडांप्रमाणे भासतात. वडाच्या पारंब्या फांद्यांमधून निघून जमिनीत जाऊन मूळ धरतात आणि नव्या वृक्षांची उभारणी करतात. कालांतरानं यातला मूळ वृक्ष कोणता, शाखा कोणत्या, मुळे कोणती हे कळतच नाही; सगळेच वृक्ष मात्र एकमेकांना जीवनरस देत असतात. अशा वृक्षाला गीतेतल्या ऊर्ध्वमूल अश्वत्थाचंच वर्णन लागू पडेल. ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे,

आणि अधिं फांकली डाळें । तिथें चि होति मूळें ।

तेयातळिं पघळे । वेलि पालौ ॥ १५. १४४॥

परि येरां रुंखासारिखा । तळिं मूळें वरि शाखा ।

तैसा न्हवे म्हणौनु लेखा । नैए कव्हणा ॥ १५.१४७॥

मराठीचं मूळ शोधण्याच्या या प्रयत्नाचा समारोप ज्ञानेश्वरांच्या मर्‍हाटिया बोलांनीच करणं उचित ठरेल.