• श्रीधर

    श्रीधरकवी नाझरेकर हे इ.स.१७ व्या शतकातील एक प्रसिद्ध आख्यानकवी होते. काशीच्या आनंद संप्रदायातले हे आठवे वंशज. ह्यांचे घराणे मोगलाईतील खडकी येथील होते. आडनाव खडके म्हणत, पण यांच्या घराण्यातील एक पुरुष घोडदळात अधिकारी बनल्याने घोडके आडनाव पडले. त्यानंतर राघोपंत नाझर एका महालाचे कुलकर्णी बनल्यावर त्यांना नाझरेकर म्हणू लागले. श्रीधरांचे वडिलांचे नाव ब्रम्हानंद होते. आईचे नाव सावित्री. इ.स. १६७८ मध्ये हा वडिलांसोबत पंढरपूर क्षेत्री आला. येथेच त्यांचे अध्ययन झाले. पुराणे, पंचकाव्य, रामायण, भागवत ग्रंथाचे अध्ययन झाले व संतकवींची कविताही त्याने वाचली. त्याने एकूण ६० हजारावर ओळींचे काव्यलेखन केले आहे..

  • आनंदतनय

    दक्षिण भारतातील एक मराठी कवी. पूर्ण नाव गोपाळपंत आनंदराव अरणीकर. तो सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरजवळच्या अरणी या गावाचा रहिवासी होता. ‘मुरारपंत’, ‘मुरारब्रह्म’ अशी त्याच्या गुरूची नावे सांगितली जातात. तथापि त्याच्या वडिलांनीच त्यास गुरूप्रदेश दिला, असेही एक मत आहे. नलदमयंती-स्वयंवराख्यानाकर्त्या रघुनाथपंडिताचा तो व्याही होता, अशी एक आख्यायिका आहे. रामचरित्र, कृष्णचरित्र यांसारख्या विषयांवरील ३१ आख्याने, १७० हून अधिक पदे (त्यांत एक हिंदी पद आणि काही संस्कृत पदेही आहेत), काही आरत्या आणि गर्भगीता नामक वेदान्तपर प्रकरण एवढी त्याची रचना उपलब्ध असून ती प्रसिद्ध झाली आहे. छंदशास्त्राचा त्याचा चांगला अभ्यास होता, असे दिसते. त्याची शैली प्रौढ आणि यमकानुप्रासप्रचुर आहे. अक्षरगणवृंतात मराठी काव्यरचना सुरू करण्याचे श्रेय त्यास काही अभ्यासक देतात. सीतास्वयंवर, पूतनावध, राधाकृष्णविलास  ही त्याची विशेष प्रसिद्ध अशी आख्यानकाव्ये होत.

  • मुक्तेश्वर

    मुक्तेश्वर म्हणजे चिंतामणीसुत मुदगल. पंडिती परंपरेतील कवींमध्ये प्रथम मुक्तेश्वरांचा विचार करावा लागतो. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात व १७ व्या शतकाच्या पूर्वार्धातील कलाकवी. संत एकनाथ यांच्या मुलीचा मुलगा, अर्थात एकनाथांचा नातू होय. यांचा जन्म, मृत्यू व गुरुपरंपरेबाबत संशोधकांत मतभिन्नता आहे. मुक्तेश्वर हे त्यांच्या आराध्यदैवतचे नाव असून त्यालाच तो लीला विश्वंभर संबोधतो. मुक्तेश्वरांचे गोत्र अत्रि आहे. कोल्हापुरची महालक्ष्मी ही कुलदेवता व सोनारीचा भैरव हे कुलदैवत आहेत.

    मुक्तेश्वरांनी विविध प्रकारच्या रचना केल्या आहेत. संत आणि पंडित यांच्यातील दुवा म्हणून मुक्तेश्वरांचे लेखन उल्लेखनीय आहे.

  • अमृतराय

    (जन्म : दिनांक १७ मार्च ई.स. १६९८ शके १६२० ला चैत्र शुद्ध षष्ठी

    श्री अमृतराय महाराज यांचें नांव अमृत आणि त्यांचे काव्य देखील अमृतासारखेच. श्री हरी संकीर्तनाचे अमृततत्व आपल्या अमृतमय वाणीने ज्ञानामृत वर्षाव करित त्यांनी असंख्यजन भक्तीमार्गाला लाविले.  वयाच्या ११ व्या वर्षी चैत्र शुद्ध षष्ठी शके १६३१ ला महाराजांनी कटिबंध रचना करून ईश्वराला सादर केली व सर्वांना गाऊन दाखविली. त्याच बरोबर हरि कथा निरुपण प्रारंभ केला. वडिलांबरोबर राजकारणार्थ प्रवास व अनेकांशी झालेला व्यवहार तसेच संत, सत्पुरूष, विद्वान यांच्या भेटी व सहवास वारंवार होऊन ज्ञान संपन्नता विशेष झाली. मराठी, हिंदी, संस्कृत, फारशी, कानडी इ. भाषांच्या प्राविण्यामुळे श्री अमृतराय महाराज उर्फ रायजी हे अल्पावधीतच सर्वांच्या प्रेमास प्राप्त झाले.

  • मोरोपंत

    मोरोपंत पूर्ण नाव: मोरेश्वर रामचंद्र पराडकर. (जन्म : पन्हाळगड, इ.स. १७२९ – बारामती, १५ एप्रिल, १७९४-चैत्री पौर्णिमा) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी. पन्हाळगड इथे पराडकर कुळात मोरोपंतांचा जन्म झाला. पराडकर कुटुंब हे मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणार्‍या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली