- तिथी :
श्रावण वद्य अमावास्या
- पार्श्वभूमी :
भारत हा शेतीप्रधान देश आहे. पारंपारिक पध्दतीने शेतीसाठी बैलाची अनमोल मदत घेतली जाते. बैल वर्षभर शेतात राबत असतो. त्याच्या कष्टामुळे धनधान्य मिळते. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्याने केलेल्या कष्टाचे स्मरण व्हावे म्हणून वर्षातून एक दिवस बैलपोळा साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे हा सण शेतकरी साजरा करतात.
- साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :
पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घातली जाते. बैलांशी निगडीत वस्तू नवीन आणून बैलांवर चढवतात. शिंग तासून रंग देतात. नविन वेसन बैलाच्या नाकात घातली जाते. नविन घंटा, घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून .बैलांना सुद्धा रंग देण्याची प्रथा आहे. पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. दिवस भर बैलांना कणकेचे गोळे, तेल, सरकी इत्यादी देऊन त्यांना आराम देण्यात येतो. संध्याकाळी सर्वप्रथम शेती अवजारांची पूजा करण्यात येते. सजविलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते, बैलांना गावच्या मंदिरात नेऊन प्रसाद म्हणून गुळ- खोबरं वाटण्यात येते. वर्षभर शेतात राबणारा बैल पोळयाच्या दिवशी मात्र नवरदेव असतो. मिरवून आणलेल्या बैलांचे ओवाळून स्वागत केले जाते. या दिवशी बैलाचे लग्न लावतात. बैलांचे लग्न लावताना चाहूर चाहूर चांगभला, पाऊस आला घरला चला असे म्हणतात. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो.
- वैशिष्ट्य :
काही ठिकाणी या दिवशी बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. काही ठिकाणी गावातले सगळे लोकं मिरवणुकीने आपापले बैल घेऊन एकत्र जमतात आणि मग गावाचा प्रमुख “पोळा फोडतात”. त्यानंतर प्रत्येक बैल घरी उत्सवासाठी जातात.
- खाद्यपदार्थ :
पुरणपोळी