‘प्रगती अंध विद्यालया’ बदलापूर

दृष्टिहीन असणे ही कोणती कमतरता नसून त्यावर मात करत प्रत्येकाने आयुष्याची स्वत:ची वाटचाल स्वत:च घडवावी ही भावना प्रत्येक दृष्टिहीन व्यक्तीच्या मनात निर्माण व्हावी या हेतूने बदलापूरच्या सुहासिनीताई मांजरेकर यांनी पुढाकार घेतला.

‘व्हिक्टोरिया मेमोरिअल हायस्कूल फॉर ब्लाईंड’ या शाळेत १५ वर्षे शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. आर्थिक टंचाईमुळे गरजू, गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेचे साहित्य, ब्रेल लिपीतील पुस्तके आदी गोष्टींसाठी तडजोड करावी लागत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुहासिनीताई यांनी स्वत:च एक शाळा सुरू करण्याचे ठरवले. बदलापूर येथे राहणा-या सुहासिनीताई यांनी १९६८ साली बदलापूर येथेच ‘प्रगती अंध विद्यालय’ची स्थापना केली. या शाळेतील शिक्षण दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असून सुरुवातीला केवळ एका विद्यार्थ्यांसोबत सुरू केलेल्या या शाळेत आता ११२ विद्यार्थी शिकत आहेत.

८४ वर्षाच्या सुहासिनीताई आजही तितक्याच उत्साहात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. या विद्यालयामध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग घेतले जातात. . ‘प्रगती अंध विद्यालयात’ केवळ शैक्षणिक उपक्रम न राबवता विद्यार्थ्यांमध्ये इतर गुण निर्माण व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. संगीत क्षेत्रातील प्रगती अंध विद्यालयाचे विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने नावारूपाला आले आहेत. उत्कृष्ट गायक, तबलावादक, ढोलकीवादक आणि नृत्याविष्कार सादर करणारे विद्यार्थी तयार झाले आहेत. संगीतात या शाळेने एवढी प्रगती केली आहे की, या शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्वत:चा ऑर्केस्ट्रा ग्रुप तयार झाला आहे. अनेक ठिकाणी येथील विद्यार्थी संगीताचे कार्यक्रम घेत आहेत.

ताल सुरांचा अनोखा मिलाप ताल आणि सुरांचा अनोखा मिलाप या शाळेत अनुभवास येतो. नृत्याविष्काराचे दोन अनोखे प्रयोग शाळेने केले आहेत. ‘स्केटिंग नृत्य’ आणि ‘परातीवरील दांडिया’ ही येथील विद्यार्थ्यांची खासियत आहे. या नृत्याविष्कारांना भरभरून दाद मिळते.

सुहासिनीताईंचे कार्य पाहता त्यांना आतापर्यंत १ हजार ७ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या मेहनतीची दखल राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी घेतली आणि अंध-अपंगांसाठी विशेष कार्य केल्याबद्दल २००७ मध्ये सुहासिनीताई यांना पुरस्कार देत त्यांचा गौरव केला

शाळेत शिकायला विविध ठिकाणची मुलं

सुहासिनीताईंच्या या प्रगती अंध विद्यालयामध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग घेतले जातात. विद्यालयात आता तब्बल ११२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांमध्ये बदलापुरातील ही एकमेव शाळा आहे. नागपूर, नाशिक, उत्तर प्रदेश अशा भारतातील विविध ठिकाणांहून अंध मुलं या शाळेत शिक्षण घेत आहेत. म्हणजेच ताईंनी रुजवलेल्या शाळारूपी रोपट्याचा आता भलामोठा वटवृक्ष झालाय.

शाळेतून पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी सुहासिनीताई मार्गदर्शनही करतात. सोबत व्यसन हे आरोग्यासाठी किती अपायकारक आहे याचा संदेशही दिला जातो. केवळ शिक्षण नाही तर नृत्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रगतीची वाट दाखवली असून सुहासिनीताई आज नि:स्वार्थीपणे झटत आहेत.

 • पत्रव्यवहारासाठी पत्ता

  At And Post,Badlapur Gaon,

  Taluka Ambernath,

  Near Police Station
  Badlapur
  Thane – 421504

 • दूरध्वनी

  02512665420,

  02512665182

 • ई-मेल

  pagatiandhvid@gmail.com