प्रकृतीदोष आणि त्रिदोष

शरीर हे त्रिदोषयुक्त (तीन तत्वे) आहे. काही व्यक्तीत हे त्रिदोष – कफ, वात, पित्त समस्थितीत असतात. बहुतेक जणांमध्ये एक ना एक दोष जास्त असतो. दोष-प्रकृती कशी ओळखायची ते आपण आधी थोडक्यात समजावून घेऊ या.

वातदोष

वातदोषाधिक्याच्या व्यक्ती ह्या नेहमी सडपातळ, तडतडया, लगेच कामाला लागणा-या, पण कामात सातत्य नसणा-या असतात. त्यांची भूक कमीजास्त होते, पण अन्न कितीही घेतले तरी वजन वाढत नाही. मळाला कोरडे खडे होण्याची प्रवृत्ती असते. काही ना काही आजारपण वारंवार असते. गरम अन्न आवडते पण पंखा व गारठा नकोसा वाटतो, थंडीत लोकरीचे कपडे लागतातच अशी प्रवृत्ती असते. या व्यक्तींच्या शरीरावरील शिरा (निला) उठून दिसतात. त्यांची त्वचा रखरखीत कोरडी दिसते. पावसाळयात वारंवार आजारपण आढळते. शरीरातील मांसल भाग कडकडीत असतो.

पित्तदोष

पित्तदोषाधिक्याच्या व्यक्तींना उकाडा सहन होत नाही. त्वचा इतरांच्या मानाने थोडी गरम असते. मांसल भाग इतर प्रकृतीच्या मानाने मऊ लागतो. नेहमी भरपूर भूक, झटपट पचन होत. भुकेच्या काळात पुरेसे खाणे न मिळाल्यास कासावीस होणे दिसून येते. मात्र ऑक्टोबरमध्ये आजारी पडण्याची प्रवृत्ती असते. अशा व्यक्तीस भराभर नवीन कल्पना सुचतात, रागही जास्त असतो. अशा व्यक्तींना मलमूत्रविसर्जनासंबंधी किंवा अपचनाचे आजार सहसा होत नाहीत.

कफदोष

कफदोषाधिक्याच्या व्यक्ती नेहमी गुटगुटीत, शांत-संथ, मोजके खाणा-या, उष्णताप्रिय, इतरांच्या मानाने निरोगी, न दमता काम करणा-या, गाढ झोपणा-या, व्यायामप्रिय अशा असतात.

वरीलप्रमाणे एकेक दोषाधिक्य असलेल्या व्यक्तींप्रमाणे दोन-दोन दोषाधिक्यांचे मिश्रण असलेल्या प्रकृतीच्या व्यक्तींही आढळतात हे लक्षात ठेवले पाहिजे.

त्रिदोष आणि आजार

आयुर्वेदाने आजारांचेही त्रिदोषसिध्दांताच्या आधारे वर्गीकरण केले आहे.
वात, पित्त आणि कफ ह्या तीन घटकांपैकी शरीरामध्ये कोणताही एक, दोन किंवा तीनही घटक प्रमाणापेक्षा वाढू शकतात. असे झाले तर शरीरात ते निरनिराळया प्रकारचे रोग निर्माण करतात. या तीन घटकांच्या वाढीला अनेक वेळा आपल्या आहार – विहारातील गोष्टी कारणीभूत ठरतात.

कफदोषाचे आजार

सावकाश वाढणारे, शरीरातील अवयवांची फार हानी न करणारे, फार ताप-वेदना नसणारे आजार हे कफदोषाचे म्हणून ओळखले जातात.
कफदोषात्मक आजारांत परिश्रम, लंघन व मधयुक्त औषधे उपयुक्त ठरतात.

वातदोषांचे आजार

वजन घटवणारे, त्वचेवर सुरकुत्या आणणारे, झटके आणणारे किंवा अचानक कमी-जास्त होणारे, निद्रानाश घडवणारे आजार हे वातदोषांचे आजार या गटात येतात. वातदोषिक आजारांत एखादा अवयव निकामी होणे, सुकणे, इत्यादी घटनाही समाविष्ट आहेत.
वातदोषात्मक आजारांत विश्रांती आणि तैलयुक्त औषधे, उपयुक्त असतात.

पित्तदोषिक आजार

पित्तदोषांच्या आजारांमध्ये ठिकठिकाणी लालपिवळा रंग तयार होणे, त्वचेवर किंवा शरीरद्वारांच्या (मुख, गुदद्वार,नाक, मूत्रद्वार, घसा) भोवती लालसरपणा, आग, जळजळ होणे, शरीरात कोठेही आग, जळजळ, जास्त ताप, हिंडती-फिरती व्यक्ती अचानक अंथरूण धरणे, शरीरात कोठेही पू वाढणे, वरून ठीक दिसणारा अवयव झटक्याने निकामी होणे, इत्यादी आजारांचा समावेश केला जातो.
पित्तदोषात्मक आजारांत सतत निरीक्षण करणे आणि तूप वापरणे आवश्यक असते.
तापाचे उदाहरण घेतले तरी, कफ-वात-पित्तदोषांमुळे आजाराआजारांत फरक दिसतो.

कफदोषिक ताप

महिनेमहिने ताप असूनही शरीर बारीक न होता, कामात अडथळा न येता चालू असणारे आजार कफदोषाचे असतात.
पित्तदोषिक ताप
अचानक वाढणारा ताप, ग्लानी, दोन-तीन दिवसांतच तापाने थकून जाणे, शरीर बारीक न झाल्यास घसा, गुदद्वार, इत्यादी जागी लालसरपणा दिसणे हे सर्व पित्तदोषाशी संबंधित आहे.

वातदोषिक ताप

वातदोषाशी संबंधित आजारात ताप येतो व जातो. ताप असताना काही सुचत नाही, पण गेल्यावर सर्व ठीक वाटते. शरीर बारीक होत जाते, पण पू फारसा होत नाही.

दोषकारक आणि दोषनाशक पदार्थ

कफकारक आणि कफनाशक

आपल्या आहारातले चिकट पदार्थ (उदा. उडीद डाळ, भात, इ.), गोडसर पदार्थ (मिठाई, इ.) पिठात पाणी मिसळून चिकट होणारे पदार्थ (कणीक, इ.) कफकारक आहेत. गूळ, मिठाई,लस्सी, दही हे कफकारक आहेत. थंड पाणी, गारठा इत्यादींनी कफ वाढतो. आराम, जास्त झोप हेही कफकारक आहेत.

धान्य भाजून केलेल्या लाह्या किंवा लाह्याच्या पिठात पाणी मिसळून केलेले पदार्थ कफ कमी करतात. सुंठ, मिरे, पिंपळी, मिरची, इत्यादींनी उकळून केलेले पाणी कफनाशक असते. नैसर्गिक मधही कफनाशक आहे.

वातकारक आणि वातनाशक

वातकारक पदार्थ म्हणजे हरभरा, वाटाणा, पावटा, मटकी, चवळी, इत्यादी कडधान्ये. ज्या धान्याचे आवरण पूर्ण वाढल्यावर वाळून तडकून फुटते अशी ही धान्ये आहेत. काकडी, खरबूज, टरबूज या गटांतील कापल्यावर पाणी सोडून देणारी फळे तसेच कडू, तुरट, तिखट चवीच्या वस्तू, इत्यादी पदार्थ वातकारक असतात. या पदार्थामधून पोषण कमी होते आणि विष्ठा कडक, कोरडी होते असे आयुर्वेदाचे सांगणे आहे.

गोड चवीचे पदार्थ, स्निग्ध पदार्थ (तेल, तूप), मीठ, आंबट पदार्थ, तेलमालिश, सहज पचणारे अन्नपदार्थ, गहू, उडीद तेल मिसळून केलेले पदार्थ वातविकारात वापरावेत. हे पदार्थ वातदोष कमी करतात.

पित्तकारक आणि पित्तनाशक

पित्तकारक पदार्थांमध्ये पिवळया, लालभडक, उग्र वासाच्या पदार्थांचा समावेश असतो. मसाल्याचे पदार्थ पित्तकर असतात. तिखट, आंबट, शिळे, खारट, आंबवलेले, मुरवलेले (लोणचे). दारू, इत्यादी पदार्थ पित्तकर आहेत. पित्तदोष असणा-या व्यक्तींना जळजळ होत असेल तर वरील पदार्थ टाळल्यास बरे वाटते. पित्तप्रकृती व्यक्तींना उन्हात त्रास होतो. भाजणे, शेकणे, यांचाही जास्त त्रास होतो. शेकोटीनेही या व्यक्तींचे पित्त वाढू शकते.

पित्तप्रकृती व्यक्तींचे आजार वेगाने वाढतात. त्यामुळे त्यांना सावधपणे गोड, द्रवरूप पदार्थ आणि नैसर्गिक पदार्थातील कडू-तुरट चवीचे पदार्थ दिल्यास बरे वाटते.

पथ्याचे महत्त्व

या दोषवर्णनाचे महत्त्व सतत निरीक्षणाने लक्षात येईल. काही व्यक्ती कायम नजरेसमोर असल्याने तुम्ही वर्गीकरण सहज शिकू शकाल. या त्रिदोषवर्गीकरणाचा वापर करून त्या त्या व्यक्तींचे पथ्यापथ्य सांगितल्यास त्यांचे आजार लवकर बरे होतील. यामुळे कमी औषधे लागतील हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. कोणत्या पदार्थाने त्यांचे आजार वाढतात किंवा कमी होतात ह्याचा अभ्यास केला पाहिजे.

सर्वसाधारणपणे अखंड मूग (सालीसकट) हा त्रिदोषांच्या दृष्टीने संतुलित पदार्थ आहे. हा पदार्थ वापरल्यास आजारनियंत्रण लवकर होते.

त्रिदोषविचार लक्षात घेतल्यावर केवळ साध्या अन्नपदार्थाच्या पथ्यापथ्याने आजारांवर ब-याच प्रमाणात उपचार करता येतात.