भटक्या-विमुक्त जातीतील फासेपारधी समाज कायमच भटके जीवन जगणारा. पाली व बेडय़ांवर वास्तव्य करणारा हा समाज. जन्मजात गुन्हेगार म्हणून इतर भटक्यांप्रमाणेच फासेपारधी समाजाकडे बघितलं जातं. उकिरडय़ावरचं जगणं नशिबी आलेल्या समाजाला त्यांच्यातीलच मतीन भोसले या तरुणानं अंधकाराच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
फासेपारधी समाजातील वंचित मुला-मुलींसाठी अमरावती जिल्ह्यातील काही युवकांनी एकत्र येत सुरू केलेली आश्रमशाळा शासकीय मान्यता व अनुदानाअभावी अडचणीत आली आहे. भीक मागून मिळालेल्या पैशातून सुरू असलेल्या या शाळेला अजूनही मान्यता व अनुदान न मिळाल्याने या शाळेच्या भवितव्यावर ‘प्रश्नचिन्ह’ निर्माण झाले आहे. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हे लक्षात घेऊन डी. एड पर्यंतचे शिक्षण झालेले आणि आदिवासी फासेपारधी सुधार समितीचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मान्यता न मिळाल्याने २२ सप्टेंबर २०१३ रोजी अमरावतीमधील मंगरूळ चव्हाळा या गावात ही ‘प्रश्नचिन्ह’ आदिवासी आश्रमशाळा सुरू केली. राज्यभर; तसेच देशातील काही मोठ्या शहरांमध्ये फिरून सिग्नलवर भीक मागणारी, कोणतेही काम करून पोट भरणारी समाजातील १८८ मुला-मुलींना गोळा करत एका संस्थेच्या गोदामात शाळा सुरू केली. घरातले काही साहित्य विकून या मुलांना पाट्या आणून दिल्या. दरम्यान, प्रशासनाने दबाव आणून ती जागा काढून घेतली. गावातील काहींच्या विरोधामुळे या कार्यकर्त्यांना तुरूंगातही जावे लागले. त्यानंतर समाजाच्याच एका कार्यकर्त्याच्या जागेत नारळाच्या झावळ्या आणि ताडपत्री बांधून तिथेच ही शाळा स्थलांतरित झाली.
सध्याच्या शाळेतील १८८ विद्यार्थ्यांपैकी काहींचे आईवडील मरण पावले आहेत. तर काहींचे आई-वडिल तुरूंगात आहेत. डीएड झालेली एक आणि बीएड झालेली एक शिक्षिका तसेच पदवीपर्यंत शिकलेले समाजातीलच अन्य पाच विद्यार्थी येथे शिक्षक म्हणून काम करतात.आयोगाने शाळेची माहिती घेऊन शाळेला मान्यता व अनुदान द्यावे, अशी शिफारस राज्य शासनाला केली आहे. परंतु, त्यावरही कार्यवाही झालेली नाही. जिल्हा परिषदेतल्या शाळेतील नोकरीचा त्याग करून त्याने भीषण आर्थिक दैन्यावस्था, गरिबी, गुन्हेगारीच्या दलदलीत अडकलेल्या कुटुंबातील भटक्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘प्रश्नचिन्ह’ ही निवासी शाळा सुरू केली. सध्या या शाळेत वर्ग १ ते १० पर्यंत २८८ मुले आणि १५९ मुली, असे एकूण ४४७ विद्यार्थी शिकत आहेत. शाळेच्या गरजा खूप आहेत मात्र त्यासाठी लागणारे धन कमी पडत आहे. अनेक संस्था, दानशूर व्यक्ती या शाळेच्या मदतीसाठी पुढे येत आहेत पण या शाळेचा आवाका मोठा आहे. मुलांना निवासी शाळेतल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मदतीची गरज आहे.मदतीचेआवाहन‘भीक मांगो आंदोलनातून मिळालेले धान्य, आर्थिक मदत आणि साहित्यावरच शाळेचा कारभार सुरू आहे. त्यामुळेच शाळा चालवण्यात अनेक अडचणी येत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनीही पुढे येत आम्हाला मदत करावी. धान्य, नवे-जुने कपडे, जुने फर्निचर, शैक्षणिक साहित्य याचबरोबर आर्थिक मदत यथा शक्ती करावी असे भोसले यांनी सांगितले.