मानसिक विकलांगता हे आयुष्याला लागलेले पाप आहे असा समज पसरलेला असताना, या समाजाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस रजनीताई लिमये यांनी दाखवले. त्यांनी मानसिक विकलांगांसाठी नाशिकमध्ये पहिली शाळा काढली. मानसिक अपंग मुलांनाही इतरांप्रमाणे आनंदाने जगण्याचा, आरोग्य, शिक्षण व व्यवसायाचा हक्क आहे. या मुलांना समाजात वावरता यावे याकरिता त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होणे गरजेचे असते. त्यासाठी त्यांना विशेष शिक्षण द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली. तिच्या स्थापनेमागील इतिहास विलक्षणच. स्वत:चा मुलगा गौतम गतिमंद असल्याचे समजल्यावर तेव्हा पेशाने शिक्षिका असणाऱ्या रजनीताई लिमये अक्षरश: हादरल्या. त्यातून कसेबसे सावरत त्यांनी वास्तवाचा अर्थात मुलाचा मानसिक अपंगत्वासह स्वीकार केला आणि १ जानेवारी १९७७ रोजी या विशेष शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. शहरातून कसेबसे चार मुले मिळवून भाडेतत्त्वावरील दोन खोल्यांच्या जागेत सुरू झालेल्या संस्थेच्या कार्याचा विस्तार आज वेगवेगळ्या वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी तीन शाळा तसेच १८ वर्षांनंतर शालेय वयोगट संपुष्टात आल्यावर प्रौढ व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रबोधिनी कार्यशाळेपर्यंत असा तब्बल ४०० जणांपर्यंत विस्तारला आहे. वास्तविक, गतिमंद मुले जितक्या लवकर शाळेत येतील, तितके त्यांच्या फायद्याचे असते. त्यांना चांगले वळण लावणे आणि वर्तनसमस्या कमी करणे या दोन्ही गोष्टी सुकर होतात. परंतु, पालकांना ही बाब उमगत नाही. परिणामी, अशी मुले उशिराने म्हणजे वयाने बरीच मोठी झाल्यावर विशेष शाळेकडे वळतात. त्यात दोष पालकांचा असला तरी प्रबोधिनीने मोठय़ा मुलांना त्याची शिक्षा न देता कधी प्रवेश नाकारलेला नाही.
मानसिक अपंग मुलांसाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम बालवाडी सुरू करण्याचे श्रेयही प्रबोधिनीचेच. अजूनही अशी बालवाडी असलेली प्रबोधिनी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था होय. तीन ते सहा वयोगटातील विद्यार्थ्यांना ‘सावली’ अर्थात बालवाडीमध्ये प्रवेश दिला जातो. सहा ते अठरा वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी प्रबोधिनी विद्या मंदिर आणि श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिर कार्यरत आहे. या शाळेत इयत्ता नसल्या तरी मानसिक अपंग मुलांच्या बुद्धय़ांकानुसार गट पाडून त्यांना शिक्षण दिले जाते. लेखन, वाचन, अंकगणित हे शिक्षण तुलनेत कमी विद्यार्थ्यांना घेणे शक्य होते. परंतु, प्रत्येकाला सुलभ शारीरिक हालचाली, स्वावलंबन, सामाजिक जाण, संपर्क कौशल्य विकसित करण्यासाठी नेटाने प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांमधील गुण ओळखून त्यांना स्पर्धा, खेळ, गायन, वादन, नृत्य याचे शिक्षण देऊन त्यांच्या जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धामध्ये मुलांनी मिळविलेली पारितोषिके ही त्याची पावती. मुलांची वर्तनसमस्या कमी करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी व्यक्तिगत लक्ष, वाचनालय, मनोरंजनाची साधने, हस्तव्यवसाय शिक्षण आदी उपक्रमांसोबत मानसोपचारतज्ज्ञांकडून तपासणी व वार्षिक वैद्यकीय तपासणी याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाते.
१८ वर्षे पूर्ण झाल्यावर ही शाळा सोडावी लागते. त्यापुढे प्रौढ गतिमंदांना प्रत्येकाची मानसिक, शारीरिक व बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा पार पाडते. कार्यशाळेतील १०७ जण फाईल व द्रोणनिर्मिती, कापडी पिशव्या व खुच्र्यावरील कापडी आच्छादन शिलाई, स्क्रीन प्रिंटिंग, मसाला व पूजा साहित्य पिशवीबंद करणे, आकाश कंदील व छोटय़ा गुढींची निर्मिती, पापड बनविणे, बाइंडिंग आदी कामांत पारंगत झाले आहेत. या कामातून होणाऱ्या उत्पन्नातून संस्था संबंधितांना दर तीन महिन्याला काही मानधनही देते. काही जणांनी द्रोणनिर्मितीची यंत्रणा खरेदी करून घरातच आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. प्रबोधिनीत येऊन काम करायला शिकलेली ५० हून अधिक मुले बाहेर काम करून अर्थार्जन करू लागले आहेत.
गतिमंदत्वाबरोबर शारीरिक अपंगत्व असलेल्या आणि बहुविकलांग विद्यार्थ्यांना व्यायामाचे पाठ देण्याकरिता फिजिओथेरपी विभाग तसेच मानसशास्त्र मार्गदर्शन केंद्रही कार्यान्वित आहे. सर्वेक्षणानुसार लोकसंख्येतील दोन टक्के लोक मानसिक अपंग असतात. नाशिक जिल्हय़ाचा विचार केल्यास ही संख्या सर्वसाधारपणे दहा हजाराहून अधिक असू शकते. त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची तितकीच आवश्यकता आहे. असे प्रशिक्षण पूर्वी केवळ मुंबई व पुण्यात मिळायचे. यामुळे प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्रामार्फत विशेष मुलांना शिकविण्यासाठी आवश्यक असलेला पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. मानसिक अपंग मुलांच्या पालकांची गरज लक्षात घेऊन त्यावर मुले व मुलींसाठी स्वतंत्र प्रबोधिनी वसतिगृहाची उभारणी करून तोडगा काढण्यात आला. शाळा व वसतिगृहात मुले इतकी आनंदाने राहतात की, दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीतदेखील ती घरी जाण्यास नकार देतात. या ठिकाणी त्यांना आपले खरे मित्र भेटतात. शाळेविषयी निर्माण झालेल्या ऊर्मीमुळे रविवार वा तत्सम सुट्टीच्या दिवशीही ते गणवेश चढवून सज्ज होतात. मानसिक अपंग मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्यासाठी प्रयत्न करतानाच पालकांचे प्रबोधन, मातांना खंबीर बनविणे, अशा विद्यार्थ्यांचे विवाह करू नयेत म्हणून जनजागृती यातही संस्था काम करीत आहे.
स्वतच्या मुलाची समस्या जाणवली तेव्हा इतर मुलांच्या समस्येचीही जाणीव झाली व ही संस्था सुरू केली. मात्र, सुरुवातीला लोकांनी ‘वेडय़ांची शाळा’ म्हणून हिणवले. दगडावर डोके आपटताहेत, असे म्हणणारे लोक आता या कार्याविषयी आस्था बाळगायला लागले आहेत.

त्यानुसार सध्या शाळेत एकूण १०८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील ४२ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन शासन देत असले तरी उर्वरित ६६ जणांचे वेतन संस्थेला द्यावे लागते. मानसिक अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा निम्म्याहून अधिक शिक्षक व सेवकवृंद अतिशय तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहे. महागाईच्या काळात त्यांना समाधान वाटेल, असे वेतन इच्छा असूनही संस्था देऊ शकत नाही. तशीच अवस्था विद्यार्थ्यांच्या शालेय बस वाहतुकीची. हे विद्यार्थी स्वत: शाळेत येऊ शकत नाहीत. बससेवा हा तर त्यांच्या शाळेचा खऱ्या अर्थाने पाया. यामुळे देणगीदारांच्या मदतीतून संस्थेने चार बसेसची उपलब्धता केली. परंतु, ही बस वाहतूक चालविताना अनंत आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासन शालेय बस वाहतुकीसाठी मदत मदतनीस यांचे वेतन संस्थेला द्यावे लागते. शिवाय, डिझेलवरही महिन्याकाठी प्रचंड खर्च होतो. हा भार पेलणे प्रबोधिनी ट्रस्टच्या आवाक्याबाहेर जात आहे. मंजूर नसलेली शिक्षक व सेवकपदे तसेच बसचालक, मदतनीस, डिझेल यासाठी प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये खर्च येतो. शासन मंजूर शिक्षक पदांच्या वेतनाच्या रकमेवर आठ टक्के वेतनेतर अनुदान देते. परंतु, त्यात दैनंदिन व्यवस्थापन खर्च भागविताना दमछाक होत आहे. ही बससेवा अव्याहतपणे सुरू ठेवणे हे देखील संस्थेसमोर आव्हान आहे. काही अनाथ गतिमंद बालकांना संस्थेने दत्तक घेतले आहे. अनेक गरीब विद्यार्थीही शाळेत आहेत. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी संस्थेवर आहे.  गरीब मुलांचे एक अथवा त्याहून अधिक वर्षांसाठी पालकत्व स्वीकारता येईल. पूरक आहार योजना, विद्यार्थी वाहतूक व्यवस्था तसेच संपूर्ण उपक्रमातील लहानसहान खर्चासाठी मदतीची आवश्यकता आहेदेत नाही. साधे चालकाचे पदही मंजूर करीत नाही. परिणामी, बसचालक,.