‘पुणे नगर वाचन मंदिर’ संस्थेने दुर्मीळ ग्रंथांच्या जतनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, डिजिटायझेशनच्या माध्यमातून संस्थेने आतापर्यंत पन्नास हजार पृष्ठांचे ज्ञानभांडार संगणक प्रणालीच्या साहाय्याने जतन करून ठेवले आहे. दुर्मीळ ग्रंथाच्या जतनाचा हा प्रकल्प केवळ पुणे नगर वाचन मंदिरापुरताच मर्यादित राहू नये, असाही संस्थेचा मानस आहे. वाई, सोलापूर, कोल्हापूर यासह ज्या गावांमध्ये जुनी ग्रंथालये आहेत, तेथील ग्रंथसंपदाही जतन करून ठेवावी लागणार आहे. आर्थिक बाबींचा विचार करता हे काम छोटय़ा ग्रंथालयांना शक्य होणार नाही, अशी त्यांची स्थिती आहे. ही परिस्थिती ध्यानात घेऊन अशा ग्रंथालयांमधील ग्रंथसंपदेचेही डिजिटायझेशन पुणे नगर वाचन मंदिराकडून करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. गेली १६६ वर्षे अव्याहतपणे वाचन संस्कृतीच्या प्रसाराचे कार्य करत असलेले पुणे नगर वाचन मंदिर आता हायटेक होणार आहे. संस्थेच्या आजवरच्या कामाची आणि ग्रंथालयाची माहिती देणारी वेबसाइट तयार करण्यात आली असून, ग्रंथालयातील सुमारे साठ हजार पुस्तकांच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या पुणे नगर वाचन मंदिराने कालानुरूप कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सदस्यांना पुस्तकांसाठी शहरात येणे जिकिरीचे होत असल्याने वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी शाखा विस्तारीकरणाचे काम हाती घेतले. त्यात वारजे आणि बिबवेवाडी येथे शाखा सुरू करण्यात आला. नगर वाचन मंदिर हे पुण्यातील सर्वांत जुन्या ग्रंथालयांपैकी एक असल्याने अनेक जुनी आणि दुर्मिळ पुस्तके, ग्रंथ या ठिकाणी संग्रहित आहेत. सध्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही पुस्तके डिजिटल स्वरूपात आणण्यात येत आहेत. पुढील महिन्यात हा डिजिटायझेशनचा प्रकल्प प्रत्यक्षात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे दोन ते तीन लाख पानांचे डिजिटायझेशन करण्यात येईल.

संस्थेने हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती कार्यवाह अरविंद रानडे यांनी दिली. ‘संस्थेच्या ग्रंथालयातील महत्त्वाचा ठेवा टिकवून ठेवण्यासाठी डिजिटायझेशनचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने संस्थेची माहिती सर्वांपर्यंत सहजगत्या पोहोचण्यासाठी वेबसाइट सुरू करण्यात येत आहे. त्यावर संस्थेचा इतिहास, ग्रंथालयातील पुस्तके अशी माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. संस्थेने बदलाच्या दिशेने टाकलेली ही महत्त्वपूर्ण पावले आहेत असे म्हणता येईल.’

दुर्मिळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनसाठी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रंथालयातील पुस्तकांचे डिजिटायझेशन करतानाच इतर कोणाकडे दुर्मिळ पुस्तके असल्यास त्यांचेही डिजिटायझेशन करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. त्यासाठी दुर्मिळ पुस्तके संग्रही असलेल्यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.  त्यासाठीचा खर्च पुणे नगर वाचन मंदिर करणार असून या प्रकल्पाबाबत विविध ग्रंथालयांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू असून त्या ग्रंथालयांनी या योजनेला मन:पूर्वक प्रतिसाद दिला आहे.  मात्र, हे ग्रंथ जतन होणार आहेत समाजाच्या साथीने, समाजाच्या सहकार्याने

  • पत्रव्यवहारासाठी पत्ता

    PUNENAGARVACHANMANDIR
    181,BUDHWARPETH,
    LAXMIROAD,
    PUNE 411002

  • दूरध्वनी

    020-24450526