पूर्णगड

रत्नागिरी हा कोकणातील जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र पसरलेला असून पूर्वेला सह्याद्रीची मुख्य रांग दक्षिणोत्तर गेलेली आहे. सह्याद्रीतून वाहत येणाऱ्या अरबी समुद्राला या डोंगर रांगा जेथे मिळतात, तेथे खाडय़ा निर्माण झाल्या. या खाडय़ामुळे कोकणचा किनारा दंतूर झालेला आहे. या दंतूर किणाऱ्यामुळे कोकणचे निसर्गसौंदर्य कैक पटीने वाढले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामधील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगड नावाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे.
 
मुंबई-पणजी महामार्गावर हातखंबा फाटा आहे. येथून पश्चिमेकडे रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण सागर किनाऱ्यावर वसलेले आहे. रत्नागिरी मधील प्रेक्षणीय स्थळे तसेच थिबा राजवाडा पाहून आपण पावस या धार्मिक क्षेत्राकडे निघतो. वाटेतील भाटय़े खाडीवरील पूल ओलांडल्यावर भाटय़े गाव लागते. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सेनापती मायनाक भंडारी यांचे स्मारक आहे. ते त्यांच्या वंशजांच्या घराच्या अंगणात आहे. या धुरंधर सेनानायकाला नमन करून आपण पावसला येतो.
 
पावसच्या एस. टी. थांब्याजवळच स्वामी स्वरुपानंदाचे स्मृतीमंदिर आहे. अनेक भाषिकांचा ओघ येथे असतो. हे स्थळ पाहून येथील निसर्ग सौंदर्य न्याहाळत आपण पूर्णगडाकडे निघतो. येथून साधारण १० कि. मी. अंतरावर पूर्णगड किल्ला आहे.
 
गावरवडीच्या पुलाच्या अलिकडेच पूर्णगड गाव आहे. येथे पायउतार होवून गावातील घरांच्या रांगांमधून चढणाऱ्या पायऱ्यांचा वाटेने २० मिनिटांमध्ये आपण किल्ल्याजवळ पोहोचतो.
 
किल्ल्याच्या दाराजवळ मारुती मंदिर आहे. या जुन्या मंदिराची सध्या गावकर्यांनी रंगरंगोटी केलेली आहे. मंदिराजवळच पूर्णगडाचा दरवाजा आहे. शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्टय़ांप्रमाणे हा दरवाजा लपवलेला आहे. दरवाजावर गणेश तसेच चंद्र- सूर्याची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. येथेच दगडात कमळे कोरलेली पहायला मिळतात.
 
येथे तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन गडाची पूर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाची काही तटबंदी ढासळलेली आहे. पण इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम अशी आहे. किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे.
 
गडामध्ये गडकऱ्यांच्या वास्तूचे अवशेष तसेच इतरही अवशेष पहायला मिळतात. लहानसा आयताकृती आकार असलेला पूर्णगड पहायला अर्धा तास पुरतो. गडामध्ये पाण्याची सोय नाही. पूर्वी गडाबाहेरील विहीरीतून गडामध्ये पाणीपुरवठा केला जात असे.
 
लहान आकाराचा किल्ला म्हणून पूर्णविरामाच्या लहानश्या टिंबासारखा किल्ला म्हणून पूर्णगड नाव पडले. तर काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड.
 
पूर्णगड पाहून आपण पुन्हा रत्नागिरीकडे अथवा पुढे राजापूर कडेही जावू शकतो.