ऋतुचर्या

निसर्गातील बदलांनुसार आपल्या दिनचर्येत बदल करावेत. ऋतुनिहाय वातावरणातील बदल आरोग्यास प्रभावित करतात. त्यांना साजेशा जीवनशैलीचा अंगिकार केल्यास दोष न वाढता आरोग्य अबाधित राहिल.

जानेवारी – फेब्रुवारी (शिशिर ऋतु)

शीतकाळ व रुक्ष – शीत हवा अशा वातावरणामुळे शरीरातील उष्मा आतच कोंडला जातो.  त्यामुळे भूक चांगली लागते. स्निग्ध आहाराचे सेवन करावे. शेंगदाणे, गुळ, तीळ, खोबरे इ. पदार्थांचा प्रचूर मात्रेत वापर करावा. सकाळी आंघोळीआधी तीळ तेलाने अभ्यंग करावे. गरम पाण्याने आंघोळ करावी. उडिद, दूधाचे पदार्थ, मांसाहारी असल्यास मांसाहार, नवीन तांदूळ यांचा आहारात समावेश करावा. यथाशक्ती व्यायाम अवश्य करावा.

मार्च – एप्रिल (वसंत ऋतु)

वातावरणातील उष्णता हळू हळू वाढीस लागते. शीतकाळात शरीरात जमा झालेला कफ पातळ होऊन कफाचे विकार जसे सर्दी – पडसे निर्माण होतात. भूक मंदावते. त्यामुळे कफ शमन करणारा आहार – विहार हितकर आहे. सुंठ, मिरे, हिंग इ. मसाल्याच्या पदार्थांचा वापर करावा. पराठे – भाकर्‍या यांचे सेवन करावे. शीत पदार्थ, स्निग्ध पदार्थ, अति गोड, अति आंबट पदार्थांचे सेवन टाळावे. मध, जव, गहू, आले, लसूण ह्यांचा समावेश आहारात अवश्य करावा. प्राणायाम, श्वासाचे यथाशक्ती व्यायाम करावेत.

मे – जून (ग्रीष्म ऋतु)

उष्ण वातावरणामुळे शरीरबल कमी झालेले असते. तांदूळ, दूध, तूप, द्राक्षे, नारळाचे पाणी, साखर यांचा आहारात समावेश करावा. माठामध्ये वाळा ठेवावा किंवा जिर्‍याने सिद्ध जल वापरावे. तिखट, मधुर व आंबट पदार्थ टाळावेत. उन्हात हिंडणे, अति व्यायाम टाळावा.

जुलै – ऑगस्ट (वर्षा ऋतु)

वाढलेल्या आर्द्रतेमुळे वात दोषाचा प्रकोप असतो. भूक मंदावते. शरीरबल कमी असते. मूगासारखे धान्य, सुठीबरोबर शिजवुन त्याचे सूप, जुने तांदुळ, गहु, जव यांचा आहेरात समावेश करावा. डोक्याला तेल लावावे. पाणी उकळुन शुद्ध करुन वापरावे. संसर्गजन्य व्याधींचा प्रादुर्भाव असतो, त्यामुळे उघड्यावरचे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. अति भोजन, अति द्रव पदार्थांचे सेवन टाळावे.

सप्टेंबर – ऑक्टोबर (शरद ऋतु)

पावसाचा जोर कमी होत जातो व ऑक्टोबर हीटमुळे उष्णता वाढते. त्यामुळे पित्ताचा प्रकोप होतो. तूप, मधुर, कडू व तुरट चवीचे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करावेत. साठीचे तांदूळ, मूग, साखर, मध, आवले, गोड द्राक्षे, पडवळ इ. पदार्थांचा आहारात समावेश करावा. दही, क्षारयुक्त पदार्थ, चायनीज, अती उन्हाशी संपर्क टाळावा.

नोव्हेंबर – डिसेंबर (हेमंत ऋतु)

ऑक्टोबर हिट ओसरुन थंडीचा जोर वाढू लागतो. भू

कही वाढू लागते. आहार – विहार ह्या कालाव्धीत देखील जानेवारी – फेब्रुवारीप्रमाणेच हितकर ठरते.

व्याधीग्रस्त झाल्यावर योग्यवेळी वैद्याकडे जाणे, योग्य ती औषध योजना सुरु करणे आणि वैद्याने दिलेले पथ्याचे काटेकोरपणे पालन करणे ह्या त्रिसुत्रीचे पालन केल्यास व्याधीमुक्तीचे उद्दीष्ट विनासायास साध्य होते. आयुर्वेदामध्ये पथ्याचे महत्त्व विषद करताना सांगितले आहे,

पथ्ये सति गदर्तस्य किमौषधनिषेवणै:, पथ्ये असति गदार्तस्य किमौषधनिषेवणै:|

अर्थात, जर एखदी व्यक्ति पथ्य पाळत आहे तर तिला औषधाची गरजच काय? कारण केवळ पथ्य पाळले तरी त्या व्यक्तिचा आजार बरा होणारच असतो आणि जर ती व्यक्ती पथ्य पाळत नसेल तरी तिला औषधाची गरजच काय? कारण अपथ्य केल्यास औषधाचा परिणाम होत नाही.

आयुर्वेदात सर्व रोगांसाठी एक महत्त्वाचा उपचार सांगितला आहे, ‘निदान-परिवर्जन’!  म्हणजेच, ज्यामुळे रोग झाला ते कारण टाळणे. बस्स, एवढे केले तरी व्याधि आटोक्यात येतो आणि त्याला योग्य त्या औषधांची जोड मिळाली व्याधिमुक्ती नि:संशय!