सांवता माळी

(१२५०–१२९५). एक मराठी संतकवी. ते संत ज्ञानदेव-नामदेव यांचे समकालीन असून पंढरपूरजवळील अरणभेंडी (अरण) ह्या गावचे रहिवासी होत. वडिलांचे नाव परसूबा व आईचे नाव नांगिताबाई. त्यांच्या जीवनाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. भेंड गावातील रूपामाळी भानवसे ह्यांची मुलगी जनाबाई हिच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन अपत्ये होती. मुलगा विठ्ठल व कन्या नागाबाई. गृहस्थाश्रमी असूनही ते विरक्त वृत्तीचे होते.

संतश्रेष्ठ ⇨ ज्ञानेश्वर व ⇨ नामदेव ह्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील निरनिराळ्या जातीतल्या संतांनी अभंगांद्वारे विठ्ठलाचा व भक्तीचा महिमा गायिला. सांवता महाराज हे निस्सीम विठ्ठलभक्त होते. ⇨ वारकरी संप्रदाया तील तत्कालीन संतसज्जनांमध्ये त्यांचा मोठा लौकिक होता. विठ्ठलभक्तीने भारलेल्या त्यांच्या अभंगरचनांनी काव्यामध्ये भक्तिभावनेचा मळा फुलविला. त्यांचे फार थोडे अभंग उपलब्ध आहेत.

श्रीसकलसंतगाथे च्या पहिल्या खंडामध्ये (आवृ. २) त्यांचे काही अभंग प्रसिद्घ झाले आहेत. काशीबा गुरव नावाचे एक गृहस्थ त्यांचे अभंग लिहून ठेवीत. आपल्या मळ्यातील भाजीपाल्यामध्येही त्यांनी विठ्ठलाचे रूप पाहिले. उदा., कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥

सांवता माळी यांनी विठ्ठलाच्या दृष्टिगोचररूपाचे भावस्पर्शी वर्णन पुढील एका अभंगामध्ये केले आहे

‘विठ्ठलाचें रूप अतर्क्य विशाळ। हृदयकमळ मंत्रसिद्घ॥

दिगंबर मूर्ती गोजरी सांवळीं । तोडे पायीं वाळी मनगटीं ॥

कटीवरी हात, हातीं पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलींत ॥

सांवता माळी म्हणे शब्दब्रम्ह साचें । नाम विठ्ठलाचें कलियुगीं ॥’

परब्रह्मभेटीचे वर्णनही सावता माळी यांनी एका अभंगामध्ये केले असून त्यांच्या अभंगांमधून विठ्ठलभक्तीचा उत्कट आविष्कार व व्यावसायिक निष्ठा प्रत्ययास येते. आपल्या नित्य व्यवसायातील अनुभवांचे अनेक संदर्भ देऊन त्यांनी अभंगरचना केल्या. उदा., ‘शांति शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥’ श्रीज्ञानदेव व नामदेव ह्या थोर संतांचा सहवास त्यांना वारंवार लाभला असावा. संत नामदेवांनी त्यांच्या अद्वैताचा उल्लेख पुढील शब्दांत वर्णिला आहे: ‘धन्य ते अरण, रत्नाचीच खाण । जन्मला निधान सावता तो । सांवता सागर, प्रेमाचा आगर । घेतला अवतार माळ्या घरी ॥’ अरणभेंडी ह्या गावी त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. त्यांच्या समाधीकालाविषयीचा पुढील अभंग प्रसिद्घ आहे :

‘बारा शतें सतरा शालिवाहन शक । मन्मथ नामक संवत्सर ॥

ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी । आला उदयासी सहस्त्रकर ॥

सांवता पांडुरंगस्वरुपीं मिनला । देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥’

सांवता माळी यांची कविता संख्येच्या दृष्टीने अल्प असली, तरी तिची रचना प्रासादिक आहे. त्यावरून त्यांच्या ठिकाणी पारमार्थिक व काव्यात्मक या दोन भिन्न वृत्ती कशा एकवटल्या होत्या, याची कल्पना येते. त्यांनी आपल्या अभंगांतून अध्यात्मप्रधान कर्मयोग सहजपणे प्रतिपादिला आहे. तत्कालीन भगवद्‌भक्तांत त्यांना मोठा मान होता, याचे चपखल शब्दांत एकनाथांनी वर्णन केले आहे. ते म्हणतात, ‘एका जनार्दनी सांवता तो धन्य । तयाचे महिमान न कळे काहीं ॥’.

संत जनाबाई

नाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील “माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||” या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. बालपण गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयतां नियमितपणे पंढरीची वारी करीत असत. तिच्या वडिलंनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत.

संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. जनाबाई ह्या पंढरपूरचे वारकरी ‘दमा’ आणि भगवद्भक्त स्त्री ‘करुंड’ या दांपत्याची मुलगी होत. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयता नियमित पंढरीची वारी करीत असत. तिच्या वडिलांनी जनाबाईंना दामाशेट शिंपी यांच्या पदरात टाकले, तेव्हापासून त्या संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत.

संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.

‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गौर्‍या-शेण्या वेचतांना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.

संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथेत मुद्रित केले आहेत. ह्या शिवाय कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा, हरिश्र्चंद्राख्यान अशा आख्यानरचना पण त्यांच्या नावावर आहेत. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या भावमधुर आख्यानांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ती मिळाली.

संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे त्यांच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपानकाका, संत गोरोबा, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदी सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत.

संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या.  (इ. स. १३५०)

संत गोरोबा कुंभार

(१२६७ — १३१७). एक मराठी संत. पंढरपूरजवळील तेरढोकी येथे ते राहत असे. जातीने ते कुंभार होते आणि त्यांना संती व रामी नावाच्या दोन बायका होत्या. आपले काम करीत असता ते विठ्ठलाचे नामस्मरण करी.

एकदा माती तुडविताना ते नित्याप्रमाणे नामस्मरणात तल्लीन झाले आणि त्यांनी रांगत आलेले स्वतःचे लहान मूल पायाखाली तुडविले, अशी आख्यायिका आहे. त्यांच्याबाबत इतरही आख्यायिका रूढ आहेत.

ज्ञानेश्वरादी संतमंडळीत ते सर्वांत वडील होते आणि सर्वजण त्यांना गोरोबाकाका म्हणत. नामदेव परमार्थात कच्चा आहे की पक्का, हे ठरविताना संत गोरोबांचे मत प्रमाणभूत मानले गेले. त्यांनी आपल्या स्वानुभवाच्या थोपटण्याने मडके वाजवून तो निर्णय दिला, असे म्हटले जाते. त्यांचे फक्त वीसच अभंग उपलब्ध आहेत. त्यांत त्यांनी नामदेवाचा मोठ्या प्रेमाने वारंवार उल्लेख केला आहे.

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या उद्धवचिद्‌घनाने त्यांचे मराठीत ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे. तेरढोकी येथे त्यांची समाधी असून तेथील त्यांचे घर, त्याचप्रमाणे मूल तुडविलेली जागा आजही लोक दाखवितात.

मीराबाई

(सु. १४९८–सु. १५४७). मध्ययुगीन भारतातील एक श्रेष्ठ कृष्णभक्त संत कवयित्री. ‘मीरा’किंवा ‘मीराँ’ हा शब्द फार्सी भाषेतून राजस्थानीत आला असावा. त्याचा अर्थ ‘श्रेष्ठ’, ‘श्रीमंत’ असा आहे. ‘अमीर’ या शब्दाचे ते संक्षिप्तरूप आहे. संस्कृतमध्येही ‘मीर’ शब्द आहे; पण त्याचा अर्थ ‘समुद्र’ असा आहे. मीरेची अधिकृत चरित्रपर माहिती फारशी उपलब्धही नाही आणि जी आहे, ती विवाद्य आहे.तिच्या वडीलांचे नाव रतनसिंह. ते मेडतिया (राजस्थान) येथील राठोड होते. मीरेचा जन्म तिच्या वडिलांच्या जहागिरीतील चोकडी (कुकडी) गावी झाला. बालपणी एका लग्नाची वरात पाहून ‘माझा विवाह कोणाशी होणार ?’ असे मीरेने आईस विचारले असता, आईने कृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवून ‘हा तुझा पती’ असे सांगितले. तेव्हापासून कृष्णाची प्रेमभक्ती तिच्या मनात उत्पन्न झाली, अशी आख्यायिका आहे. बालपणीच मातृवियोग झाल्याने आजोबा राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. दूदाजी मोठे वैष्णवभक्त होते. त्यांच्या भक्तीचा आणि धार्मिक वृत्तीचा खोल संस्कार मीरेवर झाला. नृत्य, संगीत, साहित्यादी कला तिला चांगल्या अवगत असाव्यात. अनेक अभ्यासकांच्या मते संत ⇨रैदास हे तिचे गुरू होत. उदयपूरचे महाराणा संग यांचे पुत्र भोजराज यांच्याशी तिचा विवाह झाला; पण अल्पकाळात तिला वैधव्य प्राप्त झाले. त्यानंतर वडील, सासरे, दीर रतनसिंह इत्यादींच्या एकामागून एक झालेल्या निधनांमुळे तिची वैराग्यवृत्ती वाढत गेली व मन भक्तीतच अधिक रंगू लागले. राजघराण्यातील स्त्रीने सर्वांसमक्ष मदिंरात नाचावे, गावे हे न आवडल्याने राणा विक्रमादित्याने (भोजराजाचा सावत्र भाऊ) मीरेचा अनेक प्रकारे छळ केल्याचा निर्देश तिच्या पदांतून आढळतो. मीरेचा जन्म, विवाह, वैधव्य व मृत्यू यांच्या सनांबाबत अभ्यासकांमध्ये खूपच मतभेद आहेत; तथापि जन्म १४९८, विवाह १५१६, वैधव्य १५२६ व मृत्यू द्वारका येथे १५४६ ह्या सनास सर्वसाधारणपणे अभ्यासकांची मान्यता आहे. १५३३ च्या सुमारास मीरा मेवाडवरून मेडत्यास आली असावी. १५३८ मध्ये जोधपूरच्या मालदेवाने वीरमदेवाकडून (मीरेचे काका) मेडता जिंकून घेतल्यानंतर ती सर्वस्वाचा त्याग करून वृंदावनास गेली असावी आणि १५४३ च्या सुमारास ती द्वारकेस गेली असावी. तेथेच ती शेवटपर्यंत होती.

रैदास, वल्लभसंप्रदायी विठ्ठलनाथ, तुलसीदास, जीवगोस्वामी इ. नावे मीरेचे दीक्षागुरू म्हणून घेतली जातात. तिच्या पदांत गुरू म्हणून रैदासाचे निर्देश अधिक आहेत; निर्णायकपणे तिचा एकच विशिष्ट गुरू ठरविणे अशक्य आहे. विविध भक्तीसंप्रदायांचा व साधनापद्धतींचा तिच्या संवेदनशील मनावर प्रभाव पडला असणे व त्यांतून तिने त्या त्या व्यक्तींचा आदराने निर्देश केला असणे शक्य आहे.

तिच्या रचनांबाबतही निश्चित माहिती उपलब्ध नाही. नरसीजी रो माहेरो, गीत गोविंदकी टीका, राग गोविंद, सोरठके पद, मीराँबाईका मलार, गर्वागीत, राग विहाग आणि फुटकर पद ह्या तिच्या रचना म्हणून सांगितल्या जातात; तथापि पदावलीचा अपवाद सोडल्यास वरील सर्वच रचनांचे तिचे कर्तृत्व शंकास्पद मानले जाते. पदावलीही तिची एकमेव, महत्त्वपूर्ण व प्रमाणभूत कृती म्हणतायेईल; तथापि पदावलीतील पदांची नेमकी संख्या अनिश्चित आहे. विविध संस्करणांतील तिच्या पदांची संख्या किमान २० व जास्तीत जास्त १३१२ अशी आढळते. तिच्या पदावलीची आजवर अनेक संस्करणे निघाली. त्यांतील मीराँबाईके भजन (लखनौ १८९८), मीराँबाईकी शब्दावली (अलाहाबाद १९१०), मीराँबाईकी पदावली (प्रयाग १९३२), मीरा की प्रेमसाधना (पाटणा १९४७), मीराँ स्मृतिग्रंथ (कलकत्ता १९५०), मीराँ बृहत्‌ पदसंग्रह (काशी १९५२), मीरा माधुरी (काशी १९५६), मीराँ सुधासिंधु (भीलवाडा १९५७) इ. संस्करणे उल्लेखनीय होत.

मीरेच्या भाषेचे मूळ रूप राजस्थानी असले, तरी तीत ब्रज व गुजरातीचेही बरेच मिश्रण आढळते. ही भाषा जुनी गुजराती व जुनी पश्चिमी राजस्थानी वा मारू गुर्जर म्हणता येईल. तिच्या रचनेत यांव्यतिरिक्त पंजाबी, खडी बोली, पूरबी इ. ज्या भाषांचे मिश्रण आढळते, त्याचे कारण तिच्या पदांचा झालेला प्रसार व त्यांची दीर्घकालीन मौखिक परंपरा हे होय. मीरेची पदे अत्यंत भावोत्कट व गेय असून ती विविध रागांत बद्ध आहेत. परशुराम चतुर्वेदी यांनी त्यांतील दोहा, सार, सरानी,उपमान, सवैया, चांद्रायण, कुंडल, तांटक, शोभन इ. छंद शोधून काढले आहेत. त्यांत विविध अलंकारांचाही वापर केला आहे; तथापि ह्या गोष्टींपेक्षा त्यांतील स्त्रीसुलभ आर्तता, आत्मार्पण भावना, भावोत्कटता व सखोल अनुभूतीच काव्यदृष्ट्या अधिक श्रेष्ठ ठरते. ‘मीरा के प्रभु गिरिधर नागर’ ही तिच्या अनेक पदांत येणारी नाममुद्राहोय.

ह्या पदांतील प्रमुख विषय भक्ती असला, तरी त्यांत वैयक्तिक अनुभव, कुलमर्यादा, गुरूगौरव, आप्तांशी झालेले मतभेद व त्यांनी केलेला छळ तसेच आराध्यदेवतास्तुती, प्रार्थना, प्रणयानुभूती, विरह, लीलामाहात्म्य, आत्मसमर्पण इ. विषयही आले आहेत. भक्त, संगीतप्रेमी व काव्यरसिक ह्या सर्वांनाच ही पदे कमालीची मोहिनी घालतात. कृष्णविरहाची पदे त्यांत संख्येने अधिक असून ती उत्कट व हृदयस्पर्शी आहेत.

नाभादास, प्रियादास, ध्रुवदास, मलूकदास, हरिराम व्यास इ. संतचरित्रकारांनी व संतांनी मीरेबद्दल अत्यंत आदराने गौरवोद्‌गार काढले आहेत. मध्ययुगीन राजस्थानी, गुजराती व हिंदी साहित्यात संत कवियित्री म्हणून मीरेचे स्थान अनन्यसाधारण आहे. भाषिक प्रदेशांच्या मर्यादा उल्लंघून भारताच्या कानाकोपऱ्यांत मीरेची भक्तिभावाने ओथंबलेली उत्कट पदे पोहोचलेली आहेत. अनुप जलोटा, लता मंगेशकर, एम्‌. एस्‌ सुब्बुलक्ष्मी ह्या प्रख्यात गायकांनी मीरेची पदे गायली असून त्यांच्या ध्वनिमुद्रिका अत्यंत लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकरांनी मीरेच्या निवडक साठ पदांचे मराठीत रूपांतर केले आहे. (मीरा १९६५

समर्थ रामदास

(१६०८– २ फेब्रुवारी १६८२). ज्ञानी, भक्तिमान आणि कर्मयोगी संतकवी. मूळचे नाव नारायण; उपनाव ठोसर. ‘रामदास’ हे त्यांनी पुढे स्वतःसाठी घेतलेले नाव. एक थोर सिद्धपुरुष म्हणून लोक त्यांना आदरपूर्वक ‘समर्थ’ किंवा ‘समर्थ रामदास’ असे आजही म्हणतात.

रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानशा गावचा. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत, आईचे राणूबाई. राम आणि सूर्य ह्यांची उपासना त्यांच्या घरात होती.सूर्याजीपंत अनेक मुमुक्षूंना ‘अनुग्रह’ देत. रामदासांचे वडील बंधू गंगाधर ‘श्रेष्ठ’ आणि ‘रामी रामदास’ ह्या नावांनीही ओळखले जातात. रामदास आठ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले आणि गंगाधर हे वडिलांचा संप्रदाय चालवू लागले.

वडिलांकडून आणि पुढे वडील बंधूंकडून आपल्याला मंत्रोपदेश मिळावा, म्हणून रामदासांनी प्रयत्न केला होता; परंतु दोन्ही वेळी तो निष्फळ ठरला. रामदासांच्या एका अभंगावरून असे दिसते, की प्रत्यक्ष रामचंद्रांनीच स्वप्नात येऊन ‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र त्यांना दिला.

आई आणि वडील बंधू ह्यांनी रामदासांचे लग्न, त्यांची इच्छा नसतानाही ठरविले; पण मंगलाष्टकांमधले ‘सावधान’ हे शब्द ऐकताच भर लग्नमंडपातून ते पळून गेले, असे म्हटले जाते. त्यानंतर तपश्चर्येसाठी ते नासिकला गेले आणि नासिकजवळील टाकळी ह्या गावी असलेली एक गुहा त्यांनी त्यासाठी निवडली. राममंत्राचा तेरा कोटी जप,वेदशास्त्रे, वेदान्त, काव्ये, पुराणे ह्यांचा अभ्यास; गायत्री-पुरश्चरणे; संगीतसाधना त्यांनी येथेच केली. त्यानंतर ते भारतभ्रमणास निघाले (१६३२). काशी, प्रयाग, गया,अयोध्या, श्रीनगर; हिमालयातील बद्रिनारायण आणि केदारनाथ अशी अनेक ठिकाणे त्यांनी पाहिली. अयोध्येत त्यांचे वास्तव्य सर्वाधिक म्हणजे अकरा महिने होते. पंजाबात जाऊन तेथील शीख धर्मगुरूंना ते भेटले. मानसरोवराची प्रदक्षिणा केली. पुरीच्या जगन्नाथाचे दर्शन घेतले.

दक्षिणेतीलही अनेक तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. महाराष्ट्रातही ते हिंडले. ह्या प्रवासात समर्थांनी अनेक साधुमहात्म्यांच्या भेटी घेतल्या. राम, हनुमान ह्यांची मंदिरे उभी केली. मठ स्थापन केले. समर्थांच्या आयुष्यातील ह्या यात्रापर्वात त्यांना भारताच्या लोकस्थितीचे दर्शन घडले. ते झाल्यानंतर समाजातील देवधर्माचे अराजक मोडावे, खऱ्या परमार्थाची स्थापना करावी आणि ऐहिक पुरूषार्थ साधणारी समाजव्यवस्था घडवावी, ही त्यांची साध्ये ठरली. ती सिद्ध करण्यासाठी ते कृष्णातीरी आले (१६४४). हे त्यांच्या आयुष्यातले अखेरचे पर्व.

ह्या पर्वात ते राजकारण म्हणजेच धर्मसंस्थापनेचे कार्य अखेरपर्यंत करीत राहिले. समर्थांना अभिप्रेत असलेला राजा हा परमार्थसंस्थापक आणि सज्जनांचा रक्षक असा होता. अशा राजाचे राज्य हे त्यांच्या दृष्टीने रामराज्य होते. अशा रामराज्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी निर्माण करणे, म्हणजेच समर्थ करू पाहत असलेली धर्म-संस्थापना होती. समर्थांनी वापरलेल्या ‘राजकारण’ ह्या शब्दाचा अर्थ ह्या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे.

राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होत. शिवाजी महाराजांच्या राजकीय उलाढालींत रामदासांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, हे जरी खरे मानले, तरी शिवाजी महाराजांनी हाती घेतलेल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याला अनुकूल अशी मनोवृत्ती रामदासांनी लोकांत निर्माण केली, हे दिसून येते.

इस्लामी राजवटीत, भयापोटी लोकांनी डोहांत वा नद्यांत बुडविलेल्या अनेक देवतामूर्ती बाहेर काढून रामदासांनी त्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली. धर्मप्रचारासाठी देवळे बांधली. देवांचे सार्वजनिक उत्सव सुरू केले. सामाजिक जीवनाची नैतिक परिशुद्धी करणे हे रामदासांच्या राजकारणाचे मर्म होय.

परमार्थाचा अधिकार पुरूषांप्रमाणेच स्त्रियांनाही आहे, असे रामदास मानीत. अक्काबाई आणि वेणूबाई ह्या त्यांच्या अनुयायी स्त्रिया प्रसिद्ध आहेत; त्यांच्याखेरीज अन्य अनेक स्त्रियांनी रामदासांचे अनुयायीत्व स्वीकारले होते. त्यांत काही मुसलमान फकीरही होते. उच्च पातळीवरील धर्मविचारंत हिंदू, मुसलमान असा भेद त्यांनी केला नाही.

समर्थांच्या पट्टशिष्याचे नाव कल्याण (मूळ नाव अंबाजी). तो त्यांचा मुख्य लेखनिक होता. दिनकर स्वामी, गिरिधर इ. त्यांचे अन्य शिष्यही प्रसिद्ध आहेत. समर्थांनी चाफळ येथे श्रीरामाची स्थापना केली. ह्या देवस्थानास हिंदू सरदारांची, तसेच विजापूरच्या इस्लामी राज्याचीही इनामे मिळाली. शिवाजी महाराजांनीही वर्षाला दोनशे होन इनाम दिले.अनेक गावेही इनाम म्हणून दिली.

शिवाजी महाराजांनी समर्थांचा उपदेश घेतला होता. तथापि महाराजांच्या स्वराज्यसंस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध होता, असे दाखविणारा आधार मिळत नाही.शिवराय-समर्थ भेट ही प्रथम स्वराज्यस्थापनेच्या अवघी दोनच वर्षे आधी (१६७२) झाली, असे काहींचे म्हणणे आहे. पण ज्या पत्रावरून ही पहिली भेट असे म्हणतात, ती पहिली भेट म्हणजे (राजे यांची पहिलीच भेट आहे. वाडीचे लोकास खटपटेस आणावे……… इ. मजकूर ह्या पत्रात आहे) त्या गावाची पहिली भेट असाही अर्थ निघू शकतो.

शिवाजी महाराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेतले, तर हे दोन्ही थोर पुरूष स्वाराज्यस्थापनेपूर्वी अनेक वर्षे परस्परांना ओळखत होते, हे निश्चित आहे.शिवाय विचारवंत गुरू आणि पराक्रमी राज्यकर्ता ह्यांचा संबंध दृढ होतो. तो वैचारिक देवघेवीने. शिवाजी महाराजांनी अनेक साधुसंतांचे उपदेश घेतले, असे म्हटले जात असले, तरी रामदास आणि शिवाजी महाराज ह्यांचे गुरूशिष्यनाते वेगळे म्हणायला हवे.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर (१६८०) दोन वर्षांनी समर्थांचे सज्जनगडावर निधन झाले.

समर्थांच्या ग्रंथकर्तृत्वात दासबोध आणि रामायण (दोन कांडे) ह्यांचा प्रथम उल्लेख केला पाहिजे. दासबोध हा सर्मथांचा आणि रामदासी संप्रदायाचाही प्रमुख ग्रंथ. ७,७५१ ओव्यांच्या आणि दोनशे समासांच्या आजच्या दासबोधापूर्वी समर्थांनी एकवीस समासांचा एक दासबोधही रचलेला होता. मानवी सद्‍गुणांची वाढ व्हावी, लोक कर्तृत्वसंपन्न आणि परमार्थप्रवण व्हावेत, ही तळमळ दासबोधात दिसते.

रामदासी रामायणाची ‘सुंदर’ आणि ‘युद्ध’ अशी दोनच कांडे आहेत. समग्र रामायण रामदासांनी लिहिले नाही. सुंदरकांडाची श्लोकसंख्या १०१ असून युद्धकांडातील एकूण श्लोक १,३६२ इतके आहेत. ‘निमित्य मात्र ते सीता विबुधपक्षपुरता’ असे रामायणाचे सार रामदासांनी सांगितले आहे.

स्फुट कविता, प्रासंगिक कविता, आत्मारामसारखी वेदान्त प्रकरणे, अभंग, श्लोक, भूपाळ्या इ. अन्य बरीच रचना समर्थांची आहे. करुणाष्टक, मनाचे श्लोक, ‘सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची….’ ही महाराष्ट्र घरोघरी म्हटली जाणारी श्रीगणेशाची आरती ह्या रचना तर विख्यात आहेत. रामदासांनी ‘समर्थ’ होण्यापूर्वी तपश्चर्या केली,बहुश्रुतपणा मिळविला, कवित्व प्राप्त करून घेतले. ह्या साधनेत निराशेचे क्षणही अनेकदा आले. अशा प्रासंगिक निराशेचे व उद्वेगाचे प्रतिबिंब त्यांच्या करुणाष्टकात पडलेले आढळते. मनाच्या श्लोकांचा उर्दू अनुवाद शहा तुराव चिश्ती ह्या इस्लाम धर्मीयाने सु. अडीचशे वर्षांपूर्वी केला आहे. रामदासांनी संगीताभ्यास केला होता. केदार, बागेश्री,आसावरी, काफी अशा विविध रागांमध्ये त्यांनी बांधलेली पदे, त्यांच्या काही पदांतून आढळणारे तबल्याचे किंवा नृत्याचे बोल ह्यांतून हे लक्षात येते.

रामदासांच्या लेखनातून विखुरलेले साहित्यविषयक विचार शोधून रामदासांचे साहित्यशास्त्र (१९७३) ह्या नावाचा ग्रंथ भा. श्री. परांजपे ह्यांनी लिहिला आहे.

इंग्रजी अंमलापूर्वीच्या काळात रामदासांची बरीच चरित्रे लिहिली गेली, पण ती पौराणिक पद्धतीची आहेत. समर्थशिष्य गिरिधरस्वामी, हनुमंतस्वामी, महिपतिबुवा,दिनकरस्वामी, मेरुस्वामी, उद्धवसुत आदींनी लिहिलेल्या चरित्रांचा उल्लेख करता येईल.

संत गाडगे महाराज

(२३ फेब्रुवारी १८७६ – २० डिंसेंबर १९५६). एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. त्यांचा जन्म शेणगाव (जि.  अमरावती ) येथे परीट जातीत  झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व  आईचे सखूबाई. आडनाव जाणोरकार. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘ गोधडे महाराज ’ किंवा  ‘ गाडगे महाराज ’ म्हणूनच ओळखत. १९१२ मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला; परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.

लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनांची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता.

‘ चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.

स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात; परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.

लहानपणापासूनच ते जातिपंथभेदातीत होते. जातिभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटे व त्या दृष्टीने यांचे आचरण आणि प्रयत्‍नही  असत. पंढरपूर, नासिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी  लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या; तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या.

अनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी  समाजास दिली.

‘संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही ’, असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही.

समाजात शिक्षणप्रसार करून अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी मदत केली. लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती; त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व  त्यांनी लोकोपयोगी कार्यात वेचला. त्यांनी उभारलेल्या सर्वच संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळेच पाहतात.

गाडगे महाराजांविषयी बहुजनसमाजात कमालीचा आदरभाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. प्रवास करीत असता अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले. त्यांची समाधी अमरावती येथे आहे.

इतर संतांची नामावली

संत कान्होपात्र

संत केशवदास

संत जनार्दन महाराज

संत नरहरी सोनार

संत निवृत्तीनाथ

संत भानुदास

संत मुक्ताई

संत सावता माळी

संत सोयराबाई

संत सोहिरोबानाथ