• अनंतफंदी

  अनंत भवानीबावा घोलप ऊर्फ अनंत फंदी (शा.श. १६६६ / इ.स. १७४४ – शा.श. १७४१ / इ.स. १८१९) हे एक मराठी कवी, शाहीर होते. अनंतफंदीस “फंदी” नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. अनंत फंदींनी आठ लावण्या व काही पोवाडे रचले. त्यांची ‘रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते[१]. शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.

 • प्रभाकर

  प्रभाकर जनार्दन दातार (१७५५:गंगापूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र – १८४३) हे मराठी लावणीकार होते. हेमुरुड या गावचा राहणारा. त्याने पेशवाईचा उत्कर्ष आणि अपकर्ष दोन्हीही पाहिले. दातार यांचा जन्म गंगापूर जि. नाशिक येथे झाला. २०-२२ व्या वर्षी तो पुण्यात दाखल झाला. गंगू हैबतीच्या फडात नंतर तो सामील झाला. प्रभाकरच्या कवनाने तो काळ गाजविला त्याच्या कवनात उत्तान श्रुंगार आढळतो. त्याचा संग्रह १९२० मधे प्रसिद्ध झाला. १३ पोवाडे ११९ लावण्या त्याने लिहिल्या. माधवराव पेशवे यांचा ‘रंग’ आणि त्यांचा ‘मृत्यू’ यासंबधीचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. सवाई माधवरावांचा पोवाडा करुणरसाचा उत्कट अविष्कार करतो.

 • रामजोशीराम जगन्नाथ जोशी (जीवनकाळ: १७६२ ते १८१३)< गाव: सोलापूर (महाराष्ट्र्).  'सुंदरा मनामधी भरली' ही व अशाच प्रसिद्ध तमाशाप्रधान लावण्यांचा रचयिता व गायक. रामजोशींच्या फडात बया आणि चिमा अशा दोन नाचणार्‍या तमासगिरिणी असत. शंकराचार्यांनी रामजोशींना बहिष्कृत करावे असा पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांचा आग्रह होता. परंतु शंकराचार्यांसारख्या पुरुषाला रामजोशींनी आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणाने आणि काव्यरचनेने संतुष्ट केले. दुसर्‍या बाजीरावाच्या काळात पुण्यात काशीरामेश्वरपर्यंत ज्यांचा लौकिक पसरला होता असे नीलकंठशास्त्री थत्ते नावाचे एक याज्ञिक पंडित होते. पुण्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्या सभेत नीलकंठशास्त्री आहेत, तेथेच रामजोशींचे कीर्तन ठेवले. ते जाणून रामजोशींनी यज्ञशास्त्राची जमेल तितकी माहिती गोळा केली, आणि त्या सभेत त्या माहितीचा उपयोग करून बसविलेल्या लावण्या कटिबंधाच्या चालीवर म्हटल्या. त्या ऐकून थत्तेशास्त्रींनी खुश होऊन आपल्या अंगावरची शाल रामजोशींना पांघरून त्यांचा गौरव केला.
 • सगनभाऊ

  सगनभाऊ जन्म १७७८ मृत्यू १८५० सगनभाऊ मुस्लिम धर्मीय होता. मूळचा जेजुरीचा राहणारा; परंतु पुढे अनेक वर्ष पुण्यात व्यवसायाच्या निमित्ताने राहिला. तो शिकलकरीचा तलवारींना धार लावणे, म्यान बनवणे, असा व्यवसाय करीत. सगनभाऊ लावण्या उत्तम लिहीत. त्या काळी गवळ्याचा फड व रावळचा फड असे दोन फड पुण्यात होते. गवळ्याच्या फडाचा प्रमुख होनाजी तर रावळाच्या फडाचा प्रमुख सगनभाऊ होता.  सगनभाऊंनी आपल्या लावण्यांतून मराठी राज्य, मराठी संस्कृतीचे दर्शन घडविले.

  नागेश – अदिनाथ – गोविंदनाथ – सिद्धनाथ -सगनभाऊ अशी त्यांची नाथपंथीय गुरुपरंपरा आहे.

 • होनाजी बाळा

  होनाजी बाळा (इ.स. १७५४ – इ.स. १८४४) होनाजी सयाजी शिलारखाने व बाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जातात. दोघेही पुण्याचे रहिवासी होते. होनाजींचे घराणेच शाहिरांचे व पिढीजात कवित्व करणारे होते. त्यांचे आजोबा सातप्पा शिलारखाने हे पेशव्यांचे आश्रित व नावाजलेले तमासगीर होते. होनाजी आणि त्याचा मित्र बाळा यांनी होनाजी बाळा या जोडनावानी कवने गायली. होनाजी लिहायचा व बाळा गायचा. होनाजींच्या अनेक लावण्या रागदारीवर आधारित होत्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचनाही त्यांनी केली.

  होनाजी बाळा यांची ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ ही भूपाळी मराठी संस्कृतीत अजरामर झाली. होनाजी बाळा यांच्या जीवनावर व्ही. शांताराम यांनी ’अमर भूपाळी’ नावाचा मराठी चित्रपट काढला.