शंकरराव भाऊराव चव्हाण

शंकरराव भाऊराव चव्हाण : (१४ जुलै १९२० ते २६ फेब्रुवारी २००४)  महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री. शेतकरी कुटुंबात पैठण येथे जन्म. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल्‌एल्‌.बी. झाले. १९४५ मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली. पण रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तृत्वाचे एक पर्व पूर्ण झाले. १९४८-४९ मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. १९५२ च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (१९५६), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बॅंकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली. १९५६ मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे १९६० मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर १९७२ पासून फेब्रुवारी १९७५ पर्यंत ते कृषिमंत्री होते. २१ फेब्रुवारी १९७५ रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंट्यात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांद्वारा त्यांनी मराठवाड्याचा विकास घडवून आणला. जायकवाडी प्रकल्प हा शंकररावजींच्याच प्रयत्नाचे मोठे फळ आहे. भ्रष्टाचाराचे निर्मूलन, अधिक कार्यक्षम प्रशासन, १० लाख टनांहून अधिक धान्य उत्पादन वगैरे त्यांची धोरणे आहेत.

कोणताही राजकीय प्रश्न ते समझोत्याने सोडवित असत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे १९७५ मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानायचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री, मराठवाडयातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण आज नांदेडमध्ये होत आहे. श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते हा अनावरण समारंभ असल्यामुळे या कार्यक्रमाला एक राजकीय उंची मिळाली आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शंकरराव चव्हाण या चार मुख्य नेत्यांची दखल घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा राजकीय, आर्थिक आणि सामाजिक इतिहास पुढे जाणार नाही. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील, वसंतराव नाईक हे विदर्भातील आणि शंकरराव चव्हाण मराठवाडयाचे, असा हा महाराष्ट्राच्या पहिल्या ४० वर्षाचा राजकीय समतोल आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचे योगदान खूपच मोठे आहे. त्यांचे द्रष्टेपणही मोठे. वसंतराव नाईकसाहेबांच्या नावावर महाराष्ट्राची अख्खी हरितक्रांती, आणि अनेक विषय जमा आहेत. वसंतदादा पाटील हे तर सामान्य माणसाचेच नेते.

‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ ही त्यांची घोषणा बोधवाक्य ठरली. शंकरराव चव्हाण आणखीन वेगळे. तसे नांदेड हे दूरवर एका टोकाला. निजामाच्या राजवटीत त्या सत्तेविरुद्ध लढा दिलेल्या त्यावेळच्या बिनीच्या नेत्यांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ, पी. व्ही. नरसिंह राव, गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव, गोपाळराव एकबोटे, दिगंबरराव बिंदू यांच्या बरोबरीने शंकरराव चव्हाण यांचाही मोठा वाटा. सचोटी, टापटिप, शिस्त आणि घेतलेल्या कामात पूर्ण झोकून देऊन काम करणे हे शंकररावांचे गुणविशेष.

महाराष्ट्राच्या ‘सचिवालया’चे ‘मंत्रालय’ असे नामकरण शंकरराव यांनीच केले. त्यापूर्वी मंत्रालयात जत्रेसारखी माणसे फिरायची. त्यांना काही शिस्त शंकरराव चव्हाण यांनी लावली.

प्रत्येक मजल्यावर चहाची गाडी ही शंकररावांचीच कल्पना. शेतीला बारमाही पाणी की, आठमाही पाणी, या वादात गरीब शेतक-यांच्या बाजूने उभे राहणारे शंकरराव. ७० बादल्या पाणी उसाला, याला पहिला विरोध शंकरराव यांनी केला. शेतक-यांची सावकरांकडे गहाण पडलेली भांडी-कुंडी मुख्यमंत्री झाल्यावर ५० कोटी रुपये अदा करून त्यांनीच सोडवून दिली.

मुंबईतील गिरण्यांच्या जमिनी मालकांच्या घशात घालायला शंकररावांचा विरोध होता. म्हणूनच गिरणी कामगारांचे मरण दोन वर्षानी लांबले. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते पाटबंधारे आणि वीजमंत्री होते. आज महाराष्ट्रात जी महाकाय धरणे आहेत, त्यात बाळासाहेब देसाई यांनी उभे केलेले ‘कोयना’ धरण वजा केले तर महाकाय जायकवाडी, उजनी, अप्पर वर्धा, काळ, काळीसरार, अरुणावती, विष्णुपुरी ही सगळी धरणे शंकरराव पाटबंधारे मंत्री असतानाच झाली आहेत.

महाराष्ट्राचे वीजमंत्री असताना कोराडी, पारस, एलदरी, चंद्रपूर ही औष्णिक वीजकेंद्रे शंकररावांच्या काळात उभी राहिली. महाराष्ट्राच्या आजच्या विकासाच्या नकाशात वसंतराव नाईक मुख्यमंत्री आणि शंकरराव चव्हाण पाटबंधारे, वीजमंत्री यांचे योगदान फार मोठे होते. असे हे शंकरराव सलग ५० वर्षे राजकारणात होते.

१९५२ साली ते नगराध्यक्ष झाले आणि २००२ साली राज्यसभेतून निवृत्त झाले. अशी ही सत्तेची सलग ५० वर्षे. पण ना सत्ता त्यांच्या अंगाला चिकटली, ना सत्तेच्या मोहात ते अडकले. त्यामुळे मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री अशा सर्व महत्त्वाच्या जागांवर काम करताना शंकरराव चव्हाण यांच्यावर कसलाही आरोप ५० वर्षात होऊ शकला नाही, ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही.

राजकारणातील सत्तेचे मोह आणि सत्तेपासून मिळणारे फायदे घेताना भलेभले लडबडून जातात. शंकररावांना सत्तेचा मोह झाला नाही आणि चुकीचे वागणे त्यांच्याकडून कधी झाले नाही. १९७८ साली काँग्रेसपासून वेगळे होऊन त्यांनी ‘महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस’ हा वेगळा पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचे साधे आमदार असताना मंत्रालयामागील आमदार निवास ते रिगल समोरील जुने विधान भवन इथे विधानसभेच्या काळात ते चक्क चालत जायचे आणि चालत परत यायचे.

भर उन्हात ते चालत जात असताना रस्त्यावरील अनेक लोक ‘ते बघ शंकरराव चव्हाण’ अशी बोटे करून त्यांच्याकडे बघत असत. या सगळया कालखंडात स्वत:चा वेगळा पक्ष काढला तरी काँग्रेस या पक्षाबद्दलची त्यांची निष्ठा कधीही कमी झाली नाही. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या कुरघोडीनंतर आपले वेगळे अस्तित्व दाखवण्याकरिता त्यांनी हा पक्ष काढला होता. आणि त्यांचाही एक मोठा गट होता.

केंद्रीय मंत्री म्हणून शंकरराव यांचा कार्यकाळ हा अगदी विलक्षण आहे. या देशात गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्री अशा चार मोठया खात्यांचा कारभार सांभाळणारे जसे यशवंतराव चव्हाण होते, त्यानंतर हा मान शंकरराव चव्हाण यांना मिळालेला आहे आणि या मोठया चार खात्यांचा कारभार सांभाळताना ते कुठेही कमी पडले नाहीत. उलट पेटलेला पंजाब शांत करणे, तिथे निवडणुका घेणे, लोकप्रतिनिधींचे सरकार आणणे, यात शंकरराव यांनी अहोरात्र काम केले.

पंजाबमध्ये जी दहशत होती ती दहशत लोकांना विश्वास देऊन त्यांनी मोडून काढली. पंजाबच्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी दौरा केला. उधमपूर येथे त्यांच्या सभेत फेकलेले रॉकेट त्यांच्या पायाशी येऊन पडले. पण नाक्या-नाक्यावर लाईट मशीन गन (एल. एम. जी.) सुरक्षा व्यवस्था उभी करून शंकरराव यांनी पंजाबी जनतेत विश्वास निर्माण केला आणि निवडणुका यशस्वी करून दाखवल्या.

तिच गोष्ट बाबरी मस्जिद पाडण्यापूर्वी त्यांनी दिलेला इशारा नरसिंह राव यांनी ऐकला असता तर वेगळा इतिहास घडला असता. उत्तर प्रदेशचे त्यावेळचे मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्या अ‍ॅफिडेव्हीटवर विश्वास ठेऊ नका, असे शंकररावांनी आपले मत नोंदवले होते. नरसिंह राव यांनी ते मान्य केले नाही. दुर्दैवाने पुढे जे घडले ते सर्वाना माहिती आहे.

देशाच्या आणि राज्याच्या हिताचा निर्णय घेताना दूरदृष्टी आणि विचार याचा समन्वय साधणारे हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते होते यात शंका नाही. यशवंतराव आणि वसंतदादांचे वलय मोठे होते. राजाराम बापूही तेवढेच मोठे होते. तरीही शंकररावही काही लहान नव्हते. त्यांच्या पूर्णाकृती पुतळयाप्रमाणेच ते परिपूर्ण नेते होते.