श्री क्षेत्र शेगाव मंदिर

जागा मिळाल्यावर महाराजांच्या निर्देशानुसार १२ सप्टेंबर १९०९ रोजी शेगाव येथील नारायण कडताजी पाटील, ह्यांच्या अडत दुकानावर श्रींचे भक्त, गांवकरी व व्यापारी ह्यांची एक सभा झाली,बोलावली.  श्रींनी निर्देश केलेल्या जागी हरी पाटलांनी एक शीला ठेवली आणि त्याच्या आजुबाजुला मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली. ही जागा शेगावातील सर्वे नं. ७०० (४३/४५/२) येथील जमीनीच्या मध्यभागी होती. मूळ मंदिराचे बांधकाम दगड, चुना आणि रेतीचे आहे.

भुयार

आज मुख्य मंदिराच्या तळघरात जिथे हरि पाटलांनी शीला ठेवली होती तिथे श्री गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. ह्या जागेला भुयार म्हणतात. भुयारात प्रवेश केल्यावर श्रींचे दर्शन घडते. भुयारात आतल्या बाजुनी आता संगमरवराच्या लादया बसविण्यात आल्या आहेत.

मंदिराचा बाहेरचा भाग

१९०९ साली मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली. काळया दगडांनी बांधलेल्या या मंदिराची लांबी ४८ फुट व रुंदी ४२ फुट असून शिखराचा भाग ५१ फूट उंच आहे. मंदिराच्या पूर्वीच्या दगडी भिंतीवर पौराणिक काळातील व्यक्तिरेखा कोरल्या होत्या. समाघी शताब्दी सोहळयाचे औचित्य साधून हा फोडलेला भाग आणि दगडी शिखराचा भाग २००९ मध्ये उतरवीण्यात आला आहे. उतरविलेल्या भिंती आणि शिखराची पूनर्रचना संकल्पानुसार अडगांवच्या मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी करण्यात येणार आहे.

राम मंदिर

श्रींचे दर्शन घेऊन भक्त भूयारातून तळमजल्यावर राम मंदिरात प्रवेश करतात. अशी रचना करण्या मागे एक विशिष्ट हेतू आहे. संताकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यन्त पहोचण्याचा मार्ग दाखवितात. म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भूयारातून बाहेर पडल्यावर भक्त रामाच्या दर्शनासाठी जातात. याच राम मंदिरात महाराजांचे पालखीत ठेवन्यात येणारे चांदीचे दोन मुखवटे आहेत.

सभामंडप

राम आणि हनुमान मंदिराला जोडणाऱ्या सभामंडपातील आतल्या भागात महिरपीच्या (कमान) वरच्या भागात महाराजांच्या पोथीतील विविध लीला चित्रबद्ध केल्या आहेत. या सभामंडपात सर्वत्र रेखीव कमानी आहेत. पूर्वीच्या दगडाच्या बांधकामावर रंग चढविल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात.

श्री गजानन महाराज पालखी

समाधीग्रहण स्थळ व शयनगृह

मुख्य मंदिराच्या आग्नेयेस महाराजांनी जेथे दिनांक ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधी घेतली तेथे आज संगमरवरी पादुका आहेत. त्यापाठी विठ्ठलरुक्मिणीचे मंदिर असून त्या जागेला समाधीस्थळ म्हणतात. त्याला लागूनच महाराजांचे शयनगृह आहे. श्रींच्या वापरातील पलंग येथे ठेवला असून त्यावर त्यावर दोन बाजूला लोड आहे आणि मध्यभागी श्रींचा फोटो आहे. समाधीग्रहण स्थळाच्या डाव्या बाजूला श्रींनी त्या काळी प्रज्वलीत केलेली धूनी आजही धगधगत असून शेजारीच श्रींनी वापरलेले चिमटे येथे ठेवलेले आहेत. एक सेवक धूनी अखंड तेवत ठेवतो. शिवाय अनेक भक्त त्यात तूप,राळ,तूपाची वात, गांजा इत्यादी साहित्याची भर घालत असतात.

पाठशाळा

मुख्य मंदिराच्या भोवती पटांगण आहे आणि त्याला चार बाजूंनी दगडी पाठशाळेने वेढलेले आहे. पाठशाळेला जागोजागी सुंदर कमानी आहेत. ह्याच पाठशाळेत आज विश्वस्त मंडळाची कचेरी, देणगी, आणि अभिषेक काउन्टर आणि सनई चौघडा वाजविण्याची जागा आहे.

समाधी ग्रहण स्थळाबाहेरचा परिसर

समाधी ग्रहण स्थळाबाहेर पूर्व बाजूस एक विशाल औदुंबर वृक्ष व हनुमानाची अतिप्राचीन मूर्ती असणारे छोटे मंदिर आहे.

मुख्यप्रवेशद्वारा बाहेरचा परिसर

मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला नागदेवता मंदिर आणि श्रींचे सेवक श्री बाळाभाऊ महाराज व श्री नारायण महाराज ह्यांच्या समाध्या आहेत.

पारायण मंडप

समाघीग्रहण स्थळ आणि शयनगृहाच्या समोर पारायण मंडप आहे. ज्या भक्तांना महाराजांच्या ग्रंथाचे वाचन करायची इच्छा असते त्यांच्याकरीता ग्रंथ, आसन, निरांजन विझू नये म्हणून काचेचे कंदिल, उदबत्तीची घरे सुद्धा ठेवले आहेत. काही वेळेस भक्त आपले चष्मे न आणल्याने पारायण करु शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन संस्थानाने विविध नंबरच्या चष्म्यांची सोय तेथेच केलेली आहे. या मंडपात भक्तांना जप, ध्यान, चिंतन, मनन व पारायण करता येते.

प्रवेशद्वार

पाठशाळेला लागूनच दोन प्रवेशद्वारे आहेत. उत्तरेकडे मंदिरात येण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार असून पश्चिमेला दुसरे प्रवेशद्वार आहे.स्वामी भक्त यांनी या मठात जाऊन स्वामींच्या या प्रासादिक पादुकांचे अवश्य दर्शन घ्यावे.

गजानन महाराज समाधी

जेव्हा गजानन महाराजांनी त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे असे ठरवले, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले,

मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका
कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||

याव‍रून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.

त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला. त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला,

जय गजानना | ज्ञानांबरीच्या नारायणा
अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||

आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्षमार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पहाताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. म्हणूनच त्यांना

अनंतकोटी ब्रह्मांडनायाक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय!!!

असे प्रेमादराने संबोधले जाते. ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंकाच नाही. अशा सदगुरुंविषयी परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या ‘गुरुस्तुति’मध्ये सांगितले आहे,

अगा! निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा | अगा! निर्मला, केवला आनंदकंदा || स्थिरचररुपी नटसी जगी या | नमस्कार माझा तुला गुरुराया |||| 
अगा! अलक्षा, अनामा, अरूपा | अगा! निर्विकारा, अद्वया, ज्ञानरुपा || कृपाकरोनी अक्षयपद दे दासा या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||||

सदगुरूच्या स्वरूपाचे खरे वर्णन ह्या ओळींमध्ये सामावलेले आहे, गजानन महाराजांना हे वर्णन किती चपखल बसते आहे हे तर सर्वांना विदितच आहे. त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते. ०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दु:खसागरात बुडाले तेव्हा सर्वांना आठवते ते महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे दिलेले वचन; ते समाधि घेण्यापूर्वी म्हणाले,

दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच
तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||

देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. त्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.

शेगावला गेल्यास गजानन भक्तांनी ह्या ५ स्थळांना सुद्धा आवर्जून भेट द्या

शेगावला लोक गेले की प्रमुख समाधी मंदिर, पारायण गृह आणि आनंद सागर या ठिकाणीच ९०% लोक जातात. गजानन महाराजांसंबंधित आणखी ५ जागा शेगाव ला प्रमुख मंदिराच्या जवळच आहे याची बहुतेकांना कल्पना नसते. पोथीत किंवा गोष्टीरूपी पुस्तकात या ठिकाणांचा उल्लेख आढळतो.

१. मोटेंचं शिव मंदिर

हे शंकर आणि विष्णू मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार संस्थानाने केला आहे. त्यामुळे आता हे मंदिर सुंदर स्थापत्याने परिपूर्ण आहे. या मंदिराचे महत्व म्हणजे; पोथीत उल्लेख आढळतो की, गजानन महाराजांनी घोड्याच्या पायात झोपून त्याला शांत केले, किर्तनकाराला समज दिली ती याच मंदिरात. आत गेल्यावरच महाराजांचा अप्रतिम मूळ फोटो, पादुका समोर दिसतात. शेजारी गाभाऱ्यात शिवपिंडी आणि बाजूला उजवीकडे विष्णू मूर्ती. मंदिरात मूळ मंदिराचा फोटो ही आहे. शेगाव चे मूळ नाव ‘शिवगाव’ होते ते याच ग्रामदैवत शिवमंदिरावरून पडले होते.

२. महाराजांचे प्रगट स्थळ

बहुतेक जण शेगावला येऊन समाधी मंदिरातील दर्शन घेतात. पण पहिल्या अध्यायात गजानन महाराजांचे सर्व प्रथम दर्शन, भेट बंकटलालास होते त्याबद्दल वाचूनही बहुतेक लोक त्या जागी जात नाहीत वा ती जागा अजूनही गावात आहे यबद्दल अनभिज्ञ असतात.

मोटेंच्या शिवमंदिरापासून मूळ रस्त्यावरून समोर जात उजवीकडे वळल्यावर सरळ गेल्यास किंवा कोणाला प्रकट स्थळाबद्दल विचारल्यास तो रस्ता दाखवू शकतो. थोड्याच अंतरावर ते प्रकट स्थळ येतं. एक मस्त बहरलेला भलामोठा वटवृक्ष इथे आहे. समोर प्रकट स्थळाची जागा आणि त्याबद्दल माहिती आहे. शेजारीच एक मोठा हॉल आहे ज्यात चित्ररूपी चरित्र मांडले आहे. काही वर्षांपासून संस्थानाने या जागेचं नीट बांधकाम केलंय. आता इथेही सेवेकरी असतात. पण तरीही आधीची जागाच जास्त नैसर्गिक वाटायची.

३. बंकटलालचा वाडा

प्रकट स्थळापासून मूळ रस्त्यावर येऊन पुढे जाताना कोणाही गावकऱ्याला विचारल्यास तो ही जागा दाखवेल. इथे मूळ वाड्याच्या जागी एक सभागृह बांधले आहे. आत महाराजांचा फोटो, पादुका आणि बंकटलालच्या वडिलांची हातात तराजू घेतलेली प्रीतिकृती आहे. पाचेक वर्षापर्यंत लागूनच पडक्या स्थितीतला जुना वाडाही होता. लाकडाचे जुने नक्षीकाम स्पष्ट दिसायचे. आता तो संपुर्ण पाडून तिथे मोकळी जागा आहे.

४. हनुमान, शीतला माता मंदिर

काही अंतरावरच हे मंदिर आहे. इथेच महाराजांनी, पाटील बंधूंनी त्यांना उसाने मारल्यावर त्यानी हाताने उस पिळून मुलांना रस पाजला होता. इथे या चवथ्या जागी पोचल्यावर काही पावलांवरच मंदिराचा मागचा भाग येतो. हे सुद्धा संस्थानाच्या अखत्यारीत असल्याने इथेही महाराजनचा फोटो, आणि सेवेकरी असतात. जुन्या मंदिराचा मूळ फोटो, येथील इतिहासाची माहिती दिली आहे.

५. एक जुने सुंदर शिवमंदिर

प्रमुख मंदिराजवळील महाप्रसाद गृहाकडे जाताना एक जुने शिव मंदिर आहे. हेमाडपंथी नसलेले पण मोठ्या खांबांचे पुरातन आणि वेगळा ‘फील’ देणारे हे मंदिर आहे. याबद्दल फार कमी लोकांना माहिती असल्याने इथे नेहमी शांतता आणि शांती असते. हे मंदिर संस्थानाच्या अखत्यारीत नाही. त्यामुळे येथील स्थापत्य इतर चार स्थानांप्रमाणे नसल्याने येथे मूळ ‘फ्लेवर’ जाणवतो.

श्री क्षेत्र शेगाव – कसे पोहचाल ?

जवळचे रेल्वे स्टेशन: शेगाव (मध्य रेल्वे) व
जवळचे बस डेपो: शेगाव बस डेपो.
रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा तळ आहे. प्रति व्यक्ती साठी १० रुपये घेतात. तसेच रिक्षा तळाजवळ उजव्या बाजूला १५ पावलावर संस्थेचे फ्री बस दर १५ ते ३० मिनिटांनी उपलब्ध देखील आहे. “भक्त निवास” या संस्थेच्या ठिकाणी रिक्षाने /बसने पोहोचल्यावर प्रथम भक्त निवास क्रमांक ५ या ठिकाणी जावून प्रथम रूम बुक करून घ्यावे रूम अत्यन्त सुंदर, स्वच्छ, निटनेटक्या आहे.

रूम बाबत अधिक माहिती

देवळा जवळ रूम भक्त निवास इमारत क्रमांक २, ३, ४, ५ निवडावे व रूम प्रत्येकी (२४ तास) रुपये १५०, १७५ ,३०० ,४००, ६००, ९०० आहे.
आनंद सागर नावाचे हे ठिकाण अतिशय सुंदर फिरण्याचे ठिकाण आहे. आरामात फिरल्यास ५ ते ७ तास लागतात. या ठिकाणी  ठराविक अंतरावर चहा नास्ता साठी कॅन्टीन (माफक दरात) ची सोय देखील आहे. वरील ठिकाणी जाण्यासाठी संस्थेच्या फ्री बस ठराविक वेळे नुसार आहेत.

काही वेळा: 
संस्थेच्या ठिकाणी सर्व भक्त निवास येथे सकाळी ८ ते १० पर्यंतच चहा व नाष्टा मिळतो.
कारण हे चहा-नाष्टा/जेवण अतिशय स्वस्त व अत्यंत रुचकर व अत्यंत उत्तम दर्जाचे दिलेले असते (किमत रुपये ५ ते १६ व चहा रुपये ६/-) व ११ ते २ तर काही ठिकाणी उशिरा पर्यंत जेवण मिळते रुपये (४०/- अमर्यादित थाळी)
नास्ता: इडली – सांबर, वडा-सांबर, पोहे, उपमा, चहा, कॉफी इत्यादी मिळतो.
जेवण: २ भाज्या, पोळी, भात, १ गोड पदार्थ, मठ्ठा, चटणी, ठेचा, पापड (गुरुवार असल्या प्रसादात पिठल व चतकोर भाकरी)
टीप:- संस्थेच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जेवण महाग व कमी दर्जाचे व मोजकेच मिळेल.
नियम: दोन व्यक्तींना संस्थेच्या रूम मिळत नाही अथवा देत नाहीत . पण देवळा जवळ भरपूर हॉटेल / गेस्ट हाउस इत्यादी रुपये १५० पासून २०००/- सोयी नुसार आहेत व रूम सहज मिळतात.

साधारण गर्दीची वेळ: शनिवार-रविवार व बुधवार-गुरुवार.

संस्थेच्या पासून लांब असलेले संस्थेच्या रूम २ ते ३ कि. मी.
१) आनंद विहार (२.५ कि. मी.) येथे रूम व आजूबाजूचे परिसर थ्रीस्तर हॉटेल सारखे अति सुंदर आहे रूम किमत रु. ६०० च्या पुढे.
२) आनंद सागर विसावा–  (३ कि. मी.) रूम किमत रु. १५० ते २००/२५०/३००/५०० च्या आहेत.
वरील दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी संस्थेच्या फ्री बस ठराविक वेळे नुसार आहेत. अथवा रिक्षाने (४ व्यक्ति) ४० ते ५० रुपये घेतात.
१) आनंद विहार, २) आनंद सागर विसावा हे दोन्ही जागा ५०० मीटरच्या अंतरावर आहेत. आनंद सागरअतिशय सुंदर फिरण्याचे ठिकाण येथून पुढे १ कि. मी. आहे.
रेल्वे स्टेशन १ कि. मी.
देऊळ- २ कि. मी.
आनंद विहार- ५०० मीटर
आनंद सागर विसावा- १ कि. मी.
आनंद सागर अतिशय सुंदर फिरण्याचे ठिकाण.
वरील सर्व  ठिकाणी जाण्यासाठी/फिरण्यासाठी अपंगाना /वृद्ध-अशक्त  लोकांना /लहान मुलांसाठी संस्थेच्या फ्री व्हील चेअर /बाबा गाडी (उत्तम टाईपचे) देखील उपलब्ध आहेत. यासाठी संस्थेच्या ऑफिसमध्ये संपर्क करावे.

संपर्क क्रमांक : विपुल निवास व्यवस्था उपलब्ध
१) श्री मंदिर परिसर संकुल – 07265- 252699, 252018 / 9423840852
२) भक्त निवास संकुल – 9850850891 / 9422064318 / 9423144709
३) आनंद विहार संकुल – 07265- 252019 / 9657449496
४) आनंद सागर विसावा संकुल- 07265- 253018 / 9657449495
५) पर्यायी निवास व्यवस्था – 9763743734 / 9881055023

श्री क्षेत्र शेगाव वैशिष्ट्ये

एकमेवाद्वितीय ! शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थान हे विदर्भासारख्या ग्रामीण भागात असलेलं लाखो भविकांच श्रद्धास्थान आहे. हजारो लोक तिथे रोज दर्शनाला येतात. भली मोठी दर्शनबारी असते. लोक भक्ती भावाने रांगेत चालत दर्शनाची वाट पाहत असतात. बऱ्यापैकी शांतता असते. मध्येच एखादा जयघोष नीनादून जातो.

इतक्यात पूर्णविराम होत नाही .समाधी दर्शन, गादी दर्शन घेऊन तुम्ही बाहेर येता तोवर महाप्रसाद बारी लागलेली असते. २५०- ३०० लोक ऐका वेळी बसू शकतील असे चार हॉल असतात. भाविक येत राहतात जेवणं चालूच असतात आणि एकूण ४ ते ५ हजार लोक रोज जेवण करून जातात. जेवणाची व्यवस्था अवर्णनीय असते. स्वच्छ चकाकणारे स्टील चे पाच खाणी तबक, पोळी, वरण, भात, एक फळभाजी आणि एक कडधान्याची भाजी हा मेन्यू असतो आणि प्रसाद म्हणून वडी, शिरा वा लाडू असतो. वाढून देणाऱ्या सेवेकर्यांच्या हातात हातमोजे, अंगावर apron, मंगलवेष (पांढरा सदरा पायजमा) आणि स्त्री सेवेकर्यांचे डोके पदराने झाकलेले असते. आपापले ताट वाढून घेऊन टेबलावर जाऊन बसायचे. तिथेच टेबलावर पाण्याचा ग्लास भरलेला असतो आणि धक्का लागून तो पडून जमीन ओली होणे हा नित्याचा प्रकार होऊ नये म्हणून ग्लास साठी एक खोबन असते त्यात तो ग्लास फिट बसतो. दुसऱ्या वाढी साठी सेवेकरी तत्परतेने धकलगाडी (ट्रॉली) घेऊन फिरत असतात. त्यात कोणत्या कप्प्यात काय आहे म्हणजे डाळ, भाजी, कडधान्य उसळ ई. याची नेम प्लेट दर्शनी भागावर असते. सेवेकरी तीच स्वच्छता सांभाळत, आपुलकीने वाढत असतात. जेवणाची अमृत तुल्य चव, चटका बसेल इतकं वाफाळलेल अन्न, माफक तेल आणि मसाला असं सात्विक सुपाच्य जेवण झाल्यावर एका ट्रॉली वर ताट नेऊन द्यायचे असते. तिथे आधी त्यातले खरकटे अन्न एका कप्प्यात जमा करून ताट धुवायला पाठवले जाते.

 उष्ट्या पत्रावळीवरचे शिते वेचून खाऊन अन्न हे पूर्णब्रह्म हे उक्ती ऐवजी कृतीतूनच महाराजांनी शिकवलेले आहेच त्यामुळे बहुतांश भाविक ताटात उष्टे टाकत नाहीच, पण एखाद्याच्या ताटात उष्टे दिसले तर सेवेकरी उष्टे न टाकण्याची विनंती करतो आणि जर एखाद्या भाविकांची उरलेले अन्न बांधून सोबत घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली तर ते पॅक करण्यासाठी सोबतच्या सेवेकर्यांच्या apron च्या समोरच्या खिशात आयताकृती व्यवस्थित कापलेले कागद तयारच आहेत. हो, खरच आहेत.

 महाराजांविषयी हृदयातील निस्सीम श्रद्धा आणि मनातील सेवाभाव ह्याच्या भरवश्यावर एखाद्या मोठ्या कारखान्यात व्यवस्थापनात मोठ्या पदव्या घेतलेले तज्ञ कसं नियोजनबद्ध आणि गुणवत्तेवर भर देत काम करून घेतात तसे महाराजांच्या आशीर्वादाने मा.हभप शिवशंकरभाऊ पाटलांच्या मार्गदर्शनात हे अखंड सेवाकार्य चालते. इथे सेवेकरी आहेत आणि पगारी नोकर पण आहेत. चप्पल स्टँड वर चप्पल व्यवस्थापन ते बागकाम ते स्वछता कर्मी ते हिशोबनिस ते स्वयंपाक घर काम ते वैद्यकीय अश्या विविध सेवा देण्यासाठी पण नाव नोंदणी करावी लागते आणि त्याचीही वेटिंग लिस्ट आहे. वर्ष दोन वर्षांनी नंबर लागतो. शिवशंकर भाऊ संस्थान चा चहा पण पीत नाहीत इतका निस्वार्थ भाव त्यांच्या ठायी आहे त्यामुळे सगळीच टीम त्याच निर्मोही निस्वार्थ भावनेने काम करते. संस्थानचे बरेच सेवाकार्य चालतात. वारकरी प्रशिक्षनापासून फिरत्या दवाखान्या पर्यंत आणि सातपुड्याच्या आदिवासी भागातील सेवेकार्यांपासून अभियांत्रिकी महाविद्यालया पर्यंत वेगवेगळे ४२ सेवा प्रकल्प आहेत ते अहोरात्र चालूच असतात. पैसे साठवायचा नाही, तो फिरता राहिला पाहिजे या महाराजांच्या शिकवणुकीनुसार बांधकामे, अन्नदान, सेवाकार्य कार्य चालतात. पैसा येत राहतो अन काम चालूच राहते. पैशासाठी काम कधी थांबले नाही हे भाऊ विनयाने सांगतात. कालचा आवक जावकच हिशोब आणि शिल्लक रोज फलकावर जाहीर रित्या लिहिल्या जाते.

पारदर्शकता, विश्वसनीयता या शब्दांच्या नव्या व्याख्या शेगावच्या या संस्थानात तयार झाल्या आहेत. काय म्हणावे या व्यवस्थेला, ती आखणार्या संस्थांच्या पदाधिकारी आणि विश्वस्थानां आणि राबवणऱ्या सेवेकर्यांना ? शब्दच नाहीत. केवळ शब्दातीत ! खरं म्हणजे शब्दबद्ध करण्यापेक्षा सरळ नतमस्तकच व्हायच !!

|| गण गण गणात बोते ||