नेमबाजी (शूटिंग)

बंदूक, पिस्तुल, रिव्हॉल्व्हर इ. साधानांनी स्थिर वा हलत्या निशाणावर नेम धरून गोळी मारण्याचा खेळ. या खेळाचे अनेक प्रकार आधुनिक काळात लोकप्रिय आहेत. गोफणीतून दगड फेकण्याच्या क्रियेवरून नेमबाजीची कल्पना अस्तित्वात आली असावी. प्रारंभी धनुर्विद्याहाच नेमबाजीचा प्रकार रूढ होता. पुढे पिस्तुल, बंदुका अशा साधनांचा शोध लागल्यावर धनुर्विद्या मागे पडली. युद्धशास्त्रात ही आधुनिक साधने आल्यावर त्यांत नैपुण्य मिळविण्यासाठी नेमबाजीच्या स्पर्धा भरविल्या जात असाव्यात.

नेमबाजी हा वैयक्तिक कौशल्याचा भाग असला, तरी नेमबाजीच्या सांघिक स्पर्धाही घेण्यात येतात. या स्पर्धांसाठी जाड पुठ्ठ्याचे निशाण वापरले जाते. या निशाणावर एकामध्ये एक अशी सगळी वर्तुळे असतात. काही स्पर्धांत कॅन्‌व्हासवर लाकडी चौकटीत अर्ध्या वर्तुळांची आकृती असलेला कागद चिकटवूनही निशाण तयार केले जाते. पाच किंवा दहा फेरींमध्ये या स्पर्धा घेतल्या जातात. निशाणावरील लहानात लहान गोलावर अचूक नेम धरून गोळी मारल्यास दहा गुण मिळतात. त्यापेक्षा मोठ्या गोलावर गोळी मारल्यास नऊ, अशा क्रमाने गुण मिळत जातात. या क्रीडाप्रकारात यश मिळविण्यासाठी सराव, मार्गदर्शन, अचूक संधान यांबरोबरच मानसिक एकाग्रता व तीक्ष्ण दृष्टी यांची आवश्यकता असते.

ऑलिंपिक स्पर्धांत या खेळाचे अनेक प्रकार अंतर्भूत करण्यात आले आहेत. त्यांत ‘फ्री पिस्तुल’ (५० मी.) ‘रॅपिड फायर पिस्तुल’ (२५ मी.) ‘फ्री रायफल’, ‘स्माल बोअर रायफल-प्रोन’, ‘स्मॉल बोर- थ्री पोझिशन्स’, ‘क्ले-पिजन शूटिंग’ इत्यादींचा समावेश होतो. यांपैकी काही प्रकारांचे पुढे थोडक्यात वर्णन दिले आहे.

क्ले-पिजन नेमबाजी

यालाच कूट-नेमबाजी (ट्रॅप शूटिंग) असेही नाव आहे. या प्रकारच्या नेमबाजीत विशिष्ट यंत्रातून म्हणजे अनुखनित सापळ्यातून हवेत उडवलेल्या लक्ष्याचा हवेतच वेध घ्यावयाचा असतो. हे कृत्रिम लक्ष्य ९९ ते ११२ ग्रॅ. वजनाचे आणि ११० मिमी. व्यासाचे असते. या स्पर्धेत प्रत्येकी पाच स्पर्धकांचे गट करण्यात येतात. ते एकमेकांपासून २·७४ मी. अंतरावर उभे असतात; तर अनुखनित सापळ्यापासून त्यांचे अंतर १४·६३ मी. असते. या अनुखनित सापळ्यातून लक्ष्य हवेत फेकले जाते. प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या जागेवरून पाच वेळेस लक्ष्यवेध करण्याची परवानगी असते. त्यानंतर परिभ्रमण पद्धतीप्रमाणे प्रत्येक जागेवरून प्रत्येक स्पर्धक पाच वेळेस लक्ष्यवेध करतो. अशा रीतीने एका फेरीत प्रत्येक स्पर्धकाला पंचवीस वेळा लक्ष्यवेधाची संधी मिळते. आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पंचवीस लक्ष्यवेधांच्या आठ फेऱ्या होतात. म्हणजे एकूण दोनशे लक्ष्यवेध करण्याची संधी स्पर्धकाला मिळते. ही स्पर्धा दोन दिवस चालते. एकाहून अधिक स्पर्धकांची संख्या समान झाल्यास पुन्हा पंचवीस लक्ष्यवेधांची एक अधिक फेरी घेतली जाते.‘१२ – बोअर’ जातीची दुतोंडी बंदूक यासाठी वापरली जाते. या बंदुकीचे वजन ३ किग्रॅ. असून लांबी सु. ८१३ मिमी. असते. या बंदुकीचा पल्ला ३६·६ मी. इतका असतो आणि झाडलेल्या गोळीची गती प्रति सेकंदास२६४ मी. असते. या नेमबाजीप्रकारात डाव्या पायावर शरीराचा भार देऊन उभे राहायचे असते. उजव्या पायाची टाच जमिनीपासून किंचित उचललेली असते.

गुडघ्यातून पाय अजिबात वाकवलेले नसतात. हा पवित्रा आदर्श समजण्यात येतो. क्ले-पिजन या प्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे यात दोन्ही डोळ्यांनी लक्ष्याचा वेध घ्यावयाचा असतो. यंत्रातून फेकलेले लक्ष्य नेमके कुठे जाईल, याची स्पर्धकाला पूर्वकल्पना नसल्यामुळे लक्ष्यवेध करतेवेळी त्याला शरीराची अतिशय लवचिक हालचाल करावी लागते. अचूक लक्ष्यवेध करण्यासाठी जर नेमकी लक्ष्यावरच गोळी झाडली, तर गोळी लक्ष्यापर्यंत पोहचेतोपर्यंत लक्ष्य हवेत पुढे निघून गेलेले असते. लक्ष्याच्या आणि गोळीच्या वेगाचा हवेत मिळण्याचा बिंदू एकच असावा, म्हणून स्पर्धक लक्ष्याच्या थोड्या पुढील बाजूस गोळी झाडतो. या नेमबाजीप्रकाराचा शोध १८८० साली मॅकॉस्के या स्कॉच माणसाने लावला. १९०० ते १९२४ पर्यंत (१९०४ वगळता) या खेळाला ऑलिपिक स्पर्धांत स्थान मिळाले. त्यानंतर हौशी स्पर्धक कोणाला म्हणायचे, या विषयावर वादंग होऊन हा खेळ ऑलिंपिकपुरता बंद पडला. त्यानंतर १९५२ पासून तो पुन्हा ऑलिंपिकमध्ये समाविष्ट करण्यात आला.‘स्कीट शूटिंग’ हा क्ले-पिजनचाच एक प्रकार असून सध्या अत्यंत लोकप्रिय ठरला आहे.

पिस्तुल-नेमबाजी

स्पर्धात्मक नेमबाजीत पिस्तुलाची नेमबाजी सर्वांत प्रसिद्ध आहे. या स्पर्धेत ५० मी. अंतरावरून एकूण साठ वेळा लक्ष्यवेध करण्याची परवानगी असते. यातील लक्ष्यफलकावर एका आत एक अशी दहा वलये असतात. सर्वांत आतील वर्तुळाचा व्यास ५० मिमी. असतो. याशिवाय कमीजास्त अंतरावरील पिस्तुल-नेमबाजीचे प्रकार अस्तित्वात असले, तरी वर उल्लेखिलेला प्रकारच सर्वसामान्य असून ऑलिंपिकमध्येही त्याच पद्धतीने स्पर्धा होतात. ८,६ व ४ सेकंदांच्या अंतराने वेगवेगळ्या लक्ष्यावर वेध घेण्यासाठी क्रमाने चार वेळा यात संधी दिली जाते. एकूण अडीच तासात साठ वेळा लक्ष्यवेधाची संधी मिळते. या स्पर्धेसाठी वापरले जाणारे पिस्तुल जास्तीत जास्त १·२६ किग्रॅ. वजनाचे असून ३०x१५x५ सेंमी. च्या पेटीत बसेल, अशा आकाराचे असावे. पिस्तुलाच्या नळीची लांबीही १५ सेंमी. हून अधिक असता कामा नये.

बंदूक (रायफल) नेमबाजी

 1. मोठ्या तोंडाच्या नळीची बंदूक- नेमबाजी
 2. लहान तोंडाच्या नळीची बंदूक-नेमबाजी.

मोठ्या तोंडाच्या नळीची बंदूक-नेमबाजी

१८३ ते ९१४ मी. अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याचा यात प्रयत्न असतो. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, द. आफ्रिका, ऱ्होडेशिया यांसारखे काही देश वगळता इतर सर्व देशांत २७४ मी. अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याच्या स्पर्धा होतात. ‘इंटरनॅशनल शूटिंग यूनियन’ तर्फे या स्पर्धांचे संयोजन केले जाते. या स्पर्धांत लक्ष्य हे नित्य स्थिर असल्यामुळे स्पर्धकाची स्थितीही स्थिर असते. या स्थितीचे प्रमुख प्रकार असे आहेत :

 1. प्रवण-यात स्पर्धक जमिनीवरील चटईवर पालथा झोपतो. त्याच्या कंबरेवरील भाग हा कोपरांवर तोललेला असतो. बंदुकीचा दस्ता खांद्यावर टेकलेला असतो. स्पर्धकाचा कोपरापासूनचा पुढचा हात हा जमिनीपासून ३०° पेक्षा कमी असता कामा नये, असा ‘इंटरनॅशनल शूटिंग यूनियन’ चा नियम आहे.
 2. उभी स्थिती-यात स्पर्धक दोन्ही पायांवर समतोल उभा राहतो. त्याच्या शरीराचा इतर कोणताही भाग जमिनीला वा दुसऱ्या कोणत्याही वस्तूला (बंदूक वगळता) स्पर्श करत नाही. कोणत्याही प्रकारचा कृत्रिम आधार यात घेता येत नाही. बंदूक ही अधोमुख (प्रवण) स्थितीप्रमाणेच डावा हात व खांदा यांच्या साहाय्याने पेलली जाते.
 3. गुडघे टेकून नेमबाजी स्थिती – यात उजव्या पायाचा गुडघा, पंजा व डावा पाय पूर्णपणे जमिनीवर टेकण्यास परवानगी असते. डाव्या गुडघ्यावर डाव्या कोपराचा आधार घेण्यास परवानगी असते.
 4. बैठी स्थिती – यात जमिनीवर नेहमीप्रमाणे बसून सगळ्या शरीराचा तोल सांभाळला जातो.
 5. पोश्वस्थिती – ही स्थिती अधोमुख स्थितीच्या बरोबर विरुध्द आहे. यात स्पर्धकांच्या डोक्याऐवजी स्पर्धकाचे पाय लक्ष्याकडे असतात. या स्थितीत स्पर्धक उजवा पाय लांब पसरतो आणि डावा गुडघा वर उचलून घेतो. बंदूक ही काखेत पकडली जाते. ‘इंटरनॅशनल शूटिंग युनियन’ तर्फे होणाऱ्या स्पर्धेत २७४ मी. हे नियमानुसार ठेवण्यात येणारे अंतर आहे. या अंतरावरील फलकावर असलेल्या वर्तुळातील अंतिम लक्ष्याचा व्यास १५२४ मिमी. असतो

लहान तोंडाच्या नळीची (स्मॉल बोअर) बंदूक–नेमबाजी

या स्पर्धेत १३·७ मी. ते १८२·९ मी. इतकी विविध अंतरे असतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धात हे अंतर सर्वसामान्यपणे ५० मी. असते. ऑलिंपिक वा इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांत ही स्पर्धा अत्यंत लोकप्रिय आहे.या स्पर्धेसाठी तयार केलेल्या लक्ष्यातही दहा वलये असतात. त्यातील बाहेरील सात वलये पांढरी असून, आतली तीन काळी असतात.

या प्रकारातील काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुढीलप्रमाणे होत.

 1. ‘द ड्यूअर मॅच’ –इंग्लंडमधील ‘नॅशनल स्मॉल बोअररायफल असोसिएशन’ मार्फत ही स्पर्धा भरवली जाते. १९०९ पासून ही सांघिक स्पर्धा सुरू झाली.
 2. ‘द पर्शिंग ट्रॉफी मॅच’– १९३१ पासून बिझ्ली येथे सुरू झाली.
 3. ‘द इंग्लिश मॅच’ – ‘इंटरनॅशनल शूटिंग युनियन’ तर्फे आयोजित केली जाते.
 4. ‘द थ्री पोझिशन्स इंटरनॅशनल मॅच’ – अमेरिकेच्या ‘नॅशनल रायफल असोसिएन’ तर्फे सुरू झाली.

भारतात स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेमबाजीच्या स्पर्धा होत असल्या, तरी त्याला अधिकृत स्वरूप १९५१ साली ‘नॅशनल रायफल असोशिएशन ऑफ इंडीया’ ची स्थापना झाल्यावर मिळाले. भारतात या स्पर्धा विशेष प्रसिद्ध नाहीत. कारण हा खेळ फार खर्चिक असून त्यासाठी लागणाऱ्या विशिष्ट दारूगोळ्याचे उत्पादनही भारतात अल्प प्रमाणात होते. मार्गदर्शन व आवश्यक साधनांचाही अभाव जाणवतो. तरीही गेली वीस वर्षे भारतात नेमबाजीच्या राष्ट्रीय स्पर्धा होत असतात. भारताच्या महाराज कर्णीसींगानी ‘क्ले-पिजन शूटिंग’ स्पर्धेत रोम ऑलिंपिकमध्ये (१९६०) आठवा आणि मेक्सिको ऑलिंपकमध्ये (१९६८) दहावा क्रमांक मिळवला होता. ते टोकिओ ऑलिंपिकमध्ये चाचणी स्पर्धेत (१९६४) पहिल्या शंभर लक्ष्यवेधांनंतर दुसऱ्या क्रमांकावर होते, पण नंतरच्या १०० लक्ष्यवेधांत त्यांचा क्रमांक घसरून आठवर गेला. या खेळात भारताला अद्याप फारसे उल्लेखनीय यश लाभलेले नाही.

लेखक: शंकर अभ्यंकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश