श्रीपाद नारायण पेंडसे (जन्म ५ जानेवारी इ.स. १९१९; मृत्यू २२ मार्च इ.स. २००७) हे मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार होते. पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.