• तिथी :

श्रावण कृष्ण अष्टमी

  • पार्श्वभूमी :

श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म मथुरेत कंसाच्या तुरुंगात वसुदेव देवकीच्या पोटी झाला. म्हणून हा दिवस कृष्णजयंती, वसुदेवाने कंस भयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंद यशोदेकडे पोहोचविले. गोकुळात कृष्णजन्मामुळे आनंदी आनंद झाला हा दिवस जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी साजरा केला जातो.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :

दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात़. रात्री कृष्ण जन्म सोहळ्याचे आयोजन केले जाते. रात्री देवळात फुलांनी पाळणा सजविण्यात येतो. पाळण्यात कृष्णाची मूर्ती ठेवतात. सर्व मंडळी जमून पूजाअर्चा करतात. पाळणा म्हणतात. कृष्णाला आवडणाऱ्या दूध साखर, दहीपोहे, लोणी साखर यांचा नैवेद्य दाखवतात. प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो. नवमीला गोपाळकाल्याचे वेळी महाप्रसाद होऊन हा उत्सव संपन्न होतो. भाविक लोक घराघरांतूनही श्रीकृष्णाचा जन्मकाळ साजरा करतात. बऱ्याच लोकांचा दिवसभराचा उपवास असतो. अनेकांकडे हा कुलाचार म्हणून साजरा केला जातो. दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

गोकुळाष्टमीच्या दुसरे दिवशी दहीहंडी फोडण्याचा उत्सव साजरा होतो, श्रीकृष्णाला दही, दूध, लोणी, ताक अतिशय प्रिय होते , लहानपणी गोकुळामध्ये घरांमधुन उंच शिंक्यांवर ठेवलेले, दही, दूध, लोणी, कृष्ण व त्याचे सहकारी उतरंड करून हे चोरून खात, कृष्णाचे या बाललीलेची आठवण म्हणुन हा उत्सव साजरा करतात. दूध, दही, लोणी, ताक यांचे मिश्रण एका मातीच्या मडक्‍यात भरून ती दहीहंडी उंचावर बांधली जाते. ढोल-ताशांच्या गजरात गोविंदा आला रे आऽऽला, चे सुरात सर्व गोविंदाची टोळी एकावर एक मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात.

वैशिष्ट्य :

जन्माष्टमीला श्रीकृष्णतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप, तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीकृष्णतत्त्वाचा अधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते.

खाद्यपदार्थ :

दहीकाला

पाककृती :

विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे ‘काला’ होय. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला अन् सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.