विचार महाराष्ट्र धर्माचा,
निर्धार हिंदवी स्वराज्याचा…
मुत्तीकेचे पावित्र्य तव राखिले,
स्वराज्यस्वप्न तव साकारिले I
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा
शिवराया तुज मानाचा मुजरा II…
शिवजयंती च्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा….

श्रीमंत योगी

वर्षानुवर्षे पारतंत्र्यात खितपत पडलेल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी नवचैतन्य फुंकले. अत्यंत कमी वयात घेतलेल्या हिंदवी स्वराज्याच्या शपथेची पूर्तता त्यांनी वयाच्या चव्वेचाळिसाव्या पूर्ण केली. महाराष्ट्रात हिंदवी तख्त आकारास आले ही ऐतिहासिक घटना होती. पण त्यामागे महाराजांचे प्रचंड कर्तृत्व, नेतृत्व, साक्षेप व कष्ट होते. महाराजांसोबतच त्यांच्या माणसांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली होती. ‘राष्ट्रासाठी बलिदान केले’ असे शब्द वापरून वापरून इतके गुळगुळीत होतात की त्यातील आशय अनेकवेळा नाहीसा होऊन जातो. आपण उद्या आपल्या आई, वडील, पत्नी, मुलांसाठी या पृथ्वीवर राहणार नाही हे माहिती असतांना अनेकांनी हातात तलवार घेऊन युद्धात उडी घेतली. आज आपण असे काही करू शकतो का याचा ज्याने त्याने विचार केला तर ‘राष्ट्रासाठी बलिदान करणे’ म्हणजे काय हे लक्षात येईल. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने राज्याभिषेकाचा ऐतिहासिक दिवस भारताने अनुभवला. या संस्मरणीय दिवसाचे शिल्पकार होते शिवाजी महाराज.

शिवाजी महाराजांचे चरित्र जेवढे खोलात जाऊन वाचावे तेवढी त्याची दाहकता जाणवायला लागते. किती प्रसंग आहेत, कसोट्यांचे क्षण आहे, व्यक्तिगत सुख-दुःखे आहेत पण महाराज कधीही खचले नाही. स्वराज्याचा जगन्नाथरुपी विराट रथ अंतिम श्वासापर्यंत खेचत राहिले. एक राज्यकर्ता म्हणून जी पथ्य पाळावी लागतात ती आमरण पाळली. राजा म्हणून शिवाजी आदर्श होतेच पण ते स्वतः एक स्वयंभू क्रांतिकारकही होते. ही क्रान्ती फक्त राजकीय स्वरूपात मर्यादित न राहता महाराजांच्या सर्व पवित्र्यांमध्ये दृग्गोचर होते. त्याची सुरुवात कदाचित राजमुद्रेपासून होते. तत्कालीन सुलतान आपल्या राजसत्तेचा वापर करून काही मूठभर लोकांना आपल्या मातृभूमीशी गद्दारी करायला भाग पाडत व त्यांच्या योगे आपले विलासी जीवन निर्धोकपणे जगत. सत्ता हा व्यक्तिगत सुखोपभोगांचा मार्ग म्हणूनच प्रतिष्ठित असतांना शिवाजीराजांनी क्रांतीचे रणशिंग फुंकले. “मुद्रा भद्राय राजते”, या अस्सल भारतीय चिंतनाला अनुसरून अंत्योदयासाठी आपले राज्य चालविले. रामचंद्रपंत आज्ञापत्रात लिहितात (ही आज्ञापत्रे उत्तरकालीन असली तरी ती महाराजांनीच घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे आहेत असे अभ्यासकांचे मत आहे) की राजाने नातेवाईकांना महत्वाची पदे देऊ नये. आज आपण पाहतो की हातात सत्ता आली की लगेच आपली मुले, मुली, जावई, मेव्हणे, पुतणे, भाचे यांना महत्वाच्या जागी बसविले जाते. असे केल्याने नेतृत्वाला काम करवून घेणे अशक्य होऊन बसते. राजांनी तो संकेत पळला हे किती मोठे आश्चर्य आहे. सगळी सत्ता, निर्णय, अधिकार हाती असतांना शिवाजीराजांनी आपल्या नातेवाईकांना कधीही मंत्रिमंडळात, प्रशासनात किंवा गडांवर पदे दिली नाहीत. राजांचे कुटुंबीय हे जरी राजपरिवार संबोधल्या गेले असले तरी त्यांना ते सर्व नियम लागू होते जे स्वराज्यातल्या सामान्य जनतेसाठी होते. आज जसे आपण पाहतो की अनेकदा देशाची संपत्ती व्यक्तिगत बँक खात्याकडे वळविली जाते व त्याद्वारे आपल्या मुलांचे राजकीय भविष्य सुनिश्चित केले जाते तसे स्वराज्यात झाले नाही. स्वराज्याच्या संपत्तीचा उपयोग राजाने स्वतःसाठी वा आपल्या कुटुंबासाठी कधीही केला नाही.

राजे कर्तव्यकठोर असले तरी सत्यशील, मितभाषी, संवेदनशील होते. स्वराज्यातल्या आया-बहिणींची त्यांना काळजी असे. निवांत समयी ते त्यांची सुख दुःखे समजावून घेत. गरीब, वंचित, पिचलेल्या लोकांबद्दल त्यांच्यामध्ये अपार करुणा होती. पण म्हणून अशांना सगळी फुकट सामग्री देण्यापेक्षा त्यांचे हात बळकट करण्यावर राजांचा विश्वास होता. कदाचित त्यांना माहिती असावे की फुकटचे खायची सवय लागली की माणूस आळशी होत जातो व सरकार माझी काळजी घेणारच आहे तर मी कशाला काम करू हा विचार बळावत जातो. उलट गरीबाच्या हाताला काम दिले तर जिन्नस घेण्यासाठी इतरांसारखा पै-पैका त्याच्याकडे येतो. जीवनावश्यक गरजा स्वतःच्या पैशाने भागावितांना त्याला कष्टाची सवय पण लागते अन त्याचा स्वाभिमान पण जिवंत राहतो. ३५० वर्षांपूर्वी शिवाजीराजांनी हे ओळखले व म्हणूनच त्यांनी धारण, किल्ले, रस्तेबांधणी, शेती, व्यापार याद्वारे लोकांना कार्यप्रवृत्त केले. त्यांना मेहनतीचा भाकरतुकडा खायची सवय लावली.

सामान्य लोकांबद्दल आत्यंतिक करुणा असलेले शिवाजी महाराज शत्रूबद्दल तितकेच कठोर होते. रक्तात श्रीकृष्ण भिनलेला असल्यामुळे देशद्रोही, शत्रू, भ्रष्टाचारी यांना निर्दोष सोडायचे नसते ही स्पष्टता होती. दोषींना शिक्षा केल्याने माझी लोकप्रियता कमी होऊन उद्या माझे छत्रपतीपद गेले तर असा भोळसट विचार राजांनी कधीही केला नाही. स्वराज्यासाठी जे आवश्यक आहे ते केलेच पाहिजे मग लोक काहीही म्हणो, यावर ते ठाम होते. अफझलखान, शाहिस्ताखान, सिद्दी जौहर हे शत्रू आहेत, माझ्या राज्यावर चालून आले आहेत, त्यांना व त्यांच्या सेनेला माझ्या राज्यात नागरिक म्हणून ठेऊन घेतो, ते पण मानव आहेत, निसर्गाने त्यांच्यासोबत भेद केला नाही, आपण का करावा, ते पण इथली संसाधने वापरतील, आम्हीही वापरू असा तर्कशून्य विचार शिवाजीराजांनी कधीही केला नाही. मानवता आपल्या माणसांसमोर दाखवावी लागते, तुम्हाला नेस्तनाबूत करण्यासाठी आलेल्या लोकांसमोर मानवता दाखविली तर राज्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही, हे इतिहासातून राजे शिकले होते. म्हणून मानवतावादाच्या फालतू चर्चांमध्ये ते कधीही पडले नाही. आपले कोण व शत्रू कोण याची विलक्षण स्पष्टता शिवाजीराजांना होती. त्यामुळेच महाराजांनी शत्रूंना सदैव झोडपून काढले. अफझलखानासारखे संकट स्वराज्यात आलेले असतांना नरसिंहाप्रमाणे सतराव्या शतकातील हिरण्यकश्यपूचा त्यांनी वध. शाहिस्तेखानाने ३ वर्ष पुण्यात उच्छाद मांडला असतांना राजांनी जातीने लाल महालात प्रवेश करून त्याला प्रत्युत्तर दिले. जणू काही तत्कालीन जुलमी सत्तांसाठी हा इशारा होता की जे सहन करायचे ते आम्ही ३०० वर्ष केले, आता आमच्या वाटेला जाल तर तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारू.

हिंदूंसाठी सर्व धर्म समानच आहेत. ते हिंदूंना कुणी शिकविण्याची गरज नाहीच. वर्षानुवर्षे ‘एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ चा उच्चार करणारा व तेच सत्य जगाला सांगणारा हा हिंदू आहे. आपण कधीही धर्मांतरणे केली नाहीत, आपण संस्कृतीचा विस्तार केला. पण इतिहासाची पाने उलटून पाहिल्यास लक्षात येते की काही लोकांनी संपूर्ण जगावर आपल्याच धर्माचे राज्य असावे या हेतूने विशालकाय बुडवून टाकली. ही धर्मान्ध आक्रमणे भारतावरही झाली, इथेही धर्मान्तरांचे पेव फुटले. संत गुलाबराव महाराज तर म्हणायचे की सर्वधर्म सम असतील तर धर्मान्तराची गरजच काय. तुम्ही कुठल्याही धर्मात जन्माला या, त्याच ईश्वराकडे जाणार आहात. पण हे ज्यांना कधी समजलेच नाही त्यांनी महाराजांच्याच दोन माणसांना बाटविले एक होते बजाजी नाईक निंबाळकर व दुसरे नेतोजी पालकर. क्रांतिकारी शिवाजीराजांनी सर्व रूढी परंपरा मोडीत काढून या दोघांनाही परत हिंदू करवून घेतले. आम्ही तुमच्यावर आमचा धर्म लादणार नाही पण तुम्ही आमच्या धर्मात लुडबुड केली तर सोडणारही नाही अशी राजांची नीति दिसते. सक्तीने धर्म बदलणारे मुस्लिम सुलतान व आपल्या लोकांना आपल्याच धर्मात परत येऊ न देणारे धर्म प्रतिनिधी या दोघांवरही राजांनी जरब बसविली. अशाच प्रकारची जरब गोव्यातील जेस्युईट फादर्सला बसविलेली आपल्या लक्षात येईल. इतकेच नव्हे तर आपली नष्ट करण्यात आलेली अनेक मंदिरे राजांनी पुनःप्रस्थापित केली.

भ्रष्टाचारावर राजांचे आसूड सुरुवातीपासूनच कोसळले होते. महिलांवरील अत्याचारांबद्दल त्यांच्या मनात जी प्रचंड चीड होती, तशीच भ्रष्टाचाऱ्यांबद्दलही होती. सुलतानांनी सगळा देश भ्र्रष्टाचाराने व त्याला अनुरूप प्रशासनाने पोखरून काढलेला असतांना राजांनी मात्र विलक्षण आदर्श घालून दिले. सर्वोच्च पदावर असूनही राजांनी स्वतः कधीही भ्रष्टाचार केला नाही. जनतेचा पैसा जनतेच्या कामात खर्च केल्याने लोकांचा विश्वास राजांवर बसला. आपले जबाबदार मंत्री, नातलग, अधिकारी यांनी भ्रष्टाचार केला हे कळताच राजांनी त्यांना कठोरतम शासन केले. पहिले पेशवे श्यामराजपंत रांझेकर, आपले मामा संभाजी मोहिते यांनी भ्रष्टाचार केला हे कळताच राजांनी त्यांना तात्काळ स्वराज्याबाहेर हाकलून दिले. या घटनांमुळे सामान्य जनतेचा राजावरचा विश्वास सातत्याने दृढ होत गेला. नेतोजी, प्रतापराव, मोरोपंत किंवा जिवाजी विनायक यांचे निर्णय चुकले अथवा कामात ढिलाई आली तर राजांनी कडक शब्दात त्यांना चुकांची जाणीव करून दिली. महिलांच्या अब्रूची लख्तरं वेशीवर टांगली जात होती व सामान्य माणसाला न्याय दुरापास्त होता. सुलतानांच्या राज्यात तर शहरे, गावे लुटली जात असतांना महिलांना उचलून नेणे व शत्रूस्त्रियांवर बलात्कार करणे हा गुन्हाच मनाला जात नसे, मग दाद कुणाला मागायची. हिंदू पुरुषांना नोकरी देतांना त्यांच्या बायकांना यवन अधिकाऱ्यांच्या घरी नोकरी करावी लागे, तेथे उत्पिडन होत असे हे सांगणे नकोच. बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटलाने महिलेवर बदअमल केला म्हणून राजांनी स्वतःचे वय १६ वर्षांचे असतांना त्याचे हातपाय तोडले. यानंतर स्वराज्याच्या हद्दीत महिलांवरील अत्याचारांच्या अशा घटना घडलेल्या नाहीत. अशी न्यायाची जरब बसविली.

सुलतानी राज्यात शेतकरी मेटाकुटीला आला होता. शेतकऱ्यांची पिके बाजारात विकायला आली की सगळे दलाल एकत्र येत व शेतमालाचे भाव पडून टाकत. गरीब शेतकरी माल परत नेऊ शकत नसे व आगार नसल्याने सांभाळूही शकत नसे. बिचारा पडत्या भावात धान्य विकण्यास बाध्य होई. खरेदी झाल्यावर सारे दलाल चढ्या भावात तो व्यापाऱ्यांना विकत व अमाप नफा प्राप्त करत असत. शिवाजी राजांनी शेतकऱ्यांचा सारा माल स्वतः खरेदी करायला सुरुवात केली व मोबदल्यात मिळणारा पैसा थेट शेतकऱ्यांना दिला. एका झटक्यात सारे दलाल लाथाडल्या गेले, शेतकरी पूर्ण व रास्त किंमत प्राप्त करता झाला. तत्कालीन सर्व सत्ता आपल्या सैनिकांना ८ महिने नोकरीमध्ये ठेऊन पावसाळ्याचे ४ महिने निष्कासित करत असत. शिवाजीराजांनी सर्व सैन्याला १२ महिने पगाराची व्यवस्था करून दिली. दर प्रतिपदेला पगार देणारे शिवाजीराजे मध्ययुगातील एकमेव राज्यकर्ते होते. किल्ले बांधणी, जुन्या किल्ल्यांची डागडुजी, त्यांचे सशक्तीकरण, त्यासाठी लक्षावधींचा अर्थसंकल्प (बजेट) अशी कित्येक कामे राजे सातत्याने करत. आज्ञापत्रात एक वाक्य मोलाचे आहे, ‘साहुकार (म्हणजे सावकार नव्हे तर व्यापारी) हे तो राज्याची आणि राजश्रीची शोभा’. त्यांच्यामुळे राज्यात सुबत्ता नांदते त्यामुळे त्यांची काळजी घेण्याचे दिशादर्शक तत्व आज्ञापत्रात आहे. मोठ्या व्यापाऱ्यांची काळजी घेणे याचा अर्थ शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असा होत नसतो. तर शेतकरी, व्यापारी, नोकरदार हे सगळेच स्वराज्याचे अंग आहेत व राजासाठी ते अपत्यासमान असतात त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे राजाचे कर्तव्य सांगितले आहे. बंधारे, रस्ते, पाणी अडविणे, शेतक-यांना बी-बियाणे, बैलजोडी, नांगर इत्यादी पुरविणे, त्यांना पोटापाण्याला लावणे अशी मूलभूत कामे राजांनी केली.

सेना, संसाधने, लूट, प्रचंड मोठ्या लढाया, अफाट विजय हे तर आपण नेहमीच ऐकतो. पण महाराजांनी आपल्या आयुष्याचा क्षण अन क्षण व स्वतःच्या शरीराचा कण अन कण स्वराज्यासाठी खर्चिला. आपली व्यक्तिगत सुखे, आशा, आकांक्षा, परिवार या सर्वांकडे कमीत कमी लक्ष देत साऱ्या प्रजेलाच आपले अपत्य मानले. सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले, शकनिर्मात्या महान सम्राटांच्या पंक्तीला जाऊन बसले. पण निस्पृहता किती असावी, की शकाला स्वतःचे नाव न देता ऐतिहासिक राज्याभिषेकाचे नाव देऊन ‘राज्याभिषेक शक’ अमर केला. रामचंद्रपंत आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, “अवनीमंडळ निरयावनी करावे, यावनाक्रांत राज्य आक्रमावे, हा निघोड चित्ताभिप्राय प्रकट करून पूर्व पश्चिम दक्षिण या प्रांती जे जे यवनस्तोमे बद्धमूल जाहली होती त्यावर सेना समुदाय प्रेरून मारून काढिले. आपल्या बुद्धिवैभव व पराक्रमे कोणाची गणना न धरिता, कोणावरी चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणिले, कोणावरी छापे घातले, कोणामध्ये परस्परे कलह लाऊन दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरीयात सिरोन मारामारी केली, जे कोणी इतर प्रयत्ने ना कळे त्यांचे देशात जबरदस्तीने स्थळे बांधून पराक्रमे करून आकळीले. जलादुर्गाश्रयीत होते त्यास नूतन जलदुर्गेच निर्माण करून पराभविले. दुर्घट स्थळी नौका मार्गे प्रवेशले. ऐसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा तो तो शत्रू त्या त्या उपाये पादाक्रांत करून साल्हेरी अहिवंतापासून चंदी कावेरीतीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधी कोट किल्ले, तैसीच जलदुर्गे व कित्येक विषम स्थळे हस्तगत केली. चाळीस हजार पागा साठ हजार शिलेदार, दोन लक्ष पदाती, कोट्यावधी खजिना, तैसेच उत्तम जवाहीर सकल वस्तुजात संपादिले. सिंहासनारूढ होवून छत्र धरून छत्रपती म्हणविले. तस्कारादी अन्यायी यांचे नाव राज्यात नाहीसे केले. देश-दुर्गादी सैन्याचे बंद नवेच निर्माण करून एक रूप अव्याहत शासन चालवले, केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली की ज्यावर अवरंगजेबासारखा महाशत्रू चालोन आला असता त्यास स्वप्रतापसागरी निमग्न केला. दिगंत विख्यात कीर्ती संपादली, ते हे राज्य”. किती मोजक्या आणि समर्पक शब्दात अमात्यांनी महाराजांचे वर्णन केले आहे पहा.

अशा पराक्रमी, सामर्थ्यसंपन्न, निर्मोही, विनम्र, श्रद्धावान, प्रजावत्सल, निस्पृह, निष्काम, कर्मयोगी, अध्यात्मप्रवण, शिवरायांना त्यांच्या जयंतीनिमित्त सादर नमन. महाराज, तुमच्या शतांश गुणसंपदा आम्हा भारतीयांना लाभो व आम्ही आमच्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास उद्युक्त होवो हेच आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही सर्व तुमच्या चरणी नतमस्तक आहोत.

लेखक- डॉ. सुमंत दत्ता टेकाडे,नागपूर
कोर्पोरेट ट्रेनर, टेड-एक्स स्पिकर व शिवचरित्र अभ्यासक
मो. ९९२३८३९४९०
सौजन्य- तरुण भारत