वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही सामाजिक स्वार्थासाठी झोकून देऊन काम करत आहेत. ‘स्नेहालय’ या संस्थेचे कार्यकर्तेही त्यापैकीच! गेली २० वर्षे ‘स्नेहालय’ने देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्या मुलांसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. डॉ. गिरीश कुलकर्णीनी १९८९ साली सुरू केलेल्या ‘स्नेहालय’चा व्याप आज प्रचंड वाढलाय आणि विशेष म्हणजे संस्थेला गिरीश कुलकर्णीचं नव्हे तर स्नेहाचा धागा जपणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्नेहालय म्हणून ओळखलं जातं. व्यक्तीपेक्षा संस्था आणि संस्थेचं काम मोठं हा तिथे साऱ्यांचाच नारा आहे. चांगल्या घरातील मुलांनी हवं तर आंधळे, अपंग, मतिमंद अशांसाठी काम करावं त्यानी ‘असल्या’ भानगडीत पडू नये असे सल्ले सुरुवातीला गिरीश व त्यांच्या मित्रांना वारंवार मिळत.

गिरीष लहान असताना इंग्रजी व गणिताच्या वर्गाला जायचा. एक क्लास झाला कि एक किमी अंतरावरील दुसऱ्या क्लासला जाण्यासाठी सर्वांची पळापळ व्हायची. बाकी मुले १ किमी च्या फेऱ्याच्या रस्त्याने जायची. गिरीषने मात्र ३०० मीटरचा एक शॉर्टकट शोधला व तो त्या गल्लीतून सर्वांच्या आधी पोहचायचा. त्या गल्लीतून जाताना त्याला त्याच्याच वयाच्या मुली कोठीसमोर नट्टापट्टा करून हातवारे करीत उभ्या असलेल्या दिसायच्या. त्या बदनाम गल्लीतून बाकी मुले जायची नाहीत. मात्र मुळातच धाडसी वृत्ती असणाऱ्या गिरीषला काही अडचण जाणवायची नाही. त्या गल्लीत जातायेताना पाहिलेलं हे दृश्य त्याला त्या वयातही अस्वस्थ करून जायचे. पुढे अकरावीला असताना एकदा त्याच्या एका मित्राच्या घरी तो पहिल्यांदाच गेला. तेथे गेल्यावर त्याने काय पाहिले ? तर त्या मित्राची आई वेश्याव्यवसायात होती. त्याची १५ वर्षांची बहीण पण दुर्दैवाने याच व्यवसायात आली होती. इतकेच नव्हे तर त्याची ७० वर्षांची म्हातारी झालेली आजी पण कपभर चहाच्या बदल्यात स्वतःचा देह विकण्यासाठी मजबूर होती. हे सर्व गिरीषला कल्पनेच्या पलीकडेचे होते. मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेल्या गिरीषला वाटले कि आपले आईवडील शिक्षक आहेत, आपले शिक्षण वगैरे सर्व काही व्यवस्थित सुरु आहे, पण जर माझ्या घरच्या कोणावर अशी परिस्थिती ओढवली असती तर मी काय केले असते ? या प्रश्नाने त्याला मूळातून हादरवून सोडले व प्रचंड अस्वस्थ केले. हे बदलण्या साठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे हा ध्यास त्याने घेतला. मग तो त्या व्यवसायातील बऱ्याच स्त्रियांशी याबाबत बोलू लागला. त्या सगळ्याच त्याच्याकडे पाहून उपहासाने हसून त्याची टर उडवू लागल्या. एक दिवस मात्र एका स्त्रीने तिची दोन मुले काही वेळासाठी बाहेर घेऊन जा व सांभाळ असे सांगितले. गिरीष त्या दोन्ही मुलांना घेऊन बगिच्यात गेला व त्यांना खेळवत बसला. मग तो रोजचाच दिनक्रम झाला. चार महिन्यातच या मुलांची संख्या ८० वर पोहचली. हळूहळू त्या स्त्रियांचा विश्वास त्याने मिळवला. आपले संपूर्ण आयुष्य या सर्वात वंचित-पीडित घटकांसाठी वेचण्याचा संकल्प त्याने केला व १९८९ साली वयाच्या २१ व्या वर्षी स्नेहालय या संस्थेची स्थापना केली.
गेली २८ वर्षे महिला व बाल विकासात पायाभूत स्वरूपाचे काम केलेल्या स्नेहालय संस्थेने हजारो देहव्यापारातील महिला, त्यांची बालके, एचआयव्ही-एड्स बाधित महिला व बालके, कुमारी माता, बलात्कारीत महिला, अनौरस मुले यांचे जीवन बदलले आहे.
स्नेहालय व डॉ. गिरीष कुळकर्णी यांना अनेक राष्ट्रीय खाजगी आणि शासकीय पुरस्कार मिळाले. ५ नोव्हेंबर २०१२ रोजी भारताचे राष्ट्रपती डॉ. प्रणब मुखर्जी यांनी डॉ. दुर्गाबाई देशमुख राष्ट्रीय पुरस्कार देऊन स्नेहालयच्या पथदर्शी कार्याला गौरविले. आमीरखान यांच्या गाजलेल्या सत्यमेव जयते मालिकेच्या पहिल्या व शेवटच्या भागात स्नेहालयाची चित्रफित दाखविण्यात आली होती. स्वत: आमीरखान दोन वेळा स्नेहालयात येऊन राहून गेले.
MA, MPhil, PhD व अन्य अनेक पदव्या घेतलेले डॉ. गिरीष कुळकर्णी हे स्वतः एका स्थानिक महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करतात व उरलेल्या वेळात पूर्ण वेळ स्नेहालयाचे काम करतात. बहुसंख्य वेळा अल्पवयीन मुली, स्त्रिया याना फसवून देहव्यापार या व्यवसायात आणले जाते व चक्रव्युहा प्रमाणे एकदा ती स्त्री या व्यवसायात आली कि बाहेर पडणे जवळपास अशक्यच असते. त्यामुळे भाव-भावना, मानवी मूल्य, चांगुलपणा व एकूणच माणसांवरचा विश्वास पूर्णपणे उडून गेलेला असतो. अशा पार्श्वभूमीवर स्नेहालयसोबत जुळलेल्या देहव्यापारातील महिलांनी मात्र अनेकदा पूर, भूकंप यासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी आपली आदल्या रात्रीची कमाई देणगी म्हणून मुख्यमंत्री व /पंतप्रधान निधीला लगोलग स्वत:हून पाठविली आहे, याहून मोठा बदल काय असू शकेल ? यातच स्नेहालयाचे खरे यश आहे. एवढी संवेदनशीलता या वंचित-पीडित स्त्रियांमध्ये जागृत करणे, जी बरेचदा समाजातील अभिजन वर्गामध्येही अभावानेच आढळते हि खरी स्नेहालयाच्या कामाची ताकद आहे.
मुळातच समाजाची फारशी सहानुभूती न मिळणाऱ्या अन्यायग्रस्त मुली, महिला यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढणे, पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करून, गुन्ह्याचे पंच, साक्षीदार व स्वतः अन्याय सहन केलेली मुली-महिला यांच्यावर सतत येत असणारा दबाव, प्रसंगी नोटांनी भरलेल्या सुटकेसी वा हातपाय तोडणे, खून करण्याचा धमक्या या सर्वांमध्ये झालेल्या अन्यायाचा पाठपुरावा वर्षानुवर्षे करणे हे अतिशय जिकिरीचे काम पण स्नेहालयाने यशस्वीरीत्या करून दाखविले आहे. अशाच एका केसमध्ये गुंतलेल्या उच्चभ्रू वर्गातील २२ गुन्हेगारांना डबल जन्मठेपेची शिक्षा कोर्टाकडून सुनावली जाण्याचे संपूर्ण देशातील पहिलेच उदाहरण पण स्नेहालयामुळेच घडू शकले. बाद होण्यापासून वाचवलंय.

गिरीषच्या कामाचे आणखी एक विरळे वैशिष्ट्य म्हणजे स्नेहालयाची स्थापना झाली तेंव्हाच त्यांनी संस्थेचे विश्वस्त मंडळावर देहव्यापारातील तीन स्त्रिया सदस्य म्हणून घेतल्यात. चांगुलपणावरचा एवढा पक्का विश्वास व कोणतीही व्यक्ती योग्य वातावरण व संधी मिळाली तर बदलू शकते यावरील दृढ श्रद्धा यामुळेच हे शक्य झालेय. सध्यातर गिरीष हा स्वतः स्नेहालयाचा पूर्ण वेळ काम करत असून कागदोपत्री कुठेही नाही. अशा प्रकारे स्वतःला बाजूला करता येणे सामाजिक क्षेत्रातील भल्या भल्याना जे जमलेले दिसत नाही, ते गिरीष स्नेहालयाच्या स्थापनेपासून करू शकलाय हा पण एक मानदंड !!!

सर्वोत्कृष्ट चाईल्डलाईन
स्नेहालयच्या एक एक प्रकल्पाला भेट देऊन तिथल्या आठवणी ऐकताना हेलावून जातं. स्त्रिया आणि लहान मुलांना मदत करता यावी म्हणून १९९६ सालापासून सुरू केलेल्या हेल्पलाइनचे रूपांतर २००३ साली childline मध्ये करण्यात आले. भारतात ९२ शहरांत असलेल्या childline पैकी अहमदनगर childline सर्वोत्तम मानली जाते. दररोज सुमारे ५० हून जास्त बालकांचे फोन घेतले जातात. बाल कामगारांची मुक्तता, कर्करोग, हृदयरोग, लैंगिक शोषण इत्यादी विषयांवर  स्नेहालयच्या childline ची आजवर अनेकांना मदत झाली आहे.
देशभर गाजलेले १४ ते १५ वर्षांच्या बालिकांच्या बाजारू लैंगिक शोषणाचे प्रकरण childline द्वारेच २००६ मध्ये उघडकीस आणले गेले. हे प्रकरण फारच गुतागुंतीचे आणि जास्त आरोपी असणारे होते. लैगिंक शोषणात समाजातील कथित प्रतिष्ठित, राजकारणी, नोकरशहा आणि गुन्हेगारी टोळ्यांचे गुंतलेले हात childline नेच उघड केले. या प्रकरणात न्यायालयाने नुकतीच २० आरोपींना दोन जन्मठेपेची सजा सुनावली आहे. आरोपींना अटक करण्यात, बळी बालिकांचे पुनर्वसन करण्यात, बळींना सहकुटुंब संरक्षण देण्यात उपक्रमाची महत्त्वाची भूमिका होती. अनिल गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवावर उदार होत, पैशाच्या मोहाला बळी न पडता केलेल्या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
स्नेहांकुर
नगरच्या सिद्धी बागेजवळ कुत्र्यांनी हाता-पायाचे लचके तोडलेलं बाळ असल्याचा स्नेहालयच्या कार्यालयात फोन आला आणि स्नेहांकुर या प्रकल्पाची सुरुवात झाली. स्नेहांकुरमध्ये अनाथ, बेवारस व कुमारी मातांच्या बालकांना आधार दिला जातो. आजही स्नेहालयच्या द्वाराशी ठेवलेली, कचराकुंडीत, उघडय़ावर टाकून दिलेली बालकं सापडतात. स्नेहांकुरमधील बालकांना कायदेशीररीत्या दत्तक देण्यात येऊन त्यांना चांगलं आयुष्य देण्याचाही प्रयत्न केला जातो.
बालभवन
लालटाकी, रामवाडी, संजयनगर, बोरकर नगर, मुकुंदनगरसारख्या नगरच्या झोपडपट्टीतील भागात (२००३ पासून) स्नेहालय ‘बालभवन’ हा उपक्रम चालवते. बालकांचे आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरणावर बालभवनचा भर असतो. पाठय़पुस्तकातील शिक्षणासोबत कपडे इत्यादी खेळप्रकार आणि शिवणकाम, फॅशन डिझायिनग सारखे व्होकेशनल प्रोग्राम्स शिकवले जातात. आजवर बालभवनमुळे झोपडपट्टीतील ९०० हून जास्त बालकांना प्राथमिक शिक्षणाची संधी मिळाली आहे. १३७५ शाळाबाह्य बालकांना बालभवनने नगरमधील विविध शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला बचत गट स्थापल्याने सावकारांच्या तावडीतून गरीब परिवारांची सुटका झाली आहे. सामाजिक ऐक्य, बालविवाहाची कुप्रथा, आरोग्याची काळजी, व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम या सारख्या विषयांवरही जागृती केली जाते.
आयटी सेंटर
युवक-युवतींना स्वत:च्या पायावर उभं राहण्यास मदत करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विषयाचे तीन अभ्यासक्रम स्नेहालयच्या ‘I T ’तर्फे चालविले जातात. युवकांमध्ये सामूहिक श्रम, देश व समाजासाठी समर्पण या भावना रुजवण्यासाठी २००६ सालापासून वर्षांतून दोनदा श्रमसंस्कार छावणी आयोजित केली जाते. अण्णा हजारे, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त रजनीकांत आरोळे, प्रकाश आमटे अशा मान्यवरांना मार्गदर्शनासाठी बोलावलं जातं.

साऱ्यांची चळवळ..
स्नेहायलयचा व्याप एवढा मोठा असला तरी व्यवस्थापन मात्र उत्कृष्ट आहे. करड 9001:2008 मिळाल्याने त्यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. स्नेहालयमध्ये असलेल्या महिलांची, बालकांची संख्या, त्यांचं आरोग्य याची व्यवस्थित माहिती ठेवली जाते. झोपडपट्टीतील मुलं, त्यांची कुटुंब त्यांच्या उत्पन्नाचं साधन इत्यादी मुद्दय़ावरून वर्गीकरण केलं जातं. उत्कृष्ट व्यवस्थापनात मििलद कुलकर्णीचा मोठा वाटा आहे. मात्र तरीही ही आपली साऱ्यांची चळवळ आहे, हे कुणीच विसरलेलं नाही. स्नेहालयचे सहसंचालक अंबादास चव्हाण म्हणतात ‘वेळ आली तर आम्ही उट सोबतही मीटिंगला बसतो, पण गरज भासली तर संडासही साफ करतो!’

एचआयव्ही मार्गदर्शन केंद्र ‘स्पृहा’
HIV AIDS झालेल्या सुमारे २५०० रुग्णांना स्पृहा समुदाय केंद्राने मनोबल, मोफत उपचार दिले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांसोबत काम करताना भीती नाही वाटत असं विचारलं असता कार्यकर्ते उत्तरतात, ‘जाळातच काम करायचं ठरल्यावर, आगीच्या भीतीने कशाला पळायचं?’
त्यांचा हाच पॉझिटिव्ह दृष्टिकोन आज अनेकांना प्रेरणा आणि नवजीवन देत आहे. अनियमित औषधे घेणाऱ्या व पुढच्या औषधांचे डोस घेऊन न जाणाऱ्या रुग्णांना स्नेहालयचे कार्यकर्ते शोध घेतात आणि त्यांना औषधे वेळेवर घेण्यास प्रवृत्त करतात. एचआयव्हीग्रस्तांना आत्मविश्वास मिळवून देण्यात आणि त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळवून देण्यात ‘स्पृहा’  महत्त्वाची कामगिरी बजावते.

एचआयव्ही- एड्सग्रस्त अनेक मुलं आज स्नेहालयमध्ये आनंदाचं आयुष्य जगत आहेत.

आज स्नेहालयमुळे नगरमधील १८ वर्षांखालील मुलींना वेश्याव्यवसायातून बाहेर काढण्यात यश आलंय. Adoption center मुळे स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाणही कमी होतंय. स्नेहालयने पुढाकार घेऊन ४०० पेक्षा जास्त आंदोलने करून सुस्त पोलीस, राजकारणी यांना विधायक पावले उचलण्यास भाग पाडले आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय्’ हे स्नेहालयचं ब्रीदवाक्य जपत आज अनेक विद्यार्थी अंधारातून प्रकाशाकडे झेपावत आहेत. कुणी CRPF तर कुणी BASF मध्ये गेलंय. कुणी शिक्षक होऊन चांगली पिढी घडवण्याचा विडा उचललाय. तर संतोष सूर्यवंशीसारखे छोटे दोस्तही childline सारख्या इतर उपक्रमांत आपला हातभार लावत आहेत. अंध व्यक्तींसाठी ‘अनाम प्रेम’ हा नवा प्रकल्प उभा राहतोय. स्नेहालयच्या मुलांकडून कुणाला खेळात नाव कमवायचंय तर कुणाला इंजिनीअर व्हायचंय.. त्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे.
मात्र एवढय़ावरच स्नेहालयचे कार्यकर्ते थांबणारे नाहीत. नगरजवळच हिसळक या गावी २५ एकर परिसरात वेश्यावस्तीतील महिलांच्या पुनर्वसनासाठी ‘िहमतग्राम’ हा प्रकल्प उभा राहतोय. तिथे निवासी संकुल, रुग्णालय, शाळा, सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. पहिल्या टप्प्यातील कामाचा खर्च अंदाजे २ कोटी होईल. सर्व उपक्रम चालवण्यास स्नेहालयला जवळपास ३ कोटींचा खर्च होतो आणि वर्षांगणिक तो वाढतच चाललाय. भूकंप, त्सुनामीसारख्या आपत्तींच्या वेळी समाजाचा तिरस्कार सहन करत आलेल्या नगरच्या वेश्यांची मदत सर्वात आधी पोहोचली आहे. गेल्या २८ वर्षांमध्ये स्नेहालयाच्या कामाचा विस्तार विविध बाजूनी झालेला आहे. त्या सर्व प्रवृत्ती व गिरीष कुलकर्णी यांच्या पुढच्या प्रवासाबद्दल आपण एकदा ‘ स्नेहालय ’ भेट द्या

 • पत्रव्यवहारासाठी पत्ता

  पत्ता- स्नेहालय,२३९, एम.आय.डी.सी. निबळक गाव,
  अहमदनगर-४१४०११.

 • दूरध्वनी

  Phone 0241-2778353

  मोबाईल क्रमांक- ९०११०२०१७१, ९०११२०१८०, ९०११०२६४७२

 • ई-मेल

  Email : info@snehalay.org,