सोळा संस्कार हे हिंदू धर्मीयांचे संस्कार विधी आहेत. हे संस्कार मानवी मूल्याशी निगडीत बाब आहे. गर्भधारनेपासून ते विवाहापर्यंत हिंदू व्यक्तीवर, आईवडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हटले जाते. सात्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा संस्कार विधी करण्यामागचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व संवर्धन करणे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्कारांचा पाया आहे. गुह्यसुत्रामध्ये यावर बरीच चर्चा केली आहे. अनेक ग्रंथामध्ये या संस्काराच्या विषयावर लिखाण केले गेले आहे. हिंदूंच्या पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे. संस्कार हा साधनेचा हि विषय आहे. संस्कारामुळे ईश्वराचे स्मरण होते. माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत पुरुष निर्माण व्हावे. त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

हिंदू धर्मातील सोळा संस्कार (षोडश संस्कार) :

१. गर्भाधान

गर्भाधान म्हणजे योग्य दिवशी,योग्य वेळी,पवित्र व मंगलमय वातावरणात आनंदी मनाने स्त्री-पुरुषांचे मिलन होऊन स्त्री चे गर्भाशयात गर्भाची बीज रुपाने स्थापना होणे.रजोदर्शनापासुन १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होउ शकतो.या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासुन पहील्या चार रात्री वर्ज्य कराव्या.अशुभ दिवस,ग्रहणदिवस,कुयोग त्या दिवशी असु नये. समरात्री संभोग केल्यास पुत्र व विषमरात्री संभोग केल्यास कन्या संतति होते, असा समज आहे.

या दिवशी स्त्रीला सुशोभीत आसनावर बसवितात,ओवाळुन औक्षण करतात.तिने चांगले दागीने,फुलमाला,(गजरा)इ.परीधान करावे.नंतर, पतीशी मिलन करावे.

सोळा संस्कारांपैकी पहिला संस्कार. शौनकाने त्याची व्याख्या अशी दिली आहे- निषिक्तो य्त्प्रयोगेण गर्भ: सन्धार्यते स्त्रिया | तद् गर्भालम्बनं नाम कर्म प्रोक्तं मनीषिभि: || ज्या कर्माच्या पूर्तीने स्त्री पतीद्वारा प्रदत्त अशा गर्भाचे धारण करते त्याला विद्वान लोक गर्भाधान असे म्हणतात.

मुहूर्त

हा संस्कार विवाहानंतर प्रथम रजोदर्शन झाल्यापासून (मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून) पहिल्या सोळा रात्री, ज्यास ‘ऋतूकाल’ म्हणतात, त्या वेळी करतात. त्यांत पहिल्या चार, अकरावी आणि तेरावी रात्र सोडून शेष दहा रात्री या संस्कारास योग्य समजाव्या. कित्येकदा ‘चौथा दिवसही घ्यावा’, असे म्हणतात. गर्भाधानसंस्कारास चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, अमावास्या आणि पौर्णिमा या तिथी वर्ज्य कराव्यात. उर्वरित कोणत्याही तिथीस आणि सोमवार, गुरुवार, शुक्रवार या वारी, श्रवण, रोहिणी, हस्त, अनुराधा, स्वाती, रेवती, तिन्ही उत्तरा, शततारका या नक्षत्री उत्तम चंद्रबळ पाहून गर्भाधानविधी करावा. प्रकृतीतील प्रत्येक गोष्ट कालानुसार पालटत (बदलत) असते. केवळ ब्रह्म स्थिर असते. या नियमानुसार स्त्रीबीज फलित होणे, पुत्र किंवा कन्या होणे इत्यादी गोष्टीही काळानुसार पालटत असतात. या नियमानुसार कोणती तिथी, वार आणि नक्षत्र पुत्र किंवा कन्या होण्यास पूरक असते, हे निश्चित केले गेले आहे.

विधी

अश्वगंधा किंवा दूर्वा रससेवन

पतीने स्त्रीच्या पाठीमागे उभे राहून मंत्र म्हणून तिच्या उजव्या नाकपुडीत अश्वगंधा किंवा दूर्वा यांचा रस पिळावा. तो रस पोटात गेल्यावर स्त्रीने आचमन करावे. उजवी नाकपुडी पिंगळानाडीची आहे. बहुतेक कार्ये यशस्वी होण्यासाठी पिंगळानाडी कार्यरत असणे पूरक ठरते. अश्वगंधा किंवा दूर्वा यांच्या रसाने ती नाडी कार्यरत होते.

प्रजापतिपूजन

गर्भाधान आणि विवाह या संस्कारांची प्रमुख देवता प्रजापति आहे. या देवतेच्या सुवर्णप्रतिमेची कलशावर स्थापना करून अष्टदिक्पाल आणि नवग्रहांसहित षोडषोपचारे पूजन करतात. (पाठभेद : या संस्काराला देवतास्थापन नसते.)

ओटी भरणे

सूर्यस्तवन झाल्यावर पाच सुवासिनींनी फळांनी स्त्रीची ओटी भरावी आणि तिच्या पतीच्या हाती विड्याच्या दोन पानांवर ठेवलेला नारळ द्यावा. नंतर स्त्री आणि तिचा पती यांनी देव आणि वडील यांस नमस्कार करून भोजन करावे. सूर्य हे तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. गर्भ तेजस्वी व्हावा; म्हणून सूर्यस्तवन करतात. ओटीपोटातील ओटीत स्त्रीचे गर्भाशय असते. गर्भधारणा व्हावी; म्हणून ओटी भरण्याची पद्धत आहे.

संभोगविधी

रात्री स्त्रीने श्वेतवस्त्र परिधान करावे. निजण्याच्या खोलीतील मखरात पुष्पाची शेज केलेल्या पलंगावर उभयतांनी बसून विडे खाऊन स्त्रीने आडवे पडावे. पुरुषाने तिच्या नाभीप्रदेशी हात ठेवून (उपस्थस्पर्श) मंत्र म्हणून गर्भाधानविधीस प्रारंभ करावा. मंत्राचा अर्थ असा आहे : ‘गर्भधारणार्थ तुझ्या योनीला समर्थ करून, ईश्वर तुझ्या ठायी गर्भधारणा करो. गर्भाची वृद्धी सुखपूर्वक होवो आणि दहा (चांद्र) मासांचे पूर्वी तो पतन न होवो, अशी ईश्वर कृपा करो.’ यानंतर तीन बोटांनी उपस्थास (योनीस) स्पर्श करावा. नंतर स्त्रीसह संभोग करावा आणि ‘तुझ्या प्राणात (बीजात) रेत धारण करतो’, असे म्हणावे. नंतर मंत्र म्हणावा.

त्या मंत्राचा अर्थ असा आहे : ‘जशी पृथ्वी ही अग्नीने गर्भवती आहे, जशी याही इंद्राच्या योगाने गर्भवती आहे, जसा वायू हा दिशांचा गर्भ आहे, अशा रीतीने मी तुला गर्भधारणा करवितो.’ शेवटी स्त्रीच्या हृदयास स्पर्श करून आचमन करावे, म्हणजे हा विधी पुरा झाला. हृदयास स्पर्श करणे हे स्नेह आणि प्रेम यांचे प्रतीक आहे.

अष्टमांगल्य (आठांगुळे)

ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांत हा संस्कार करतात. गर्भाधानसंस्कार न करता गर्भधारणा झाल्यास आठव्या मासात हा लौकिक संस्कार करतात. याचा विधी गर्भाधानाप्रमाणे आहे.’

२. पुंसवन

पुंसवन कर्म हे गर्भ राहिल्यापासून तिसऱ्या -चौथ्या महिन्यात करावयाचे कर्म आहे.

पौरुषपूर्ण व सुदृढ संतती निमाण होण्यासाठी करावयाचा हा संस्कार आहे.

सुदृढ आणि स्वास्थ्यपूर्ण संततीच्या जन्मासाठी म्हणून हा संस्कार केला जातो.

३. अनवलोभन

अनवलोभन (न अवलुप्यते गर्भोऽनेन)) हा सोळा संस्कारांपैकी तिसरा संस्कार असून पुंसवन कर्मासारखाच करावयाचा हा संस्कार आहे. हा संस्कार गर्भ राहिल्यानंतर चौथ्या महिन्यात करत. आश्वलायन गृह्यसूत्रांत पुंसवन संस्कारानंतर हा संस्कार सांगितला आहे. अनवलोभन संस्कारापासून तीन हेतु साध्य होतात, असे सांगितले जाई..

  • गर्भ बलवान होतो,
  •  गर्भपाताची शक्यता कमी होते.
  • मूल दिवस पुरे झाल्यानंतर जन्म पावते. हा संस्कार पतीने, किंवा तो नसेल तर दीर इत्यादिकांनीं केला तरी चालतो.

४. सीमंतोन्नयन

सीमंतोन्नयन हा आश्वलायन गृह्यसूत्र या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे सोळा संस्कारातील एक महत्त्वाचा संस्कार आहे. या विधीमध्ये पतीने आपल्या गर्भवती पत्नीचा भंग(?) पाडणे असा विधी अभिप्रेत आहे. आधुनिक काळातील दोहद्पूर्ती किंवा डोहाळेजेवण या प्रथांचे प्राचीन रूप या संस्कारात आहे असे मानले जाते.

स्वरूप

या विधीमध्ये पती सकाळी स्नान- संध्या आणि यज्ञातील आहुती इ. धार्मिक कृत्ये पूर्ण करतो. त्यानंतर साळींदराच्या काट्याने आपल्या तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा भंग पाडतो. या काट्यावर तीन ठिपके असणे अपेक्षित असते असे नोंदविलेले दिसते. सीमंत म्हणजे भंग आणि उन्नयन म्हणजे उचलणे. अग्नीत आहुती देवून गर्भवती व गर्भाच्या रक्षणासाठी देवतांना प्रार्थना केल्या जातात. गर्भवती पत्नीच्या मनाचे रंजन होईल असे गायन-वादन इ. कार्यक्रम यानंतर योजावेत असेही सूत्रकार नमूद करतात.

५. जातकर्म

जातकर्म हा हिंदूंच्या सोळा संस्कारापैकी एक संस्कार आहे. या संस्कारात सांगितले जाते की, पित्याने, कन्या/पुत्र झाला आहे हे ऐकताच अंगावरच्या वस्त्रासहित सचैल स्नान करावे. अपत्याच्या नाभीच्छेदनापूर्वी हा संस्कार करावा असे मत आहे.

६. नामकरण

जन्मदिवसापासून १०वे/१२वे दिवशी अपत्याचे नामकरण करावे असा नियम आहे. अन्यथा शुभदिवशी, शुभवारी, शुभयोगावर नामकरण करावे.नक्षत्राच्या अवकहडा चक्राप्रमाणे, जन्मनक्षत्राचे चरणाक्षर घेउन,त्यावर सुरु होणारे नाव, मुलाच्या उजव्या कानात तर मुलीच्या डाव्या कानात सांगावे. त्यावेळेस मंगल वाद्ये वाजवावित. हे जन्मनाव होय. व्यावहारीक नाव वेगळे.ते शुभ असावे. देवतावाचक, नक्षत्रवाचक, इ.चांगले नाव ठेवावे. नावात ऋ,लृ हे स्वर वर्ज्य करावे. पुरुषांच्या नावात समसंख्यांक व स्त्रियांचे नावात विषमसंख्यांक अक्षरे असावी असा सर्वसधारण नियम आहे. बालकाचा जन्म हा कुटुंबातील शुभप्रसंग!त्या बालकाला नाव देण्याचे महत्त्व हिंदू परंपरेत सांगून ठेवले आहे.बालकाचे नाव म्हणजे परमेश्वराच्या एका शक्तीला मारलेली हाक! त्या बालकाकडून त्याच्या आयुष्यातील अपेक्षित कार्याचे नाव !त्या बालकाला नकळत करावयाचे प्रेरणा जागरण!नाव ठेवण्याचा हा मूळ हेतू.

रूढी :

नामकरण संस्काराच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. मुलाचे १२ वे दिवशी आणि मुलीचे ११ वे दिवशी बारसे करण्याची (नामकरण विधी) रूढी असून काही कुळांत ४० दिवसांनंतर बारसे करण्याची पद्धत आहे. मुलाच्या बारशाच्या वेळी आईने कुलदेवतेची पूजा करून तिची प्रार्थना करून नामकरणाची रूढी आहे.

  • पालकारोहण (मुलाला पाळण्यात घालणे) : जन्मदिवसापासून बाराव्या किंवा तेराव्या दिवशी पालकारोहण हा विधी करतात. त्या वेळी पालकारोहण (मुलाला पाळण्यात घालणे) हा महत्त्वाचा विधी असतो.
  • पाळणागीत : मुलाला पाळण्यात घालतांना (पालकारोहण विधीच्या वेळी) पाळणागीत म्हणण्याची पद्धत आहे. अशा शुभ प्रसंगी देवतांची पाळणागीते म्हटल्यामुळे वातावरण सात्त्विक बनते.
  • यजमानाने पुरोहितांस उद्देशून, ‘हे पुरोहितहो, बालकाचे अमुक नाम मी ठेवतो’ यासाठी अनुमोदन घ्यावे. पुरोहितासारख्या उन्नताने संमती दर्शविल्याने बाळाचे नाव आणि रूप एक व्हायला साहाय्य होते.

अ. पहिले नाव

काशाच्या ताटात तांदूळ पसरून त्यांवर सोन्याच्या सळईने ‘अमुक (कुलदेवतेचे नाव) कुलदेवताभक्त’, असे लिहावे. नंतर जन्मकालाच्या मासाचे नाव (मासनाम) लिहावे.

आ. दुसरे नाव

ज्या नावाने नमस्कार करावयाचा ते नाव (ज्या नावाने मुलाच्या वतीने त्याचे वडील पुरोहितांना नमस्कार करतात, ते नाव.) हळूच उच्चारावे. ते नाव उपनयन होईपर्यंत आई-वडिलांनीच जाणावे. इतरांना ते नाव कळू नये. यातला उद्देश हा की, करणी आदी करणार्‍यांना खरे नाव न कळल्यास ते करणी करू शकत नाहीत. उपनयनानंतर मुलाला ‘अमुक नावाने तू नमस्कार कर’, असे म्हणून ते नाव सांगावे.

इ. तिसरे नाव

ज्योतिषशास्त्रातील अवकहडा-चक्रानुसार जन्मनक्षत्राच्या चरणावरून नाम ठेवावे.

र्इ. चौथे नाव

हे व्यवहार करण्याकरिता आपल्या मनाप्रमाणे असते.

७. सूर्यावलोकन

सूर्याचे तेज आणि ऊर्जा नवजात बालकामध्ये यावी यासाठी त्याला सूर्यदर्शन करण्याची पद्धती आहे. वस्तुत: पूर्वी अंधा-या खोलीत बाळ आणि माता यांची व्यवस्था केलेली असे. त्यामुळे त्यांनी काही काळानंतर प्रकाशाचा, उजेडाचा अनुभव घेणे यासाठी अशी योजना या संस्कारात केली असावी.

८. निष्क्रमण

संततीच्या जन्माच्या चौथ्या महिन्यात निष्क्रमण विधी करण्यात येतो. जन्माच्या काही दिवसांपर्यंत मुलाला घरातून बाहेर काढले जात नाही. असे मानले जाते की या वेळी बालक सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आणू नये, कारण त्या व्यक्तीच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, विशेषत: डोळे डोळ्यांना नुकसान होण्याची अधिक शक्यता असते. म्हणून, जेव्हा बालक शारीरिकरित्या सुदृढ होते, तेव्हाच त्याला घराबाहेर नेणे आवश्यक आहे म्हणजे निष्क्रमण करणे आवश्यक आहे.

अथर्ववेदात या संस्कारांशी संबंधित खालील मंत्र आढळतो –

शिवे ते स्तां द्यावापृथिवी असंतापे अभिश्रियौ।

शं ते सूर्य आ तपतुशं वातो वातु ते हृदे।

शिवा अभि क्षरन्तु त्वापो दिव्या: पयस्वती:।।

विधी :

निष्क्रमण संस्काराच्या दिवशी सकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात गुळ, लाल फुलाच्या पाकळ्या इत्यादीचे मिश्रण करावे व सदर पाण्याचे अर्घ्य सूर्यदेवतेस अर्पण करून सूर्यदेवतेस आशीर्वाद देण्यासाठी आवाहन करावे. संस्काराच्या प्रसादास अर्पण करताना सर्वप्रथम गणेश, नंतर गोमाता, सूर्यदेव, आपले पितर व कुलदेवतेस भोजनाची थाळीस्वरुपात अर्पण करावी. बालकास मंदिरात नेऊन आणल्यावर बैलास (लाल बैल असा उल्लेख विधींमध्ये आढळतो) सव्वा किलो गहू व सवा किलो गुळ अर्पण करावा. सूर्यास्ताच्या वेळेस सूर्यास बालकास आशिर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद द्यावे व तद्नंतर चंद्राचे दर्शन घडवावे. निष्क्रमण विधीपश्चात बालकास बाहेर कोठेही नेण्यास निषेध नाही.

९. अन्नप्राशन

अन्नप्राशन संस्काराने आईच्या गर्भात असतांना घडलेल्या मलमूत्रादी भक्षणाचा दोष नाहीसा होतो.

मुहूर्त

मुलास सहावा किंवा आठवा मास आणि कन्येस पाचवा किंवा इतर विषम मास अन्नप्राशनास योग्य आहेत. (सम संख्या पुरुषवाचक, तर विषम संख्या स्त्रीवाचक असतात.) परंतु आजकालच्या प्रदुषण युगास गृहीत धरुन वैद्यकीय सल्ला देखील घेणे उचित.

विधी

‘माझ्या बालकाला मातेच्या गर्भातील मलाचे प्राशनापासून झालेल्या दोषांचा नाश, शुद्ध अन्न इत्यादीकांची प्राप्ती, ब्रह्मवर्चसाचा (तेजाचा) लाभ, इंद्रिये आणि आयु यांची सिद्धी, बीजगर्भापासून झालेल्या पापांचे निरसन यांद्वारे श्री परमेश्वराची प्रीती होण्याकरिता ‘अन्नप्राशन’ नावाचा संस्कार करतो. त्याचे अंगभूत श्री गणपतिपूजन, स्वसि्तवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध करतो.’ असा संकल्प करून तद्पश्चात देवतेच्या पुढे आपल्या उजवीकडे शुभ्र वस्त्रावर आईच्या मांडीवर पूर्व दिशेला तोंड करून बसलेल्या बालकास प्रथम अन्नप्राशन करवावे. दही, मध, तूप यांनी युक्त असे अन्न सोन्याच्या अथवा काशाच्या पात्रात ठेवून ‘हे अन्नपते ईश्वरा, आम्हाला आरोग्यकारक आणि पुष्टीदायक अन्न दे’, असे म्हणून सुवर्णयुक्त हस्ताने (हातात सोने घेऊन) अन्न घेऊन पहिला घास द्यावा. मग पोटभर जेवण झाल्यावर मुख धुऊन बालकाला भूमीवर बसवावे.

१०. वर्धापन

जन्मकालापासुन एक सौरवर्ष पुर्ण झाल्यावर जन्मनक्षत्राचे दिवशी बालकाचा वाढदिवस करावा.

तीळगूळ आणि दूध यांच्या मिश्रणाचे प्राशन, नारीनीराजन (सुवासिनींनी ओवाळणे), अभिषेक, विविध सूक्तांचे पठण इत्यादि धार्मिक विधी यथाशक्ति करावेत. विविध सूक्तांमध्ये सप्तचिरंजीवप्रार्थना, ब्रह्मणस्पतिसूक्त, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, रुद्र (किंवा रुद्रसूक्त), शांतिसूक्त, इतिवाइतिसूक्त, अग्निमीळेसूक्त, समुद्रज्येष्ठासूक्त, परंमृत्योसूक्त, पवमानसूक्त इत्यादी सूक्ते यशाशक्ती, यथावकाश पठण करावीत.

११. चूडाकर्म

यास मुंडनसंस्कार असेही म्हटले जाते.मुलाच्या वयाच्या पहिल्या किंवा तिसऱ्या किंवा पाचव्या वर्षी हा संस्कार करण्याचा संकेत आहे. या संस्कारामागे शुचिता आणि बौद्धिक विकास ही संकल्पना आहे. या संस्कारामुळे जन्माच्या वेळी उगवलेले डोक्यावरील अपवित्र केस काढून टाकले जातात. नऊ महिने आईच्या गर्भात राहिल्याने जन्मतः उगवलेले केस दूषित मानले जातात. चूड़ाकर्म संस्कारामुळे हे दोष दूर होतात. वैदिक मंत्रोच्चारांसोबत हा संस्कार संपन्न होतो.

शास्त्र :

अ. आयुष्य, बल आणि तेज यांची वृद्धी व्हावी; म्हणून चौलकर्म (शेंडी ठेवणे) हा संस्कार करतात. शेंडीमुळे विश्वातील सत्त्वलहरी ब्रह्मरंध्रातून आत येण्यास साहाय्य मिळते.

आ. ‘शेंडीच्या ठिकाणी मेधा शक्ती जागृत झाली की, तिने तेथेच नित्य (कायम) रहावे (आमचा विवेक नेहमी जागृत रहावा) हा चौलकर्म करण्याचा उद्देश आहे. यावरूनच ‘खूण गाठ बांधणे’ आणि ‘शेंडीला गाठ मारणे’, असे म्हटले जाते.’

मुहुर्त :

हा संस्कार तिसर्‍या, चौथ्या किंवा पाचव्या वर्षी (पाठभेद : पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या किंवा पाचव्या वर्षी) शुभघटिका पाहून करण्याची वहिवाट आहे. सध्या बहुधा मुंजीच्या वेळी हा विधी करतात.

चौलकर्माशी संबंधित एक कृती – जावळ (जाऊळ, जायवळ, प्रथमकेशखंडन)

शास्त्रानुसार मुलगा असल्यास ६, ८, १० इत्यादी सम मासात, तर मुलगी असल्यास १, ३, ५ इत्यादी विषम मासात जावळ काढावे. रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे होते, त्या सुमारास त्याचे जावळ काढतात. त्या वेळी डोक्याच्या पुढच्या भागावर थोडेसे केस ठेवतात. थोडे केस ठेवण्याचे महत्त्व सूत्र ‘उद्देश’ यावरून लक्षात येईल. एक वर्षाच्या आत जावळ काढले पाहिजे, नाहीतर तीन वर्षे काढता येत नाही, अशी अनेकांची समजूत आहे; पण त्यास शास्त्राधार नाही. तीन वर्षांपर्यंत केव्हाही सममासात योग्य दिवस पाहून जावळ काढावे.

जावळ काढणे म्हणजे चौलकर्म नाही. (जावळ काढतांना शेंडी ठेवत नाहीत.)

१२. अक्षरारंभ

अक्षरारंभ म्हणजे अक्षरांचा आरंभ, हा हिंदूंच्या सोळा संस्कारापैकी एक संस्कार आहे. याची शिकवण पुढीलप्रमाणे आहे — बालकाला वयाच्या पाचव्या वर्षी सूर्य उदगयनात असतांना अक्षरे काढण्यास शिकविण्यास आरंभ करावा. योग्य दिवशी व वारी, शुभ योग, शुभ पक्ष इत्यादी बघून सुरुवात करावी. या वेळी, गणपती, लक्ष्मी, विष्णू, सरस्वती, वेद, गुरूजन, ब्राह्मण यांचे पूजन करून त्यांना वंदन करावे. सर्वप्रथम, ॐ (ओम) लिहून मग दुसरी अक्षरे लिहावी.

संदर्भ : सुलभ जोतिष शास्त्र-लेखक-ज्योतिषी कृष्णाजी विठ्ठल सोमण

१३. उपनयन

मुंज/उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे.हा कुमाराचा एक प्रमुख संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांतील पुरुषांसाठीच सांगितला आहे. याला मौंजीबंधन व व्रतबंध अशीही नावे आहेत.

उपनयनाची संस्कृतमध्ये व्याख्या अशी- गृह्योक्तकर्मणा येन समीपं नीयते गुरो:| बालो वेदाय तत् योगात् बालस्योपनयं विदु:|| अर्थ:ज्या गृह्यसूत्रोक्त कर्माने बाळाला वेदाध्ययनासाठी गुरूजवळ नेले जाते त्याला “उपनयन” असे म्हणतात.

या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.

काही वर्षांपर्यंत फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य वर्णांतील पुरुषांना हा संस्कार करवून घेण्याचा अधिकार असे. नवीन मतप्रणालीनुसार, विशेषत: नागरी महाराष्ट्रात, हे बंधन शिथिल होत चालले आहे. धर्म/जातींविषयी निरपेक्षता/उदासीनतेचा हा प्रभाव आहे.

उपनयन म्हणजे काय?

गायत्रीमंत्राचा उपदेश, ‘देवसवितरेष ते ब्रह्मचारी’ आणि मंगलाष्टकानंतर बटूचे आचार्य जे मुखनिरीक्षण करतो, यापैकी प्रत्येकाला उपनयन समजणारे तीन पक्ष होतात. वेदाध्ययनाला सुरवात या दृष्टीने गायत्रीमंत्राच्या उपदेशाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात येते. आपल्या हिंदू धर्माचा, या विश्वाचा मूळ जो प्रजापति त्याला बटु(कुमर) अर्पण करणे हा ऐतिहासिक व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्याचे सोळा संस्कारात परंपरा या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. यज्ञोपवीत जानवे वगैरे प्रजापतीचे रूप घेण्याची साधने आहेत. उपनयन म्हणजे आपला मूळ जो प्रजापति, आत्म्याने त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे, त्याची विद्या आपण मिळविण्याचा प्रयत्न करणे, केवळ या प्रमाणावरून पाहता ज्यांना वेदाधिकार पाहिजे असेल त्यांनी हा संस्कार करावयाचा आणि वैदिक व्हावयाचे असा मूळ उद्देश उपनयन संस्कारात दिसतो. सर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. तसेच त्याला वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो.

महत्त्व

शास्त्रतः हा संस्कार त्रैवर्णिकांना करण्याचा अधिकार आहे. परंतु सध्या हा संस्कार विशेषतः ब्राह्मणात, फार थोड्या क्षत्रियात आणि वैश्यात करण्यात येतो. याला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे.म्हणूनच मुंज झालेल्या व्यक्तीला ‘द्विज’म्हणतात. पहिला जन्म आई-बापांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो, असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.

उपनयन म्हणजे गुरुंच्या जवळ जाणे. गुरुच्या जवळ राहून , ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे ,एकाग्रचित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वत:ला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. सारांश, ब्रह्मचारी म्हणून स्वत:च्या शरीराला , मनाला आणि बुद्धीला जाणीवपूर्वक वळण लावावे लागते. ज्याप्रमाणे कंदिलाच्या बाहेरची काच जर खराब असेल तर दिव्याच्या वातीचे तेज बाहेर नीट पडत नाही ; त्यासाठी कंदिलाची काच स्वच्छ असावी लागते त्याप्रमाणे योगाची जी आठ अंगे आहेत त्यांचे अनुष्ठान केल्याने चित्तातील अशुद्धीचा क्षय होत जातो आणि ज्ञानशक्ती प्रदीप्त होते आणि प्रज्ञेचा विकास होतो. १ भारतीय संस्कृतीत प्रत्येक आश्रमानुसार ब्रह्मचर्याचे स्वरूप वेगवेगळे सांगितले आहे. पण प्रत्येक टप्प्यावर ब्रह्मचर्याचा अभ्यास करीत असताना आपली संयमशक्ती वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यासाठीही योगाभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.[१]

प्राचीनत्व

धार्मिक विद्यांचे अध्ययन या अर्थी ब्रह्मचर्य या शब्दाचा प्रयोग केला जातो.

उपनयनाचा काल

प्रत्येक वर्णाच्या लोकांना उपनयनाचा काल वेगळा सांगितला आहे. आठ, अकरा व बारा अशा क्रमाने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांना काल सांगितला आहे. अनुक्रमे सोळा, बावीस व चोवीस वयाच्या पुढे तरी उपनयन न करता राहणे उपयोगी नाही. (आश्व. १-१९).तरी प्रगत महाराष्ट्रात हा विधी ब्राह्मणांत वयाच्या आठव्या वर्षी, क्षत्रियांत सोळाव्या वर्षापर्यंत, तर वैश्यांमध्ये बाराव्या वर्षी करण्याचे संकेत आहेत.

काही गौण विधी

घाणा भरणे हा एक धार्मिक विधीपेक्षाही महत्त्वाचा विधी होऊन बसला आहे. वास्तविक घाणा भरणे म्हणजे सर्व कार्याची तयारी झाल्यामुळे उखळ, मुसळ वगैरे व्यवस्थित बांधून बाजूस ठेवणे. परंतु त्याला आता एका रूढीचे महत्त्व आले आहे. पूर्वी दारापुढे मांडव घालून कार्य होत असे पण आता मंगल कार्यालयात कार्य होत असल्याने मंडपप्रतिष्ठा हीसुद्धा अशीच रूढी झाली आहे. मांडव न घालता मंडपाच्या वेगवेगळ्या भागावर स्थापन करावयाच्या देवता सुपात मांडून ठेवावयाच्या ही गोष्ट केवळ प्रतिकात्मक होऊन बसते. तसेच पूर्वांगात आणि उत्तरांगात अनेक अनावश्यक विधी शिरले आहेत. ते काढून टाकून विधीचे स्वरूप मुख्य भागावर आणून बसविणे हे आपले कर्तव्य आहे.

अधिकारी

उपनयन करण्यास मुख्य अधिकारी वडील होय. त्यानंतर आजोबा , भाऊ, जातीचा कोणी तरी हे होत. ज्याची मुंज करावयाची त्याच्यापेक्षा तो वयाने मोठा असावा.

१४. समावर्तन ( सोडमुंज)

हिंदू धर्म संस्कारातील समावर्तन हा संस्कार द्वादश संस्कार आहे. यास सोडमुंज असेही म्हणतात. उपनयनास जो काल शुभ आहे, त्याकाली समावर्तन करावे. गुरूकुलातून अभ्यास संपवून परत स्वत:च्या घरी परत येण्यापूर्वी गुरू सर्व शिष्यांचा समावर्तन संस्कार करीत असत. यावेळी गुरूला दक्षिणा दिली जात असे. मुंज झाल्यावर गुरुच्या घरी शिकायला गेलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी गुरुच्या घरीच रहात असे. त्यामुळे शिक्षण संपल्याची अंतिम अधिकृत परवानगी म्हणूनही या संस्काराकडे पाहिले जायचे. या समयी गुरू आपल्या शिष्याला गृहस्थ आश्रम संबंधात श्रुतिसंमत आदर्शपूर्ण उपदेश करत असत गृहस्थाश्रम प्रवेश करण्यासाठी प्रेरित करतात.

संदर्भ : सुलभ जोतिष शास्त्र-ले.-ज्यो. कृष्णाजी विठ्ठल सोमण

१५. विवाह

जीवनात घडणार्‍या प्रमुख सोळा प्रसंगी ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी करावयाचे संस्कार हिंदु धर्माने सांगितले आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा ‘विवाहसंस्कार’ !

वधूला पित्याच्या घरून आपल्या घरी नेणे म्हणजे ‘विवाह’ किंवा ‘उद्वाह’ होय. विवाह म्हणजे पाणिग्रहण, म्हणजे वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात धरणे. पुरुष स्त्रीचा हात धरतो; म्हणून विवाहानंतर स्त्रीने पुरुषाकडे जावे. पुरुषाने स्त्रीकडे जाणे चुकीचे आहे.

अ. हिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे.

आ. स्त्री-पुरुषांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी विवाहाशी संबंधित असतात, उदा. स्त्री-पुरुष यांच्यामधील प्रेम, त्यांच्यातील संबंध, संतती, जीवनातील अन्य सुखे, समाजातील स्थान आणि जीवनातील उन्नती.

विवाहविधी

विवाहापूर्वी मुहूर्त करणे, हळकुंड फोडणे,असे काही विधी घरातील महिला करतात.

लग्नाच्या आधी हळद लावणे, घाणा भरणे, ग्रहमख असे विधी करण्याची प्रथा आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी सीमांतपूजन केले जाते.

१. मंडपदेवताप्रतिष्ठा

विवाह, उपनयन इत्यादी संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावेत, या उद्देशाने, मंडपदेवता आणि अविघ्नगणपति यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे; यालाच देवक बसविणे असे म्हणतात.

२. मंगलाष्टके अन् अक्षतारोपण विधी

मंगलाष्टके पूर्ण झाल्यावर अंतःपट उत्तरेकडून काढून घेतात. नंतर वधू-वर हातातील तांदुळ, गूळ, जिरे एकमेकांच्या मस्तकावर टाकतात. प्रथम वधू वराला आणि नंतर वर वधूला माळ घालतो.

लग्नामध्ये अक्षता वापरण्याचे कारण : लग्नामध्ये अक्षता वापरणे, हे वधु-वरांच्या डोक्यावर झालेल्या देवतांच्या कृपावर्षावाचे प्रतीक आहे. लग्नविधीमध्ये वापरल्या जाणार्‍या अक्षता या कुंकू लावलेल्या असतात. लाल कुंकवाकडे ब्रह्मांडातील आदिशक्तीचे तत्त्व आकृष्ट होते.

आदिशक्तीचे तत्त्व आकृष्ट झालेल्या अक्षतांचा वर्षाव वधु-वरांच्या डोक्यावर झाल्याने वधु-वरांमधील देवत्व जागृत होऊन त्यांच्या सात्त्विकतेत वाढ झाल्याने साहजिकच त्यांची लग्नविधीच्या ठिकाणी आलेल्या देव-देवतांच्या लहरी आकृष्ट करून घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे अशा देव-देवतांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सोहळ्याचा अपेक्षित लाभ वधु-वरांना मिळणे शक्य होते. अक्षतांचे तांदूळ अखंड असावेत.

३. कन्यादान

वधूचे वरास दान देणे, यास कन्यादान म्हणतात. ‘ही कन्या ब्रह्मलोकाची प्राप्ती करून घेण्याच्या इच्छेने आपणांस विष्णूप्रमाणे समजून देतो’, असे वधूपिता म्हणतो.

४. मंगलसूत्रबंधन

मंगळसूत्रात दोन पदरी दोर्‍यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी ४ छोटे मणी आणि २ लहान वाट्या असतात. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन, २ वाट्या म्हणजे पती-पत्नी तसेच ४ काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ.

मंगळसूत्रामधील काळे मणी आणि वाट्या यांचा आध्यात्मिक अर्थ

मंगळसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाचे, तर दुसरी वाटी शक्तीचे प्रतीक असते. शिव-शक्तीच्या बळावरच वधूने सासरच्या मंडळींचे रक्षण आणि सांभाळ करावयाचा असतो. या दोन वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी हिंदु धर्माने दिलेल्या परवानगीतील आदान-प्रदानाचे दर्शक आहे. माहेरच्या वाटीत हळद, तर सासरच्या वाटीत कुंकू भरून, कुलदेवीला स्मरून, मंगळसूत्राची पूजा करून मगच ते गळ्यात घातले जाते.

५. विवाहहोम

वधूचे ठायी भार्यत्व सिद्ध होण्यासाठी आणि गृह्याग्नि सिद्ध होण्याकरिता विवाहहोम करतात.

६. पाणिग्रहण आणि लाजाहोम

पाचही बोटांसह वधूचा उताणा हात वराने स्वतःच्या हातात धरणे, याला पाणिग्रहण म्हणतात. लाजा म्हणजे लाह्या. वर आपल्या दोन्ही हातांनी वधूची ओंजळ धरून त्यातील सर्व लाह्या होमात अर्पण करतो. मग होमपात्रे, उदककुंभ आणि अग्नि या सर्वांना वधूचा हात धरून तिला आपल्या मागून घेऊन प्रदक्षिणा घालतो.

७. सप्तपदी

सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अपरिवर्तनीय होतो.

सप्तपदीचा भावार्थ

वधू-वरांनी गत सात जन्मांतील सर्व संस्कार मागे टाकून एकमेकांना पूरक वैवाहिक जीवनाला प्रारंभ करणे.

अन्नलाभासाठी पहिले, ऊर्जेसाठी दुसरे, समृद्धीसाठी तिसरे, सुखसमृद्धीसाठी चौथे, उत्तम संततीसाठी पाचवे, विविध ऋतूंच्या सुखासाठी सहावे आणि मैत्रीच्या सहृदय नात्यासाठी वधू-वर एकत्रपणे सातवे पाऊल चालतात. याला सप्तपदी असे म्हणतात.

हा विधी करताना यज्ञवेदीच्या भोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्घ्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताचा सतत मंत्रोच्चार चालू असताना वधू-वर यज्ञवेदीभोवती प्रदक्षिणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधू तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदन्यासाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात. ईशान्य दिशेकडे संपणारी सप्तपदी मांडली जाते. ईशान्य ही अपराजिता दिशा मानली असल्याने वधूनेही त्या दिशेने जाण्याचा संकेत रूढ आहे.

८. वधूगृहप्रवेश

वरात घरी येताच वधू-वरांवरून दहीभात ओवाळून टाकतात. वधू घरात प्रवेश करतांना उंबर्‍यावर तांदूळ भरून ठेवलेले माप उजव्या पायाने लवंडून आत जाते. याला वधूगृहप्रवेश म्हणतात.

या जोडीने विवाह संस्कारात गणपती पूजन, कुलदेवता पूजन, मधुपर्क, संकल्प, कन्यादान किंवा स्वयंवर, अक्षतारोपण, मंगल सूत्र बंधन, पाणिग्रहण, होम, लाजाहोम, अश्मारोहण, सप्तपदी, अभिषेक, कर्मसमाप्ती, मंगलाष्टके असे विधी होतात. *त्याशिवाय काही ठिकाणी कंकण बंधन, कानपिळी, गाठ बांधणे, झाल, रुखवताचे भोजन, वधूने गौरीहार पूजणे असे लौकिक विधीही केले जातात.

१६. अंत्येष्टी

माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व श्राद्ध हे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या विधींकडे पाहिले पाहिजे असे वाटते.

भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणा-या वैदिक साहित्यात मृत्यूनंतर केल्या जाणार्‍या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ आढळतात. दहनप्रसंगी म्हटल्या जाणा-र्‍या प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे.

दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे. जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले जाते.. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून  प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा.  त्यामुळे दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असताना त्यामध्ये मनात पवित्र भाव आणि दिवंगताविषयी आदरभाव असावा.

एके काळी अंत्येष्टीत (मरणानंतर केलेल्या जाणार्‍या संस्कारात) पाळल्या जाणार्‍या काही जुन्या हिंदू प्रथा :

द्वि व त्रि पुष्कर योग, पंचक, इत्यादी कुयोग टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा दहनविधी करावा. वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून अस्थिसंचय करावा. त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, अस्थी तीर्थात नेऊन विसर्जित कराव्यात. नंतर यथाकाल श्राद्धविधी करावा.

अन्त्येष्टी संस्कारामध्ये यम देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्ण होवो. त्याचे चर्म होरपळून टाकू नकोस. या दिवंगताला तू त्याच्या पितरांकडे ने. आमच्या कन्या-पुत्र यांना अयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव.

गरुड पुराणात सांगितले आहे की शव उचलण्यापूर्वी घरात एक पिंड द्यावा. शवयात्रा सुरु करण्यापूर्वी दरवाजात दुसरा पिंड द्यावा. शवयात्रा चौकात आल्यावर एक पिंड द्यावा. स्मशानात विसाव्याच्या ठिकाणी एक पिंड द्यावा आणि चितास्थानी एक पिंड द्यावा, असे एकूण पाच पिंड द्यावेत. त्यानंतर दहनाचा विधी करावा. त्यावेळी पवित्रीकरण, प्राणायाम, संकल्प, जानव्याचे अपसव्य, यमाला नमस्कार, यमाची स्तुती, स्मशानभूमीची प्रार्थना, स्मशानातीला जलाची प्रार्थना, भूमिप्रोक्षण, अग्निस्थापना, रेखाकरण, चितीकरण, सूक्त पिंडदान (प्रेताच्या कपाळ, मुख,हात व पाय या ठिकाणी सातूचे पिंड ठेवणे, शवाला पाणी पाजणे, अग्निसंस्कार, अग्नी, पितर व मृताला प्रार्थना, घटाचा स्फोट, अप्रदक्षिणा, तिलांजली असे सर्व विधी केले जातात.