सोनचाफ्याची पाऊले… सासू-सुनेच्या नात्याचं एक सुंदर तोरण

सरस्वती आणि लक्ष्मीच्या रूपाने ‘ती’ येणार….

तिचं सन्मानाने स्वागत करावं, हीच माझी मनापासून भावना! म्हणून मी, तिची लग्नाची पत्रिका उघडताच प्रथमदर्शनी,

“दारा बांधता तोरण घर नाचले नाचले,

आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले..”  याच श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संतांच्या ओळी छापल्या ! ती सोनचाफ्याच्या  पावलांनी माझ्या  घरी येणार, या कल्पनेनंच मी नवचैतन्यानं मोहरून उठले होते ! तिच्यासाठी काय करू अन् काय नको, असं झालं मला. तिच्या लग्नाच्या प्रत्येक तयारीत, क्षणाक्षणाला  मी आनंद वेचतेय…. अशी माझी अवस्था होती.

खरं तर, कधी कधी स्त्री ही स्त्रीची शत्रू होते, आणि त्यातही सासू-सुनेचं नातं हे कायम जहरी असतं, असं म्हणतात. त्यामुळे माझी सासू माझ्याशी वाईट्ट वागली, म्हणून मीही माझ्या सुनेशी तशीच वागून वचपा काढणार, अशी मनस्थिती काही ठिकाणी दिसते. याला अपवादही असतात. उदा. गोव्यातील ‘कारेंचे’ घर! काय सुंदर नातं जपलंय या घरानं! अक्षरश: गोकुळ नांदतं इथं ! दोघी जावांची मुलं कोणती, नि कोण कुणाच्या मुलांना भरवतंय, हे ही सांगणं मुश्किल! नाती ही अशीच प्रेमाने सांभाळावीत, असे मला कायम वाटत असताना, एके दिवशी अमेरिकेत पी.एच.डी. करत असलेल्या  माझ्या मुलाने आदित्यने, तो ‘प्रेमात’ असलेल्या एका मुलीचं नाव सांगितलं…. आणि मला धक्काच बसला!

प्रत्येकजण आपल्या भविष्याविषयी मनात का होईना, चित्रं चितारत असतो, स्वप्नं पहात असतो. माझ्या नि माझे पती सुनीलच्या मनातली चित्रं काही वेगळीच होती ! आदित्यच्या स्वप्नातली ‘सपना’ ही तामिळ ब्राह्मण मुलगी! त्यामुळे तिचा स्वभाव, त्यांच्या रूढी, परंपरा, संस्कृती, भाषा, खाण्यापिण्याच्या सर्व सवयी मराठी परंपरांपेक्षा नक्कीच वेगळ्या असतील! हे कट्टर शाकाहारी! माझ्या मुलाचे  कसे होणार?  असा सहज, एक आई म्हणून मला पडलेला प्रश्न ! खरं तर सपनाच्या आईवडिलांनीही काही स्वप्नं पाहिली असतील आणि मराठी मुलगा म्हणून कदाचित त्यांचा विरस झाला असू शकेल !  माझ्यावेळीही माझ्या सासूबाईंना हाच प्रश्न पडला होता. मी सारस्वत! पक्की मांसाहारी… एका कोकणस्थाबरोबर कसे जमणार? त्यात सासूबाईंचा आम्ही तिघांनीं ( सून – मी सारस्वत, व दोन जावई – क-हाडे व देशस्थ  )….. कोकणस्थ नसल्याने आणि घारेगोरे तर बिल्कुलच नसल्याने अपेक्षाभंग केलेला!  आम्ही तिघेही एकत्र आल्यावेळी सासूबाईंची त्याबद्दल चिडवून गंमत करत असू!

सपनाला मात्र मी आदित्य बरोबर कॉलेज मध्ये पाहिलं होतं. सपना आणि माझी पहिली भेट ही थोडी कोरडी होती खरी, परंतु सुरुवातीला WhatsApp  द्वारे सहा महिने एकमेकींशी चॅट करताना व फोनवर एकमेकींशी गप्पा मारताना तसेच गेल्या वर्षी प्रत्यक्ष भेटीत तिच्या लाघवी स्वभावानं मात्र माझं मन जिंकून घेतलं आणि ती मला अधिकाधिक सुंदर दिसू लागली. सौंदर्याची माझी व्याख्याच तिच्या गोड स्वभावाने बदलून टाकली. आता तर तिच्या मधुर हसण्याने मला पुरतं काबीज करून टाकलंय! तिला पहाताना *‘सुहास्य तुझे मनासी मोही…’हीच ओळ मी गुणगुणत असते.

सुरुवातीला सपनाच्या बाबतीत आदित्य समोर माझं गप्प गप्प राहणं पाहून आदित्य म्हणाला, “अगं अन्नी, सपना आणि तुझ्यात खूप साम्य आहे बरं का!  ती  सात्विक, सोज्वळ, प्रेमळ, संस्कारी, वागण्यात सरळ (straight forward ), सतत कामात गर्क (workaholic ), सुविद्य (एम.एस. इंजिनीअरिंग) आणि अतिस्वच्छता करणारी…. वगैरे वगैरे सांगून आदित्य ने माझे वीकपॉइंट्स जाणून, गुगली टाकून मला आधीच गुंडाळून टाकले आणि म्हणाला, “आई मी सपनाच्या सिएॅटलच्या घरी गेल्यावेळी, ती स्वच्छतेच्या बाबतीत, ‘इथे हे कर नि तिथे ते करू नकोस’ असे काटेकोरपणे सांगून मला ती तुझ्याचसारखी छळत असते.” हे ऐकून मला आनंदाने हर्षवायू झाला, कारण स्वच्छता हा गुण मुळात रक्तातच असावा लागतो!

माझ्या घरात जी कुणी मुलगी येईल, तिचं मी प्रेमानेच करीन; असे मात्र मी आधीच ठरवले होते. ‘सासू’ म्हणजे विष, सासू ही विखारीच असते हे सहसा समाजातील चित्र, माझ्यापुरतं तरी मी बदलायचं ठरवलं. काही ठिकाणी सासू-सुनांना एकमेकींचे कौतुक करताना पाहून मला बालपणापासून, ही मंडळी आपले आदर्श असावेत, असंच वाटायचं आणि आता तर तो निश्चय मी स्वतः मनात दृढ केलाय! आत्तापर्यंत लेकाला मी सांभाळलं, माझ्या आई-वडिलांनी, भाऊ-वहिनीने, सर्वांनी त्याचं उत्तम संगोपन केलं, चांगल्या वाईटाची जाण दिली, संगीताच्या आवडीला खतपाणी घातलं नि त्याच्यातल्या कलाकाराला बहरूही दिलं. आता सपना त्याला सांभाळणार, त्याचे लाड, कोडकौतुक तीच करणार, त्याच्या प्रत्येक सुखदु:खात सहभागी होणार, साथ देणार, त्याच्या गुणदोषासकट त्याला स्वीकारणार, त्याच्या कार्यात त्याला प्रोत्साहन देऊन मोठं करणार!  तिचं आदित्यप्रती प्रेम (आपला स्वार्थीपणा किंवा possessiveness न ठेवता) मान्य केला पाहिजे, असं मला वाटतं. आदित्यलाही मी, तिचे आईवडील हे तुझेही आईवडील म्हणून त्यांच्याशी वाग, अशी समज दिलीय आणि तीही जबाबदारी तो नक्कीच चांगली निभावेल अशी मला खात्री वाटते.

सपनाशी वागताना, मी सासू नसून तिचं आईपण निभावण्यासाठी ‘जपून टाक पाऊल साजणी…’ हे लक्षात ठेऊनसुद्धा, नात्यात कुठल्याही प्रकारचा कृत्रिमपणा येऊ न देता, सहजपणा जपला पाहिजे, जणू मी तिची जन्मदात्री आईच आहे, हे मनात खोलवर बिंबवलंय. असं वागणं खरंच कठीण असतं हे मान्य. परंतु मी खरा प्रयत्न करणार आहे. कधी जर ती लेक म्हणून कुठे चुकली तर त्याविषयी, तिच्याशीच मोकळेपणे बोलून अस्सल आईप्रमाणे चुका पोटात घालण्याचा किंवा माझे कुठे चुकले तर मनापासून सॉरी म्हणण्यात, कुठेही कसूर होता कामा नये. एकमेकींना आपण रक्ताचे नातेवाईक असल्यासारखे (कमीतकमी पुढल्या पिढीत तरी नक्कीच) वागायचा मी प्रयत्न करणार आहे.

विचारात कुठेही फरक असेल तर, एकमेकींशी सुसंवाद साधायचा प्रयत्न करीन. परंतु विषय पटलाच नाही तर मी दोन पावलं मागे जाईन, असं ठरवलंय. एकदा का तिला आपलं मानलं आणि आईच्या चष्म्यातून पाहिलं तर सगळं जग स्वच्छ नि सुंदर दिसायला लागतं!  एखादी गोष्ट आवडली नाही, पटली नाही, तर आईला (सासूला) स्पष्टपणे ती सांगण्याची जशी सुनेला मुभा हवी, तशी मुलामध्येही धमक हवी! मी एखादी गोष्ट चुकले असं आदित्यला वाटलं, तर तो आधी प्रेमाने व नंतर स्पष्टपणे (ठणकावून) मला सांगतो.  तेवढी मोकळीक त्याला त्याच्या संगोपनातून मिळालीय ! आई – मुलाचं / मुलीचं नातं हे पैसा, कष्ट, श्रम, दागिने, मालमत्ता यापलीकडचं जसं असतं, तसं हे ही सासू – सुनेचं नातं चिरंजीवी व्हावं असं मला वाटतं. कुठल्याही नात्यात देण्याघेण्यावरून वितुष्ट येऊ शकतं. त्यामुळे देण्याघेण्याची व उद्भवणाऱ्या मानपानाची अपेक्षाच ठेऊ नये. म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. सासू-सुनेचं अनुपम नातं जपण्यासाठी केवळ सुशिक्षितच असण्याची गरज नाही. अनेक अशिक्षित घरातही ही नाती मायलेकीच्या भावनेनं जपली जातात हे मी पाहिलंय. सुसंस्कृतपणा म्हणजे आणखीन काय असतं?

आदित्य – सपनाचे लग्न ठरल्याठरल्या, माझ्या उत्साही नि कामसू मेंदूने नेहमीप्रमाणे पटापट सगळी कामे करायची ठरवले.  दुसऱ्याच दिवशी जाऊन आमच्या परिसरातले सगळे हॉल पिंजून काढले नि एक सुंदर नि विख्यात हॉल बुक केलाही. आहेराचं देणं घेणं कोणीही करू नये असंच मी सर्वानुमते ठरवलं. हे माझं मत, आज सगळे सुखवस्तू असल्याने प्रत्येकाला पटलं. सपनाच्या सर्व दागिन्यांची तिच्या पसंतीने WhatsApp  वर फोटो पाठवून खरेदी केली. साड्यांचीही खरेदी झाली. सारे काही मी व माझी थोरली चित्रकार बहीण, उषाताईने आनंदाने पत्रिकेचे डिझाईन, डेकोरेटर, केटरर, इ. कामांची सवयीने पटापट सुरुवात केली. सपना ही आमचीच आहे, त्यामुळे तिचे माझे वेगळे किंवा ही कामे तिच्या आईवडिलांनी मुलीचे आई वडील म्हणून करावीत हे माझ्या ध्यानीमनीही चुकून आले नाही. एके दिवशी सपनाचा फोन आला नि मला म्हणाली, “अन्नी तुम्ही घर, प्रवास, लेखन, कार्यक्रम सांभाळून किती धावाधाव करताय? त्यात लग्नासंबंधी  सगळीच कामं तुमच्यावर तुम्ही ओढवून घेतलीत. खरं तर लग्नाच्या वेळी, मुलीचे आईवडील अशी सगळी धावपळ करतात नि मुलाचे आईवडील नुसते पाहुणे म्हणून लग्नात येऊन सोफ्यावर बसलेले असतात. यहाँ तो उलटी गंगा बह रही है ! तेव्हा प्लीज माझ्याही आईवडिलांना काही कामे सांगा ना ! सगळी दगदग तुम्हीच करू नका!” सपनाने हे सारे सांगेपर्यंत,केवळ आईच्या ममतेच्या चष्म्यातून मी पहात असल्याने, मी ‘वरमाय’ आहे हे माझ्या ध्यानीमनीही आले नव्हते, याची मलाच खूप गंमत वाटली आणि आनंदही झाला.

लग्नानंतर काही महिने सलग, सपनाचे व माझे फोनवर प्रेमाचे बोलणे होत असे. परंतु मधेच अचानक ती संपर्क साधेना, त्यावेळी माझा जीव कासावीस झाला! मग लक्षात आले की आम्ही दोघीही व्यस्त आणि त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, आपला दिवस तो त्यांची रात्र व त्यांचा दिवस ती आपली रात्र, यामुळे आमची जास्त चुकामूक होतेय! त्यावेळी सपना ऑफिसच्या एक अत्यंत महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये तीन आठवडे गुंतल्यामुळे अनेकदा जेवायलाही आणि विश्रांतीलाही तिला सवड मिळत नसे. घरी आल्यावर थकून भागून पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी करणे, जेवण आणि इतर अनेक गोष्टी स्वतः करणे या धावपळीत ती अडकल्याने मीही तिला समजून घेतले. पुन्हा मात्र तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर, तिचा सविस्तर फोन आल्यावर, माझी घुसमट पूर्णपणे थांबली. गेल्याच महिन्यात २८ डिसेंबरला  आदित्य सपनाच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं.

या दिवाळीत मी तिला काही दागिने व ब्लाऊजेस शिवून दोन जरीच्या रेशमी साड्यांबरोबर पाठवले. सपनाने त्वरित मला व्हिडिओ कॉलवर, हौसेने दागिने घालून व साड्या नेसून दाखवल्या. आणि सगळे काही मनापासून आवडल्याचे सांगितले. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही खूप समाधान वाटले.

परंतु मुंबईतील दिवाळी पहाटच्या माझ्या कार्यक्रमातील काही भाग, सुनीलनी आदित्य – सपनाला जेव्हा व्हिडिओ कॉलवर अमेरिकेत लाईव्ह ऐकवला त्यावेळी सपना म्हणाली, “आजपर्यंतची मला मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट होती….” तिचे हे वाक्य मला अनेक गोष्टींची जाणीव देऊन गेले. ते म्हणजे, केवळ वस्तूंमध्ये जीव न अडकवता, सपनाचा या वयात, संगीताच्या जाणिवेबद्दलचा, प्रगल्भपणा मला सुखावून गेला.  यावर माझा जिवलग भाऊ विनायक मला म्हणाला, “दीदी, तुला सपनाशी कायमचे रेशमी आणि नाजूक बंध जपायचे असतील तर, आधी तिच्या आईवडिलांचंही मन सांभाळ.” असा नात्यांचा दोन्हीकडून सुंदर आश्वासक गोफ कसा विणावा यावर रामबाण उपाय सांगितला. नुकतीच सपनाची आई रेवती तिच्याकडे सियाटलला गेल्यावेळी, सपनासाठी तिला आवडणारा मध, तूप, फराळ असा खाऊ मी पाठवला. त्यावेळी ‘तुझ्या सुनेला सगळा खाऊ दिला बरं का !’ म्हणून सांगायला रेवतीचा फोन आला. त्यावेळी मी म्हटलं, “अगं ती माझी सून नाही काही, माझी लेकच आहे नि माझ्या लेकाला आदित्यला मी तुम्हाला बहाल केलाय!” खरंच माझ्या तोंडून हे उद्गार अगदी मनापासून आले. रेवतीने सपनाला जन्म दिला, तिला उत्तम संस्कार देऊन तिचं पालनपोषण करून शिक्षण देऊन एम.एस. करून, सुविद्य बनवून आमच्या स्वाधीन  केलं.  हा प्रत्येक मुलीच्या आईचा मोठेपणा असतो. तसेच तिची संस्कारित मुलगी मला रेडिमेड मिळाली याचा मलाही खूप आनंद झालाय.  त्यावर रेवती  गंमतीने म्हणाली, “ हो हो पद्मजा, तुझीच लेक बरं का…. मला ठाऊक आहे, जरी मी सपनाला नुसत्या घरगुती वेषात तुझ्याकडे पाठवलं तरी ती सुखी राहील….” तिचं हे वाक्य, मला मोठ्ठं सर्टिफिकेट असल्यासारखं आयुष्यभराचं समाधान देऊन गेलं!

              पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर.