महाराज श्री स्वामी समर्थ 

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा दिलासादायक आणि सकारात्मक गुरुमंत्र देणारे स्वामी समर्थ महाराज चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हेच नंतर स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. मी नृसिंह भान असून, श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे, असे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सूचवतात.

मी नृसिंह भान असून, श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे, असे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सूचवतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा दिलासादायक आणि सकारात्मक गुरुमंत्र देणारे स्वामी समर्थ महाराज.

इ.स. १४५९ मध्ये माघ वद्य प्रतिपदा या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त करून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या कालावधीत मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ उभे केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली व वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट झाले. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत. आपल्या हातून महापुरुष जखमी झाला, या विचाराने उद्धवाला अत्यंत दुःख झाले व भय वाटू लागले. पण, भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकाता येथे गेले. महाकाली मातेचे दर्शन घेऊन काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले, असे सांगितले जाते.

श्री दत्तात्रेयांचे अवतार मानल्या जाणाऱ्या स्वामी समर्थांचा प्रकट दिनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या मठात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासह प्रत्येक समर्थ मठात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

इ. स. १८७५ च्या सुमारास महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता; तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी स्वामी समर्थांनी फडके यांना ‘सध्या लढायची वेळ नाही’, असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थांनीच शेगावचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा महाराज यांना दीक्षा दिल्याची मान्यता आहे.

स्वामी समर्थांचे देशभ्रमण

अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन, असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे. शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते.

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,
उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ,
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.
श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||