गेली १८ वर्षे स्वयंसेतू पिडित, निराधार, समस्याग्रस्त महिला व मुलांच्या समस्या निवारण, समुपदेशन व पुनर्वसन या विषयांवर कार्यरत आहे. याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी, शाळा, महाविद्यालये, महिला मंडळ यातून सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत जाणीव जागृती व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. आजवर सातशेहून अधिक समस्याग्रस्तांच्या प्रकरणांत सल्ला, समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले असून शेकडो कुटुंबांना आधार देण्यात आला आहे. तसेच तीनशेहून अधिक चर्चासत्रांच्या माध्यमातून तळागाळातील महिला व मुलांशी संवाद साधण्यात आला आहे.हे कार्य करीत असताना शालेय, महाविद्यालयीन मुलांना लैंगिक शिक्षण देणं आवश्यक असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानिक प्रशासन व शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून उपक्रम राबविण्याचा प्रयत्न गेली ८ वर्षे करण्यात आला. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही परंतु अलिकडे मोबाईल, व्हॉटस्‌ऍप व सोशल मिडियामुळे तरूण पिढीमध्ये लैंगिकतेबाबत निर्माण होणारी उत्सुकता, भावना उद्दिपित करणार्‍या अश्‍लिल फिल्मस्, त्यातून मिळणारी अशास्त्रीय, चुकीची माहिती यामुळे बहुसंख्य तरूणवर्ग संभ्रमित झालेला दिसतो. या अज्ञानामुळे त्यांच्या हातून विनयभंग, छेडछाड, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे घडताना दिसतात. यासाठी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर लैंगिक शिक्षण देणे ही काळाची गरज झाली आहे. याची जाणीव काही शाळांतून झाल्यामुळे त्यांनी या विषयावर विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे भविष्यात वाट चुकण्यापेक्षा योग्य शास्त्रीय माहितीच्या आधारे आपल्या जीवनाची वाटचाल करावी या हेतूने आमच्यासारख्या संस्थांना सहकार्य देण्याचे ठरवले आहे.नुकताच लांजा तालुक्यातील सापूचे तळे येथील माध्यमिक शाळेतील इ. ७ ते ९ वीच्या विद्यार्थीनींशी लैंगिक शिक्षण अर्थात शारिरीक शिक्षण यावर मुक्तसंवाद साधण्यात आला. यावेळी मासिक पाळी म्हणजे काय? तिचा पुढील आयुष्यात कसा उपयोग होतो? ती मुलींनाच येते का? मुलांना का येत नाही? या काळात शिवाशिव का पाळतात? त्याला शास्त्रीय आधार आहे की न पाळल्यास ‘देवाचा कोप’ होतो हे खरे आहे की अंधश्रद्धा? पुरुषांनी स्पर्श केल्यास, मिठी किंवा चुंबन घेतल्यास गर्भधारणा होते का? पाळी नियमित येणे गरजेचे आहे का? इ. अनेक प्रश्‍न मुलींनी विचारले. त्याला समर्पक अशी उत्तरे समुपदेशक श्रद्धा कळंबटे यांनी दिली. काही वेळा प्रत्यक्ष उदाहरणे देऊन त्यांनी मुलींना ‘आपल्या शरीरातील महत्वाच्या चार अवयवांशी कोणालाही छेडछाड करण्याची परवानगी देऊ नये. आपल्या वैवाहिक जीवनाशी या चार अवयवांचा प्रत्यक्ष संबंध येत असल्याने त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. दुर्दैवाने तशी वेळ कुणावर आल्यास ताबडतोब घरी, शाळेत किंवा मैत्रिणींना सांगून त्याला प्रतिबंध करावा’ अशी महत्वपूर्ण माहिती दिली. यावेळी काही मातापालक उपस्थित होते. त्यांनीही आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.कार्यक्रम संपल्यानंतर ‘आजवर आमच्याशी कुणीही अशाप्रकारे आमच्या शरीराबद्दल बोलले नाही, आज आम्हाला खूप महत्वाची माहिती समजली. मासिक पाळी बाबतच्या अंधश्रद्धा दूर झाल्या’ अशा प्रतिक्रिया विद्यार्थीनींनी दिल्या. भविष्यात आम्ही स्वतःची काळजी नक्की घेऊ असे आश्‍वासनही दिले. यावेळी मुलांनासुद्धा या शिक्षणाची अत्यंत गरज असल्याने भविष्यात त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्यात येईल. इच्छुकांनी स्वयंसेतूशी संपर्क साधावा. यासंदर्भात कोणाला माहिती किंवा मार्गदर्शन हवे असल्यास ९४२२४३०३६२ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा

 • पत्रव्यवहारासाठी पत्ता

  चिंतामणी,आनंदनगर,
  थिबापॅलेस रोड,रत्नागिरी.

 • दूरध्वनी

  [02352]225430

  9422430362

  श्री. विनय परांजपे-

  9922260641
  श्री.शिरीष दामले –

  9423875402